पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात जुन्नर या शहराच्या ठिकाणापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेले वडज ( Tirth Kshetra vadajcha Khandoba )हे मीना नदीच्या काठावर वसलेले एक गाव असून कुलस्वामी खंडेराय महाराज यांच्या येथील वास्तव्यामुळे हे फार प्रसिद्ध आहे. येथील वडज धरणामुळे येथील निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर पडलेली आपणास दिसते.
येथील खंडोबा देवाचे मूळ स्थान वडजच्या भंडारा डोंगरावर असलेल्या जोगद्यावर आहे. वडज गावापासून हा जोगधा साधारणपणे दीड किलोमीटर अंतरावर आहे. एका आख्यायिकेनुसार येथील सदानंद नावाच्या भक्ताने देवाला साद घातली आणि या भक्ताच्या सादेला देवाने हाक दिली. त्यामुळे हे तीर्थक्षेत्र तयार झाले. ऐतिहासिक वारसा लाभलेले वडज हे गाव सर्व संपन्न असून येथील खंडोबा देवाच्या मंदिरामुळे फार प्रसिद्ध आहे. या गावात सातारा जिल्ह्यातील कराड मधील एक सदानंद चव्हाण नावाचे गृहस्थ कुटुंबासह पोट पाण्यासाठी या मीना नदीकाठच्या गावी वडज येथे आले होते.
त्यांच्या घरात पूर्वजांपासूनच खंडोबाची भक्ती चालत असे. त्यामुळे गावाकडून येतानाच त्यांनी त्यांच्यासोबत त्यांचे कुलदैवत असलेल्या पालीच्या खंडोबाच्या पादुका घेऊन ते इकडे आले होते. याच पादुकांची स्थापना त्यांनी भंडारा डोंगरावर असलेल्या कपारीत एका ठिकाणी केली होती. तसेच त्या ठिकाणाला ते जोगधा असे म्हणत. सदानंद चव्हाण नित्य क्रमाने मीना नदीच्या पात्रात सकाळी अंघोळ करून नदीतून काही पाणी घेऊन जोगधा येथे जाऊन देवाला आंघोळ घालून पूजा करत असत. पुढे देवाचा जवळचा भक्त म्हणून त्यांना गावकरी व पंचक्रोशीतील लोक ओळखत असायचे.
हळूहळू अनेक लोक भंडारा डोंगरावर देवाच्या दर्शनासाठी जाऊ लागले. श्रद्धेपोटी अनेक जण देवाला नवस करीत आणि त्यांच्या समस्यांचे निरसनही देवाच्या कृपेमुळे होऊ लागले. त्यामुळे पुढे लवकरच जागृत देवस्थान म्हणून नावारूपास आले . गावातील व पंचक्रोशीतील लोक मोठ्या श्रद्धेने या देवाची पूजा करत. हळूहळू देवाची ख्याती दूरवर पसरली. लवकरच येथे छोटा यात्रा उत्सव भरू लागला. तसेच इतरही लहान मोठे कार्यक्रम होऊ लागले. परंतु सदानंद यांचे आता वय झाल्यामुळे त्यांना दिसण्यास व ऐकण्यास कमी येऊ लागले होते. वय झाल्यामुळे त्यांना चालणेही कठीण झाले.
परंतु देवावरील श्रद्धा त्यांची काही केल्या जाईना.म्हणून एक दिवस पूजा झाल्यानंतर त्यांनी देवाला विनंती केली की हे देवा मला तुझ्या भक्तीशिवाय राहत नाही. परंतु मी म्हातारा झाल्यामुळे मला आता तुझ्याकडे येणे अशक्य आहे आणि याच विचाराने मी रोज आणखीनच खचत चाललो आहे. मी आता काय करू? माझा जीव तुझ्या भक्तीशिवाय कासावीस होत आहे. सदानंदाने सर्व गाऱ्हाणे देवाला ऐकवल्यानंतर ते हळूहळू आपल्या घराकडे निघाले. देवाकडे सकाळी आलेल्या सदानंदला घरी जाण्यास संध्याकाळ झाली होती. थकलेले सदानंद काहीही अन्न न घेता तेथेच आपल्या झोपडीत झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी चंपाषष्ठीचा दिवस होता. सदानंद झोपेत असताना त्यांना आदल्या दिवशी देवाने स्वप्नात दृष्टांत दिला आणि म्हणाले सदा उठ मी तुझ्या भक्तीचा भुकेला आहे. मला तुझी काळजी माहित आहे. तू माझ्या दर्शनासाठी उद्या चंपाषष्ठीला तेथे आल्यानंतर मी तुझ्या पाठीमागे लगेच येईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव. मी तुझ्या पाठीमागे येत असताना तू ज्या ठिकाणी मागे वळून पाहशील त्याच ठिकाणी मी थांबेल व माझ्या नावासोबत तुझी ख्याती एवढी वाढेल की माझ्या नावा अगोदर लोक तुझे नाव घेतील. स्वप्नात असे बोलून देव निघून गेले. सदानंद झोपेतून जागे झाले.
देवाचा दृष्टांत ऐकून सदानंदाने घाई घाई मीना नदीच्या पात्रात स्नान केले आणि जोधव्याकडे निघाले.
सदानंदाच्या मनात आनंद मावत नव्हता. देवा जवळ गेल्यानंतर सदानंदाने नेहमीप्रमाणे नित्य पूजा आटपून ते परत आपल्या झोपडीकडे निघाले. सदानंद रस्त्याला लागताच मागून घोड्याचा आणि घुंगराचा आवाज त्यांच्या कानी येऊ लागला. देवाच्या घोड्याचा आवाज सदानंदाने ओळखला आणि सदानंद आणखीनच आनंदी झाले. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
सदानंदाच्या मनात देवाला पाहण्याची लालसा जागृत झाली होती. आता सदानंदाचे भान हरपले होते. त्यांना शरीरातील थकवाही जाणवत नव्हता. कदाचित त्यावेळचा त्यांचा उत्साह म्हणजे भगवंताचे शक्ती बळच असावे. सर्वसाधारणपणे जोगध्या पासून एक किलोमीटर अंतरावर आल्यानंतर रोज सदानंद ज्या बोरीच्या झाडाखाली विसाव्यासाठी थांबत असे त्या झाडाजवळ आल्यानंतर देवाच्या भक्तीलालसेचे पोटी सदानंदाने अचानक मागे वळून पाहिले.
तेवढ्यात बोरीच्या झाडाच्या खोडाचा मोठा कडकड आवाज झाला व देव त्या झाडाच्या खोड्यात लुप्त झाले. देवाने स्वप्नात दिलेल्या दृष्टांत प्रमाणे आजही देवाच्या नावा अगोदर सदानंदाचे नाव घेऊन “सदानंदाचा येळकोट येळकोट” असा जयघोष केला जातो. पुढे त्याच बोरीच्या झाडाजवळ एक छोटेसे मंदिर बांधण्यात आले. जोगध्या जवळ देवाचे दर्शन घेणारे भक्त या बोरीच्या झाडाजवळ दर्शनासाठी येऊ लागले. पुढे बऱ्याच वेळा मंदिराचा जीर्णोद्धार करून बऱ्यापैकी चांगले मंदिर बांधण्यात आले.
त्यानंतर इस 1825 ते इस 1877 दरम्यान पंचक्रोशीतील दानशूर लोकांच्या देणगीतून, धान्य कोठाराच्या माध्यमातून आणि काही सरकारी निधीतून सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन भव्य दिव्य दगडी बांधकामाचे मोठे सुंदर मंदिर उभारले. या मंदिराची रचना, रंगरंगोटी वाखण्यासारखी असून मंदिराची बांधकाम शैली पाहून मन अगदी भारावून जाते. पुढे इस 1966 मध्ये मंदिराच्या ट्रस्टची स्थापना झाली.
त्यामुळे मंदिराचा कारभार आणखीनच सुरळीत झाला. पुढे 1976 पासून पुढे या ठिकाणी सामूहिक लग्न सोहळे पार पडू लागले. असे सांगितले जाते की जुन्नर तालुक्यात सगळ्यात जास्त विवाह होणारे हे ठिकाण गणले गेले आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यामध्ये माघ पौर्णिमेला येथे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक असलेला मोठा यात्रा उत्सव साजरा होतो. त्याचप्रमाणे चंपाषष्ठी व दसऱ्याला येथे उत्सव साजरे होतात. तसेच दसऱ्याला काल्याच्या कीर्तनासह सप्ताह नियोजित केला जातो.
या देवस्थान ट्रस्टच्या वतीने एक आयटीआय कॉलेज व एक हायस्कूल चालवण्यात येते. तसेच ट्रस्टच्या वतीने येथे येणाऱ्या भक्तांना अनेक चांगल्या प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात त्यामुळे येथे येणाऱ्या भक्तांची संख्या हजारो मध्ये असते. महाराष्ट्र सरकारने जुन्नर तालुका हे पुणे जिल्ह्यातील पहिले पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेले ठिकाण आहे. त्यामुळे येथे अनेक पर्यटन स्थळे आहे.
वडजच्या खंडोबा मंदिराच्या आसपास आणि जुन्नरसह आजूबाजूच्या परिसरात काही किलोमीटर अंतरावरच शिवनेरी किल्ला,निमगिरी किल्ला, नारायण गड किल्ला, हडसर किल्ला अशी ऐतिहासिक ठिकाणे आणि ओझर मध्ये अष्टविनायकांपैकी एक गणपती मंदिर, जुन्नर जवळ कुकडी नदीकाठी बौद्ध लेण्यांचे ठिकाण लेण्याद्री अशी धार्मिक प्रार्थनीय स्थळे आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी फिरायला आलेले पर्यटक आणि भक्त वडज येथे खंडोबा दर्शनासाठी लोक येतात.