आळंदी ( Alandi ) हे तीर्थ क्षेत्र पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधे इंद्रायणी नदी तीरावरती वसलेले एक नगर आहे. श्री क्षेत्र आळंदी हे वैष्णव वारकरी संप्रदायातील पंढरपूर प्रमाणे महत्वाचे तीर्थ क्षेत्र आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज यांचे संजीवन समाधी स्थळ म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. या तीर्थ क्षेत्राला अलौकिक सौंदर्य लाभले आहे. आळंदी हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोळ असून, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्ती महाराज, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांची कर्मभूमी आहे. या पावनपुण्य भूमिला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.
आळंदी हे संत तीर्थ नसून देव तीर्थ ही आहे स्कंदपुरणातील सह्याद्री खंडामध्ये 61 व्या अध्यायामध्ये याचे वर्णन केलेले आहे. आळंदी हे अठरा शिवपीठात वरिष्ठ शिव पीठ असून, अष्ट महासिद्धी चे अखंड वास्त्यव्य येथे आहे. तसेच परमपरमात्मा भगवान महादेवास कैलासानंतर सगळ्यात प्रिय स्थान म्हणजे ही अलंकापुरी (आनंदभूमी ) असून महादेवाचे सिद्धेश्वर रूपाने येथे अखंड वास्तव्यास आहे. अनेक संत साहित्य, स्कंदपुराण, अलकामाहात्म्य, या पुराणामध्ये आळंदी ची अनेक नावाने ओळख आहे.
कृत युगात आनंदवन, त्रेता युगात वारून क्षेत्र, द्वापार युगात कपिल क्षेत्र, कली युगात अलकापूर अलंकार पूर, आणि आत्ताची आपली आळंदी, तसेच या शिवाय शिवतीर्थ, सिद्ध क्षेत्र, अलंकावती, कर्णिका, अलंकापुरी, या नावाने पुराणामधे आळंदी ची ओळख आहे. विठ्ठलाचा आणि माउलींच्या नामचा जय घोष करत दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. जेथे भिंतीचे चालणे,रेड्याचे वेद बोलणे, मंदिराच्या कळसाचे हलणे,शक्य आहे, देवाच्या आणि संतांच्या पदस्पर्षाने पुनीत झालेली पावन भूमी म्हणजे अलंकापुरी होय
संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी मंदिर
संत ज्ञानेश्वर समाधी मंदिरास देऊळवाडा असे म्हणतात. देऊळ वाड्याचे मुख्य द्वार हे उत्तर मुखी असून ते 1750 मधे श्री काशीराव शिंदे यांनी बांधले आहे. महाद्वाराची पहिली पायरी संत ज्ञानेश्वर महाराज यांचे परमभक्त श्री हैबत बाबा यांची आहे. या पायरीस पितळआणि चांदीचे आवरण बसवले आहे. प्रथम दर्शनाचा मान हैबत बाबांच्या पायरीस आहे, महाद्वाराच्या शेजारी संत महादेव कासार यांचे मंदिर आहे. महाद्वाराच्या आत मधे हनुमान आणि गरुड मंदिर आहे. महाद्वाराच्या उजव्या बाजूस हैबत बाबांचे मंदिर आहे, मंदिरात हैबत बाबांची समाधी असून त्याच्या पादुका व मूर्ती आहे पाठीमागे श्री हरी विठ्ठल आणि रुक्मिणी माता यांची मूर्ती आहे.हैबत बाबा यांच्या समाधी समोर संत एकनाथ महाराजांचा पार आहे.
पिंपळाच्या झाडा भोवती हा पार बांधला असून पारावरती संत एकनाथचे मंदिर असून त्यामधे एकनाथ महाराजांच्या पादुका असून त्यांची पितळी मूर्ती आहे. संत एकनाथांच्या पाराशेजारी संत भोजलिंग काका यांची समाधी आहे, या भोजलिंग काकांच्या अंगाखांद्यावर माऊली आणि त्यांची भावंडे खेळलेली आहेत . भोजलिंग काकाच्या समाधीच्या बाजूस श्री लक्ष्मीनाथ आणि केसरी नाथ यांची समाधी आहे. या तिन्ही समाधी मंदिराचे दर्शन घेऊन आपण दर्शन बारीने पुढे नागमोडी वळणे घेत पंखा मंडपात येतो,समोर माऊलींची समाधी मंदिराचा गाभारा आहे .
गाभाऱ्यात माऊलींची संजीवन समाधी आहे समाधी वरती माऊली चा मुखवटा असून पाठीशी श्री हरी विठ्ठल आणि आई रुख्मिणी यांची मूर्ती आहे. माउलींच्या समाधी मंदिराच्या पाठीमागे संत मुक्ताई यांचे मंदिर आहे, मंदिरामध्ये संत मुक्ताई यांची मोहक मूर्ती आहे. मंदिराच्या समोरील बाजूस संत ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याचे शिल्प साकारलेले आहे.येथे नादकेश्वरराची मूर्ती असून येथूनच माऊली समाधीला गेले होते. थोडे पुढे गेल्यास सिद्धेश्वर मंदिर असून, हे एक पुरातन शिव पीठ आहे, शिव शंकर महादेवाचा अखंड वास येथे आहे, मंदिरात महादेवाची पिंड आहे.शेजारील बाजूस पान दरवाजा आहे. पान दरवाजा समोर अजाण बाग आहे, या अजाण बागेत अजाण वृक्षाच्या खाली विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, त्याच्या बाजूस ज्ञानेश्वरी मधील काही ओव्याचे फलक येथे कोरलेले आहेत.
असे म्हणतात या अजाण वृक्षा खाली केलेला अभ्यास कायम स्मरणात राहतो, या वृक्षा संबधी अशी अख्यायिका आहे की संत ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थळी जात असताना आपल्या हातातील दंड (काठी) या ठिकाणी रोवली आणि त्याला नंतर पालवी फुटली आणि तिचे वृक्षात रूपांतर होऊन, त्याचे अनेक वृक्ष तयार झाले. येथे अजाण वृक्षाच्या माहितीचे फलक येथे लावलेले आहे. या वृक्षामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, या वृक्षाचे बद्दल संधर्भ अनेक संत साहित्यात आहे, या वृक्षा ची अनेक नावाने संत साहित्यात ओळख आहे.सुवर्ण पिंपळ या वृक्षा संबंधि अशी अख्यायिका आहे की कुबेर देवाने या वृक्षा ची स्थापणा केली आहे, आणि संत ज्ञानेश्वर यांच्या माता रुक्मिणी यांनी या झाडाला सव्वा लक्ष प्रदिक्षणा घातल्या होत्या.
आळंदी ( Alandi ) मधील इतर काही ठिकाणे :
सिद्धबेट : चाकण कडे जाताना चाकण चौकातून ज्ञानेश्वरी मंदिरापासून थोड्याच अंतरावर सिद्धबेट आहे, सिद्धबेट च्या कमानी मधून आत मधे प्रवेश केल्यानंतर काही अंतर चालून गेल्यास श्री सद्गुरू राघवदास महाराज ( ब्रम्हचारी महाराज )यांची समाधी आहे. अजून थोडे अंतर चालून गेल्यास इंद्रायणी नदी तिरावरती विठ्ठलाचे मंदिर असून याच ठिकाणी माऊलींचे वडील विठ्ठल पंत आणि मातोश्री रुक्मिणी यांनी देहांत प्रायश्चित्त घेतले होते. परतीच्या मार्गावरती साखरे महाराज यांची समाधी आहे. येथूनच पुढे गेल्यास एक छोटे मंदिर असून मंदिरा मधे विठ्ठल रखुमाई, दत्तगुरु, संत ज्ञानेश्वर, आणि शिवलिंग असून या ठिकाणी विठ्ठल पंत आणि माता रुख्मिणी वास्तव्य करत होते याच ठिकाणी संत ज्ञानोबाराय आणि भावंडाचे बालपण येथेच गेले.
मुक्ताईने ज्ञानदेवांच्या पाठीवरती मांडे भाजले, संत ज्ञानेश्वर रुसले असताना ताटीचे अभंग म्हटले. याच झोपडीचे आज मंदिरात रूपांतर झाले आहे. येथे अजाण वृक्षाचे वन असून अनेक भाविकांनी याच अजाण वृक्षाच्या वनात बसून ज्ञानेश्वरी तोंड पाठ केलेली आहे. अनेक धार्मिक पुस्तकांचे वाचन आणि ग्रंथाचे पारायण येथे लोक करतात. पण सिद्धबेट आता तळीरामांचा अड्डा बनला असून येथे हळू हळू घाणीचे साम्राज्य पसरत चालले आहे, स्थानीक प्रशासनाने या कडे लक्ष देण्याची गरज आहे.
ज्ञानेश्वरी मंदिर : ज्ञानेश्वरी मंदिर खूप सुंदर आणि भव्य मंदिर असून, येथे अनेक साधू संत आणि देवतांची मूर्ती स्थापन केलेल्या आहेत, संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, भगवान शंकर, संत निवृत्तीनाथ, तिरुपती बालाजी, विठ्ठल रखुमाई, नवनाथ, शनिदेव, राधा कृष्ण, या देवांच्या मूर्ती येथे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्रा वरील देखावे येथे बसवलेले आहेत. तसेच ज्ञानेश्वरी मधील सर्व अध्याय या ठिकाणी कोरलेले आहेत.
कालभैरव मंदिर : वडगाव चौकाजवळ, माऊलींनी चालवलेल्या भिंती शेजारी कालभैरव मंदिर असून, मंदिरामध्ये भगवान कालभैरव आणि माता जोगेश्वरी असून समोरील बाजूस कशी विश्वेश्वर आहेत. माउलींच्या नित्य स्नानासाठी श्री हरी विठ्ठलाने ज्या भागीरथी नदीची निर्मिती केली तिचे उगम स्थान येथे आहे. येथे उगम होऊन गुप्त पणे इंद्रायणी नदीच्या त्रिवेणी भागीरथी कुंडामध्ये प्रकट होते
संत ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत: वडगाव चौकालगत कालभैरव मंदिरा शेजारी हे मंदिर आहे, योगी चांगदेवांचे गर्व हरण करण्यासाठी माऊलींनी हि मातीची भिंत चालवली होती. मातीची भिंत हळू हळू जिर्ण होऊन लोप पावली, आणि भिंतीचा जीर्णोद्धार करून दगडी भिंत बनवलेली आहे. या भिंतीवरती संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताई आणि योगी चांगदेव यांचे शिल्प आहे.
त्रिवेणी भागीरथी कुंड : इंद्रायणी नदी च्या तिरावरती आळंदी च्या घाटाच्या मध्यवर्ती त्रिवेणी भागीरथी कुंड आहे, या कुंडाचे दगडी बांधकाम असून येथे नितळ पाण्याचा झरा आहे येथे भागीरथी इंद्रायणी आणि मनकर्णिका या तीन नाद्यांचा संगम आहे. या कुंडा विषयी अशी अख्यायिक आहे की स्वतः पांडुरंगाने माउलींच्या नित्य स्नानासाठी याची निर्मिती केली आहे.
विश्व शांती केंद्र : हे ठिकाण इंद्रायणी नदी च्या पैलतीरावती असून, या ठिकाणाला संत श्री ज्ञानेश्वर संत तुकाराम ज्ञानतीर्थ म्हणून हि संबोधले जाते. माउलींच्या संजीवन सोहळ्या निमित्त येथे अखंड हरीनाम साप्ताहाचे आयोजन केले जाते
विश्व शांती स्तंभ : इंद्रायणी च्या नदी पात्रात या स्तंभाची निर्मिती केली असून याला विश्व शांती स्तंभ म्हणून ओळखले जाते, या स्तंभावर हिंसेकडून अहिंसेकडे जाणारे शिल्प साकारलेले आहे.या मधे सिंह, गरुड, मोर, आणि शांततेचे प्रतीक असलेले कबुतर, आणि वरती शांती ध्वज, हा स्तंभ रात्रीच्या रोषणाईत अतिशय मोहक दिसतो.
विश्रांतवड: वडगाव चौकपासून वडगाव रोड वरती दोन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. संत ज्ञानोबाराय आणि योगी चांगदेव यांच्या भेटीचे ठिकाण आहे. येथे मोठा वटवृक्ष असून याच वटवृक्षा खाली संत ज्ञानेश्वर आणि योगी चांगदेवांची भेट झाली होती. काही काळ त्यांनी येथे विश्रांती घेतली होती म्हणून या ठिकाणाचे नाव विश्रांत वड असे नाव पडले. येथे संत ज्ञानेश्वर आनी चांगदेवांच्या भेटीचे शिल्प साकारलेले आहे. या वटवृक्षा खाली महादेवाची पिंड आहे. येथे बालगोपाळालांना खेळण्यासाठी उद्यानाची निर्मिती केलेली आहे.
पद्मावती मंदिर : पद्मावती मंदिर हे पार्वती मातेचे पुरातन मंदिर आहे. वडगाव चौकपासून सुमारे 1.3 किमी अंतरावर असून हे एक शांत आणि निवांत स्थळ आहे. मंदिरासमोर भव्य सभामंडप असून, येथे बालउद्यानाची निर्मिती केलेली असून येथे येऊन मन प्रसन्न होते. नवरात्री मधे येथे मोठा उत्सव असतो. नवरात्र मधे माऊलींची पालखी येथे दर्शनास येते.
भक्त पुंडलिक मंदिर : भक्त पुंडलिक मंदिर हे आळंदी घाटावर स्थित असून,मंदिरा समोरील बाजूस नंदी आहे. आतमध्ये शिवलिंग असून भक्त पुंडलिकाची प्रतिमा ठेवलेली आहे.
दक्षिण मुखी शनी मारुती मंदिर : इंद्रायणी घाटावरून माउलींच्या मंदिराकडे जाताना हे मंदिर असून, मंदिरामध्ये शनिदेव आणि मारुतीरायांची मूर्ती आहे.
विष्णू पद : दक्षिण मुखी मारुती मंदिरा समोरील कमानिच्या बाजूस विष्णू पद आहे. येथे काही पायऱ्या खाली उतरून गेल्या नंतर श्री हरी विष्णू पद आहे. भगवान श्री हरी विष्णू पदाच्या महती सांगणारा अभंग येथे कोरलेला आहे. या तीर्थस्थळाकडे सर्वांचे दुर्लक्ष झालेले आहे.
संत ज्ञानेश्वर थोरल्या पादुका : पुणे आळंदी मार्गांवर संत ज्ञानेश्वर थोरल्या पादुका मंदिर आहे. मंदिरा समोर संत ज्ञानोबाराय आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीचे शिल्प साकारलेले आहे. समोरील बाजूस प्रशस्त उद्यान आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारावरती संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्रा वरील काही प्रसंग रेखाटलेले आहे. मंदिराच्या समोरील बाजूस दत्तगुरु, गणपती, आणि मारुती या देवतांची मंदिरे आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात माऊलींची सुंदर आणि भव्य मूर्ती असून पाठीमागील बाजूस श्री हरी विठ्ठल माता रुख्मिणी मूर्ती आहे.
धाकल्या पादुका मंदिर : काटे नगर येथे माउलींच्या धाकल्या पादुका मंदिर आहे हे मंदिर छोटे आणि साधारण आहे. येथे माउलींच्या पादुका असून बाजूस महादेवाची पिंड आहे. आतील बाजूस मारुती रायांची मूर्ती आहे.
संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर रस्ता : माउलींच्या समाधी मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूस विविध दुकाने असून हि दुकाने संत साहित्य विविध प्रकारचे ग्रंथ, अनेक देवी देवतांच्या मूर्ती, तुळशीमाळा बनवणारी दुकाने, सोबत विविध झाडापासून बनवलेल्या माळा, लहान मुलांची खेळणी, मुली व महिलांसाठी विविध प्रकारचे दागिने इमिटेशन ज्वेलरी सौंदर्य प्रसाधने,टाळ, मृदूंग, अबीरबुक्का हळदी कुंकू, पाने फुले हार, तसेच प्रसादाची अनेक दुकाने आहेत.
वारकरी शिक्षण संस्था : आळंदी येथे अनेक वारकरी शिक्षण संस्था असून अनेक कीर्तन कार येथे घडवले जातात. या वारकरी शिक्षण संस्था चा पाया विष्णू महाराज जोग यांनी रचला असून,1917 मधे पहिली वारकरी शिक्षण संस्था चालू केली, आज शेकडो वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथे आहेत.वारकरी शिक्षण संस्थाचा शिक्षणाचा काळ 4 वर्षाचा असून, या चार वर्षाच्या कालखंडा मधे, ज्ञानेश्वरी अमृत अनुभव, संत तुकाराम गाथा, भगवत गीता, एकनाथी भागवत, चांगदेव पासष्टी, आणि संस्कृत व्याकरण शिकवले जाते. प्रति वर्षी लेखी परीक्षा घेतली जाते.
याच सोबत प्रथम वर्षी गायन कीर्तन वाद्य शिकवले जाते. तद नंतर दुसऱ्या वर्षाला आपण एक विषय निवडून त्या विषयाचे पुढील शिक्षण दिले जाते. याच सोबत विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण पण दिले जाते. काही वारकरी शिक्षण संस्थानमधे विनामूल्य शिक्षण दिले जाते.
श्री गजानन महाराज संस्थान आळंदी : आळंदी येथे देहूफाट्या जवळ देहू रोड वरती हे मंदिर असून अतिशय सूंदर आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे मंदिर आहे. मंदिराची सुरवात शांत आणि प्रसन्न वातावरणाने होते. मंदिराची रचना हि संगमरवरा मधे असून मंत्रमुग्ध करणारी आहे. येथे स्वच्छता आपल्याला पावलोपावली दिसते. मंदिराच्या पायऱ्या चढताना बाजूला असणाऱ्या संघमरवरा मधे बनवलेल्या छत्र्या आणि मधोमध असलेली हिरवळ मंदिराच्या सौंदर्यात अजून भर टाकते मुख्य मंदिरा मधे गजानन महाराजांची भव्य आणि मोहक मूर्ती पाहुण मन प्रसन्न होते.
भाविकांसाठी येथे ध्यान केंद्र असून. मंदिराच्या खालच्या बाजूस एक मंदिर असून येथे अनेक ग्रंथ पुस्तके ठेवलेली आहेत शांत वातावरणात बसून या ग्रंथाचे आणि पुस्तकांचे भाविक वाचन करू शकतात.
येथे भाविकांसाठी निशुल्क प्रसादालय आहे. येथे उच्च दर्जाचे भक्त निवास असून राहण्यासाठी दोनशेहून अधिक खोल्या आहेत. मंदिराचे विलोभनीय दृश्य पाहुण मन प्रसन्न होते.
आळंदी ला कसे जायचे
- पुणे स्टेशन पासून आळंदी 22 किमी असून येथून आळंदी ला जाण्यासाठी PMT, PCMT बस सेवा उपलब्ध आहे
- स्वारगेट ते आळंदी 28 किमी अंतर असून येथूनहि आपणास आळंदी साठी बस उपलब्ध होतील
- पुणे मनपा ते आळंदी 24 किमी अंतर असून येथून हि बस उपलब्ध आहेत.
- भोसरी ते आळंदी 9 किमी अंतर असून येथून बस रिक्षा या मधून आपण आळंदीस जाऊ शकता.
- चाकण ते आळंदी 12 किमी अंतर असून येथून रिक्षा किंवा बसने प्रवास करू शकता.
पार्किंग सुविधा
इंद्रायणी घाटा लगत आळंदी चाकण रोड वरती माउलींच्या मंदिराच्या पश्चिम दिशेला चार चाकी आणि दोन चाकी वाहनांसाठी पार्किंग ची सुविधा उपलब्ध आहे.
निशुल्क महाप्रसाद (माऊलीअन्नपूर्णा) :
संत ज्ञानेश्वर मंदिर समिती कडून दुपारी 12ते 3 आणि रात्री 7ते 9 निशुल्क अन्नप्रसादाची सोय आहे.