गौतम बुद्ध | Gautam Buddha

बौद्ध धर्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध ( Gautam Buddha ) शांती, अहिंसा, त्याग, सत्य आणि अहिंसेचे प्रतीक मानले जातात. तसेच ते भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी आणि आध्यात्मिक शिक्षक होते. तथागत गौतम बुद्ध राज घराण्यातील राजकुमार असून सुद्धा त्यांनी राज्याचा त्याग करून जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी आपले जीवन एका संन्याशी प्रमाणे व्यतीत केले होते. गौतम बुद्ध एक युग प्रवर्तक होते.

त्यांनी फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात आपल्या ज्ञानाची ज्योत पेटवलेली आहे. तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म इस 563 मध्ये कोसल देशातील नेपाळ मध्ये शाक्य कुळामध्ये वैशाख पौर्णिमेला लुंबिनी वनात झाला होता. वडील सिद्धोधन आणि त्यांच्या आईचे नाव महामाया असे होते. जेव्हा त्यांचा जन्म झाला होता तेव्हा तेथील असित ऋषींनी त्यांचे भविष्य वर्तवले होते कि, जर हा मुलगा संन्याशी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल. आणि जर त्याने गृह त्याग करून संन्यास घेतला तर तो सम्यक सबुद्ध असा बुद्ध होईल. पुढे पाचव्या दिवशी बाळाचा नामकरण विधी करण्यात आला.

मुलाचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले व त्यांचे गोत्र नाव गौतम असे होते. याच दरम्यान गौतम बुद्धांची आई महामाया फार आजारी पडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सिद्धार्थ यांची आई गेली त्यावेळेस ते फक्त सात दिवसांचे होते. त्यानंतर या बालकाचे पालन पोषण त्यांच्या मावशी प्रजापती गौतमी आपल्या मुलाप्रमाणे करू लागल्या. प्रजापती गौतमी ह्या राजा शुद्धोधन यांच्या पत्नी होत्या.

राजकुमार सिद्धार्थ यांचे जीवन मोठ्या सुखात आणि आरामात चालू होते. दैन्य, दुःख, ताप, वेदना यांचा त्यांना वाराही लागू नये तसेच अध्यात्मिक विचार, वैराग्य, संन्यास यांपासून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. त्यांना अवघ्या वयाच्या 8 व्या वर्षी त्यांच्या सिद्धाभ्यास देण्यास सुरुवात झाली होती. ते लवकरच तलवार चालवणे, घोडेस्वारी व धनुर्विद्या यामध्ये पारंगत झाले होते. पुढे वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह यशोधरा यांच्याशी स्वयंवरांमध्ये थाटामाटात पार पडला.

त्यावेळी त्या दोघांचे वय सारखेच होते. विवाह नंतर अनेक वर्षांनी त्यांना एक पुत्र झाला त्याचे नाव राहुल होते. एके दिवशी सिद्धार्थ घराबाहेर फिरण्यासाठी पडले असताना एक वृद्ध व्यक्ती, रोगी, मृत व्यक्ती आणि एक संन्याशी अशी चार प्रकारची माणसे त्यांना दिसली. त्यावेळी त्यांना समजले की आपले सुख हा एक अपवाद असून जगात फार दुःख आहे. अखंड जग दुःखात बुडालेले आहे.

या दुःखाचे कारण आणि जीवनाचे सत्य शोधण्यासाठी पुढे त्यांनी संन्यास घेण्याचे ठरवले. मग त्यांनी वयाच्या 29 व्या वर्षी सर्व सुखे आणि आराम सोडून गृहत्याग केला. त्यांनी कपिलवास्तु सोडल्यानंतर देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला. ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थ गौतम बुद्धांनी एकापाठोपाठ दोन गुरूंचे शिष्यत्व पत्करले. अध्यात्म मार्गातील त्यांची प्रगती बघून दोघांनीही त्यांना आपले उत्तर अधिकारी म्हणून निवडले. परंतु सिद्धार्थने त्या दोघांनाही नकार दिला.

पुढे सिद्धार्थ गौतम आणि इतर पाच संन्याशी यांनी संपूर्ण युगाचा त्याग करण्याचा मार्ग स्वीकारला. अन्न पाण्याचा त्याग करण्याचा हा मार्ग अतिशय बिकट होता. शेवटी शेवटी झाडाचे एक पान एवढेच त्यांचे अन्न राहिले होते. त्यामुळे त्यांचे शरीर अत्यंत कमजोर झाले होते. त्यांचे पोट त्यांच्या पाठीच्या कण्याला चिकटले होते. त्यांची वैराग्याची हि तपचर्या तब्बल सहा वर्षे चालली होती. पुढे त्यांनी विचार केला की हा मार्ग वासना मुक्त होण्याचा, पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही. माझी शक्ती नष्ट होत चालली आहे.

भूक, तहान आणि थकव्यामुळे मी गळून गेलेला आहे. शिवाय थकव्यामुळे माझे मन शांत नसून एक चित्त होत नाही. त्यामुळे मला ज्ञानाचा नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी पुढे वैराग्याचा मार्ग सोडून ध्यानाचा मार्ग स्वीकारला. मग एके दिवशी बौद्ध गया येथे त्यांनी एका पिंपळाच्या झाडाखाली बसून अंतिम सत्याची ज्ञान प्राप्ती होईपर्यंत न उठण्याचा निश्चय केला. 49 दिवसाच्या अखंड आणि अविरत तपश्चर्यनंतर वयाच्या 35 व्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली.

यानंतर त्यांच्यातील अंधकार नष्ट होऊन प्रकाशाचा उदय झाला. त्यांना एक नवा मार्ग दिसला आणि तेथून पुढे त्यांना लोक बुद्ध असे म्हणू लागले. बुद्ध ही एक ज्ञानाची उपाधी आहे. त्याचा अर्थ होतो आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी. बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले त्या वृक्षाला बोधी वृक्ष ( Bodhi vruksha ) म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष असे म्हणतात. पुढे बुद्धांनी उत्तर प्रदेश येथील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या या पहिल्या उपदेशाला धम्मचक्र असे म्हणतात.

या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धर्माची मूलतत्वे सांगितले. त्यामध्ये त्यांना अनेक शिष्य मिळाले व बौद्ध धर्म वाढीस लागला. त्यांनी साधारणतः सहाव्या शतकामध्ये एक लाख लोकांना बौद्ध धर्माची शिकवण दिली. भगवान बुद्धांनी पाली या भाषेमधून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण दिली.

बौद्धांनी धर्माची चार आर्य सत्य, अष्टांग मार्ग व पंचशिले सांगितली. बुद्धांनी आपले धर्मप्रसाराचे कार्य आपल्या ज्ञानप्राप्ती पासून सुमारे 45 वर्ष केले. सत्य, अहिंसा, धर्म,प्रेम आणि शांतीचा संदेश त्यांनी आपल्या लाखो अनुयायांना देऊन आणि बौद्ध धर्माची स्थापना करून बुद्धांनी जगात मोठा बदल घडून आणला होता. धर्म प्रसाराचे कार्य सुरू असताना त्यांची वृद्धापकाळामुळे प्रकृती नीट राहत नव्हती.

अशा दुर्बल अवस्थेमध्ये बुद्धाचा प्रवास चालूच होता.शेवटी कुशीनगर येथे वैशाख पौर्णिमेला वयाच्या 80 व्या वर्षी तथागताचे परिनिर्वाण झाले. त्यांचे परिनिर्वाण इस 483 मध्ये झाले. त्यांच्या पाली भाषेतील ग्रंथात असे म्हटले आहे की सूर्य केवळ दिवसाच प्रकाशित असतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान असतो. आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो. ब्राह्मण ध्यानस्थ असतो त्यावेळेस तो तेजपुंज असतो. परंतु बुद्ध मात्र स्वयं तेजाने दिवस-रात्र स्वयंप्रकाशित राहतो.

भगवान बुद्धांनी पाली या लोक भाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण आणि आचार विचार सांगितलेले आहेत. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी चार आर्यसत्य, अष्टांगिक मार्ग व पंचशिला सांगितलेली आहेत. त्यातील चार आर्य सत्य मध्ये भगवान बुद्ध म्हणतात मानवी जीवन हे दुःखमय आहे. दुःखाची निर्मिती तृष्णेतून म्हणजे वासना, इच्छा, असक्ती, आवड यामधून होते म्हणून या तृष्णेवर म्हणजेच आपल्या इच्छेवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब करावा.

त्याचप्रमाणे अष्टांग मार्गामध्ये भगवान बुद्धांनी नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निर्वाणाच्या समिप पोहोचण्यासाठी साठी हा अष्टांग मार्ग सांगितलेला आहे. अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग आहे. यालाच मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. अष्टांग मार्गाच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखकर होते. तसेच सम्यक दृष्टी मध्ये बुद्ध सांगतात निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ती गोष्ट मानू नये. तसेच सम्यक संकल्प मध्ये बुद्ध योग्य निर्धार आणि योग्य विचार सांगतात.

तसेच सम्यक वाचा यामध्ये बुद्ध करुणा युक्त व सत्य पूर्वक वाचा सांगतात.तसेच सम्यक कर्मांत म्हणजेच योग्य कर्म करणे. सम्यक आजीविका म्हणजे वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता सन्मार्गाने करणे. सन्मक व्यायाम म्हणजे वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा लगेच नाश करणे. सम्यक स्मृती म्हणजे तात्विक गोष्टीचे स्मरण करून आपल्या मनाला जागृत ठेवणे. सम्यक समाधी म्हणजे कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श न होऊ देता दृष्ट प्रवृत्ती पासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.

इत्यादी सोप्या भाषेत सांगितले. तसेच गौतम बुद्धांनी पंचशीले सांगितलेली आहेत या तत्त्वांनी जीवन जगले तर मनुष्य जिवंत असेपर्यंत नक्कीच दुःख मुक्त राहून आदर्श जीवन जगू शकतो.यामध्ये जीव हिंसा न करणे, चोरी न करणे, कामवासनेच्या अनाचारापासून दूर राहणे, खोटे न बोलणे, मद्य व मादक गोष्टी तसेच मोहात पाडणाऱ्या सर्व गोष्टीचा त्याग करणे. या सर्व गोष्टी येतात.

तसेच बुद्धांनी दहा परमिता मार्ग सांगितलेले आहेत. त्यामध्ये शील म्हणजे नीतिमत्ता, दान म्हणजे दुसऱ्यांना मदत, उपेक्षा , निष्काम्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा, मैत्री या सर्व गोष्टींचे ज्ञान येते. भगवान बुद्धांना युगप्रवर्तक मानले जाते. त्यांनी आपले जीवन बहुजन हिताय बहुजन सुखाय खर्च केले.तसेच त्यांनी त्याकाळच्या असलेल्या सर्व अनिष्ट प्रथा आणि परंपरा यांचा विरोध केला.

काही यज्ञात दिला जाणारा प्राण्यांचा बळी तसेच चातुर वर्णीय व्यवस्थेचाही त्यांनी विरोध केला.कर्मकांड व मरणोत्तर जन्म म्हणजे पुनर्जन्म याच्याशी माझ्या धम्माचा काहीही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी असणारे नाते हा या धम्माचा केंद्रबिंदू आहे. तथागत गौतम बुद्धांनी संप्रदाय जात-पात धर्म व सामाजिक दर्जा यांचा विचार न करता समता प्रस्थापित करण्याचा धर्मोपदेश केला.

त्यांनी स्त्रियांना संघात प्रवेश दिला. बौद्ध धर्म विज्ञानवादी असल्यामुळे त्याने वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत केली. त्यामुळे गौतम बुद्धाला,त्यांच्या शिकवणीला, आणि त्यांच्या उपदेशाला जगभरात स्वीकारले जाते. कालांतराने बुद्ध धर्माचा प्रसार पूर्वेकडील देशांमध्ये जास्त प्रमाणात झालेला आढळतो त्यात प्रामुख्याने चीन ,जपान कोरिया ,थायलंड , व्हिएतनाम ,कंबोडिया म्यानमार ,श्रीलंका ,भूतान ,लाओस ,मंगोलिया, तैवान हे देश येतात.



Leave a Comment