तीर्थक्षेत्र पिठापूर | Tirth Kshetra Pithapur

भारतातील आंध्रप्रदेश मध्ये पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठापुरम ( Tirth Kshetra Pithapur ) हे एक गाव आहे. येथे दत्त महाराजांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ झाला होता. पिठापूर मंदिरापर्यंत गेल्यानंतर मंदिराचे उजवीकडील बाजूस मुख्य प्रवेशद्वार आहे. श्रीपाद श्रीवल्लभ महा संस्थान पीठापुर येथील सर्व सुविधांची आणि कार्यक्रमांची चांगल्या पद्धतीने जबाबदारी घेते. या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत मध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला प्रथम संस्थानाचे कार्यालय दिसते. येथे आपण आपल्या इच्छेप्रमाणे देणगी देऊ शकता तसेच तेथे विविध प्रकारची पुस्तके , पोथ्याही खरेदी करता येतात.

तसेच डाव्या हाताला मोठा यज्ञकुंड आहे. त्यापुढे लगेच डाव्या हाताला मुख्यमंदीर आहे. मंदिराच्या दरवाजा जवळच एक मोठा औदुंबर वृक्ष आहे. सन 1983 साली परमपूज्य राम स्वामी यांनी ही जागा विकत घेतली आणि हा औदुंबर वृक्ष त्या ठिकाणी लावला होता. पुढे 1987 पर्यंत त्यांनी अनेकांच्या वर्गणी मधून हे डोलदार मंदिर उभे केले होते. पुढे नंतर या ठिकाणी पिठापुरम महासंस्थानाची स्थापना झाली. मंदिराच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत अनेक भक्त गुरुचरित्राचे पारायण करतात. पिठापूरच्या मंदिराखेरीज पिठापूर मध्ये आणि आसपासच्या भागांमध्ये अनेक दर्शनीय मंदिरे आहेत. परंतु त्यातील काही मंदिरामध्ये भक्तांनी जाऊन दर्शन घेतल्याशिवाय पिठापूर यात्रा संपन्न होऊ शकत नाही अशी भक्तांची मान्यता आहे. सर्वात प्रथम मुख्य मंदिरापासून एक – दीड किलोमीटर अंतरावर असलेले श्री कुकुटेश्वरा मंदिर आहे. कुकुटेश्वरा मंदिराजवळ पादगया आणि पुर्रूहितिका देवी मंदिराचे दर्शन घडते. या मंदिरासमोर झोपलेल्या गयासुराची मूर्ती आहे. भगवान विष्णूंचा गयासूर हा एक मोठा भक्त होता.

गयासुर इतका पुण्यवान होता की त्याच्या नुसत्या दर्शनाने माणसाला मोक्ष मिळत असे. असे म्हटले जाते कि त्याची उंची इतकी होती कि झोपलेल्या अवस्थेत त्याचे डोके गया येथे आणि पाय पिठापूर पर्यंत येत असे . त्याने असे केल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना त्याचे दर्शन होत होते आणि लोकांना मोक्ष मिळत होता. परंतु त्यामुळे सृष्टीचा समतोल बिघडू लागला होता, म्हणून देवांनी एक योजना आखली आणि त्यांनी गया शूराच्या शरीरावर यज्ञ करण्यास भाग पाडले. हा यज्ञ अखंड सात रात्री चालू होता. तसेच या यज्ञादरम्यान त्याला किंचितही हालचाल करण्यास परवानगी नव्हती. भगवान शंकरांनी त्या रात्री कोंबड्याच्या रूपात येऊन बाग दिली . तेव्हा पहाट झाली असे समजून गयासुराने हालचाल करण्यास सुरुवात केली. अशा तऱ्हेने देवांची योजना यशस्वी ठरली. तसेच गया सुराला सुद्धा त्याची चूक कळली. त्याचे पाय पिठापुरम मध्ये होते म्हणून या क्षेत्राला पादगया असे म्हणतात.

पादगया मध्ये असणाऱ्या सरोवरामध्ये अनेक भाविक पाप नष्ट होण्यासाठी स्नान करतात. तसेच त्यांच्या प्रियजनांचे पिंडदान सुद्धा करतात. कुकुटेश्वरा हे भगवान शिवशंकराचे मंदिर आहे आणि भगवान शिवशंकर या ठिकाणी कोंबड्याच्या रूपात आले होते म्हणून या ठिकाणाला कुकुटेश्वर असे नाव पडले. पुरुहुतिका देवीचे मंदिर कुकुटेश्वरा मंदिराच्या प्रांगणात परंतु स्वतंत्र आहे. या मंदिराचीही अख्यायिका अतिशय रंजक आहे.भगवान शंकराची पहिली पत्नी सती हिला हे समर्पित आहे. तसेच हे देवीच्या महत्त्वाच्या 18 शक्तिपीठांपैकी दहावे शक्तिपीठ आहे. श्री पुरुहुतिका देवीची मूर्ती चार फूट उंच घडवलेली असून उत्तर दिशामूख आहे आणि तिला सुवर्णलंकाराने आणि वस्त्रालंकाराने मढवलेले आहे. सतीचे पिता दक्ष यांनी एकदा यज्ञ करायचे ठरविले होते . त्यांनी शिवाचा अपमान करायचा म्हणून जाणून बुजून शिव आणि सतीला आमंत्रित केले नाही. परंतु सतीला जशी ही बातमी कळली तसे सतीने शंकराकडे या यज्ञाला जाण्यासाठी हट्ट केला. भोलेनाथ स्वतः गेले नाहीत त्यामुळे सतीला एकटीलाच जावे लागले.

जेव्हा सती त्या कार्यक्रमाला गेली तेव्हा तिचा पदोपदी अपमान होऊ लागला. तसेच त्यांनी जाहीररित्या भगवान शिवाबद्दल अपमान करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सतीने ते सहन न झाल्यामुळे त्या यज्ञात उडी घेऊन स्वतःला संपवलं. तेथील उपस्थित तिला वाचू शकले नाहीत परंतु तिचे अर्धवट जळालेले शरीर त्यांनी बाहेर काढले.ही बातमी जशी भोलेनाथांना कळाली तेव्हा त्यांना अति दुःख झाले व त्याचे रूपांतर त्यांच्या भयंकर क्रोधात झाले. त्यांनी क्रोधाने आपल्या जटा उपटून जमिनीवर आपटल्या आणि त्यातून वीरभद्र व भद्रा काली यांची उत्पत्ती झाली . त्यानंतर त्यांनी शेकडो भूतगणांसह यज्ञकरांवर हल्ला केला.

त्यावेळेस शिवाने आपल्या प्रिय पत्नीचे प्रेत उचलून ते पूर्ण सृष्टीवर भ्रमण करू लागले. हे सृष्टीसाठी घातक होते म्हणून इंद्रदेवाने आपल्या सुदर्शन चक्राने त्या प्रेताचे तुकडे तुकडे करण्यास सुरुवात केली.
ज्यामुळे सतीच्या पाठीचा एक भाग या ठिकाणी पडला. म्हणून या ठिकाणी दहाव्या शक्तिपीठाची निर्मिती झाली व त्याला पिठिकापुरम या नावाने ओळखले जाऊ लागले.त्यालाच पुढे पिठापूरम व नंतर पिठापूर म्हटले जाऊ लागले. इंद्रदेवाने गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हीचा विनयभंग केल्यामुळे ऋषींनीं इंद्राला शाप दिला त्यामुळे इंद्र देवाने त्यांचे रोशन गमावले होते. मग शापित इंद्राने याच ठिकाणी जगन्नमाते समोर बसून प्रार्थना केल्यामुळे देवीने प्रसन्न होऊन इंद्राने गमावलेले रोशन त्यांना परत दिले. देवीने पुरु अर्थात इंद्र यांचे पृथापण केले म्हणून या जगन मातेचे नाव पुरुहुतिका देवी असे पडले असावे किंवा यज्ञात स्वअभुती दिल्यामुळे दोन्ही गोष्टींचा संदर्भ घेऊन पुरुहुतिका देवी असे झाले असावे. येथे जवळच कुणती माधव स्वामी मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे.

स्वर्गामध्ये इंद्राने पाच मंदिरे स्थापन केली होती त्यापैकीच हे एक मंदिर आहे . या मंदिराच्या पौराणिक कथेनुसार चित्रकेतू हा भगवान विष्णूंचा मोठा भक्त होता. त्याला सर्प राजाने म्हणजे आदिशेशाने अध्यात्मिक जाणले होते. सर्प राजाने त्याला एक विमान देखील भेट दिले होते. चित्रकेतू आपल्या विमानातून कैलास पर्वतावरून जात असताना त्याला दिसले कि शिव पार्वतीच्या भोवती आपला हात ठेऊन बसले आहेत . हे पाहून चित्रकेतू हसला आणि म्हणाला अरे तू सर्वांसमोर माता पार्वतीला अलिंगन देत आहेस. मग रागावलेल्या पार्वतीने चित्रकेतूला राक्षस म्हणून जन्म घेशील असा शाप दिला.

म्हणूनच चित्रकेतूने प्रजापती या ब्राह्मणाच्या घरी रुद्रसुर राक्षसाच्या रूपात जन्म घेतला. प्रजापती हे महान शक्ती असलेले ऋषी होते. रुद्रासुराने कठोर तपश्चर्या नंतर भगवंताकडून वरदान मिळाले होते कि, त्याला ज्ञात असलेले कोणतेही शस्त्र त्याला मारू शकत नाही. तसेच लाकूड आणि धातूपासून बनवलेले कोणतेही शस्त्र त्याला हानी पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्याचे सामर्थ्य युद्धाप्रती वाढतच होते. रुद्रसुराने त्याच्या सर्व सामर्थ्याने देव इंद्राच्या स्वर्गावर पूर्ण ताबा केला. मग इंद्राने पुन्हा स्वर्गावर ताबा मिळवण्यासाठी दधीजीं ऋषी यांच्या हाडांपासून वज्र युद्धा हे शस्त्र तयार केले. या शस्त्राने इंद्राने या राक्षसाचा वध करून इंद्रलोक वर पुन्हा ताबा मिळवला. ब्राह्मणाच्या हत्तेच्या पापापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी काशी, प्रयाग, गया, पद्मनाभ आणि पिठापूर अशा पाच वेगवेगळ्या ठिकाणी पंच माधव नावाच्या कृष्णमूर्ती स्थापन केल्या. नंतर द्वापार युगात जेव्हा पांडव राज्यातून अज्ञातवासात गेले तेव्हा पांडवांची आई कुंती हिने याच ठिकाणी भगवान विष्णूची प्रार्थना केली.

भगवान विष्णू तिला प्रसन्न होऊन त्यांनी तिला आशीर्वाद दिला. म्हणून हे मंदिर पुढे कुणती माधव स्वामी या नावाने प्रसिद्ध झाले. आणखी एक महत्त्वाचे मंदिर म्हणजे अनघा लक्ष्मी माता मंदिर. हे विश्वातील एकमेव मंदिर आहे की जिथे अनघा लक्ष्मी माता आणि दत्तात्रेय यांच्या एकत्र मूर्ती स्थापित आहेत. अनघा लक्ष्मी या दत्तात्रयांच्या पत्नी आहेत. जसे श्री दत्तात्रेय ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित स्वरूप आहेत तशाच अनघा लक्ष्मी या सरस्वती, पार्वती आणि लक्ष्मी यांचे एकत्रित स्वरूप आहे. काही ठिकाणी अनघा लक्ष्मी दत्तात्रयांचे स्त्री रूप आहे असे सांगितले जाते. तर काही ठिकाणी दत्तात्रयांनी तळ्यातून अनघा लक्ष्मी यांची निर्मिती केली असे सांगितले जाते. त्याचप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभांचे सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे बापनाचार्य निवासस्थान म्हणजे त्यांचे घर .श्रीपाद श्रीवल्लभ यांनी त्यांच्या बालपणीचा बराच काळ याच ठिकाणी व्यतीत केला. याच ठिकाणी अनेकांना चैतन्यरूपी अनुभूती आल्याचे सांगितले जाते. पिठापूरमध्ये अनेक मंदिरे आहेत , परंतु वरील महत्त्वाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याशिवाय पिठापूर यात्रा यशस्वी नाही असे सांगितले जाते.

मुंबई व पुण्यावरून पिठापूरला जाण्यासाठी MH65 रोड वरून 20 ते 22 तास प्रवासानंतर आपण पिठापूरला पोहोचू शकता. विमानाने जायचे असल्यास विशाखापट्टणमच्या एअरपोर्टवर जाऊन येथून दीडशे किलोमीटर अंतरावर पिठापुरम असून तेथे जाण्यासाठी सुमारे तीन तास लागतात. मुंबई आणि पुण्यावरून विमानाने दोन तासात विशाखापट्टणम एअरपोर्टवर पोहोचू शकता. विमान खर्च अंदाजे 12 ते 15 हजार रुपये लागू शकतो. एअरपोर्ट वरून पिठापूरला जाण्यासाठी पाच हजार आणि परत येण्यासाठी पाच हजार रुपये टॅक्सीने जाण्यासाठी लागतात. मुंबई आणि पुण्यावरून पिठापूरम ला जाणाऱ्या दोन भारतीय रेल्वे आहेत. एक म्हणजे विशाखापट्टणम एक्सप्रेस आणि दुसरी म्हणजे कोणार्क एक्सप्रेस. विशाखापट्टणम एक्सप्रेस पुण्यावरून दररोज दहा वाजून वीस मिनिटांनी सुटते आणि रात्री पावणेआठला पिठापुरमला पोहोचते. तसेच कोणार्क एक्सप्रेस संध्याकाळी सहा वाजता सुटते व दुसऱ्या दिवशी दुपारी साडेबारा वाजता विशाखापट्टणमला पोहोचते. ट्रेनच्या पोहोचण्याचा टायमिंग मध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. अंदाजे चार ते पाच दिवस वेळ काढल्यानंतरच आपण पिठापूर तीर्थक्षेत्र ट्रेन ने अनुभवू शकतो.

तसेच पिठापूरला ( Tirth Kshetra Pithapur ) भरपूर मंदिरे फिरण्यासारखी आणि पाहण्यासारखी आहेत. पिठापूरला जायचे असल्यास निवांत वेळ काढूनच जावे , घाई गडबडीत गेल्यास पिठापूरच्या दर्शनाचा आणि दत्त प्रभूंच्या सहवासाचा आनंद घेता येणार नाही. पिठापूरच्या अलीकडे आपणास गोदावरीचे विस्तीर्ण पात्र लागते. गोदावरी नदीचा पूल संपताच डाव्या हाताला गोदावरी रेल्वे स्टेशन आहे. येथून पिठापुरम सव्वा ते दीड तास प्रवासाच्या अंतरावर आहे. या रेल्वे स्टेशन पासून विठापूरच्या मंदिराकडे जाण्यासाठी अनेक रिक्षा असतात शंभर ते 120 रुपये पर्यंत ते पिठापूर जाण्याचे भाडे आकारतात.

पिठापूरला ( Pithapuram ) भक्तांना राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ भवन आहे. त्यामध्ये मोठ्या सत्तेचाळीस रूम,दोन छोटे हॉल आणि एक मोठा हॉल आहे. ज्यामध्ये 70 माणसे आरामात झोपू शकतात. येथील रूम फार स्वच्छ आणि नीटनेटक्या आहेत. मोठ्या हॉलमध्ये सुद्धा प्रत्येकासाठी स्वतंत्र लॉकर आहेत. पहाटे पाच वाजल्यापासून या ठिकाणी भक्तांना स्नान करण्यासाठी गरम पाणी असते. विशेष म्हणजे भक्तांसाठी या सर्व सुविधा मोफत दिल्या जातात. परंतु त्यासाठी गुगलवर असलेल्या त्यांच्या लिंक वर जाऊन त्यांचा एक फॉर्म ऑनलाइन कमीत कमी 45 दिवस अगोदर भरून द्यावा लागतो.

तसेच जरी भक्तांसाठी ही सुविधा उपलब्ध झाली नाही तरीही काळजी करण्याचे काही कारण नाही कारण येथे जवळच छोटे छोटे उत्कृष्ट लॉजेस आहेत. तेथे भक्तांना एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत रूम उपलब्ध होतात. तसेच संस्थानाच्या अन्नछत्र मध्ये सकाळी सहा ते सात आणि दुपारी चार ते पाच मोफत चहा दिला जातो. तसेच दुपारी साडेबारा ते अडीच पर्यंत मोफत जेवण मिळते. तसेच रात्री आठ ते साडेनऊच्या दरम्यान भगर,सांबर, चटणी अशा प्रकारचे जेवण असते. आसपास अनेक हॉटेलं आणि उपहारगृह आहेत तिथे योग्य दरात शाकाहारी जेवण मिळते.

Leave a Comment