दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरण्याचे ठिकाण तसेच शैवांचे आखाडे व दिगंबर अनी, निर्वाणीअनी, निर्मोही अनी असे तीन आखाडेही येथे भरतात. त्याचप्रमाणे निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी आणि गोदावरी नदीचा उगम यासाठीही त्रंबकेश्वर (Tirth kshetra Trimbakeshwar ) प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर हे एक तालुक्याचे ठिकाण आहे. याच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे.
दहाव्या शतकामध्ये शिलाहार राजाने भारत देशात गोदावरी,भीमा अशा महत्त्वाच्या बारा नद्यांच्या उगमस्थानी बारा ज्योतिर्लिंगांची निर्मिती केली. त्यातील हे एक ज्योतिर्लिंग आहे. त्रिंबक या गावी असल्यामुळे याला त्रंबकेश्वर नाव पडले. भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा हे मंदिर प्रसिद्ध आहे. त्यामुळे वर्षभर या ठिकाणी भाविकांची गर्दी असते. त्रिंबकेश्वर मंदिरातील शिवलिंगाला तीन मुख आहेत. त्यांना ब्रह्म,विष्णू आणि महेश असे संबोधतात. या लिंगावर एक सुवर्ण त्रिदेव मुकुट ठेवलेला आहे.
हा मुकुट पांडवांच्या काळापासून येथेच ठेवलेला आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. या मुकुटावर हिऱ्यासारखे अनेक रत्न जोडलेले आहेत. फक्त सोमवारीच आपण हा मुकुट मंदिरात पाहू शकतो कारण त्याच दिवशी तो मंदिरात आणला जातो. त्र्यंबकेश्वर मंदिराची बांधणी काळ्या दगडापासून केलेली आहे. या मंदिराची वास्तुकला फार अनोखी आणि अद्भुत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरात कालसर्प शांती, त्रिपिंडी विधी, नारायण नागबली ( Narayan Nagbali ) इत्यादी पूजा करण्यात येतात.
अनेक भक्तांना असे विधी मार्ग करण्यासाठी नाशिक या तीर्थक्षेत्राचा भटजींकडून पर्याय सुचवला जातो. आपण पैसे भरल्यावर विधीसाठी आलेल्या लोकांना राहण्याची, जेवणाची सोय येथे केली जाते, तसेच विधी साठी लागणारे सगळे साहित्य तेच उपलब्ध करून देतात. नानासाहेब पेशवे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे काम 1755 पासून तर 1786 पर्यंत चालू होते त्याकाळी हे मंदिर उभारण्यासाठी 16 लाख रुपये खर्च झाले होते. त्याकाळी ही रक्कम फार मोठी समजली जायची.
या मंदिराची बांधणी सिंधू आर्यशालीचा अद्भुत नमुना आहे. या मंदिराच्या गर्भामध्ये प्रवेश केला असता शिवलिंगाचे प्रथम आपणास डोळे दिसतात तसेच व्यवस्थित पाहिल्यास तेथील तीनही लिंग दिसतात. यात तीन लिंगाना त्रिदेव म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचा अवतार मानले जाते. येथे सकाळी होणाऱ्या पूजेनंतर या लिंगावर पंचमुखी मुकुट चढवला जातो. या मंदिराजवळच एक मोठा कुंड आहे त्याला गोदावरी नदीचे आवर्तन आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदी अनेक वेळा लुप्त असे मग गौतम ऋषींनी महान तपचर्या करून गोदावरी नदीचा बंद होणारा प्रवाह कायमचा सुरू ठेवण्यासाठी गोदावरीला बंधन घातले होते. तेव्हापासून या कुंडात कायमस्वरूपी पाणी राहते.
या कुंडाला कुशावर्त कुंड ( Kushavart Kund ) म्हणून ओळखले जाते. या कुंडात शैव आखाड्याच्या वेळी अनेक साधू पवित्र स्नान करतात. शिव पुराणानुसार ब्रह्मगिरी पर्वतावर पोहोचण्यासाठी 700 पायऱ्यांची शिडी तयार केली आहे. या शिडीवरून वर गेल्यानंतर रामकुंड आणि लक्ष्मण कुंड पर्यंत पोहोचता येते. वरती आपल्याला गोमुखातून वाहणाऱ्या गोदावरीचे दर्शन होते. पौराणिक कथेनुसार महर्षी ऋषी आणि त्यांच्या तपोवन भूमीत राहणाऱ्या ब्राह्मणांच्या बायका काही कारणास्तव गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिच्यावर नाराज झाल्या होत्या. मग त्या आपल्या पतीला गौतम ऋषीचा अपमान करण्यासाठी सांगतात.

त्यानंतर त्या ब्राह्मणांनी गणेशाची कठोर तपचर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर गणेश प्रसन्न होऊन त्यांना वर मागण्यास सांगितले . गौतम ऋषींना या आश्रमातून बाहेर काढावे असा वर ब्राम्हणांनी गणेशांकडे मागितला होता. श्री गणेशाला त्यावेळी त्यांची ही गोष्ट मान्य करावी लागली. तेव्हा श्री गणेशा ने एका दुर्बल गायीचे रूप धारण करून गौतम ऋषीच्या शेतात जाऊन त्यांचे पीक ती गाय खाऊ लागली. हे गौतम ऋषींनी पाहिल्यानंतर त्यांनी हातात एक लाकडी दांडा घेऊन गाईला तेथून ते पळवू लागले. गौतम ऋषींच्या दांड्याचा गायीला स्पर्श होताच गाय तेथे मरण पावली.
त्यावेळी सर्व ब्राह्मण एकत्र येऊन गौतम ऋषींनी गोहत्या केली असा आरडाओरडा करून गोहत्यारी म्हणून त्यांचा अपमान करू लागले. यावेळी गौतम ऋषी दुःखी होऊन त्यांनी त्या ब्राह्मणांना याचे प्रायश्चित्त आणि उपाय विचारला. त्यावेळी त्या ब्राह्मणांनी गौतम ऋषींना तीन वेळा पृथ्वीची परिक्रमा करून आपले पाप सर्वांना सांगत जावे असे सांगितले. तसेच परत इथे आल्यानंतर एक महिना ब्रह्मगिरी व्रत करावे तेव्हा तुमची शुद्धी होईल किंवा गंगा नदीचे पाणी आणून तिच्या पाण्याने स्नान करून एक करोड पार्थिव शिवलिंगाने भगवान शिवाची आराधना करून पुन्हा गंगेत स्नान करून अकरा वेळा ब्रह्मगिरी पर्वताच्या परिक्रमा करण्यास सांगितले.
तसेच 100 घरचे पवित्र पाणी आणून पार्थिव शिवलिंगाला स्नान घातल्यास तुमचा उद्धार होईल असे सांगितले. त्यानंतर गौतम ऋषी आणि त्यांच्या पत्नी भगवान शिवाची उपासना करू लागले एवढ्या मोठ्या कठोर तपानंतर भगवान शिव शंकरांनी त्यांना वर मागण्यास सांगितले. त्यावेळेस गौतम ऋषींनी त्यांना मला गोहत्तेतून मुक्त करावे असा वर मागितला.
भगवान शिव शंकरांनी सांगितले की गौतम तुम्ही सदा सर्वदा निष्पाप अहात. गो हत्तेचे पाप तुमच्यावर जाणून बुजून लावले गेले होते. असे केल्यामुळे तुमच्या आश्रमातील ब्राह्मणांना मी शिक्षा देऊ इच्छित आहे. मग गौतम ऋषी त्यांना म्हटले की, यामुळेच मला तुमचे दर्शन मिळाले. त्यामुळे त्यांच्यावर तुम्ही क्रोध करू नये. त्यावेळी अनेक ऋषीमुनींनी गौतम ऋषींचे कौतुक करून भगवान शिव शंकरांना आपण सदा सर्वदा याच ठिकाणी वास करावा अशी विनंती केली.
म्हणून भगवान शिव शंकरांनी त्यांची विनंती मान्य करून त्र्यंबक नावाने त्या ठिकाणी स्थापित झाले. त्र्यंबकेश्वर मंदिरात जेव्हा भगवान शिव शंकराची मोठी पालखी निघते त्यावेळी ते दृश्य पाहण्यासारखे असते. त्यावेळच्या भगवान शिवाच्या पंचमुखी सोन्याच्या मुकुटाला पालखीमध्ये ठेवून गावभर शिवगर्जना करत ही पालखी फिरवली जाते. त्यानंतर कुशावर्त घाट तीर्थात स्नान घातले जाते. त्यानंतर मुखवट्याला परत मंदिरात आणून देवाला हा हिरेजडित मुकुट घातला जातो.
हे सर्व दृश्य त्रंबकेश्वर देवाचा राज्याभिषेक असल्यासारखे भासते. शिवरात्री आणि श्रावण सोमवारच्या दिवशी त्रंबकेश्वर मध्ये भक्तांची लाखोंच्या संख्येने गर्दी असते. येथे येणारे सर्व भक्त सकाळी स्नान करून आराध्य भगवान शिवशंकराचे दर्शन घेतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी व दुःख मुक्त होण्यासाठी देवाकडे इच्छा व्यक्त करतात.मुंबईपासून 160 किलोमीटर तर पुण्यापासून 210 किलोमीटर अंतरावर असलेल्या नाशिक जिल्ह्यात त्रंबकेश्वर पासून जवळच पांडवलेणी गुफा पाहण्यासारखी आहे.
नाशिक पासून 11 किलोमीटरवर दूध सागर हा धबधबा आहे. हा स्पॉट लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे. तसेच नाशिक मधील कालाराम मंदिर हे लोकांसाठी प्रार्थनीय धार्मिक स्थळ आहे. येथे राम-लक्ष्मण आणि सीता यांच्या मुर्त्या आहेत. तसेच नाशिक पासून 17 किलोमीटर अंतरावर भगुर हे ऐतिहासिक स्थळ आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हे जन्मस्थळ आहे.तसेच नाशिक मधील मुक्तिधाम मंदिर. या मंदिराच्या विशिष्ट वास्तू कलेमुळे हे प्रसिद्ध आहे. येथे बारा ज्योतिर्लिंग आहे त्यामुळे हे फार प्रसिद्ध मानले जाते. या मंदिरातील सर्व भिंतींवर भगवद्गीतेतील श्लोक लिहिलेले आहेत.
नाशिक हे द्राक्षासाठी प्रसिद्ध असल्यामुळे येथे सर्वोत्कृष्ट वाईन उत्पादक म्हणून येथे सोला वाईन यार्ड आहे. त्याचप्रमाणे येथे नाशिक पासून 20 किलोमीटर अंतरावर आशिया खंडातील एकमेव शिक्का संग्रहालय आहे आणि येथील हरीहर किल्ला पाहण्यासारखा आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर च्या आसपास काही किलोमीटर अंतरावरच पंचवटी, रामकुंड, सप्तशृंगी देवी मंदिर, अंजनेरी हनुमान मंदिर, स्वामी समर्थ मठ इत्यादी प्रार्थनीय स्थळे आहेत.