“मानवता” हाच खरा धर्म सांगणारे हरिभक्त पारायण ताजुद्दीन महाराज ( Tajuddin Maharaj ) शेख यांचा जन्म मुस्लिम धर्मात जांब शहराजवळ बोधलापुरी गावात तालुका घनसांगवी जिल्हा जालना येथे झाला होता. जन्माने मुस्लिम असलेले ताजुद्दीन महाराज लहानपणापासूनच गावात हरिपाठ,भजन, कीर्तन ऐकायला जात असायचे. त्यांना अध्यात्माची अत्यंत आवड लागली होती.
हळूहळू ते हरिपाठ,भजन, कीर्तनाचे धडे इतरांना देऊ लागले. पण त्यासाठी त्यांनी अगोदर अनेक हिंदू धर्म ग्रंथ आणि साहित्याचा अभ्यास केला होता. त्यांच्या या कार्याला घरातून विरोध होता. या रागातून त्यांनी एक दिवस थेट आळंदी गाठली. तेथून ऋषिकेश आणि नंतर ते त्र्यंबकेश्वरला गेले. अशा अनेक अध्यात्मिक तीर्थस्थळी त्यांच्या ज्ञानात आणखीनच भर पडली. ताजुद्दीन महाराज नियमित आळंदी, पंढरपूर सारख्या महत्त्वाच्या तीर्थस्थळी नित्यनेमाने वारी करू लागले होते. नाथ षष्ठीला ते पैठणची नेहमीच वारी करीत होते. ताजुद्दीन महाराज विठ्ठल चरणी लिन होऊन त्यांच्याकडून किर्तनरुपी अखंड सेवा घडो अशी मागणी मागणी करत असायचे. ईश्वर कृपेने आणि त्यांच्या कठोर प्रयत्नाने त्यांच्यातील किर्तन कला एवढी प्रभावी झाली की त्यांच्या कीर्तनाला लोक फार गर्दी करत होते. पांडुरंगाच्या आशीर्वादाने त्यांनी महाराष्ट्रभर दौरे करून आपली कीर्तन रुपी सेवा अखंड चालू ठेवली होती.
मूळचे मुस्लिम असल्यामुळे त्यांनी कुराण वाचन आणि पठण केले.त्याचप्रमाणे त्यांनी कुटुंबीयांचा विरोध पत्करून वारकरी संप्रदायाचे संपूर्ण ज्ञान ग्रहण केले. पुढे हिंदू-मुस्लीम धर्मांच्या दोन्ही पवित्र ग्रंथात मानवासाठी कल्याणकारी संदेश असल्यामुळे आणि लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाची आवड लागल्यामुळे आपल्या कीर्तनातून ते लोकांना मानवता हाच खरा धर्म सांगू लागले. त्यांना संस्कृत,उर्दू, हिंदी मराठी अशा भाषा येत असल्यामुळे व त्यांचा सखोल अभ्यास असल्यामुळे त्यांची सर्व कीर्तने प्रभावी होत असायचे. तसेच त्यांच्या विनोदी शैलीमुळे त्यांच्या कीर्तनाला हजारोंच्या संख्येने लोक गर्दी करत होते. लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाचे संस्कार त्यांच्यावर झाल्यामुळे हळूहळू कुटुंबीयांचा विरोधी कमी होऊ लागला. हिंदू धर्मातील अध्यात्मिक छंद आणि त्यांच्या मनाचा ओढा पाहून कुटुंबीयांची साथ मिळत असताना पुढे त्यांनी गीतेचा सखोल अभ्यास केला. कुराण ग्रंथामध्ये प्रथमच पहिल्या अध्यायात अलिफ “लाम मीम मिम जालिकल किताबों ला रहे बहुदलिल मुत्त किना लजीन” असे नमूद केले आहे.
त्याचप्रमाणे गीतेमध्ये “सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं वज्या” असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. या दोन्हींचा अर्थ मी एकच असून सर्वत्र व्यापलेला आहे. मला जरी अनेक नावे असली तरी मी एकतत्व आहे. तू माझ्याकडे आला तर मी तुझा होईल.असा एकच संदेश दिसून येतो. यातूनच ते समाजाला धर्म भेद करू नये यासाठी संबोधन करीत होते. महात्म्यांनीही कोणत्याही जीवाचा न घडो सत्सर असेच सांगितले आहे. अशा प्रकारे ताजुद्दीन महाराजांचा दोन्ही धर्मांचा अभ्यास असल्यामुळे त्यांना बालपणीच लागलेल्या अध्यात्माची ओढ त्यांनी तशीच आपल्या मनात रुजवून ठेवली. तरीही धार्मिक द्वेष करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही.
त्यामुळे समाजकंटकांकडून होणाऱ्या त्रासाची आणि आपल्या धर्मातील लोकांचे पाठबळ मिळत नसल्यामुळे त्यांच्या मनात नेहमी खंत राहत असे. परंतु “ स्वकीर्ति कानी न ऐकावी l पुज्यता डोळा न देखावी ll संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या विचाराप्रमाणे महाराजांचा स्वभाव होता.त्यामुळे वारकरी संप्रदायातील अनेक भक्त त्यांचे समर्थन करत असत. तसेच त्यांच्या मनातील खंत आणि त्यांच्या भावना ते त्यांच्या कीर्तन प्रवचनाच्या वेळी नेहमी बोलून दाखवत असायचे. कीर्तनातून महाराज बोलत असताना माणसाच्या कुप्रवृत्ती नेहमी सांगायचे. त्यांच्या कीर्तनाला हजारोंच्या संख्येने लोक हजर राहत असत त्यात महाराष्ट्राच्या अनेक भागातून आलेले वारकरी सुद्धा असत. हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारे ताजुद्दीन महाराज स्वभावाने फार दिलखुलास आणि प्रेमळ होते.
हिंदू व मुस्लिम या दोन धर्मातील मतभेद आणि द्वेषाची दरी कमी करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. गीतेतील अनेक श्लोक व कुराण मधील हदिश व आयते यांचा एकत्र बोध संगम साधत लोकांच्या शंकांचे ते निरसन करायचे. ताजुद्दीन महाराजांची किर्तने इतकी प्रभावी असायची की काही तरुणांच्या मनावर त्यांचा चांगला प्रभाव दिसत असे. त्याचेच एक उदाहरण म्हणून लातूर मधील एक मुलगा ताजुद्दीन महाराजांचे कीर्तन जिल्ह्यात कोठेही असले तरी चार चाकी गाडीने चार मित्र बरोबर घेऊन कीर्तनाला जात असे.अनेक तरुणांना ताजुद्दीन महाराजांच्या कीर्तनातील छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांवर केलेले संबोधन आणि गायलेले गाणे फार आवडत असायचे. त्यांच्या मतानुसार धर्मा धर्मा मधील वेगवेगळ्या भाषा एकमेकांना येत नसल्यामुळे धर्माधर्मातील द्वेष वाढत जात आहे असे ते सांगायचे. कारण भाषा समजत नसल्यामुळे लोक दुसऱ्या धर्माचा त्यांच्या भाषेतील ग्रंथ वाचत नाहीत.
धर्माने मुस्लिम असलेल्या परंतु वारकरी संप्रदायाची जीवनशैली अंगीकारलेल्या ह भ प ताजुद्दीन महाराज यांनी पैठण मध्ये स्वतःचा एक आश्रम खोलून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे अनमोल कार्य केले. ताजुद्दीन महाराजांनी महाराष्ट्रभर हजारो कीर्तने केली. कीर्तन करतानाच मला मरण यावे अशी इच्छा त्यांनी एका ठिकाणी कीर्तनात बोलून दाखवली होती आणि शेवटी तसेच घडले व दोन धर्मातील महत्त्वाचा दुवा हरपला. “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म l भेदाभेद भ्रम अमंगळ ll” संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या ओवी प्रमाणे संपूर्ण आयुष्य जगलेल्या ह भ प ताजुद्दीन महाराज शेख यांचे धुळे जिल्ह्यात साखरी तालुक्यातील निजामपूर जवळच असलेल्या जामदा नावाच्या गावात कीर्तन करत असताना अचानक आलेल्या हृदयविकारामुळे तीव्र झटक्याने अति दुःखद निधन झाले.
किर्तन चालू असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि लगेच ते जवळच बसलेल्या एका आजोबांच्या मांडीवर डोके ठेवून झोपले. त्या आजोबांच्या मांडीवर त्यांचा जीव गेला. ताजुद्दीन महाराजांच्या कायम सोबत असलेले त्यांचे ड्रायव्हर राजू अरगडे यांनी त्यांच्या खूप सार्या गोष्टी आणि महाराजांचे वेगळेपण सांगितले. महाराज किती तत्त्वनिष्ठ होते तेही त्यांनी सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार ताजुद्दीन महाराज जे ठरवायचे ते करायचे. ताजुद्दीन महाराज कितीही दूर कीर्तनासाठी गेले तरी ते भक्तांना आपल्या पाहुणचाराचा त्रास होऊ नये म्हणून परत आपल्या आश्रमात यायचे. ते कधीच कीर्तनाच्या ठिकाणी मुक्कामी राहत नव्हते.
कधीकाळी लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी काल्याचे किर्तन तेथेच जवळपास असेल तरच ताजुद्दीन महाराज मुक्काम करायचे. अन्यथा ते कोठेही मुक्काम करत नव्हते. या दुःखद घटनेने महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायांमध्ये आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेमध्ये फार दुःखाचे वातावरण झाले होते. अनेकांनी मनापासून हळहळ व्यक्त केली. या घटनेनंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात असलेल्या बोधलापुरी गावात त्यांच्याच आश्रमाजवळ साई मंदिरासमोर दफनविधी करण्यात आले.
महाराजांच्या इच्छेनुसार आणि दैवी कृपेने त्यांचे कीर्तन चालू असतानाच त्यांना मरण आले, खरोखर ही त्यांच्यासाठी फार भाग्याची गोष्ट होती. लाखोंच्या संख्येने त्यांना लोकांनी श्रद्धांजली वाहिली.