वैष्णवी देवी | Vaishnavi Devi


उत्तर भारतामधील कश्मीर मधील वैष्णवी देवीचे ( Vaishnavi Devi ) मंदिर हिंदू भारतीय लोकांचे पवित्र आणि पूजनीय ठिकाण आहे. हे मंदिर उंच पर्वतावर असल्यामुळे येथील भव्यता, दिव्यता आणि निसर्ग रम्य सुंदरता यामुळे सुद्धा ते प्रसिद्ध आहे. हे मंदिर पाच हजार दोनशे फूट उंचीवर असून कटरा या शहरापासून जवळजवळ 14 किलोमीटर अंतरावर आहे. दरवर्षी येथे लाखोंच्या संख्येने भाविक तीर्थयात्रा करतात. हे भारतातील तिरूमला व्यंकटेश्वर मंदिरानंतर दुसरे सर्वाधिक भेट दिले जाणारे जाणारे तीर्थक्षेत्र आहे. माता वैष्णवी देवी संबंधी अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. परंतु त्यातील काही कथांना मान्यता आहे.

जसे की, मान्यतेनुसार माता वैष्णवी देवीने आपल्या परमभक्त श्रीधर याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याचा जीव वाचवला होता. आणि त्याच घटनेमुळे संपूर्ण सृष्टीला वैष्णवी देवीच्या अस्तित्वाची जाणीव झाली होती. कटरा पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हंसाली नावाच्या गावात माता वैष्णवी देवीचे भक्त श्रीधर राहत होते. ते निपुत्रिक असल्यामुळे नेहमी दुःखी असायचे. एक दिवस त्यांनी आपल्या घरी नवरात्री उत्सवानिमित्त लहान मुलींना जेवणासाठी आमंत्रित केले. आपल्या भक्तासाठी माता वैष्णवी देवी मुलीच्या रूपात त्यांच्यामध्ये येऊन बसली होती. पूजेनंतर सर्व मुली उठून गेल्या परंतु माता वैष्णवी तेथेच बसून राहिली आणि भक्त श्रीधरला म्हणाली की, गावातील सगळ्यांना आपल्या घरी भंडाऱ्यासाठी निमंत्रित करा.

श्रीधर ने त्या मुलीचे बोलणे ऐकून आसपासच्या सर्व लोकांना भंडाऱ्याचे निमंत्रण दिले. सर्वांना निमंत्रण पोहोचल्यानंतर श्रीधर घरी आले. तेव्हा गुरु गोरक्षनाथ आणि त्यांचे शिष्य बाबा भैरवनाथ यांच्या बरोबरच त्यांच्या इतर शिष्यांनाही भंडाऱ्यासाठी त्यांनी निमंत्रित केले होते. एवढ्या सगळ्यांना भोजनाचे निमंत्रण असल्यामुळे सगळे गावकरी अचंबित झालेले होते. अशी कोणती मुलगी आहे की ती सर्व गावाला जेवण देऊ इच्छित आहे. ठरलेल्या दिवसाप्रमाणे सर्व गाववाले श्रीधर यांच्या घरी भंडाऱ्यासाठी एकत्रित आले.

जेवणासाठी सर्व पंक्ती बसल्यानंतर कन्या रुपी वैष्णवी देवीने एका पात्रातून सर्वांना भोजन वाढण्यास सुरुवात केली. भोजन वाढताना ज्यावेळेस ती कन्या भैरवनाथाजवळ गेली तेव्हा ते तिला म्हणाले की मी खीर ऐवजी मांस भक्षण करू इच्छित आहे. तसेच मला मदिरा प्राशन करण्याची इच्छा झाली आहे. त्यावेळी कन्या रुपी माता वैष्णवी देवीने त्याला समजावले की हे ब्राह्मणा घरचे जेवण आहे. यामध्ये मांसाहार दिला जात नाही. तरी भैरवनाथांनी त्याचा हट्ट चालूच ठेवला आणि कन्या रुपी मातेला पकडण्यास आणि तिची चेष्टा करण्यास सुरुवात केली. तेव्हा कन्यारूपी माता वैष्णवी देवीने त्याच्या कपट प्रवृत्तीला ओळखले आणि वायुरूपात त्रिकूट पर्वताच्या दिशेने उडू लागली. भैरवाने तरीही तिचा पाठलाग केला.

असे सांगितले जाते की त्यावेळी माता वैष्णवी देवीच्या रक्षणासाठी पवनपुत्र हनुमान सुद्धा होते. हनुमानाला जेव्हा तहान लागली तेव्हा माता वैष्णवी देवीने आपल्या धनुष्यातून डोंगरामध्ये बाण मारून पाणी काढले होते आणि त्या पाण्यामध्ये माता वैष्णवी देवीने तिचे केस धुतले होते. आज सुद्धा ही जलधारा बाळगंगा नावाने ओळखली जाते. या पाण्यात स्नान केल्याने भक्तांच्या अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे. त्यानंतर माता वैष्णवी देवीने तेथील एका गुफेमध्ये नऊ महिने कठोर तपश्चर्या केली.

त्यावेळीही भैरवनाथ तिच्यामागे आले होते. तेव्हा भैरवनाथाला एका साधूने सांगितले की तू जिला एक कन्या समजतो ती एक आदिशक्ती जगदंबा माता आहे. त्यामुळे तू त्या महाशक्तीचा पीछा सोडून दे. तरीही भैरवनाथाने साधूची विनंती मान्य केली नाही. तेव्हा माता वैष्णवी देवी गुफेतून दुसरा मार्ग काढून निघून गेली. ही गुफा आजही आदिकुमारी, गर्भ कुमारी या नावाने ओळखली जाते. त्या गुफे मध्ये देवीच्या चरण पादुका आहेत. असे म्हटले जाते की, या पादुकांच्या ठिकाणी देवीने पळता पळता वळून भैरवनाथाकडे पाहिले होते. गुफेतून बाहेर निघाल्यानंतर त्या कन्येने देवीचे रूप धारण केले. तसेच तिने भैरवनाथाला चेतावणी दिली आणि परत जाण्यास सांगितले. तरीही भैरवनाथाने ते मानले नाही. देवी परत गुफा मध्ये गेल्यानंतर हनुमंताने गुहेबाहेर भैरवनाथ बरोबर युद्ध केले.

तरीही भैरवनाथाने हार मानली नाही. शेवटी जेव्हा वीर हनुमान थकले त्यावेळी माता वैष्णवी देवीने महाकालीचे रूप धारण करून भैरवनाथा बरोबर युद्ध केले. त्यावेळी भैरवनाथाचे मातेने शिर उडवले. ते शीर उडून त्रिकूट पर्वतजाजवळ भैरव घाटी येथे पडले. तेथे एक मंदिर उभारले असून त्या स्थानाला भैरवनाथ मंदिर या नावाने ओळखले जाते. तसेच ज्या ठिकाणी माता वैष्णवी देवीने भैरवनाथाचा वध केला त्या पवित्र ठिकाणाला पवित्र गुफा किंवा भवन नावाने ओळखले जाते. या ठिकाणी माता कालिका डाव्या बाजूला, मध्यभागी माता सरस्वती आणि उजव्या बाजूला महालक्ष्मी माता पिंडीच्या रूपाने गुहेत विराजमान आहे.

तिन्हींच्या एकत्रित रूपालाच माता वैष्णवी देवीचे रूप मानले जाते. असे म्हटले जाते की भैरवनाथाला आपला वध होण्यापूर्वी आपल्या चुकीचा पश्चाताप झाल्यानंतर त्याने आपल्या समाधानासाठी माता वैष्णवी देवीकडे शेवटची इच्छा व्यक्त केली. देवी वैष्णवीला माहीत होते की मोक्ष प्राप्तीसाठी भैरवनाथ माझा पिच्छा करत होता म्हणून तेव्हा माता वैष्णवी देवी ने त्याला वरदान दिले की माझ्या दर्शनानंतर भक्ताने तुझे दर्शन घेतल्याशिवाय माझे दर्शन पूर्णत्वास जाणार नाही. आणि याच मान्यतेनुसार वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी जाणारे सर्व भक्त वैष्णवी देवीच्या दर्शनानंतर आठ किलोमीटर अंतराचा पहाड चढून भैरवनाथ मंदिरात दर्शन घेतात.

या काळातच माता वैष्णवी देवीने तीन पिंडाच्या आकाराचे रूप धारण केले कायमस्वरूपी आणि ध्यान मग्न झाली. त्यावेळी देवीचे भक्त श्रीधर बेचैन झाले होते. ते देवीच्या शोधात त्रिकुट पर्वताच्या दिशेने पुढे गेले की जे ठिकाण त्यांनी स्वप्नामध्ये पाहिलेले होते. शेवटी ते एका गुहेच्या द्वारा पर्यंत आले आणि देवीने धारण केलेल्या पिंडापर्यंत पोहोचले. तेव्हापासून त्या पिंडांची पूजा ही त्यांची दिनचर्या झाली. थोड्या दिवसात देवी प्रकट होऊन देवीने भक्त श्रीधरला प्रत्यक्ष दर्शन दिले. तेव्हापासून श्रीधर आणि श्रीधर यांचे वंशज देवीचे नित्य क्रमाने पूजा पठण करतात. अशीच एक वैष्णवी देवीची दुसरीही कथा सांगितली जाते.

जगामध्ये धर्माची हानी होऊन विश्वामध्ये अधर्माचा कल्लोळ माजला असताना आदिशक्ती देवीचे तीनही रुपे महासरस्वती, महालक्ष्मी आणि महादुर्गा यांनी आपल्या सामूहिक शक्तीने धर्माच्या रक्षणासाठी एका कन्येला प्रगट केले होते. ही कन्या त्रेता युगात भारताच्या दक्षिण दिशेला महासागराच्या किनारी रामेश्वर मध्ये पंडित रत्नाकर यांच्या पोटी कन्या रूपात जन्माला आली. कित्येक वर्षे रत्नाकर यांना पुत्रप्राप्ती होत नसल्याने रत्नाकर यांनी त्या कन्येला त्रिकुटा असे नाव दिले. परंतु भगवान विष्णूच्या अंश रुपी प्रकट होण्याच्या कारणामुळे तिला वैष्णवी असे नाव पडले. ती कन्या वयाच्या नऊ वर्षांची असताना तिला माहित झाले की, भगवान विष्णूंनी सुद्धा पृथ्वीतलावर श्रीरामाच्या रूपाने अवतार घेतला होता.

तेव्हापासून ती भगवान श्रीरामाला पती मानून रामाला मिळवण्यासाठी कठोर तपचर्या करू लागली. जेव्हा श्रीराम सीता हरण झाले असताना सीतेच्या शोधात रामेश्वरला पोहोचले तेव्हा त्यांनी समुद्राच्या किनारी तप करत बसलेल्या एका कन्येला पाहिले. मग त्या मुलीने भगवान श्रीरामाला मला पत्नीच्या रूपात पाहिले जावे अशी विनंती केली. श्रीराम तिला म्हटले की मी सीतेशी लग्न केलेले असून प्रत्नीव्रताचा पण घेतलेला आहे. त्यामुळे मी तुझ्याशी आता लग्न करू शकत नाही. मी पुन्हा कलयुगात जन्माला येऊन त्यावेळी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करेल. तोपर्यंत तू त्रिकूट पर्वतावर जाऊन तप कर आणि लोकांच्या दुःख आणि कष्टांचे निवारण कर.

जेव्हा श्री रामाने रावणाविरोधात विजय मिळवला तेव्हा वैष्णवी देवीने नवरात्र उत्सव करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कित्येक लोक नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उत्सवात रामायणपाठ करतात. श्री रामाने तिला वचन दिले होते की समस्त संसार करणाऱ्यां कडून या नऊ दिवसात माता वैष्णवी देवीची स्तुती केली जाईल. त्रिकुटा वैष्णवी देवीच्या रूपाने प्रसिद्ध होईल आणि सदा सर्वदा अमर राहील.

Leave a Comment