श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त, परम गुरु,फकीर तात महाराज ( Tat Maharaj ) यांनी स्वामींच्या भक्तीमध्ये संपूर्ण आयुष्य काढले होते. परंतु पूर्णतः प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्यांचे संपूर्ण नाव रामचंद्र व्यंकटेश वराडकर असे होते. ते मूळचे देहगावचे यजुर्वेदी ब्राह्मण कुटुंबातील होते. गोव्याचे मंगेश हे त्यांचे कुलदैवत होते. त्यांच्या पूर्वजांपासून त्यांच्याही कुटुंबाची मंगेश दैवतावर अतोनात श्रद्धा होती. हे कुटुंब शिवाचे निश्चिम भक्त होते. सन 1838 मध्ये श्रावण वद्य एकादशीला त्यांचा जन्म झाला होता.
रामचंद्रांचे वडील व्यंकटेश हे आयुर्वेदिक औषधांचे व्यापारी होते.त्यामुळे त्यांनी त्यांचा मुलगा रामचंद्रला आपल्या व्यवसायात घेण्याचा विचार केला होता. लहानपणापासूनच रामचंद्र शिवाच्या उपासनेत दंग होता. जस जसा रामचंद्र मोठा होत गेला तसे त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकण्यास सुरुवात केली.त्यांनी त्याला त्यांच्या धंद्यातील काही भाग सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. परंतु रामचंद्राचे त्याच्या धंद्यामध्ये मन लागत नव्हते. त्याला फक्त शिवाच्या उपासनेतच मग्न व्हायला आवडायचे.
पुढे तो थोडा मोठा झाल्यानंतर वयाच्या चौदाव्या ते पंधराव्या वर्षी सोलापूरच्या स्मशानभूमीत जाऊन शिवाची उपासना करू लागला. एके दिवशी अनेक तास रामचंद्राची शिव मंदिरात खांबाला टेकून शिवाची उपासना चालू असताना अचानक त्याला जाग आली. त्यानंतर तो एका पायावर उभे राहून परत शिव आराधना करू लागला. आशातच भगवान शिव शंकरांनी त्याला साक्षात दर्शन दिले.आणि त्याला म्हणाले की तू इथे काय करत आहेस. तुझे इथे काहीच काम नाही. तुला जर माझा सहवास अनुभवायचा असेल तर तू अक्कलकोटला जा.साक्षात शिवशंकराच्या साक्षात्कारानंतर मजल दर मजल करत. अनेक दिवसांच्या पायी प्रवासानंतर ते अक्कलकोटला पोहोचले.अक्कलकोट ला स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेताच त्यांचे ब्रह्मानंदी ध्यान लागले.
सुरुवातीला स्वामींना पाहून त्यांच्या चरणांवर डोके ठेवताच त्यांनी आनंदाश्रू गाळले. अंतर्ज्ञानी स्वामींना माहिती होते की हे आपल्याकडे कोण आले आहेत. स्वामींच्या चरणावर ते ध्यान मग्न झाले होते. स्वामींनी स्वतःच्या हाताने त्यांना उठवले असता तात महाराजांना आपले कुलदैवत मंगेशचे दर्शन झाले. स्वामींनी मंगेशाचे रूप दाखवताच त्यांना आकाशगमन केल्याचे भासले. रामचंद्राच्या विनंतीवरून स्वामी महाराज पुन्हा त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये आले.एका जागी कुलदैवत मंगेश,स्वामी महाराज आणि शिव शंकराचे दर्शन झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तेथून पुढे रामचंद्र स्वामी महाराजांचा ध्यास करू लागले.
आणि श्री स्वामी समर्थ यांचे कायमचे भक्त झाले. पूर्णतः ते स्वामी नामा मध्ये आणि शिवनामामध्ये विलीन झाले होते. त्यांनी फक्त दीक्षा घेणे बाकी राहिले होते. ते स्वामी चरणी इतके मग्न झाले होते की त्यांना देहभान राहिले नव्हते. परत ते जेव्हा मुंबईमध्ये आले तेव्हा ते इतके स्वामींना भजू लागले होते की लोक त्यांना तात म्हणू लागले. तात्त शब्दाचा अर्थ वडील असा होतो. आता रामचंद्र चे परिवर्तन तात महाराज म्हणून झाले होते. तात महाराज कधीच जास्त लोकांमध्ये मिसळत नसायचे. ठराविक लोकच त्यांच्याकडे यायचे. स्वामी महाराजांनी त्यांच्या छातीवर हात ठेवून सांगितले होते की आता मी तुझ्यात आहे.
परंतु ही गोष्ट तात महाराजांनी कधीच कोणाला सांगितली नाही. एकदा ते एका बोटीतून प्रवास करत असताना ती बोट एका खडकावर धडकली. खडकावर बोट धडकताच बोटीला दोन भोके पडली. त्यातून पाणी आत येऊन सगळे घाबरले होते. तात महाराज मात्र नामस्मरात मग्न होते. बोट पाण्याने पूर्ण भरत आली होती. सर्वांचे ओरडणे ऐकून तात महाराज त्यांना म्हणाले अरे ओरडता का नामस्मरण करा. परंतु कोणीच नामस्मरण करत नव्हते, भजन करत नव्हते. सगळे आपण बुडणार आणि मरणार ह्या चिंतेने ग्रस्त झाले होते. मग तात महाराजांनी बोटेला पडलेल्या दोन भोकांवर पाय ठेवून श्री स्वामी समर्थ व मंगेश महाराजांचे नामस्मरण सुरू केले. तरीही काही प्रमाणात पाणी आत येत होते.
लोक त्यांना म्हणू लागले कि खरंच देव आपल्याला वाचवणार असेल तर ते पाणी आत यायचे थांबले असते .बोट वेगाने मुंबईकडे पुढे धावत होती. मुंबई जवळ आल्यानंतर समुद्रकिनारी असलेल्या अतिदक्षता विभागाला त्यांना या बोटीबद्दल कळाले. सर्वांनी बाहेर उड्या मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.त्या पथकाने बोटी बाहेर उड्या मारून आलेल्या शंभर दीडशे माणसांना सुखरूप समुद्रकिनारी आणले. एकालाही इजा झाली नाही. शेवटी तात महाराज मात्र एका जागी नामस्मरण करत बोटीतच उभे होते.
त्यांनाही सगळे विनंती करत होते बाहेर या परंतु बाहेर येणार कुठून संबंध बोटीत पाणी झाले होते. महाराजांच्या गळ्यापर्यंत पाणी पोहोचले तरीही त्यांना त्याची चिंता वाटत नव्हती. शेवटी बोट पूर्णपणे पाण्यामध्ये बुडाली आणि तात महाराज पाण्यावरती तसेच तंगत होते. मग त्या पथकाने त्यांना समुद्रकिनारी आणले. तरीही ते स्वामी महाराजांच्या भजनात दंग होते त्यांना झालेल्या प्रकाराबद्दल काहीच कळाले नाही. मला काहीही होणार नाही आणि मला माझे स्वामी महाराज वाचवणार असा त्यांचा ठाम विश्वास होता. स्वामी महाराजांच्या अशा अनेक लीला तात महाराजांना माहित होत्या आणि त्यावर त्यांचा अखंड विश्वास होता.
तात महाराजांना जास्तीत जास्त लोक ओळखत होते ते त्यांच्या शिष्यांमुळे. त्यांचे मुख्य शिष्य बाळकृष्ण महाराज यांच्यामुळे. ज्यांनी मुंबईतील दादर मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ स्थापन केलेला आहे. या बाळकृष्ण महाराजांची श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन कधीच घेतलेले नव्हते. परंतु ते छोटे असताना त्यांची आजी प्रत्यक्षात अक्कलकोट ला जाऊन श्री स्वामी समर्थ यांची सेवा करत होती. हे बाळकृष्ण महाराज ब्राह्मण कुटुंबातील होते. त्यांचे आडनाव उपाध्ये होते. या त्यांच्या आजीमुळे त्यांच्या घरात सगळेच नेहमी श्री स्वामी समर्थ यांची भक्ती, पूजा, पठण आणि नामस्मरण करायचे .
घरातील भक्तिमय वातावरणामुळे हळूहळू बाळकृष्ण महाराजांच्याही मनात स्वामी समर्थ भक्ती रूढ झाली होती. परंतु पुढे काही वाईट संगतीमुळे बाळकृष्ण फार नास्तिक झाला होता. हा विषय त्यांच्या घरात फार चिंतेचा झाला होता. अशातच एकदा त्यांच्या चुलत्यांनी बाळकृष्ण महाराजांना तात महाराजांकडे आणले. घरच्यांना अशी अपेक्षा होती की तात महाराज बाळकृष्ण महाराजांना या सर्व नास्तिक गोष्टी वाईट विचारांमधून बाहेर काढतील. त्यांच्या चुलतत्याने बाळकृष्ण महाराजांच्या सर्व हरकती त्यावेळी ताज महाराजांसमोर मांडल्या. तात महाराज बाळकृष्ण महाराजांना म्हणाले की तू जरी माझ्या स्वामींना, परब्रम्हाला विसरला असशील तरी स्वामी महाराज तू पूर्वी केलेली त्यांची भक्ती विसरलेले नाहीत.
त्यांना तू केलेले नामस्मरण स्मरणात आहे. तात महाराजांचे हे बोलणे ऐकून बाळकृष्णला आपल्या बालपणी केलेल्या स्वामींच्या नामस्मराची आठवण होते. आणि त्याला जाग येते. ज्या व्यक्तीने आपल्याला लहानपणी पाहिलेच नाही ती व्यक्ती आपल्या लहानपणीच्या कार्याबद्दल सांगते हे ऐकून बाळकृष्ण चा तात महाराजांच्या बोलण्यावर विश्वास बसतो. तेव्हापासून बाळकृष्ण नेहमी तात महाराजांकडे येऊन सत्संगात सामील होतो. परंतु जेव्हा जेव्हा बाळकृष्ण तात महाराजांकडे यायचे तेव्हा तेव्हा तात महाराज रुद्र रूप धारण करायचे. एकदा तर त्यांनी आपल्याजवळील एक उशी बाळकृष्ण ला फेकून मारली.
उशी त्यांच्या कानावर लागताच त्या उशीतून श्री स्वामी समर्थ असा आवाज येऊ लागला. बाळकृष्ण महाराजांनी लहानपणी केलेला जप आणि त्या उशीतून आलेला आवाज एकच असल्यामुळे बाळकृष्ण महाराज ताटकन उठून उभे राहिले. मग त्तात महाराजांनी म्हटले काय झाले बाळकृष्ण झाले का स्मरण तुला महाराजांचे. तू विसरलास रे,महाराज तुला विसरले नाहीत. मग बाळकृष्ण महाराज तात महाराजांना म्हणाले, मी स्वामी समर्थांचा जप करायचो हे तुम्हाला कसे माहित पडलं. तेव्हा तात महाराज म्हणतात अरे अज्ञानी अजूनही तु मला ओळखत नाहीये. तरीही बाळकृष्णला हे काही कळत नसायचे.
शेवटी तात महाराजांनी त्याला हाताला धरून घराबाहेर काढले. बाळकृष्ण ला घेऊन त्याचे चुलते आणि तात महाराज चालत चालत भुलेश्वर येथील अष्टभुजा देवी दुर्गा माता देवीच्या मंदिराकडे घेऊन आले. आणि देवीला त्यांनी सांगितले बघ माय,हा काय करत आहे बघ. स्वामींचा परम भक्त असलेला हा बाळकृष्ण आता वाईट संगतीत आहे. अशातच देवीने अकराळ विकराळ रूप धारण करून बाळकृष्ण कडे डोळे वाटारुन पाहिले. देवीचे हे रूप पाहून बाळकृष्ण इतके घाबरतात की ते तात्काळ तात महाराजांना मिठी मारतात. आणि म्हणतात आता मला सगळे कळाले आहे. मी लहानपणी जे करत होतो त्याची पोहोच खरोखरच परब्रम्हाकडे झालेली आहे. ज्याची मला कल्पनाच नव्हती. परंतु आता देवीला तुम्ही सांगा की तू माझ्याकडे अशी पाहू नकोस नाहीतर इथेच मी संपेल.
मग महाराज देवीला नमस्कार करून शांत करतात. आता बाळकृष्ण ची मूर्ती पूर्ण बदललेली होती आणि तो तात महाराजांचा निश्चिम भक्त झाला होता.आणि तात महाराजांनी सुद्धा त्याला आपला शिष्य म्हणून त्याचा स्वीकार केला होता. पुढे तात महाराजांनी बाळकृष्ण ला माझ्या नावाने एक मठ आणि ध्वजा उभी कर असा आदेश केला होता. मग पुढे बाळकृष्ण महाराजांनी तात महाराजांच्या इछेनुसार त्यांचा एक मठ आणि त्यांच्या नावाने तिथे ध्वज उभा केला. बाळकृष्ण महाराजांना त्यांनी अशी बुद्धी दिली की त्यांनी स्वामी समर्थ महाराजांचा मुंबईतील दादर मध्ये मठ स्थापन केला.
लहानपणी स्वामीनामामध्ये दंग असलेले बाळकृष्ण महाराज मध्यंतरी फारच वाया गेले होते. त्यानंतर जणू त्यांना स्वामी महाराजांनी परत बोलावून घेतल्यासारखा साक्षात्कार झाला होता. तात महाराजांमुळे नास्तिक प्रवृत्तीतून परत अध्यात्माकडे वळाल्यामुळे बाळकृष्ण महाराजांनी पुढे नेहमीच तात महाराजांची भक्ती केली. आजही दादरच्या श्री स्वामी समर्थ मठात दर्शनी भागात सुरुवातीलाच तात महाराजांचा फोटो दिसतो. त्यानंतर आपणास स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घडते. त्यानंतर बाळकृष्ण महाराजांचे दर्शन मिळते.प्रसिद्धीपासून दूर असलेले तात महाराज बाळकृष्ण महाराज मुळे राज्यभर ओळखले जाऊ लागले.
स्वामी समर्थांच्या मठाच्या स्थापनेनंतर तात महाराज तृप्त होऊन श्रावण शुद्ध वद्य एकादशीला तात महाराजांनी आपला देह ठेवला. विशेष म्हणजे त्याच तिथीला त्यांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दादर मठांमध्ये त्यांची जयंती आणि पुण्यतिथी श्रावण वद्य एकादशीला एकाच दिवशी साजरी केली जाते. श्री स्वामी समर्थ महाराजांचे निश्चिम भक्त, फकीर तात महाराज आता स्वामीमध्ये विलीन झाले होते . त्यांचे कुठलेही चरित्र लिहिलेले नसून तात महाराजांविषयी तुरळक काही माहिती मिळते. परंतु अपार स्वामी भक्ती मुळे आजही अनेक भक्त दादरच्या स्वामी समर्थ मठामध्ये स्वामी समर्थांबरोबर तात महाराज आणि बाळकृष्ण महाराज यांचेही भक्तिभावाने दर्शन घेतात.