संत सावतामाळी

    वारकरी कर्मयोगाचा पहिला आदर्श म्हणजे सावतामाळी, कर्मयोगाचा साक्षात्कार म्हणजे सावतामाळी, मराठीतला पहिला शेतकरी कवी म्हणजे सावतामाळी, ज्यांना साक्षात देव भेटायला आले ते संत म्हणजे सावतामाळी, संत परंपरेतले सर्वात आधीचे संत म्हणजे सावता माळी.

अशा या महान संतांचे पूर्वज मराठवाड्यातील लातूर जवळील औसा गावचे होते असा संदर्भ सापडतो. अजूनही त्या गावात यादव आडनावांची माणसे वस्तीत आहेत. पूर्वीपासूनच त्यांच्या घराण्यात परंपरेने विठ्ठलाची वारी होत होती. त्यांच्या आजोबांना पंढरीची वारी करत असताना पंढरपूरच्या रस्त्यावरच आणि पंढरपूर जवळ असलेले अरण नावाचे गाव आवडले. मग ते दरवर्षी वारी करतअसताना पंढरपुरास जाताना किंवा येताना एकदा तरी या गावात मुक्काम करायचे. तसेच हे गाव सुपीक असल्याने त्यांनी कायमस्वरूपी येथेच राहायला यायचे असे ठरवले . आणि त्यांना घरच्यांनीही तशी परवानगी दिली.

सुरुवातीला  त्यांचे आजोबा दैवू यांनी गावातील महादेवाच्या मंदिरात राहण्यास सुरुवात केली. नंतर हळूहळू त्यांनी तिथे शेत घेतले. त्यानंतर एक घरही तेथे बांधले. त्यानंतर काही दिवसांनी सावतोबांचा जन्म अरण गावात झाला.अरणगाव हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात आहे. या गावाला अरणभेंडी असेही म्हणतात.  अरण गावापासून पंढरपूर हे फक्त 35 किलोमीटर अंतरावर आहे. त्यांचे वडील परसोबा यांना अजून एक भाऊ डोंगरोबा होते. मात्र ते एका दिंडीत गेले ते परत आलेच नाहीत. त्यांच्या आईचे नाव नांगीताबाई यांनीच कष्टाची आणि  वारीची दीक्षा सावतोबांना दिली. सावतोबांच्या पत्नीचे नाव जनाई होते. त्या येथील जवळच भानवस नावाच्या गावच्या होत्या. त्यांच्या मुलाचे नाव विठ्ठल होते परंतु त्यांचा मुलगा विठ्ठल लवकरच वारला. त्यानंतर  नागू ही त्यांची एकुलती एक मुलगी कायम त्यांच्याबरोबरच असायची. काही दिवसांनी नागू चे लग्न त्याच गावातील गोविंद वसेकर यांच्याशी झाले. तसेच सावतोबांच्या  आई सुद्धा अरण गावाजवळच्याच एका छोट्या गावातील होत्या.

  संत जनाबाईंच्या एका अभंगानुसार काशीबा गुरव हे सावतोबांच्या अभंगाचे लेखनिक समजले जातात. संत सावतामाळी हे संत  ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा 25 वर्षांनी  वयाने मोठे होते आणि संत नामदेवांपेक्षा वीस वर्षांनी वयाने मोठे होते. संत सावता माळी यांचा जन्म इ.स.1250 आणि मृत्यू इ.स. 1295 मध्ये झाला असे समजते. त्यांना एकूण केवळ 45 वर्षाचे आयुष्य लाभले. या 45 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी अखंड विठ्ठल नामाचा जप करत संसार करता करता आपली शेतीवाडी सांभाळली. या अरणगावातच त्यांच्या शेतीमध्ये अजूनही एक मोठी विहीर आहे. तसेच त्या विहिरीला भरपूर पाणी सुद्धा आहे. त्यावरून तेथे ते उन्हाळी पिकेही घेत असावेत असे दिसते. आजोबांच्या काळातच त्यांच्या जमिनीत एक म्हसोबा होता. म्हणून आजोबांनी त्या ठिकाणी काही जमीन पडीक ठेवली होती. परंतु सावतोबांनी नंतर तो म्हसोबाचा दगड उचलून थेट बांधावर नेऊन ठेवला. लोक त्यांना नका असं करू असं म्हणत होती. हे चांगलं नाही, पाप लागेल असे म्हणत लोकांनी त्यांना अनेक वेळा विनवले. परंतु त्यांनी कोणाचेच ऐकले नाही.

एकदा सर्व संतांना घेऊन विठ्ठल सावतोबांच्या  मळ्यात आले होते असा संदर्भ आपणास संत नामदेवाच्या अभंगात मिळतो.
 तया सर्वात्मका ईश्वरा I स्वकर्म कुसुमांची वीरा II
  पूजा केली होय अपारा I तोशा लागे II
 स्वतः विठ्ठल मळ्यामध्ये का आले तर कर्मयोग कसा श्रेष्ठ आहे. आपण करत असलेल्या कामातच ईश्वर कसा असतो, कामाला कसं प्राधान्य दिलं पाहिजे ते वरील संदर्भातून समजते यावरून संत सावता माळी यांनी स्वकर्माची पूजा करत देवाची भक्ती करा असे नेहमीच सांगितल्याचे समजते. तसेच संत नामदेवांनीही त्यांच्या अभंगातून संत सावतामाळी विषयी लिहिताना  सांगितले आहे की,
  नाम विक्रय न करावा I दान प्रतीग्रहो न घ्यावा II 
 कष्टे करून मिळवावा I तोचि ग्रास अपुला II 
 याचाच अर्थ कोणाचेही कधीही दान घेऊ नका, देवाचे नाव विकू नका, पैसे घेऊन कीर्तन करू नका, कष्ट करून मिळवलेलेच फक्त आपले असते. तसेच शेती करून मिळवणारे सावता महाराज हे एकमेव संत होते असेही सांगितले जाते. म्हणूनच स्वतः विठ्ठल सावता कडे जाऊन ढोरे तो लागायचे, त्यांना शेत काम करू लागायचे, त्यांच्या कामाचा क्षीण भाग कमी करायला जायचे. स्वतः विठ्ठलांना त्यांची कष्ट करून केली जाणारी भक्ती अतिशय प्रिय होती असे अनेक अभंगातून आपणास दिसते. आणि म्हणूनच संत सावता माळी यांचे अरणगावात असलेल्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे  येथे पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी सावतोबांना भेटायला येते असा सुरुवातीपासूनच रिवाज आहे. इतर सर्व गावोगावच्या पालख्या पंढरपूरला जातात. प्रपंची असोनी परमार्थ साधावा असे सावता महाराज नेहमी सांगायचे. तसेच भूदेवांना नव्हे तर संतांना देव माना असेही त्यांनी त्यांच्या अभंगामधून सांगितले आहे.

 संत सावतोबांच्या आयुष्यातील एकमेव चमत्कार म्हणजे छाती फोडून देव ठेवल्याचा चमत्कार. ही कथा आपणास एकनाथ महाराजांच्या अभंगात पहावयास मिळते. ती अशी सांगितलेली आहे की, पैठण जवळील मुंगी गावचा एक गृहस्थ होता. त्याने पैठणला एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज यांचे कीर्तन ऐकले आणि त्याला असे वाटले की आपणही पंढरपुराला गेले पाहिजे. परंतु त्याला हात आणि पाय दोन्हीही नव्हते. म्हणून लोकांनी त्यांची चेष्टा करायला सुरुवात केली. परंतु त्या ग्रहस्थाने हट्टच धरला आणि तो पंढरपूरच्या दिशेने निघाला. मग कसं चालणार तर तो छातीने पुढे सरकत सरकत चालू लागला. तो चालताना एखाद्या कासवासारखा दिसू लागला म्हणून लोक त्याला कुर्मदास म्हणत. त्याच्या नावाने पैठण जवळ एक साखर कारखाना ही आपणास पहावयास मिळतो.

हा ग्रहस्थ छातीने सरकत सरकत पंढरपूरच्या दिशेने एका लहूळ गावापर्यंत गेला. परंतु एकादशी तर उद्यावरच आलेली होती. मग त्याच्या लक्षात आले की आपण एकादशीपर्यंत पंढरपूर मध्ये पोहोचू शकत नाही. कारण त्याला लहूळ गावापर्यंतच चार महिने लागले होते. मग त्याने सोबतच्या वारकऱ्यांना सांगितले की, तुम्ही पंढरपूरला पोहोचताच देवाला सांगा की मी येतोय,प्रयत्न करतोय परंतु मी एकादशीला पोहोचू शकत नाही. नंतर हे लोक पंढरपूरला पोहोचल्या बरोबर विठ्ठल दर्शन घेताना त्यांनी कुर्मदासाची व्यथा पांडुरंगाला सांगितली.

मग देव, संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेवांना म्हणाले चला आपणच कुर्मदासांना भेटायला जाऊ. आणि ते निघाले. ते तिघेही कुर्मदासा कडे जात असतानाच पांडुरंगांनी रस्त्यात एक गंमत केली. ते ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराजांना म्हणाले की मी थोडा पुढे जातो आणि लपून बसतो. तुम्ही हे कुर्मदासांना सांगू नका. परंतु ते पुढे थेट सावतामाळीच्या मळ्यात गेले आणि सावतोबांना म्हणाले की सावतोबा माझ्या मागे दोन चोर लागले आहेत. तर तुम्ही मला कुठेतरी लपवा. आनंदी झालेल्या सावतोबांनी हातात असलेल्या खुरप्यानेच आपली छाती फाडून  देवाला आपल्या छातीत लपवले. तोपर्यंत पाठीमागून ज्ञानदेव आणि नामदेव त्यांचा शोध घेत आले होते. सावतोबा त्यांना दिसताच त्यांनी सावतोबांना विचारले की देव इकडे आले होते का ? पण सावतोबा नाही म्हणाले. परंतु थोडासा पांडुरंगाच्या जरीचा काठ छाती बाहेर राहिल्याने त्यावरून संत नामदेवांनी त्यांना ओळखले असे म्हटले जाते. आणि मग सावता महाराजांनी छाती फाडून त्यांना देव दाखवले. हा चमत्कार संत एकनाथांनी त्यांच्या अभंगात संत सावतामाळी यांच्याविषयी सांगितलेला आहे.

  संत सावता माळी यांच्या अभंगांची गाथा ही केवळ 37 अभंगांची आहे. त्यांचे अभंग कविता हे जरी संख्येने अल्प असले तरी त्यांची रचना अगदी प्रसादिक आहे. विठ्ठल हेच परमदैवत मांडणाऱ्या संत सावता माळी  यांनी 
  आमची माळीयाची जात I शेत लावू बागाईत II
 कांदा मुळा भाजी Iअवघी विठाई माझी II
 स्वकर्मात व्हावे रत I मोक्ष मींळे हातो हातII
 अशा अनेक मार्मिक अभंगांची रचना केलेली आढळते.


        

Leave a Comment