त्रैलंग स्वामी | Trailanga Swami

जवळपास 300 वर्ष कार्यकाळ असणारे त्रैलंग स्वामी ( Trailanga Swami ) वाराणसी मध्ये सुमारे दीडशे वर्ष वास्तव्य करत होते. फार मोठे योगी, तपस्वी आणि साध्य पुरुष त्रैलंग स्वामी यांना भेटण्यासाठी येत असत. तसेच स्वामी विवेकानंद यांचे गुरु स्वामी परमहंस हे नेहमी स्वामींना भेटण्यासाठी वाराणसी मध्ये यायचे. त्यांना काशीचे सचल विश्वनाथ म्हटले जायचे.

धर्मनगरी वाराणसीची तुलना मानवी सभ्यतेच्या सर्वात प्राचीन प्रसिद्ध ठिकाणांमध्ये केली जाते. असे मानले जाते की हे ठिकाण भगवान शंकराच्या त्रिशूलावर उभे आहे. एवढेच नव्हे तर असे मानले जाते की या ठिकाणी ज्याला मरण येईल तो जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. काशी अनेक महान साधू, संत, योगी, तपस्वी आणि अवधूतांची नगरी आहे. त्यातील एक म्हणजे त्रैलंग स्वामी.

त्यांचा कार्यकाल संपेपर्यंत त्यांचे वय 300 वर्षापर्यंतचे सांगितले जाते. या तीनशे वर्षांमध्ये त्यांच्याबरोबर अनेक चमत्कारिक कथा सांगितल्या जातात. त्रैलंग स्वामी गंगा नदीच्या पाण्याच्या लहरीवर कित्येक तास आसन लावून साधना करत असायचे तर कधी कित्येक तास पाण्यामध्ये दडून बसायचे. उन्हाळ्यात कठीण तापमानाच्या वेळी मणिकर्ण घाटाच्या दगडी शिळावर निश्चल अवस्थेत त्रैलंग स्वामी निर्वस्त्र दिसणे भक्तांसाठी काही नवीन नव्हते. तसेच एकेकाळी त्रैलंग स्वामींना इंग्रजांनी जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कोणीही त्रैलंग स्वामींना जेलमध्ये ठेवू शकले नाही.

त्याचप्रमाणे एक वेळ त्यांना विष देण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यांच्यापुढे विष प्रयोग सुद्धा निकामी ठरला.एकदा त्रैलंग स्वामींना भेटण्यासाठी रामकृष्ण परमहंस आले तेव्हा काही अद्भुत झाले. राम कृष्ण परमहंस यांनी सर्वांना सांगितले की हे तर साक्षात “शिव” आहेत. त्रैलंग स्वामीचा जन्म 27 नोव्हेंबर 1607 मध्ये आंध्र प्रदेशातील विजयनगर जिल्ह्यात झाला होता. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव शिवराम असे ठेवले होते.त्यांचे पूर्वज आणि आई-वडील सुरवातीपासून शिवभक्त होते. शिवराम सुद्धा लहानपणापासून शिव भक्ती करत असत. पुढे लग्नाच्या वयात आल्यानंतर सुद्धा त्यांनी लग्न केले नाही.

जेव्हा ते 40 वर्षांचे झाले होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी त्यांनी आपल्या आईच्या म्हणण्यानुसार भगवती काली मातेची सेवा आणि भक्ती करण्यास सुरुवात केली होती. शिवरामचे त्यांच्या आईवर इतके प्रेम होते की त्यांची आई मरण पावल्यानंतर ते स्मशानात जाऊन राहू लागले. शिवाय तेथेच ते स्मशानात साधना करू लागले. असे सांगितले जाते की त्रैलंग स्वामींनी तब्बल वीस वर्ष स्मशान घाटात तपस्या केली. त्यांची नित्य क्रमाने साधना चालू असताना एक दिवस भागीरथ स्वामी स्मशाना जवळून चालले होते तेव्हा त्यांची नजर स्मशानात तपस्या करत बसलेल्या शिवराम यांच्यावर पडली.

सांगितले जाते की भागीरथ स्वामींनी आपल्या दिव्य दृष्टीने शिवराम चे उज्वल भविष्य आधीच पाहिले होते. त्यामुळे भागीरथ स्वामी त्यांना आपल्याबरोबर पुष्कर तीर्थावर घेऊन आले. पुष्कर तीर्थावर भागीरथ स्वामींनी शिवराम स्वामींना वयाच्या 78 व्या वर्षी संन्यास दीक्षा दिली. तसेच त्यांचे नाव बदलून त्यांना स्वामी गणपती सरस्वती असे नाव दिले. पुढे सन 1695 च्या आसपास भागीरथ स्वामी यांचा देहांत झाला. त्यानंतर त्रैलंग स्वामी भारत भ्रमण करण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त होते.

भारत भ्रमण करताना त्यांनी रामेश्वरम, नेपाळ, सुदूर दुर्गम, हिमालय अशा जवळजवळ पूर्ण भारतातील महत्त्वाच्या सर्व तीर्थस्थळांना भेटी दिल्यानंतर सन 1734 मध्ये ते परत काशीमध्ये पोहोचले आणि ते कायमचेच काशीचे झाले. त्रैलंग स्वामी ज्यावेळी काशीमध्ये परत आले त्यावेळी त्यांचे वय 122 वर्षे होते. परंतु असे सांगितले जाते की त्यांची शरीरयष्टी पन्नास वर्षे वयाच्या व्यक्ती सारखी दिसत असे.

त्यांचे वजन जवळपास 140 किलो होते असे सांगितले जाते. त्यानंतर वाराणसीच्या लोकांनी ते तेलंगणामध्ये येऊन राहिल्यामुळे त्यांना त्रैलंग स्वामी असे नाव दिले. स्वामी अनेक वेळा मौन पाळत असत. भूक,पाणी आणि इंद्रियांवर त्यांनी विजय प्राप्त केला होता. ते कित्येक दिवस बिगर जेवणाचे राहत होते. त्यावेळी काशीमध्ये योगीराज जामा चरण यांच्या व्यक्तित्व व चमत्कारामुळे ते प्रसिद्ध होते.

त्रैलंग स्वामी सुद्धा त्यांचा फार सन्मान करत असत. एकदा त्रैलंग स्वामींनी लाहिरी महाशय योगीराज जामा चरण यांचा मोठा सन्मान करण्याचे ठरवले. परंतु त्यांना त्यांच्या शिष्याने विचारले महाराज आपण एवढे मोठे संन्याशी असून सुद्धा एका साधारण संन्याशाचे एवढे मोठे अभिनंदन का करू इच्छिता. यावर उत्तर देताना त्रैलंग स्वामी म्हणाले लाहिरी महाराज साधारण नाहीत. ते माता भगवती चे असे पुत्र आहेत की माता भगवती ने त्यांना जिथे बसवले तिथे ते चुपचाप बसत आहेत. गृहस्थ अवस्थेत राहून सुद्धा त्यांनी अध्यात्मिक उच्च लेवल गाठलेली आहे. हे सर्व करण्यासाठी मला माझे सर्व त्याग करावे लागले आहे.

त्रैलंग स्वामींना देह बोध नव्हता. लहान मुलांसारखे ते कपडे न घालता काशी मध्ये फिरत असायचे. इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना अशा अश्लीलतेच्या वागणुकीबद्दल जेलमध्ये टाकले. पुढे काही वेळातच पोलिसांनी त्यांना जेलच्या छतावर पाहिले. त्यांना परत पक्क्या कोठडीत बंद केले. तरी ते पोलिसांना बाहेर दिसायचे. असे अनेक वेळा झाल्यानंतर शेवटी पोलिसांनी त्यांना सोडून दिले. त्रैलंग स्वामींच्या चमत्कारांच्या अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. जसे की त्यांना जहर देऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला.

एकदा एका नास्तिक माणसाने त्रैलंग स्वामींना पाखंडी म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला.रंगकाम करणाऱ्या त्या माणसाने एका बाटलीत रंगकाम करण्याचा चुना घेऊन महाराजांकडे गेला आणि म्हणाला महाराज फार प्रेमाने मी तुमच्यासाठी दही आणले आहे. कृपया हे दही तुम्ही घ्या. त्रैलंग स्वामींनी काहीही शंका न घेता तसेच त्याच्याकडे कुठल्याही शंकाखोर नजरेने न पाहता सारा चुना पिऊन घेतला. पिल्यानंतर चुपचाप ते एका जागेवर बसून राहिले. तो व्यक्ती वाट पाहत होता की आता महाराज मरणार.

परंतु झाले सगळे उलटे. महाराजांना काहीच नाही झाले परंतु तो व्यक्ती पोटात त्रास होत आहे म्हणून तरफडू लागला. त्याला एवढा त्रास होऊ लागला की त्याला वाटले आता मी मरणार. मग तो जीव वाचवण्यासाठी त्रैलंग स्वामींना माफी मागून कृपया माझा जीव वाचवा असे म्हणू लागला.त्यावर त्रैलंग स्वामी त्याला म्हणाले की अरे भल्या माणसा, माझे आणि तुझे जीवन एकसाथ जोडलेले आहे.

जर मला ज्ञान नसते की ईश्वर माझ्या पोटामध्ये ज्याप्रमाणे आहेत तसे संपूर्ण ब्रम्हांडात ते सर्वत्र आहेत तर या विषाने मी मरण पावलो असतो. मग त्रैलंग स्वामींच्या कृपेने ती व्यक्ती बरी झाली आणि गुपचूप तिथून तो निघून गेला. अनेक सिद्धीने परिपूर्ण असलेल्या त्रैलंग स्वामींनी आसपासच्या परिसरात अनेक ठिकाणी मृत पावलेल्या व्यक्तींना स्पर्श करून जिवंत केल्याच्या घटना सुद्धा सांगितल्या जातात.

स्वामींना अनेक महान विभूती बनारसला येऊन त्यांचे मनोभावे दर्शन घेत असत. जसे की, महेंद्रनाथ, स्वामी विवेकानंद, स्वामी परमहंस, स्वामी प्रेमानंद, स्वामी अभेदानंद, स्वामी भास्करानंद, स्वामी विशुद्धानंद तसेच इतरही अनेक अध्यात्मिक विभूती त्यांना भेटायला येत असत. असे सांगितले जाते की रामकृष्ण परमहंस एक दिवस आपल्या शिष्यांसोबत भगवान विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी काशी तीर्थक्षेत्र आले होते. ते आणि त्यांच्या सोबतची सर्व मंडळी “हर हर महादेव” चा गजर करत काशीच्या परिसरात फिरत होते. तेव्हा रामकृष्ण परमहंस यांच्या समोर त्रैलंग स्वामी येऊन उभे राहिले.

दोन्ही संतांनी एकमेकांना त्यांच्या दिव्य दृष्टीने पाहिले आणि एकमेकांना अभिवादन केले. त्यानंतर रामकृष्ण परमहंस काशी विश्वनाथचे दर्शन न घेता परत निघून गेले. जेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना काशी विश्वनाथाचे दर्शन न घेण्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले की साक्षात काशी विश्वनाथ माझ्यासमोर दर्शन देण्यासाठी उभे होते. ते ज्ञानाच्या चरम अवस्थेमध्ये आहेत. आता त्यांच्या मध्ये देह बोध उरला नाही.अशाप्रकारे त्रैलंग स्वामी साक्षात परमहंस आहेत. ते वाराणसी चे खरे महादेव होते.

त्यांनी शेवटी 26 डिसेंबर 1827 दिवशी महासमाधी घेतली. तोपर्यंत ते वाराणसीच्या अस्सी घाट आणि हनुमान घाट जवळील वेद अभ्यास आश्रम आणि तशास्व मेघ घाट येथे निवास करत होते. आजही त्यांची वाराणसी मध्ये पंच घाटावर समाधी आहे. तेथे देश विदेशातील अध्यात्मिक जिज्ञासू आणि शिव भक्त त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जातात. पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला त्यांची जयंती साजरी केली जाते.

Leave a Comment