भारत माहीत करून घ्यायचा असेल तर विवेकानंद ( Swami Vivekananda ) वाचा हे उद्गार आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे. वेदांत व योगाचे ज्ञानी पुरुष, भारत देशाचे तत्त्वज्ञ, स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, ज्ञान,भक्ती आणि योग यांचा संगम, मानव सेवा आणि आत्मन्ति, राष्ट्र एकात्मता आणि स्त्री शिक्षण, त्याचबरोबर जातीभेद नष्ट करणारे स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी ब्राह्मण कुटुंबात आई भुवनेश्वरी आणि वडील विश्वनाथ दत्त यांच्या पोटी झाला होता.
त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ असे होते. त्यांचे वडील व्यवसायाने त्याकाळचे प्रसिद्ध वकील होते. थोडक्यात नरेंद्रनाथ सदन घराण्यातील होते. त्यांचे आई-वडील त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा उपयोग दान धर्म करण्यासाठी करत असत. आई-वडिलांच्या याच संस्कारात नरेंद्रनाथ मोठे झाले. लहानपणापासून नरेंद्रनाथ धाडसी स्वभावाचे होते. लहानपणापासून नरेंद्रला झाडावर खेळण्यास आवडायचे.
परंतु तेथे राहणारे एक आजोबा नरेंद्रला झोका खेळू नको असे म्हणायचे परंतु नरेंद्र काही ऐकत नसे. म्हणून एकदा त्याला घाबरवण्यासाठी ते आजोबा म्हणाले या झाडावर एक ब्रह्मराक्षस आहे. तसेच या ब्रह्मराक्ष सबंधी काही अत्यंत भीतीदायक गोष्टी ते आजोबा नरेंद्रला सांगत असत. सतत हे आजोबांचे बोलणे ऐकून एकदा नरेंद्र त्यांना म्हणाला खरंच जर या झाडावर ब्रह्मराक्षस असता तर त्याने मला केव्हाच झाडावरून खाली पाडले असते. एकदा नरेंद्र समोर अचानक एक मोठा नाग आला.
लहानपणापासून नरेंद्र भगवान शिवाची उपासना करत असे. त्यांच्याजवळ नाग आल्यानंतर आजूबाजूला असलेल्या लोकांना तो दिसला. परंतु नागाला डिवचण्याचे कोणी धाडस करेना. नंतर नाग निघून गेला. नरेंद्र त्यावेळी ध्यानमग्न असल्यामुळे त्यांना या नागाबद्दल काहीच माहित नव्हते. पुढे नरेंद्र थोडा मोठ्या झाल्यानंतर त्याला अनेक प्रश्न पडू लागले. इस 1877 ते इस 1879 च्या दरम्यान नरेंद्र आपल्या वडिलांसोबत रायपूर येथे राहात होता.रायपूर मध्ये राहात असताना नरेंद्रजी निसर्गासोबत मैत्री झाली आणि त्यांच्या मनात विश्वाविषयी आकर्षण निर्माण झाले.
सन 1879 मध्ये कोलकत्ता येथे येऊन त्यांनी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. त्यांनी साहित्य आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास सुरू केला. पाश्चिमात्य तत्वज्ञान आणि भारतीय श्रद्धावाद याची सांगड कशी घालायची असा प्रश्न नरेंद्र ला पडला होता. तसेच या दरम्यान स्वामींना अनेक प्रश्न पडू लागले. जसे की हे जग कोण चालवते? जीवनाचे उद्दिष्ट काय? परमेश्वर कसा दिसतो? या परमेश्वराला कोणी पाहिले का?
शिक्षण घेत असताना या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधताना स्वामीजींची पुढे रामकृष्ण परमहंस यांच्याशी भेट झाली. पुढे राम कृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे गुरु झाले. परंतु हा प्रवास सोपा नव्हता. मुळातच स्वामी विवेकानंद ब्राह्मण कुटुंबाचे सदस्य असून निराकाराची भक्ती करायचे. या उलट रामकृष्ण परमहंस साकार ची पूजा आणि भक्ती करत होते अर्थात ते मूर्ति पूजक होते.
स्वामी लग्नाच्या वयात असताना त्यांचे वडील विश्वनाथ दत्त यांना त्यांचे लग्न करावे असे वाटायचे. तसेच स्वामीजी सुंदर तरुण तडफदार आणि अभ्यासू व अध्यात्मिक असल्यामुळे त्यांना लग्नासाठी अनेक चांगले स्थळ येत होते. एका धनाड्य व्यक्तीने तर त्यांना दहा हजार रुपये हुंडा देण्याचे कबूल केले होते. परंतु स्वामीजींना पैशाची हाव अजिबात नव्हती. त्यांनी आपल्या वडिलांना स्पष्टपणे सांगितले होते की मला लग्न करायचे नाही. गुरु आणि शिष्य म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या भक्तीचे प्रकार जरी वेगळे असले तरी स्वामीजींना गुरु परमहंस यांच्या विषयी फार स्नेह वाटत असे.
त्यामुळे रामकृष्ण परमहंस जेथे राहायचे त्या दक्षिणेश्वरी कडे स्वामीजींचे येणे जाणे सुरू होते. अगोदर स्वामी यांचा मूर्ती पूजेला विरोध होता परंतु रामकृष्ण परमहंस यांनी कधी स्वामीजींवर सक्ती केली नाही. उलट ते साकार आणि निराकार एकच असल्याचे पटवून देऊ लागले. त्यामुळे स्वामी विवेकानंदांना आपल्या गुरु विषयी फार आदर वाटत असे. स्वामी विवेकानंदांचा जन्म दैविक कार्य करण्यासाठी झाला आहे हे त्यांच्या गुरूंनी फार लवकर ओळखले होते.
पुढे काही दिवसांनी स्वामीजींचे वडील विश्वनाथ दत्त यांचे निधन झाले. घरामध्ये ते फक्त एकटेच कमावणारे होते. तसेच त्यांचा स्वभाव दानधर्माचा असल्यामुळे त्यांच्याकडे फार संपत्ती मागे उरलेली नव्हती. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जवळच्या लोकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली होती. एका नातलगाने तर स्वामींच्या घरच्या मंडळींनाच घराबाहेर काढले आणि त्यांचे घर आपल्या ताब्यात घेतले होते. एकेकाळी लग्नासाठी दहा हजार रुपये हुंडा मिळत होता परंतु आता त्यांना दहा रुपयांची नोकरी मिळणे सुद्धा कठीण झाले होते. आता त्यांना देवा विषयी प्रश्न पडू लागले.
देवाने दुःखी माणसासाठी काय केले? पापी लोक अतिशय चांगले जगत आहेत, आनंदी जगत आहेत. अशी विधाने त्यांच्या तोंडून येऊ लागली. त्यामुळे लोकांचा असा समज झाला की नरेंद्र आता नास्तिक झाला आहे.अशा अवघड प्रसंगी त्यांचे गुरु परमहंस त्यांच्या मदतीला धावून आले. गुरु शिष्यांची पुन्हा भेट झाली. त्या भेटीनंतर नरेंद्र पुन्हा कामाला लागले. संघर्ष करू लागले. नातेवाईकांनी त्यांचे जे घर हडप केले होते त्यासाठी त्यांनी खटला दाखल केला. या खटल्यात मोठ्या हुशारीने स्वामीजी जिंकले.
तरी देखील त्यांच्या आर्थिक विवंचना काही संपत नव्हत्या. ते गुरु परमहंस यांना म्हणाले माझ्या आईला आणि भावंडांना जेवण मिळावे असे तुम्ही कालीमातेला सांगा. रामकृष्ण म्हणाले मग तूच का मागत नाही देवीकडे. तू मागशील तर देवी देईल. आणि इथेच विवेकानंद यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.
गुरूंच्या आज्ञेवरून विवेकानंद देवीसमोर उभे राहिले परंतु भावंडासाठी आणि आईसाठी जेवण मागण्या ऐवजी त्यांच्या तोंडून वेगळेच शब्द बाहेर पडले. ते म्हणाले मला विवेक दे,भक्ती दे,वैराग्य दे, ज्ञान दे! असे ते तीन वेळा म्हणाले. कारण गुरूंच्या शिकवणीत स्वामी परमहंस त्यांना नेहमी सांगायचे तू वटवृक्षासारखा हो! आणि आपल्या राष्ट्रासाठी कार्य कर.
त्यामुळे त्यांच्या वाणीतून देवीला काही मागताना विवेक, भक्ति, वैराग्य आणि ज्ञानच मागितले गेले. पुढे त्यांना चांगली नोकरी मिळाली. घरच्यांच्या गरजा पूर्ण करण्या इतपत ते समर्थ झाले. पुढे त्यांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांना घशाचा कर्करोग झाला. सर्वांना कळून चुकले की आता परमहंस जास्त काळ आपल्यासोबत नाहीत. त्यांच्या काही भक्तांना हा संसर्गजन्य आजार असल्याची भीती वाटू लागली.
त्यामुळे परमहंस यांच्यापासून ते दूर जाऊ लागले. भक्तांचे हे अज्ञान दूर करण्यासाठी स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांनी अर्धवट पिलेला काढा स्वतः पिले. मग त्यांच्या भक्तांना पटले की हा संसर्गजन्य रोग नाही. पुढे रामकृष्ण परमहंस यांचे सन 1886 रोजी निधन झाले. त्या अगोदरच त्यांनी स्वामी विवेकानंदांना आपले उत्तर अधिकारी म्हणून जाहीर केले होते.
त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी वराह नगर येथे एका मठाची स्थापना केली. तिथे ज्ञान, भक्ती, योग आणि कर्म याविषयी शिकवण दिली जाऊ लागली. पुढे त्यांनी भारत भ्रमण केले. या दरम्यान अलमार च्या महाराजांकडे ते एक दिवस मुक्कामी थांबले होते. दगडाच्या किंवा धातूपासून बनवलेल्या मूर्तीबद्दल मला भक्ती वाटत नाही असे अलमारचे महाराज स्वामीजींना म्हणाले. त्यावर महाराज म्हणाले आपली जिथे श्रद्धा आणि विश्वास असतो त्यावर भक्ती करावी. तेव्हा स्वामींनी भिंतीवर टांगलेले महाराजांचे चित्र खाली ठेवण्यास सांगितले. महाराजांच्या समोर ते दरबारातील सेवकांना म्हणाले की तुम्ही या चित्रावर थुंका.
हे ऐकून सर्वजण हादरले. स्वामीजी म्हणाले का थुंकू शकत नाही. या चित्रात स्वतः महाराज कुठे आहेत. हा तर फक्त एक कागद आहे. परंतु चित्रावर थुंकण्यामुळे महाराजांचा अपमान होईल असे तुम्हाला वाटत आहे ना. त्यावर सगळेजण हो म्हणाले. मग स्वामीजी महाराजांना म्हणाले महाराज तुम्ही या चित्रात नाहीत परंतु तुमचे या चित्रामुळे अस्तित्व जाणवते. त्यामुळे या चित्रावर कोणीही थुंकले नाही.
तुम्हाला आणि या चित्राला सगळे लोक सारखेच मानतात. याप्रमाणेच भक्तगण चित्रांमध्ये किंवा मूर्तीमध्ये देवाला पाहतात. मग राजे म्हणाले माफ करा आम्हाला. किती सहज तुम्ही हे आम्हाला समजावले.
पुढे स्वामीजींच्या विचारानुसार एकांतात राहून फक्त साधना करण्यात हित नाही तर मानव कल्याणासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हे त्यांना जाणवले.
मग त्यांनी एक ऐतिहासिक अमेरिका दौरा केला. तिथे मोठी धर्म परिषद ठरलेली होती. अमेरिका दौरा करण्याचा त्यांचा उद्देश हाच होता की प्राचीन भारतीय संस्कृती आणि ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावे. त्याचबरोबर पाश्चात्य देशातील लोकांच्या मनात भारताविषयी प्रतिष्ठा निर्माण व्हावी व तेथील औद्योगिक विकास आणि ज्ञान भारतात यावे. सन 31 मे 1893 रोजी अमेरिकेला जाण्यासाठी स्वामीजींचा प्रवास सुरू झाला होता. भगवा वेश आणि पगडी परिधान करून ते निघाले होते. येथूनच त्यांना पाहून संस्कृती दर्शन घडत होते.15 जुलै 1893 रोजी ते कॅनडा येथे पोहोचले. तेथून रेल्वेने ते शिकागोला गेले.
नेमकेच संमेलन पुढे ढकलले गेले. जुलै ऐवजी ते सप्टेंबर महिन्यात ठरले गेले. त्या संमेलनाला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी प्रतिष्ठित संस्थेचे प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक होते. परंतु ते स्वामींकडे नव्हते. तसेच शिकागो हे महागडे शहर असल्यामुळे तिथे राहणे त्यांना मुश्किल झाले होते. म्हणून त्यांनी आपला मुक्काम बॉस्टनला हलवला. बोस्टनमध्ये केट्स सोनबॉर्न या महिलेने त्यांना आपल्या घरी राहण्याचे आमंत्रण दिले. पैसे वाचावे या उद्देशाने त्यांनी ते आमंत्रण स्वीकारले.
तिथे त्यांची अनेक विद्वानांशी भेट झाली. हॉरवर्ड विद्यापीठातील ग्रीक भाषेचे प्रोफेसर जे एच राईट यांना स्वामी विवेकानंदांची विद्वत्ता भावली. मग त्यांनीच शिकागोच्या परिषदेत विवेकानंदांसाठी प्रतिनिधित्व मिळवण्याची जबाबदारी घेतली.अखेर 11 सप्टेंबर 1893 हा दिवस उजाडला. याच दिवशी तेथे धर्म परिषद होती.या परिषदेत विवेकानंदांचे भाषण सुरू होताच स्वामी विवेकानंदांनी सर्वांच्या काळजाला हात घातला. त्यांनी भाषणाची सुरुवात अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी केली.
सलग दोन मिनिटे टाळ्यांचा कडकडाट झाला.तसेच या भाषणात त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे सगळ्या धर्मांचे एकमेव ध्येय म्हणजे परमेश्वर आहे. पुढे 17 दिवस हे संमेलन चालू होते. रोज स्वामीजींचे संमेलनात व्याख्यान होत असे. पुढे तीन वर्षे त्यांनी परदेशात व्याख्याने केली. सन 1897 मध्ये ते पुन्हा भारतात आले. “राष्ट्र हीच देवता” हा उद्देश ठेवून त्यांनी जनजागृती केली. पुढे 1 मे 1897 मध्ये त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्याद्वारे त्यांनी धर्मप्रचार आणि लोकसेवेचे कार्य सुरू केले.
लोकसेवा, परिवर्तन, जनजागृती अशा चौफेर कार्य समाप्तीनंतर दिनांक 04 जुलै 1902 रोजी स्वामीजींनी देह ठेवला. उठा जागे व्हा आणि आपले उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका ही श्री स्वामी विवेकानंदांची प्रेरणा घेऊन आज भारत प्रगतीपथावर आहे.