श्री क्षेत्र अक्कलकोट


   
          सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र आणि  कर्नाटक सीमेवर अक्कलकोट हा एक तालुका आहे. सोलापूर पासून 40 किलोमीटर असलेले हे शहर इतिहास काळात छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा गादीसोबतच उदयास आले. छत्रपती शाहूंचे मानसपुत्र राजे फत्तेहसिंह हे या संस्थानाचे पहिले राजे 1707 च्या काळामध्ये होऊन गेले. या काळातील त्यांचा किल्ल्यासारखा दिसणारा जुना राजवाडा अक्कलकोट गावामध्येच आहे. या राजवाड्यामध्ये जुन्या काळातील असलेल्या शस्त्र आणि वस्तू नवीन राजवाड्यात स्वतंत्र वस्तू आणि शस्त्र संग्रहालय तयार करून ठेवलेल्या आहेत. इतिहास काळातच प्रख्यात असलेल्या या गावी श्री दत्तगुरूंचे चौथे अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांनी सुमारे 22 वर्ष वास्तव्य करून त्यांच्याकडे असलेल्या दैवी शक्तीने  लोककल्याणाचे काम केले.आणि तेव्हापासून ते एक प्रमुख तीर्थक्षेत्र बनले.

  श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे चौथे अवतार समजले जातात. पंजाब मधील छेलिया या गावी समर्थांनी मनस्वी देह धारण केला. त्यानंतर कर्दळी वनात जाऊन 300 वर्ष त्यांनी तेथे तप केला. तीनशे वर्षात स्वामीभोवती मोठे वारूळ तयार झाले. एकदा एका लाकूडतोड्याकडून लाकडे तोडत असताना या वारुळातील ध्यानस्थ असलेल्या स्वामींच्या मांडीला एक वार लागला. परंतु त्याच्याकडून ते चुकून घडल्याने स्वामींनी त्याच्यावर न रागवता उलट त्याला आशीर्वाद दिला. आणि ते तिथून लोक कल्याणासाठी निघाले. प्रथम काशी आणि नंतर कलकत्त्याच्या कालीमातेच्या दर्शनास गेले. नंतर गंगा तटाने फिरले व पुढे केदारनाथ,गिरनार पर्वती  जाऊन आले. तसेच श्री दत्तगुरूंच्या प्रत्येक स्थानी जाऊन आले. आणि अखेर गोदावरी तटी आले. पुढे मंगळवेढ्यास इ.स.  1824 ते 1856 मध्ये सुमारे बारा वर्षे राहिले. मग पंढरपूरला विठू माऊलीस भेटण्यास  गेले. आणि नंतर इ.स.1857 मध्ये ते अक्कलकोटला आले. येथे श्री स्वामी समर्थांचे वास्तव्य सुमारे 22 वर्षे म्हणजे समाधी काळापर्यंत होते.

  तेथे त्यांनी एका वटवृक्षाखाली सदैव राहून आपल्या चमत्कारांनी भक्तांच्या समस्यांचे निवारण केले. आणि या वटवृक्षाप्रमाणे भक्तांच्या अडचणी अगदी सहज सोडवून त्यांनी भक्तांची सेवा केली. ज्या अडचणी कोणालाही सोडवणे शक्य नाही अशा अडचणी स्वामींनी सोडवल्या म्हणून “अशक्यही शक्य करतील स्वामी“असे म्हटले जाते. ब्रम्हांडनायक स्वामी दिनांचे कैवारी आहेत. स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही. म्हणून अक्कलकोट हे भूवैकुंठ म्हणून नावारूपास आले. जसे भगवान विष्णूंचे वैकुंठ धाम हे मुक्तीचे माहेरघर आहे तसेच स्वामींचे अक्कलकोट सुद्धा मुक्तीचे माहेर घर मानले जाते.

   अक्कलकोटला या वटवृक्षाजवळच स्वामींचे समाधी मंदिर आहे. त्यांनी भक्त चोळप्प्पांच्या घरी राहून तेथेच महाराजांनी चैत्र वैद्य 1878 मध्ये समाधी घेतली. आजही या समाधीस्थानाचे पूजन हे फक्त चोळप्पांचे  वंशज करतात. शेजारीच चोळप्पांचा जुना वाडा आहे. येथे भक्तांना महाराजांनी दिलेल्या पादुकांचे व रुद्राक्ष माळेचे दर्शन घेता येते. जवळच एक खंडोबा मंदिर आहे. ज्यावेळेस श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आले त्यावेळी प्रथम या खंडोबा मंदिरातच ते तीन दिवस राहिले आणि नंतर चोळपांच्या घरी येऊन माझे आणि तुझे सात जन्माचे नाते आहे म्हणून मी तुझ्या घरी आलो आहे असे सांगितले.. त्याबरोबर  जवळच बाळप्पांचा मठ आहे.  ते स्वामीसमर्थ महाराजांचे शिष्य होते. त्यांनाही स्वामींनी  आपल्या पादुका दिल्या होत्या आणि स्वतंत्र मठ स्थापन करण्याचे सांगितले होते. तसेच स्वामींच्या शेजारीच समाधी घेण्याची परवानगीही त्यांना दिली होती.

बाळप्पा नंतर गंगाधर महाराज नंतर गजानन महाराज शिवपुरे अशी गुरु शिष्याची परंपरा पुढे चालतच राहिली म्हणून या मठाला गुरु मंदिर असे नाव दिलेले आहे. येथे भक्तांना मोफत महाप्रसादाची सोय केली जाते की जी प्रथा बाळप्पानी पूर्वीच सुरू केलेली होती. काही अंतरावरच हाक्याचा मारुती मंदिर आहे. या मंदिरात इ.स. 1600 मध्ये समर्थ रामदास स्वामींनी मारुतीरायाच्या मूर्तीची स्थापना केली होती.येथे समर्थांच्या आज्ञेनुसार बाळप्पा महाराजांनी बारा वर्षे तप केले. तसेच वटवृक्ष मंदिरासमोरच अन्नछत्र मंडळ आहे. या ठिकाणी सकाळी 11: ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत आणि रात्री 8:00 ते 11:00 वाजेपर्यंत भक्तांसाठी मोफत महाप्रसादाची सोय असते. अन्नछत्र आवारातच सुंदर असे बाल उद्यान आहे. हे उद्यान सकाळी 6:00 ते रात्री 10:00 वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी 5:00 ते 9:00 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असते. या ठिकाणी सुंदर अशा प्राण्यांच्या कलाकृती व लहान मुलांसाठी खेळण्या उभारलेल्या आहेत. येथे सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली असल्यामुळे संध्याकाळी येथे फारच प्रसन्न वाटते.

   अक्कलकोट या ठिकाणी भक्तांना राहण्यासाठी अल्प दरात दोन भक्तनिवास उपलब्ध आहेत. पहिले म्हणजे वटवृक्ष मंदिराजवळच असणारे  यात्रा निवास 1. ही तीन मजल्यांची इमारत असून येथे भक्तांना राहण्यासाठी 18 हॉल्स आणि 66 रूम्स आहेत. पंधरा हजार चौरस फूट जागेमध्ये असलेल्या ह्या भक्त निवासात अंदाजे पाच हजार स्वामी भक्त राहू शकतात अशी व्यवस्था आहे. तसेच या इमारतीमध्ये 75 पेक्षा जास्त सेवेकरी स्वच्छता व इतर सेवा पुरवतात. येथे लॉकर्सचीही व्यवस्था आहे, कार्य तत्पर सेवेकरी, स्वच्छता व टापटीप, हवेशिरपणा, प्रसन्न व मोकळे वातावरण, भरपूर पाणी, सुरक्षा व्यवस्था व स्वतंत्र वाहन तळ, तसेच शेजारीच मोफत महाप्रसादाचे अन्नछत्र, समोर स्वामींचे वटवृक्ष मंदिर, आणि नाममात्र देणगी शुल्क अशी या यात्रा निवासाची वैशिष्ट्ये आहेत. येथे एका रूम मध्ये चार जण राहू शकतात परंतु एका रूम मध्ये तीनच बेड  असतात. येथील एका खोलीसाठी प्रत्येकी 600 रुपये चार्ज आकारला जातो.  येथे रूम बुक करण्यासाठी 6000893969 ह्या क्रमांकावर फोन करून सुद्धा आपले बुकिंग करता येते. जास्तीत जास्त भाविक स्वतः तिथे जाऊनच बुकिंग करतात.

 तसेच याच श्री स्वामी समर्थ महाराज ट्रस्टचे दुसरेही एक नवीन यात्रा निवास 2 आहे. त्याला स्वामीधाम भक्त निवास असे म्हणतात. अक्कलकोट-गाणगापूर रोडवर, वटवृक्ष मंदिरापासून 600 मीटर अंतरावर अक्कलकोट रेल्वे स्टेशन पासून बारा किलोमीटर, सोलापूर एअरपोर्ट पासून ते 30 किलोमीटर,स्वामी समर्थ मठापासून दीड किलोमीटर, आणि अक्कलकोट बस स्टँड पासून 600 मीटर अंतरावर आहे. ही इमारत यात्रा निवास 1 पासून जवळच आहे. हि इमारत श्री शमीविघ्नेश गणेश मंदिरासमोर आहे. यामध्येमात्र अद्यावत व आरामदायी अशा रूम्सही उपलब्ध आहेत. या भक्तनिवासात एकूण 106 खोल्या असून तीन मजल्यांची ही इमारत आहे. प्रत्येक मजल्यावर 18 एसी खोल्या आहेत. येथे www.yatraDham.org ह्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ऑनलाइन बुकिंग करता येते. येथील राहण्याची व्यवस्था 499 रुपयांपासून सुरू होते.

तसेच अक्कलकोट मध्ये भक्तांना राहण्यासाठी हॉटेल साहिल लॉज,कुलकर्णी लॉज,श्री स्वामी कृपा सदन अशा अनेक प्रकारच्या प्रायव्हेट सुविधाही उपलब्ध आहे. याठिकाणीही जास्त महाग नसल्याने अनेक भक्त प्रत्यक्षात अक्कलकोट या ठिकाणी गेल्यानंतरच आपल्या राहण्याच्या रूम्सचे  बुकिंग करतात. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाणारे बहुतेक भावीक पंढरपूर, तुळजापूर, आणि गाणगापूर अशा तीर्थक्षेत्रांची  यात्रा करतात. तर काही भाविक अक्कलकोट आणि गाणगापूर अशी यात्रा करतात. तर काहीजण अक्कलकोटसह सोलापूर मधील पर्यटन स्थळे व तीर्थक्षेत्रे करतात. जसे की सोलापूर मधील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय, या प्राणी संग्रहालयात महाराष्ट्रात क्वचित दिसणारा माळढोक पक्षी सुद्धा आहे. तसेच इतर अनेक प्राणी आणि पक्षांच्या प्रजाती इथे पहावयास मिळतात.

विजापूर रोडवर असलेले सिद्धेश्वर मंदिर, सोलापूरचा भुईकोट किल्ला, तसेच सोलापूर विज्ञान केंद्र. हे विज्ञान केंद्र महाराष्ट्रातील प्रख्यात तिसरे विज्ञान केंद्र आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जवळच असलेला  हिप्परगा तलाव, महाराष्ट्रात सर्वात मोठी, स्वच्छ आणि सुशोभीकरणासाठी नंबर वन असलेली अकलूज ग्रामपंचायत, विजापूर परिसरातील आणि संभाजी तलावाजवळ असलेले व सोलापूरचा आत्मा समजले जाणारे स्मृती उद्यान, सोलापूर मधील नान्नज या गावी असलेले माळढोक पक्षी अभयारण्य, अकलूजमधील सयाजीराजे पार्क, धर्मवीर संभाजीराजे तलाव, तसेच सोलापूरजवळील माढा तालुक्यातील भीमा नदीच्या तीरावर असलेले उजनी गावातील प्रख्यात उजनी धरणही काही जण पहावयास जातात.

Leave a Comment