वज्रेश्वरी देवी | Vajreshwari Devi

देवीच्या सर्व शक्तीपीठांपैकी असेच एक शक्तिशाली पीठ म्हणजे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी ( Vajreshwari Devi ) माता मंदिर. तानसा नदीकाठी वसलेले हे ठिकाण ठाण्यापासून सुमारे 42 किलोमीटर,वसई विहार पासून 30 किलोमीटर अंतरावर, भिवंडी पासून फक्त 19 किलोमीटर अंतरावर,आणि मुंबईपासून 75 किलोमीटर अंतरावर आहे. वज्रेश्वरी माता मंदिर परिसराला पहिल्या काळात वडवली परिसर असे म्हटले जायचे. परंतु देवीच्या नावावरून या परिसराला वज्रेश्वरी असे नाव पडले.

तसेच या देवीला वज्रेश्वरी, वजराबाई आणि वज्रयोगिनी असेही म्हणतात. घनदाट जंगल आणि शांत वातावरण असलेला हा परिसर साधू,ऋषी, मुनी यांच्या तपचर्यांनी पावन झालेला आहे. याच ठिकाणी कालिकत नावाचा महाभयंकर राक्षस आला होता.तो आल्यानंतर येथील साधू,मुनि, ऋषी आणि तपचर्या करणाऱ्या योगी महात्म्यांना तो त्रास देऊ लागला होता. त्यांचा तो छळ करत असे. तसेच त्यांचे होम हवन मोडून टाकत असे. साधूंच्या या तपश्चर्या भंग करून त्यांचे यज्ञ तो मोडत होता. हे पाप करण्याचे काम कालिकत आणि त्याचे जोडीदार दंतूर आणि दुर्धर हे तीनही राक्षस करत होते. त्यांच्या या छळाला जनता फार कंटाळली होती.

अशा वेळी सर्व साधुसंत ऋषीमुनी आणि त्यांचे भक्तगण सर्वांनीच विचार केला की यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. सर्वांनी मिळून महान तपचर्या करणारे ऋषी वशिष्ठ ऋषींकडे जाण्याचे ठरवले. वशिष्ठ ऋषींकडे गेल्यानंतर सर्वजण त्यांच्या पायाशी नतमस्तक झाले आणि आपली समस्या त्यांच्यासमोर मांडली. त्यावेळी वशिष्ठ ऋषींनी त्रिचंडी नावाचा एक मोठा यज्ञ करायचे ठरवले. तसेच या यज्ञासाठी सर्व देव, साधू संत,ऋषी, मुनी यांना आमंत्रित करण्यात आले आणि यज्ञाला सुरुवात केली. यज्ञ सुरू होताच त्यांनी प्रत्येक देवाला आहुती देण्यास सुरुवात केली. हे सर्व करत असताना वशिष्ठ ऋषी इंद्र देवाचे नाव विसरले होते.

त्यामुळे इंद्रदेवांना महाभयंकर राग आला होता. तसेच त्यांना शंका आली की वशिष्ठ ऋषी माझ्यापेक्षा मोठे होण्यासाठी काहीतरी करत आहेत. त्यामुळे त्यांनी वशिष्ठ ऋषींना युद्धाचे आव्हान केले. वशिष्ठ ऋषींकडे सुद्धा अस्त्र शस्त्र होती. वशिष्ठ ऋषी सुद्धा महान तपचर्या करणारे महान तपस्वी होते. इंद्रदेवांनी यज्ञ मोडण्यासाठी महान शस्त्र सोडण्यास सुरुवात केली. परंतु तपश्चर्या काही मोडत नव्हती. त्यामुळे इंद्र देवांना फार राग आला होता. त्यावेळी त्यांनी वज्र नावाचं महाभयंकर अस्त्र सोडले.

त्यावेळी पृथ्वीतलावर फार मोठा आवाज झाला. मग सर्व देव मिळून पार्वती मातेकडे गेले आणि मातेला सांगितले की, माता आता पृथ्वीवर काहीतरी महाभयंकर होत आहे. हे युद्ध फक्त तुम्हीच थांबवू शकता. त्याचवेळी आदिमाया शक्ती पार्वती माता प्रगट झाली. पार्वती मातेने ते वज्र नावाचे अस्र आपल्या उदरामध्ये घेतले आणि हे युद्ध थांबवले. नंतर आदिमाया शक्ती पार्वतीने कालिकत नावाच्या राक्षसाचा आणि दंतुर आणि दुर्धर या त्याच्या राक्षस जोडीदारांचा वध केला. अशा प्रकारे पार्वतीने धारण केलेल्या त्या रूपाला वज्र अस्र आपल्या उदरात घेतल्यामुळे वज्रेश्वरी माता संबोधण्यात आले होते.

तेव्हा सगळे देव पार्वती मातेच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी देवीला सांगितले की, माता तुम्ही या ठिकाणी थांबून येथील जनतेचा उद्धार करा. म्हणून देवाच्या सांगण्यानुसार वज्रेश्वरी माता येथे तिच्या गुप्त रूपात वास्तव्य करू लागली. हा इतिहास चार ते साडेचार हजार वर्षांपूर्वीचा आहे. नवनाथ ग्रंथामध्ये सातव्या अध्यायामध्ये सांगितले आहे की, नाथपंथी गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ वनीच्या आदिमाया शक्ती सप्तशृंगी मातेच्या म्हणजेच पार्वती मातेच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी सप्तशृंगी मातेने त्यांना सांगितले होते की माझा जो पुढील अवतार आहे तो वज्रेश्वरी माता म्हणून असेल.

म्हणून आज ज्या ठिकाणी वज्रेश्वरी मातेचे मंदिर आहे त्या ठिकाणी गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ दर्शन घेण्यासाठी आले होते. हा पुरावा नवनाथ ग्रंथसार मध्ये सांगितलेला आहे. सन 1739 मध्ये वसईचा किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. त्यावेळी पेशवेकालीन सरदार चिमाजी अप्पांनी वसई किल्ल्यावर आक्रमण करण्याचे ठरवले होते. या आक्रमणाच्या अगोदर चिमाजी आप्पा वज्रेश्वरी मातेच्या दर्शनाला जाऊन देवीच्या पायाशी नतमस्तक झाले होते. तसेच त्यांनी वज्रेश्वरी मातेला नवस केला होता की हे माता जर आम्ही ही मोहीम फत्य करू शकलो तर आम्ही तुझे भव्य असे मंदिर बांधू आणि तसेच झाले देवी चिमाजी आप्पाच्या नवसाला पावली व चिमाजी अप्पांनी वसई किल्ल्यावर आक्रमण करून पोर्तुगीजांना पराभूत करून विजय मिळवला.

नंतर विजय उत्सव साजरा करून चिमाजी आप्पांनी वज्रेश्वरी चे भव्य दिव्य मंदिर बांधले. या मंदिराच्या सभोवती तटबंदी आणि बुरुज आहेत. असे म्हणतात या मंदिराची वास्तू वसई किल्ल्या सोबत मिळती जुळती आहे. त्यामुळे मंदिराकडे जाताना एखाद्या किल्ल्याकडे गेल्यासारखे वाटते. फार पुरातन व पारंपारिक या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर सुंदर वज्रेश्वरी मातेची मूर्ती दिसते. वज्रेश्वरी मातेला पाहता क्षणीच आपले डोळे आनंदाने भरून येतात. मातेच्या हातामध्ये खडग,गदा असून तिच्या दोन्ही बाजूला रेणुका आणि कालिका माता विराजमान आहेत. चैत्र महिन्यामध्ये या ठिकाणी फार मोठी यात्रा भरते.

यात्रेला महाराष्ट्रासह देशभरातून भक्त येत असतात. तसेच नवरात्र मध्ये सुद्धा या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. आजूबाजूच्या परिसरातून दर मंगळवारी सुद्धा येथे फार मोठी भक्तांची गर्दी पहावयास मिळते. येथील आजूबाजूच्या परिसरात या देवीला लोक कुलमाता म्हणून मानतात. तसेच आगरी आणि कोळी बांधवांची या देवीवर फार मोठी श्रद्धा आहे. तसेच चिमाजी आप्पांच्या नवस पूर्तीनंतर अनेक भक्त येथे देवीला नवस करू लागले.अनेकांच्या मनातील इच्छा येथे पूर्ण झाल्याचे अनुभव लोक सांगतात. म्हणून मनापासून भक्ती करणाऱ्या लोकांच्या सर्व इच्छा येते पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे.

वज्रेश्वरी च्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांचा देवीच्या दर्शनासाठी ओघ असतोच तसेच वार्षिक उत्सवाला येथे फार मोठी गर्दी पाहावयास मिळते. या मंदिरापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर गणेशपुरी आहे. त्या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहे. नदीच्या पात्रातच हे कुंड आहेत, सभोवताली थंड पाणी वाहत आहे आणि या कुंडांमधून गरम पाणी वाहत असतें . प्रत्येक झऱ्याच्या पाण्याचे तापमान वेगळे आहे. काही जास्त उष्ण तर काही कमी उष्ण आहेत. हा एक निसर्गाचा चमत्कार आहे.

या कुंडांचा उल्लेख सुद्धा नवनाथ ग्रंथामध्ये केला आहे. या वरून आपल्याला कळते की हे गरम पाण्याचे कुंड किती प्राचीन आहेत. आजही या गरम पाण्यात स्नान केल्याने त्वचा रोग नष्ट होतात असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. तसेच या ठिकाणी नित्यानंद महाराजांचा आश्रम आहे. भक्तगण नित्यानंद महाराजांचा दर्शन घेऊन येथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतात. त्यामुळे वज्रेश्वरीला गेल्यानंतर तीर्थस्थानाबरोबर पर्यटनाचा लाभही भाविकांना घेता येतो.

Leave a Comment