गणपती आरती अर्थ I Ganapati Aarti

आरती म्हणजे आर्त, हृदयापासून निघालेले शब्द,अंतकरणातून देवाला मारलेली हाक होय. कोणत्याही देवाचे स्तुती वर्णन, महती आणि देवाला केलेली प्रार्थना आरती मध्ये सामाविष्ट असते. गणपती देवाची आरती ( Ganapati Aarti ) महाराष्ट्राचे संत आणि थोर कवी श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली असून आरती मधील सर्व काव्य प्रथम श्री समर्थ रामदास स्वामींच्या तोंडून आलेले आहेत.

अशा प्रकारची आरती आपल्या सर्वांचे आराध्य दैवत, बुद्धीची देवता “श्री गणेश” देवाची घरोघरी रोजच्या पूजेमध्ये, प्रत्येक मंगल कार्याच्या ठिकाणी आणि गणेशोत्सवात नेहमी म्हटली जाते. तसेच कुठल्याही पूजेनंतर म्हटल्या जाणाऱ्या आरत्या पैकी गणपतीची आरती प्रथम म्हटली जाते. श्री समर्थ रामदास स्वामींना पुण्यातील मोरगाव येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या गणपतीच्या मूर्तीला पाहून सुचलेले हे काव्य आहेत.

सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची|

नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |

सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|

कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥

जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|

दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥

रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|

चंदनाची उटी , कुमकुम केशरा|

हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |

रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥

लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |

सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|

दास रामाचा, वाट पाहे सदना|

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|

जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥

सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची|

नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |

      आरती मध्ये गणपती देवाला संबोधून सुखकर्ता म्हणजे सुख देणारा आणि दुःखहर्ता म्हणजे दुःखाचा नायनाट करणारा, दुःख हरवणारा तू श्री गणेशा. वार्ता म्हणजे बातमी आणि विघ्नाची म्हणजे वाईट गोष्टीची किंवा संकटाची. अशी दुःख देणारी बातमी आमच्या जवळ येऊ देऊ नकोस. नूरवी म्हणजे माझ्या जीवनात दुःख उरु देऊ नको, दुःखाचा नाश कर, आमचे दुःख तू समूळ नष्ट कर. तू आम्हाला प्रेम पुरव आणि तुझी कृपा आमच्यावर सदैव राहू दे.

सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची | कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥

 वरील काव्यामध्ये श्री गणेश सर्वांगाने फार सुंदर असून त्याच्या अंगाला शेंदुराची उटी लावलेली आहे. श्री गणेशाच्या कंठी मोत्याची माळ झळकत आहे म्हणजे सुंदर,उठून दिसत आहे. आमच्या दृष्टीने ती मुक्ताफळे दिसत आहेत.

जय देव, जय देव जय मंगलमूर्ती I दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥

 जय देव जय देव म्हणजे तुझा जय जयकार असो. तू मंगलमय आहेस. तुझे दर्शन घेतल्याने आमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. सर्व इच्छा सदिच्छा पूर्ण होतात.

रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा | चंदनाची उटी , कुमकुम केशरा |

 तुझ्या डोक्यावर चढवलेल्या मुकुटाला मोराच्या डोक्यावर जसा तुरा असतो तसा रत्नजडित तुरा आहे. तसेच तू गौरी कुमार आहेस. तुझ्या कपाळी कुंकू व केशर यांचे मिश्रण असणारी चंदनाची उटी तुझ्या कपाळी लावलेली आहे. 

हिरेजडित मुकुट, शोभतो बरा | रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया| जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥

 तुझ्या डोक्यावर हिऱ्याच्या साह्याने घडवलेला मुकुट फार शोभत आहे. तसेच तुझ्या पायातील नुपुरे म्हणजे वाळवे किंवा पैंजण घुंगरामुळे रुणझुण करत आहेत, मंजुळ वाजत आहेत. हे मंगलमूर्ती तुझा जय जयकार असो.

लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना | सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|

 हे लंबोदरा म्हणजे मोठे पोट असणाऱ्या आणि अंगी पितांबर नेसलेल्या श्री गणेशा तुझ्या कमरेला असलेला कर दोरा फनीवर बंधना म्हणजे नागाचे बंधन आहे. तुझी तोंड सरळ आहे आणि तोंड वाकडे आहे म्हणून तू वाकड्या मार्गाने चालणाऱ्या लोकांना सरळ करतो. त्रिनयना म्हणजे तीन डोळे किंवा तीन नेत्रे असणाऱ्या श्री गणेशा.

दास रामाचा, वाट पाहे सदना | संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|

हे श्री गणेशा मी श्रीरामाचा दास आहे. असे श्री रामदास स्वामींनी म्हटले आहे. म्हणून मी माझ्या घरी तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. हे सुरवर वंदना माझ्या संकट समयी तू मला पावावे, सहकार्य करावे, माझे संकट तू टाळावे. निर्वाणी म्हणजे शेवटच्या क्षणी, मरण यातना भोकताना, देह त्याग करताना सुद्धा तू माझे रक्षण कर. अशी माझी तुझ्या चरणी नम्र प्रार्थना आहे.

जय देव जय देव, जय मंगलमूर्ती | दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥

  पुन्हा श्री गणेशाचा जयजयकार करत हे देवा, हे मंगलमूर्ती दर्शनमात्रे म्हणजे तुझ्या पवित्र मंगलमय दर्शनाने माझ्या मनोकामना पूर्ण होऊ दे, माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, माझ्या घरी सुख समृद्धी नांदू दे अशी विनंती करतात. काही भक्त तर दर्शन मात्रे या शब्दांच्या ऐवजी स्मरण मात्रे असेही म्हणतात. म्हणजे फक्त तुझे स्मरण केल्याने सुद्धा माझ्या मनोकामना पूर्ण होऊ दे.

Leave a Comment