ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर आहे.अशा संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचे “पसायदान”( Pasaydan) कित्येकांचे तोंडपाठ आहे. अनेकांना लता मंगेशकर यांच्या आवाजात पसायदान ऐकायला फार आवडते.
शाळेच्या प्रार्थनेमध्ये सुद्धा पसायदानाचा समावेश असतो. एवढेच काय तर पाठ्यपुस्तकांमध्ये सुरुवातीला पसायदान असायचे. परंतु तरीही अनेकांना त्याचा अर्थ माहित नसतो.खरे तर हे आपले दुर्भाग्य इतके वर्ष संत ज्ञानेश्वर महाराजांनी देवभक्ती आणि ज्ञानदानाचे काम केले परंतु त्यांनी देवाकडे स्वतःसाठी काही मागितले नाही. विश्वामध्ये चराचरामध्ये व्यापलेल्या ईश्वराकडे माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांनी लोक कल्याणासाठी पसायदानातून मागणी केलेली आहे.
ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari ) ग्रंथामध्ये माऊलींनी सुरुवातीला वेदांनी सांगितलेले आणि आत्मरूप व्यापलेल्या ईश्वराचे वर्णन करताना शेवटच्या अध्यायात विश्वभर कणाकणात व्यापलेल्या देवाला स्वतः केलेल्या ज्ञानेश्वरी वाड्मयाचे फलस्वरूप प्रसाद रुपी मागणी करताना ज्ञानदेव म्हणतात.
आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनि मज द्यावे। पसायदान हे ॥
माऊली ( Mauli ) म्हणतात या विश्वातील कणाकणामध्ये भरून राहिलेल्या माझ्या भगवंता माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे. या यज्ञाने आपण प्रसन्न व्हावे आणि मला या पसायदानाचे फलस्वरूप दान द्यावे.
जें खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥
माऊली ईश्वराकडे मागतात की माझे मागणे हे आहे की या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या त्या वाईट प्रवृत्तीचा नाश कर. कारण कोणताच मनुष्य वाईट नसतो फक्त त्याचे कर्म आणि गुण वाईट असू शकतात. फक्त त्यांच्यातील हे वाईट गुण तुम्ही काढून टाक आणि त्यांच्या सत्कर्मा मध्ये वाढ कर. असे जर केले तर या पृथ्वीवरील सर्व जीव प्रेमळ होऊन जातील.
भगवंताकडे असे मागणे मागत असताना माऊलींना आपल्या वाईट म्हटल्या जाणाऱ्या मुलांची जास्त जास्त काळजी वाटते कारण प्रत्येक मनुष्य सत्कर्मातून देवत्वाकडे वाटचाल करू शकतो. म्हणून ते सर्व प्राणीमात्रांमध्ये आपापसात मैत्रत्व वाढवण्याची मागणी करतात.
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो जो जे वांच्छील तो ते लाहो । प्राणिजात ॥
जगामध्ये पाप हे फक्त अज्ञानरूपी अंधकार मुळे आहे. हा अंधकार नाहीसा होण्यासाठी जगात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होवो. प्राणीमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवो. अशी देवाकडे मागणी करतात.येथे स्वधर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, बौद्ध इत्यादी धर्म नव्हे तर माणुसकी धर्माबद्दल इथे बोलण्यात आलेले आहे. हा धर्म जर आचरणात आणला तर प्राणीमात्रांना सुद्धा त्यांच्या इच्छेप्रमाणे सर्व काही मिळेल.असा माऊलींना विश्वास आहे.
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
या संपूर्ण विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहो. सध्याच्या युगात नश्वर गोष्टींविषयी लालसा वाढत आहे. धन संपत्तीला सुख मानून जगणारे लोक नकोत तर आत्म्यास चिरंतन सुख मागणारे लोक जन्मास यावेत असे माऊली ईश्वराकडे मागतात.
चला कल्पतरूंचे आरव । चेतनाचिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव । पीयुषांचे ॥
ईश्वराविषयी प्रेम असणारे लोक म्हणजे संत. संत हे कल्पतरूंचे उद्यान आहे. तसेच संत जिथे राहतात ते जणू चिंतामणींचे गावच असते. त्यांची वाणी म्हणजे जणू समुद्राचे अमृतच आहे. जर आपण ईश्वरनिष्ठ लोकांशी संग ठेवला तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही. असा या ओवीचा व्यतीत अर्थ आहे.
चंद्रमे जे अलांछन । मार्तण्ड जे तापहीन ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
जो मनुष्य चारित्र्यावर कोणताही डाग नसलेला जणू चंद्र आहे व अंधारामध्ये सुद्धा दुसऱ्याला साथ देणारा आहे. रागीट आणि तामसी स्वभाव नसलेला ज्ञानरूपी प्रकाशाचा जणू सूर्यच आहे. अशा लोकांना सदैव सज्जन लोकांची साथ लाभते. तसेच त्याचे सगे सोयरे ही त्याच्यासारखेच असतात.
किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिहीं लोकी भजी जो आदिपुरुखीं । अखंडित ॥
विश्वा मधील तिन्ही लोकांतील लोक सर्व सुखी होऊन अखंड या आधी पुरुषाची भक्ती करत राहोत. तसे पाहता सर्व सुख मिळाल्यानंतर भगवंताकडे जाण्याची लोकांची इच्छा कमी होत जाते आणि तसे न होण्याची मागणी माऊली या ओवी मधून करत आहेत.
आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय । होआवे जी ॥
आद्य भगवंताने जे वेद आणि ग्रंथांची निर्मिती केली आहे त्या ग्रंथांचा अभ्यास हेच लोकांचच्या जीवनाचे ध्येय व्हावे. तसेच त्याच ग्रंथामध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार सर्वांनी आयुष्य व्यतीत करावे. ग्रंथांना गुरु माना आणि आपले जीवन सुखकर करा.
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो । आ होईल दानपसावो येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥
हे विश्वेश्वरा,हे जगाच्या मायबापा तू जेव्हा म्हणशील की मी हे दान तुला दिले आहे. तेव्हाच हा ज्ञानदेव चिरंतन सुखी होईल.