महाराष्ट्राची राजधानी असलेल्या नागपूर शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर फार प्राचीन आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामटेक ( Tirth Kshetra Ramtek ) आहे. प्रभू रामचंद्र आपल्या वनवासाच्या काळात अगस्ती ऋषींना भेटण्यासाठी शिंदगिरी पर्वतावर या ठिकाणी आले होते. तसेच प्रभू रामाने पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत येथे काही काळ वास्तव्य केले होते. तसेच येथे एक स्वयंपाक घर तयार करून अनेक ऋषीमुनींना भोजन देण्यात आले होते. याचा उल्लेख पद्मपुराणांमध्ये केलेला आढळतो.
त्यामुळे प्राचीन काळापासून रामाचे वास्तव्य असणारे ठिकाण म्हणून या ठिकाणाला मान्यता आहे.
तसेच या ठिकाणी आणि येथील आजूबाजूच्या परिसरात प्रभू रामचंद्र यांच्याशी जोडलेले अनेक तीर्थ आहेत व ते या ठिकाणी राहिल्याचे काही निशाणही आहेत. मराठा सरदार रघुरावजी भोसले यांनी प्रभू रामचंद्र कडे एक इच्छा व्यक्त केली होती की जर मी लढाई जिंकली तर येथे एक भव्य किल्ला बांधीन. म्हणून त्यांनी विजयानंतर किल्ल्यासारखेच श्रीरामाचे भव्य मंदिर बांधले आहे.
रामटेक ( Ramtek ) बस स्थानकापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर एका डोंगरावर किल्ल्याच्या आतमध्ये आहे. रामटेक हे ठिकाण प्राचीन काळापासून प्राकृतिक रूपाने निसर्ग रम्य आणि सुंदर आहे. रामटेक येथे जाण्यासाठी प्रथम आपणास नागपूर येथे जावे लागते. महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वात मोठे शहर असल्यामुळे नागपूरला विमानाने, रेल्वेने, एसटी बसेसने किंवा स्वतःच्या खाजगी वाहनाने आपण सहज जाऊ शकतो. नागपूर हे शहर विमानतळ ,रेल्वे ,बस आणि मोठमोठ्या महामार्गाने जोडलेले आहे. नागपूर शहराच्या बस स्टैंड वरून रामटेकला जाण्यासाठी फक्त एक तास लागतो.
तसेच रामटेक बस स्टैंड वर जाण्यासाठी येथून एसी बसेस, साध्या बसेस, टॅक्सी, रिक्षा इत्यादी वाहने असतात. रामटेक बस स्टॅन्ड पासून मंदिर सहा किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी येथून तीन मार्ग आहेत. एक म्हणजे 600 पायऱ्या चढून मंदिराकडे जाता येते. दुसऱ्या रस्त्याने 150 पायऱ्या चढून वर जाता येते. तसेच अजून एका रस्त्याने आपण स्वतःच्या गाडीने , रिक्षा किंवा टॅक्सीने ही जाऊ शकतो. मंदिराजवळ पार्किंगची व्यवस्था आहे. पार्किंग पासूनच मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार प्राचीन दगडी बांधकामात केलेले असून भव्य दिव्य आहे.
आत मध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथम आपल्याला भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी एक वराह अवतार चे दर्शन होते. येथे वराह भगवंताची फार प्राचीन मूर्ती आहे. येथे अशी मान्यता आहे की वराह देवाचे दर्शन घेतल्यानंतर वराह मूर्तीच्या पायामध्ये असलेल्या जागेतून खालून गेले पाहिजे. पुढे गेल्यानंतर चक्रधर स्वामींचे मंदिर लागते. भगवान श्रीकृष्णाचा पाचवा अवतार समजले जाणारे चक्रधर स्वामी आणि भगवान श्री कृष्ण यांना हे मंदिर समर्पित आहे. त्रेता युगात रेवत राजाचे राज्य असताना चक्रधर स्वामींनी दहा महिने येथे निवास केला होता. पुढे गेल्यानंतर किल्ल्याच्या बुरुजा समोर मंदिराचे दुसरे प्रवेशद्वार आहे.
या प्रवेशद्वारातून वर आल्यानंतर मंदिरासमोर फार मोठे पटांगण दिसते. प्राचीन काळी याला सिंदला गिरी पर्वत तसेच याला तपो गिरी पर्वत असेही म्हटले जायचे. येथे भगवान श्रीरामाचे फार प्राचीन मंदिर होते. पुढे 18 व्या शताब्दी मध्ये नागपूरच्या मराठा सरदारांनी या मंदिराला किल्ल्याचे रूप दिले. समोर भगवान श्रीरामाचे मंदिर दिसते आणि येथे एका बाजूला महर्षी अगस्ती ऋषी आश्रम पण आहे.
तसेच येथे एक भगवान श्रीकृष्णाचे मंदिर आहे. येथे महर्षी अगस्ती ऋषी यांच्याकडून पेटवली जायची ती ज्योत आजही पेटती ठेवली जाते. तसेच महर्षी अगस्ती ऋषींची एक मूर्ती आहे. अशा प्रकारे या आश्रमात भगवान श्रीकृष्ण आणि अगस्ती ऋषींचे दर्शन घडते. पुढे मुख्य श्रीराम मंदिरात प्रवेश केल्यानंतर सगळ्यात अगोदर छोट्याशा मंदिरात हनुमंत रायाचे दर्शन घडते. हनुमान मंदिराच्या समोरच लक्ष्मण मंदिर व गणपतीचे छोटे मंदिर आहे. येथे दर्शन घेऊन पुढे गेल्यास श्रीरामाचे गड मंदिर आहे.
मंदिरात प्रभू रामासोबत सीता देवीची मूर्ती आहे. तसेच प्रभू राम मंदिराच्या शेजारी कौशल्य माता मंदिर, विष्णू मंदिर, शिवमंदिर आहे. श्रीराम मंदिरापासून संपूर्ण रामटेक गाव आणि सुंदर परिसर दिसतो. येथून गावातील जैन मंदिरही दिसते. तसेच रामटेक गावाजवळ सूर नदीकाठी अगस्ती ऋषी यांचा आश्रम होता त्या ठिकाणी अगस्ती ऋषी आणि प्रभू श्री राम यांचे भेटीचे ठिकाण आहे.
राम मंदिरात दर्शन घेऊन परत पार्किंग एरिया मध्ये आल्यानंतर पार्किंगच्या आसपास असलेल्या प्राचीन नरसिंह भगवान मंदिर, महाकवी कालिदास स्मारक , दिगंबर जैन मंदिर अशा ठिकाणी भक्त भेट देतात.
जैन धर्मीय दिगंबर यांचे गुरु भगवान शांतिनाथ यांचे फार सुंदर भव्य दिव्य मंदिर आहे. या मंदिरात जैन धर्मातील देवांच्या जसे की भगवान महावीर आणि इतर गुरु यांच्या मूर्ती आहेत.
मंदिरात भगवान शांतिनाथ यांची तेरा फूट उंचीची मूर्ती आहे. रामटेक यात्रेला आलेले अनेक भक्त या ठिकाणी भेट देतात. रामटेक मध्ये आनंद धाम नावाचा एक आश्रम आहे. बाबा जुमले देव यांचा हा आश्रम आहे. येथे दरवर्षी त्यांची एक रॅली निघते. आणि आनंदोत्सव साजरा होतो. त्याचप्रमाणे रामटेक मध्ये एका जंगलात सर्वात प्राचीन प्रसिद्ध करपुर बावली मंदिर आहे. या मंदिराजवळ एक सरोवर असून त्या सरोवरात कापरा सारखा वास येतो म्हणून या सरोवरास कपूर सरोवर असे म्हणतात.
असे म्हटले जाते की प्रभू रामचंद्र प्रथम येथे आले होते आणि सुरुवातीला अगस्ती ऋषींचा आश्रम येथे होता. अगस्ती ऋषींचे 2000 शिष्य येथे शिक्षण घेत होते. आजही येथे फार प्राचीन काळाचे आश्रमाचे बांधकाम दिसते. तसेच येथील मंदिर व स्थान पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली गेल्यामुळे येथील सर्व महत्त्वाच्या गोष्टी किल्ल्यावर श्रीराम मंदिर बांधल्यानंतर नेण्यात आल्या. तसेच येथे अगस्ती ऋषी मंदिर, गणेश मंदिर,शिव मंदिर आणि श्रीराम मंदिर सरोवराच्या कडेला आजही दिसते.
असे सांगितले जाते की ही इमारत आठ मजली आहे परंतु पाण्यामुळे ती संपूर्ण दिसत नाही फक्त इमारतीचे वरचे दोन मजले दिसतात. त्याचप्रमाणे रामटेक प्रमुख मंदिर असलेल्या पर्वताच्या पायथ्याशी अंबाला झील नावाचे फार पौराणिक मान्यता असलेले ठिकाण आहे. या झीलच्या किनाऱ्यावर अनेक प्राचीन तीर्थ आणि मंदिरे आहेत. येथे घाट बनवलेले आहेत आणि घाटावरच मंदिरे बांधलेली आहेत.
या ठिकाणी अस्थि विसर्जन आणि पितृपक्ष कार्यक्रम केले जातात. अंबाला झील च्या जवळ पर्यटकांना आणि पर्यटक व भक्तांना राहण्यासाठी फार स्वस्त रूम्स मिळतात. किल्ल्याजवळ गेल्यानंतर येथे तीन प्रमुख स्थान आहेत. एक म्हणजे किल्ल्याच्या आतील प्राचीन प्रभू रामचंद्र मंदिर, दुसरे म्हणजे येथे जवळच असलेली सिंदूर बावडी, आणि तिसरे म्हणजे महान कवी कालिदास स्मारक.
रामटेक ला आल्यानंतर भक्तांना राहण्यासाठी ट्रस्टच्या वतीने कोणतेही भक्त निवास नाही. परंतु भक्तांना राहण्यासाठी रामटेक शहर मध्ये अनेक हॉटेल, गेस्ट हाउस,लॉजेस,आणि प्रायव्हेट रूम मिळतात. येथे राहिल्यानंतर रामटेक मधील सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी स्वतःच्या गाडीने किंवा टूर्स पॅकेज ने पाहता येतात.