तीर्थक्षेत्र शिवथरघळ | Tirth Kshetra Shivtharghal

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये तसेच इतरही काही ठिकाणी नैसर्गिकरीत्या अनेक घळी तयार झालेल्या आहेत. परंतु समर्थ रामदास स्वामींनी दासबोध या ग्रंथाची रचना केलेले ठिकाण असल्यामुळे शिवथरघळ(Tirth Kshetra Shivtharghal ) मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली. दक्षिण मोहिमेवर जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींचा शिवथरघळ येथे येऊन आशीर्वाद घेतला होता. महाराष्ट्रातील आठ घळी सम्राटांच्या घळी म्हणून ओळखल्या जातात.

हेळबागची घळ, मोरघळ, तारळ घळ, सज्जनगडाची रामघळ, चाफळची रामगड, चंद्रगिरीची घळ, जरंडेश्वर घळ आणि शिवथरघळ. शिवथरघळ येथेच दासबोध या पवित्र ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. समर्थांनी या घळीला “सुंदर मठ” असे नाव दिले होते. शिवथरघळ ची उंची 2985 मीटर आहे. शिवाजी महाराजांचे कट्टर वैरी जावळीचे मोरे यांच्या वतनदारी मध्ये शिवथरघळ आणि आजूबाजूचा परिसर येत होता. जावळीचे मोरे हे विजापूरच्या मुघल दरबारचे वतनदार होते. घनदाट झाडी आणि डोंगरांनी वेढलेला भूप्रदेश यामुळे मोरे वरचढ ठरत होते. इ.स .1648 मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीवर आक्रमण करून जावळीचा परिसर ताब्यात घेतला होता.

समर्थ रामदास स्वामी ( Samarth Ramdas swami ) अंदाजे इस 1649 मध्ये या घळीमध्ये वास्तव्य करण्यासाठी आले होते. पुढे दहा ते अकरा वर्षें ते याच ठिकाणी राहत होते. त्याच काळात त्यांनी दासबोध ( Dasbodh) या पवित्र ग्रंथाची रचना तेथे केली, म्हणून या ठिकाणाला दासबोधाची जननी असे म्हणतात. रायगड कडून महाड कडे जाताना उतरल्यानंतर आपणास शिवथरघळचा फाटा लागतो. तिथे एक निळा बोर्ड लावलेला आहे. या बोर्ड पासून सहा किलोमीटर अंतरावर शिवथरघळ आहे.श्री समर्थ स्वामीं नादासबोध जिथे बोधला आणि कल्याण स्वामीनी तो लिहून काढला असे हे परम पावन स्थान आहे. रायगड जिल्हा हा स्वराज्याची राजधानी आहे. तसेच शिवथरघळ रायगड मध्ये असल्यामुळे रायगडच्या सुरक्षिततेसाठी रायगडच्या आजूबाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी काही गडांची निर्मिती केली होती.

त्यापैकीच वरंधा घाटातून येताना कावळा नावाचा गड लागतो. त्याच गडाच्या बुरुंजावर एक भगवा फडकत आहे. त्याच पर्वतरांगेमध्ये सह्याद्रीच्या पोटात शिवथरघळ आहे. याच पर्वतरांगा उतरून जाताना समर्थ रामदास स्वामींनी ज्या ठिकाणी दासबोध ग्रंथाची रचना केली ते ठिकाण लागते. प्रवेशद्वारा जवळच भाविकांना राहण्यासाठी भक्त निवासाची सोय केलेली आहे. घळीपर्यंत दरीतून डोंगरावर जाताना काही पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत.घळीच्या शेजारीच एक वर्षभर वाहणारा आणि जोरजोरात आपटणारा धबधबा आहे. पावसाळ्यात या घबधब्याचा आवाज अतिशय भीतीदायक वाटतो.

अनेक पर्यटकांना आणि समर्थ भक्तांना आकर्षित करणारी शिवथरघळ बिरवाडी गावाच्या जवळ वरंधा घाट उतरल्यावर लागते. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत मोठ्या डोंगरात वाघजाई देवीच्या कुशीत शिवथरघळ आहे. याच परिसरात काळ नदीचा उगम झालेला आहे. ही पश्चिम वाहिनी काळ नदी पुढे सावित्री नदीत मिळते. याच काळ नदीच्या किनाऱ्याला आंबे,कसबे, आणि कुंभे ही गावे वसलेली आहेत. शिवथरघळ पासून काही अंतरावर प्रतापगड,तोरणा, रायगड आणि राजगड जवळपास सारख्या अंतरावरच आहेत.

शिवथरघळ जवळ अनेक धबधबे आहेत. शब्दात व्यक्त करता येणार नाही असा येथील नजारा आहे.येथील आजूबाजूचा परिसर सुद्धा फार निसर्ग रम्य आणि सुंदर आहे. मुख्य घळीकडे जाताना कठड्यांनी बांधलेला अरुंद रस्ता आहे. उंच पर्वताच्या खाली सुंदर अशी शिवथरघळ आहे. डोंगराच्या छता खाली असलेल्या शिवथरघळीत जाताना वाकून जावे लागते. काही ठिकाणी आपणास उभे राहता येते. जिथे समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ लिहिला त्या डोंगराच्या छतावर लाखो टन डोंगराचे ओझे आहे. परंतु कित्येक वर्ष ही शिवथरघळ अगदी सुरक्षित आहे. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड येथील सर्व कार्याची दखल घेते.

या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी यांच्या मूर्ती बसवण्यात आलेल्या आहेत. शिवथर घळीमध्ये गेल्यानंतर कल्पनाही करता येत नाही की आपल्या डोक्यावर फार मोठे डोंगर आहेत. घळीच्या मुख्य भागात गेल्यानंतर समर्थ रामदास स्वामी, सीता माता, राम, लक्ष्मण आणि बजरंग बली यांच्या मूर्ती आहेत. या सर्वांच्या मूर्तींना आपणास प्रदक्षिणा घालता येते. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाची रचना केलेली घळ नैसर्गिक तयार झालेली आहे. शिवथरघळ येथे इस 1957 मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. समर्थ रामदास स्वामींच्या या मठापासून शिवथरघळ फक्त पाचशे मीटर अंतरावर आहे.

समर्थ रामदास स्वामींचा मठ असलेल्या माळावर वाहने जाऊ शकतात. दासबोध 20 दशकांचा आहे. त्या प्रत्येकामध्ये दहा समास आहेत. आणि त्या 200 समासामध्ये त्यांच्या 7751 ओव्या आहेत. आपले दररोजचे जीवन जगताना या ग्रंथाचा उपयोग व्हावा असा हा ग्रंथ आहे. दासबोध मध्ये द्वेतापासून ते अद्वैतापर्यंतचे निरूपण आहे. तसेच यामध्ये पंचमहाभूतांचा उदय कसा झाला तेही समजते. . दासबोध या ग्रंथामध्ये सृष्टीची निर्मिती आणि शेवट कशाप्रकारे होईल हे सांगितले आहे . दासबोधात शहाणे आणि मूर्खांची लक्षणे पण सांगितली आहेत . राग कसा आवरावा, राजकारण कसे करावे अशा अनेक मार्मिक गोष्टी दासबोधामध्ये उल्लेखित केलेल्या आहेत.

शिवथरघळ म्हणजे हिरव्या निसर्गसृष्टीचा सहवास होय. त्यामुळे लाखो पर्यटक या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींच्या दर्शनाबरोबरच येथील वातावरणाचा लाभ घेतात. अगदी मन प्रसन्न होईल असे ठिकाण, मनाला शांती लाभेल असे ठिकाण, तसेच मनात नवीन चेतना निर्माण होतील असे ठिकाण अनेक भाविक फिरण्यासाठी सुद्धा निवडतात. घनदाट जंगल आणि धबधब्यांचा मोहक आवाज, हिरवे गार डोंगर, सतत वाहणारी नदी व समर्थ रामदास स्वामींच्या भक्तीचा सहवास यामुळे येथे जाऊन परमानंद मिळतो.

महाड शहरापासून अंदाजे 35 किलोमीटर अंतरावर शिवथरघळ आहे. मुंबई पुणे पंढरपूर महाड अशा अनेक ठिकाणाहून इकडे जाण्यासाठी मोठमोठे रस्ते आणि वाहने आहेत. एस टी बसेस आणि खाजगी वाहनाने भाविक येथे सहज जाऊ शकतात. शिवथरघळ येथे जाण्यासाठी कोकण रेल्वे,माणगाव रेल्वे ही रेल्वे स्थानके जवळचे आहेत. विशेषता पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे भरपूर आनंद लुटता येतो. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून मन प्रसन्न करण्यासाठी हे उत्तम ठिकाण मानले जाते.

Leave a Comment