परमहंस ही रामकृष्ण ( Ramkrishna Paramhans ) यांना मिळालेली पदवी होती. परमहंस म्हणजे संसारी बंधनातून मुक्त होऊन अंतिम सत्यापर्यंत पोहोचून आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे. महान अध्यात्मिक गुरु, संत आणि परमहंस रामकृष्ण यांचा जन्म पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील कामारपुकुर गावात 18 फेब्रुवारी 1836 रोजी एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला होता.
त्यांच्या आई-वडिलांना एकूण चार अपत्ये होती व रामकृष्ण हे सर्वात धाकटे होते. त्यांच्या वडिलांचे नाव खुदीराम चटोपाध्याय आणि आईचे नाव चंद्रमणी देवी असे होते.चंद्रमणी देवी ही त्यांच्या वडिलांची दुसरी पत्नी होती. त्यांच्या वडिलांकडे बरीच संपत्ती होती परंतु एका बेईमान रामानंद रॉय नावाच्या माणसाने खोटा दावा दाखल करून ती हडप केली होती. संपत्ती फुकट गेल्यानंतर त्यांचे वडील सुखलाल गोस्वामी नावाच्या त्यांच्या मित्राकडे पोटापाण्यासाठी गेले.
त्यांच्या मित्राने त्यांना काही जमीन उदरनिर्वाह करण्यासाठी फुकट दिली होती.कष्ट करून पोट भरणाऱ्या आणि सतत भगवंताचे स्मरण करणाऱ्या पिता खुदीराम यांच्या स्वप्नात एक दिवस त्यांच्या पोटी साक्षात विष्णू रुपी मुलगा जन्माला येईल असे आले होते. तसेच चंद्रमणी देवीला एका शिवमंदिरात महादेव दर्शन करत असताना महादेवाच्या पिंडीतून प्रकाश त्यांच्या पोटात आल्याचे जाणवले.
सुरुवातीपासून खुदीराम आणि चंद्रमणी देवी राम भक्त होते. म्हणून त्यांनी या मुलाचे नाव गदाधर असे ठेवले होते नंतर काही दिवसांनी ते बदलून त्यांचे नाव रामकृष्ण असे ठेवण्यात आले. लहानपणा पासून रामकृष्णला औपचारिक शिक्षणाची,संसारी गोष्टींची आणि अध्यात्माची फार आवड होती. तसेच त्याला चित्र काढण्याची आणि गायनाची सुद्धा फार आवड होती. पुढे ते संतांची सेवा करण्यात आणि प्रवचन ऐकण्यात दंग होऊ लागले. संतांच्या प्रवचनातून परमानंदाचा आनंद कसा असतो हे ऐकून त्यांची परमानंद इच्छा जागृत झाली. पुढे त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मनातील वैराग्याची भावना अधिकच रूढ होत चालली होती. पुढे जेव्हा ते सोळा वर्षाचे झाले तेव्हा त्यांना त्यांचा भाऊ रामकुमार यांनी पुरोहितांची व कालिका माता मंदिरात सेवा व नोकरी करण्यासाठी कलकत्त्याला नेले. पुढे सन 1855 मध्ये राणी रासमणी हिने दक्षिणेश्वर मधील काली माता मंदिराचा जीर्णोद्धार करून मातेचा मोठा अभिषेक केला. या मंदिरात नंतर रामकृष्ण यांची पुजारी म्हणून नियुक्ती झाली. रामकृष्ण यांनी काली मातेची फार मनापासून भक्ती आणि प्रेमपूर्वक आराधना केली. त्यांनी पुरोहित कर्तव्याचे अनुष्ठान विसरून अनेक वर्ष काली मातेची तपचर्या केली.
पुढे अनेक चमत्कारामधून काली माता राम कृष्ण यांना प्रसन्न झाल्याचे संकेत मिळाले. नंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा विवाह जयरामबती गावच्या शारदा देवी बरोबर लावून दिला. लग्नानंतर रामकृष्ण जास्तच कठोर आध्यात्मिक साधना करायला लागले. तीव्र अंतरीक इच्छेमुळे त्यांनी अनेक गुरूंच्या मदतीने हिंदू शास्त्रातील वेगवेगळ्या मार्गाने ईश्वर साक्षात्कार मिळण्यासाठी प्रयत्न केला.
त्यांना शास्त्र विद्येमध्ये पारंगत असलेल्या एका भैरवी नावाच्या ब्राह्मण महिलेने कठीण विद्येचा तांत्रिक मार्गाने अभ्यास घडवला व त्यामध्ये यश मिळवून दिले. पुढे नंतर तीन वर्षांनी तोतापुरी नावाच्या साधूने सहा महिने अद्वैत अवस्थेत राहून श्रीराम कृष्ण यांना हिंदू धर्मातील 3000 पेक्षा जास्त अध्यात्मिक अनुभवांची एक श्रृंखला पुनर्जीवित करून सांगितली. रामकृष्ण यांची नेहमी ईश्वराच्या प्रती भूक अपूर्ण राहत असे. त्यामुळे त्यांनी काही काळ हिंदू धर्मा बरोबरच इस्लाम ईसाई धर्मांसारख्या धर्मांचा अभ्यास करून सर्वोच्च बोध प्राप्त करून घेतले. त्यांनी तथागत बुद्धाला ईश्वराच्या रूपात पाहिले.
तसेच त्यांनी दहा शीख गुरूंचा सन्मान केला होता. रामकृष्ण यांनी बारा वर्षांचा आध्यात्मिक बोध पूर्ण करून “ यतो मत, ततोपथ” म्हणजे जितका विश्वास तेवढे मार्ग असा उपदेश सर्व जगाला सांगितला. त्यांच्या सांगण्यानुसार ईश्वरावर विश्वास असणाऱ्या सर्वांना प्राणीमात्रांमध्ये सुद्धा ईश्वर दिसतो. एक दिवस रामकृष्ण यांची पत्नी शारदा त्यांना भेटण्यासाठी इस 1872 मध्ये गावाकडून दक्षिणेश्वर येथे आली होती.
पत्नीला सर्व अध्यात्मिक जीवन समजावून सांगून त्यांनी पत्नीचे स्वागत केले. तसेच त्यांच्या पत्नी काही दिवस दक्षिणेश्वर मंदिरामध्ये त्यांनी आपल्या सोबत मुक्कामी ठेवल्या. ते नेहमी आपल्या दिव्य पत्नीला ईश्वराप्रमाणे पूजत होते. त्यानंतर त्यांची पत्नी त्यांच्यासोबत आध्यात्मिक जीवनात राहू लागली. कारण राम कृष्ण यांनी संन्यास घेतला होता. ते एका भिक्षूच्या रूपात राहत होते.
म्हणून ते भिक्षुसारखे पवित्र राहून पत्नीची देवाप्रमाणे पूजा करत असत. तसेच श्री रामकृष्ण यांची दक्षिणेश्वर मंदिरामध्ये राणी रासमणी सुद्धा रक्षक म्हणून काम करत होत्या. राणी रासमणी यांच्या मृत्यूनंतर भक्त मथुरानाथ बिश्वास रामकृष्ण यांची देखभाल करू लागले. एक प्रख्यात संत, अध्यात्मिक गुरु आणि परमहंस म्हणून रामकृष्ण यांचे नाव आता सातापार पसरले होते. एक वेळी माथूर राजाने सर्व विद्वानांची सभा घेण्याचे ठरवले. त्यामध्ये रामकृष्ण परमहंस यांना आधुनिक युगातील अवतार घोषित केले. तेव्हा राजा राम मोहन राय यांचे सामाजिक धार्मिक आंदोलन सुरू होते.
त्यामुळे रामकृष्ण यांचा अनेक सामाजिक,धार्मिक आणि आध्यात्मिक संघटनेतील नेत्यांसी, सदस्यांशी, गुरूंशी, शिष्यांबरोबर आणि संतांबरोबर संबंध आल्यामुळे त्याचा अधिक प्रभाव वाढला. धर्म सामंजस्य संघटनेमुळे त्यांनी विभिन्न संप्रदायातील लोकांना आपल्याकडे आकर्षित केले होते. त्यामुळे दक्षिणेश्वर मंदिर एक धर्म संसद बनले होते. आता प्रचंड मोठ्या संख्येने भक्त रामकृष्ण परमहंस यांच्याकडे येत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या भक्तांना दोन भागात विभागले होते.
एक गृहस्थ लोकांचा आणि दुसरा शिक्षित युवकांचा. त्यातील गृहस्थ लोकांना आपल्या प्रपंचात राहुन अध्यात्मिक कसे जगायचे ते शिकवत असत आणि युवकांना भिक्षू बनवून मानव जातीच्या कल्याणासाठी कसे काम करायचे ते शिकवत असत. या युवकांमधील एक नरेंद्रनाथ म्हणजे स्वामी विवेकानंद होते. त्यांनी रामकृष्ण परमहंस यांना गुरु मानून त्यांच्या आज्ञेनुसार वेदांताचे सार्वभौम संदेश जगात सर्वत्र पसरवले व हिंदू धर्माला पुनर्जीवित करून भारताचा आत्मा जागृत केला.
राम कृष्ण परमहंस यांनी कुठलेही पुस्तके लिहिली नाहीत तसेच सार्वजनिक व्याख्यानेही दिली नाहीत. परंतु त्यांच्या दृष्टांतानुसार समाजातील अनेक घटकांना प्रापंचिक आणि अध्यात्मिक जीवन जगण्यासाठी मोठा उपयोग झाला. त्यांची भाषा बंगालमधील अभिजात वर्गाला आकर्षित करणारी होती. रामकृष्ण परमहंस यांच्या शिकवणीने प्रभावित होऊन महेंद्रनाथ गुप्ता यांनी त्यांच्या सर्व संदेशांची दखल घेऊन “ श्रीराम कृष्ण कथामृत “ नावाचे पुस्तक प्रकाशित केलेले आहे.
पुढे इस 1942 मध्ये या पुस्तकाचे इंग्रजी मध्ये अनुवादन केलेले असून त्या पुस्तकाला “द गोस्पेल ऑफ श्री रामकृष्ण”असे नाव देण्यात आलेले आहे. आजही ही दोन्ही पुस्तके फार प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. श्रीराम कृष्ण परमहंस यांचा कठोर परिश्रमाने अध्यात्मिक प्रवास केल्यामुळे आणि साधकांप्रती प्रेम ठेवून अनेक प्रकारचे कष्ट केल्यामुळे पुढे काही दिवसांनी त्यांचे स्वास्थ्य त्यांना साथ देत नव्हते.
तसेच इस 1885 मध्ये त्यांना घशाचा कॅन्सर झाल्यामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. त्यांचे शिष्य दिवस-रात्र त्यांची सेवा करत होते. परंतु त्यांची तब्येत काही केल्या साथ देईना त्यामुळे शेवटी श्रीराम कृष्ण परमहंस यांनी 16 ऑगस्ट 1886 रोजी सकाळी काली मातेचे नाव घेऊन आपल्या भौतिक शरीराचा त्याग केला. ते ज्या ठिकाणी अनंतात विलीन झाले त्या ठिकानाला आज “श्री रामकृष्ण परमहंस मठ” म्हणून ओळखले जाते.