आरती नंतर काय म्हणायचे तर “मंत्रपुष्पांजली”( Mantrapushpanjali ) . थोडक्यात आपण आपल्या आराध्य दैवताची आरती करतो आणि त्यानंतर धुपारती करतो आणि त्यानंतर एक प्रकारचा पाठ करतो तो म्हणजे “मंत्र पुष्पांजली”. म्हणजे गणपतीच्या आरती नंतर “मोरया मोरया मी बाळ तहाने” “आरंभी विनंती करू विद्या दया सागरा,” किंवा “सदा सर्वदा योग तुझा घडावा” तसेच देवीचा उत्सव असेल तर देवीचे अथर्व पठण किंवा श्री सूक्त.
त्याचप्रमाणे आपण जे पुजन करतो मग ते सत्यनारायणाचे असो, रुद्राचे असो, किंवा गणेशोत्सवामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी जे पूजन करतो ते शोडोपचार म्हणजे 16 उपचाराचे पूजन असते. या 16 पैकी एक म्हणजे “मंत्रपुष्पांजली” होय. आणि ही मंत्र पुष्पांजली आरती नंतर घेतली जाते. मंत्र पुष्पांजली ही वैदिक आहे. म्हणजे ती वेदांमधून घेतलेली असते. म्हणून ती संस्कृत मध्ये असते. त्यामुळे अनेकांना तिचा अर्थ समजलेला नसतो. परंतु कोणत्याही मंत्र पुष्पांजली चा जर आपणाला अर्थ समजला तर ती आपल्या अंगवळणी पडेल म्हणजे ती म्हणताना आपल्याला आनंद मिळेल. याकरिता आपण ती समजून घेतली पाहिजे.
मंत्र, पुष्प आणि अंजली म्हणजे “मंत्रपुष्पांजली”. (Mantrapushpanjali ) मंत्र म्हणजे वैदिक शब्दांचा संग्रह, पुष्प म्हणजे फुले आणि अंजली म्हणजे ओंजळ. थोडक्यात आरतीनंतर आपल्याला देवावर फुले अर्पण करणे नव्हे तर मंत्र पुष्प म्हणजे मंत्राचे पुष्प अर्पण करायचे आहेत. त्याचप्रमाणे अंजली हा सुद्धा शब्द फार महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे मारुती स्तोत्र हे समर्थांनी लिहिले आहे आणि मारुती हे त्यांचे अधिष्ठान आहे तसं या मंत्रपुष्पांजली मध्ये असलेल्या मंत्रांचा कोणीही कर्ता नसून त्याचे कोणतेही एक आराध्य नाही कारण ते मंत्र वेदातून आलेले आहेत. आणि जरी ते वेदोक्त असले तरी ते वेदांतून वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतलेले असतात. ते एक संघ नाहीत. म्हणून ते एकत्र करून अंजली म्हणजे ओंजळीत घेऊन अर्पण करणे. हे मंत्र रूपाचे पुष्प ओंजळीत घेऊन परमेश्वराला अर्पण करणे म्हणजे “मंत्रपुष्पांजली” बोलणे.
मंत्रपुष्पांजली मध्ये चार श्लोक आहेत आणि चारही श्लोकाचे अधिष्ठान वेगवेगळे आहेत. पहिल्या श्लोकाचे अधिष्ठान “यज्ञ” असून त्यामध्ये यज्ञाचा महिमा वर्णन केलेला आहे. म्हणजे यज्ञ देव आणि साध्य: मिळून पहिला श्लोक आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये आराध्य दैवत कुबेराचे वंदन, नमन आणि स्तुती केलेली आहे. तिसरा श्लोक अत्यंत सुंदर असून त्यामध्ये सार्वभौम राज्याची कल्पना मांडलेली आहे. आणि चौथ्या श्लोकामध्ये सार्वभौम राज्याच्या अधिपतीचे आणि राज्याचे एकत्रितपणे स्तुतिगान केलेले आहे. किंवा अभि गीत गायलेले आहे.
ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् | ते हं नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवाः ॥
येथे साध्या: म्हणजे देव आणि देवा: म्हणजे अनेक देव. थोडक्यात साध्या: म्हणजे प्रजापती ब्रह्मा, विष्णू किंवा महेश आणि देवा: म्हणजे इंद्रादि जे 33 कोटी देव आहेत ते इंद्र,वायू,अग्नी,वरून, इत्यादी हे सर्व देव.वरील पुष्पांजली चा अर्थ असा सांगितला जातो की देवांनी सर्वात प्रथम यज्ञ केलेले आहेत. तसे पाहता सर्वात प्रथम अत्रि ऋषींनी यज्ञाची सुरुवात केली होती. यज्ञाचे वर्णन करताना काय काय होऊ शकते याचा सारांश सांगणारा वरील श्लोक आहे. त्यामध्ये सांगितले आहे की जे 33 कोटी देव आहेत त्यांनी अशा यज्ञांच्या सहाय्याने यज्ञ देव म्हणजे साध्या: यांचे यजन करून ( एजन करणे म्हणजे यज्ञाच्या सहाय्याने केली जाणारी आराधना ) नाकं म्हणजे दुःख रहित, सुखाच्या स्वर्गात स्थान मिळाले. म्हणजे सर्व 33 कोटी देवांनी साध्या: ( ब्रह्म विष्णू आणि महेश ) देवासारखे स्वर्गात स्थान मिळवले. असा वरील मंत्राचा अर्थ होतो.
ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने | नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
वरील मंत्राचा अर्थ असा होतो की, मी वैश्रवणायाला म्हणजे विस्रवाचा मुलगा वैश्रवण याला मी वंदन करतो. विस्रवा हा कुलस्ते ऋषींचा मुलगा आणि त्या विस्रवाच्या मुलाला म्हणजे वैश्रवणायला मी वंदन करतो. म्हणजेच राजाधिराज असा जो कोणी आहे त्याला मी वंदन करतो, तसेच प्रसह्य साहिनै म्हणजे युद्धामध्ये ज्याला सत्वर विजय मिळतो असा जो कोणी असेल त्यालाही मी वंदन करतो.
स मे कामान्कामकामाय मह्यम् | कामेश्वरो वैश्रवणो ददातु | कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः II
वरील मंत्राचा असा अर्थ होतो की, वैश्रवनाय यांच्याकडे मागणी केली आहे की,मी मनुष्य सदैव कामनांनी व्याप्त आहे. म्हणजे माझ्या मध्ये अनेक इच्छा जागृत आहेत. माझ्या पूर्ण न होणाऱ्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद देणारे राजाधिराज, वैश्रवण, कामेश्वर म्हणजे शेवटच्या चरणातील कुबेर आहेत. म्हणून मी त्या महाराजाला वंदन करतो. कुबेर यक्षराज आहेत. वैश्रवा आणि इडाविडा यांचा पुत्र “कुबेर” देवांचे खजिनदार आहेत. म्हणून दिवाळीमध्ये किंवा इतर कधीही पूजा करत असताना अनेक जण हा मंत्र मंत्रपुष्पांजली म्हणून म्हणतात.
ॐ स्वस्ति,साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं l वैराज्यं पारमेष्ठ्यं महाराज्यमाधिपत्यं ll समंतपर्यायीसात्सर्वभौमः सर्वयुष l आंतादापरधात्पृथिव्यै ll पृथिव्या समुद्रापर्यंत या एकराळिति ll
सर्वात प्रथम सांगितले आहे ओम स्वस्ति म्हणजे सर्व मंगल असे साम्राज्य, साम्राज्यं भौज्यं,वैराज्यं,पारमेष्ठ्यं अशा पाच प्रकारच्या राज्यांमध्ये सर्व काही मंगल मांगल्ये घडू दे. साम्राज्य म्हणजे विशाल राज्य. ज्याच्या कक्षा रुंदावल्या आहेत असे राज्य. साम्राज्य भौज्यं म्हणजे असं राज्य की जिथे सर्व सुख सुविधा उपलब्ध आहेत. सगळीकडे आनंदी आनंद आहे.
शिक्षणासहित सर्व प्रकारच्या सुविधा त्या राज्यात लोक भोगत आहेत. पुढे स्वाराज्यं येते. म्हणजे हे लोकशाही पद्धतीने चाललेलं राज्य असावं. त्यापुढे वैराज्यं येते म्हणजे अशा या स्वराज्यात कोणाला कोणाचे लुटावे वाटत नाही. नीतीने कमवून आपले जीवन जगणाऱ्या या राज्यात लोकांच्या मनात वैराग्याची भावना निर्माण व्हावी असे या शब्दातून व्यक्त केले जाते. तसेच श्लोकाच्या शेवटी पारमेष्ठ्यं राज्य येण्याची विनंती केली जाते.
पारमेष्ठ्यं म्हणजे या राज्यातील लोकांच्या मनात सगळं काही व्यवस्थित मिळायला लागल्यामुळे वैराग्याची भावना निर्माण झालेली असल्यामुळे हे राज्य आता परमेश्वर नियमाने चाललेले आहे. म्हणून हे राज्य आता पारमेष्ठ्यं झालेले आहे. पुढे म्हटले आहे की,महाराज्यमाधिपत्यं म्हणजे या राज्यात सत्ता उपभोगण्यासाठी नव्हे तर लोकांची सेवा करणारा महाराजा असावा, तो मंत्री नव्हे तर सेवक असावा.
पुढे म्हटले आहे की हे राज्य समंतपर्यायीसात्सर्वभौमः म्हणजे या राज्याच्या सीमा क्षितिजापर्यंत पसरलेल्या असाव्यात, हे राज्य दीर्घायुष्य असावं, हे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत असावं, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत ते सुरक्षित राहावं, ते दीर्घायुष्य राहावं. पुढे पृथिव्या समुद्रापर्यंत या एकराळिति म्हणजे या संपूर्ण पृथ्वी वरती एकच राज्य असो. म्हणजेच संपूर्ण मानव जातीचे एकच राज्य असावं. ते राज्य सार्वभौम असावं, भोज्य असावं, एकाच राजाच्या अधिपत्याखाली असावं, त्या राज्याचा राजा प्रधान सेवक असावा, अशा या राज्याचं आणि राजाचं स्तुती गीत गाण्यासाठी हा चौथा श्लोक आहे.
मरुतः परिवेष्टारो मरुतःl अवक्षितस्य कामप्रेसर्विश्वेदेवाः सभासद इति ll
मरुत म्हणजे सृष्टी चालवणाऱ्या 50 गणांपैकी एक मरुत पुत्र मारुती. अशा वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या गणांनी सृष्टीला परिवेष्टारो म्हणजे वेढलेले आहे. ते सृष्टीला वेगवान करत आहेत. अशा मरुत: राजासारखे प्रधान सेवक सृष्टीला हवेत. म्हणून प्रार्थना केली आहे की आमचं राज्य सम्राट मरूत:च्या अधिपत्याखाली असावं. कारण त्याच्या घरी विश्व देव निवास करत आहेत. किंवा त्याच्या सभेचे ते सदस्य आहेत. अशा राजाच्या अधिपत्याखाली आमचे राज्य असो आणि मी त्या राज्याचा सभासद असू दे.
आजच्या काळामध्ये मंत्र पुष्पांजली चे खूप महत्त्व आहे कारण या धावत्या जगात कलयुगात मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये अनेक मत मतांतरे आणि हेवे दावे वाढत चाललेले आहेत. अशा युगात सार्वभौम राज्याची कल्पना किंवा प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे. म्हणून नुकत्याच झालेल्या विश्व हिंदू परिषद G20 मध्ये भारताने “ हे विश्वची माझे घर “ संकल्पना मांडलेली आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या “पसायदान” या विश्वप्रार्थने मध्ये जे काही मागितले आहे ते संपूर्ण विश्वासाठी मागितले आहे. म्हणून पसायदान श्रेष्ठ आहे. मंत्र पुष्पांजली म्हणत असताना प्रार्थना बरोबर संकल्पही करावा. मंत्रपुष्पांजली ग्रुप मध्ये म्हणताना त्याचा जास्त इफेक्ट पडतो.