श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोट मध्ये आले तेव्हा त्यांच्या सेवेमध्ये फार कमी मंडळी होती. चोळप्पा महाराज मात्र त्यांच्या सेवेमध्ये सुरुवातीपासूनच होते.अशातच सोलापूर वरून एका लहान लेकराला कडेवर घेऊन एक बाई श्री स्वामी समर्थ महाराजांकडे आली होती. तो तिचा नातू होता. तिच्या पायाला काहीतरी त्रास होत असे. काही दिवसातच स्वामींच्या लिलेमुळे तिच्या पायाला फरक पडला होता. त्यामुळे तिचा स्वामी वरील विश्वास बळावलेला होता. एके दिवशी तिने स्वामींकडे स्वामी सेवेमध्ये रुजू होण्याची इच्छा व्यक्त केली. मग चोळप्पाने तिला विचारले की तुला पडेल ती कामे येथे करावी लागतील.
ती हो म्हणाली परंतु श्री स्वामी समर्थांनी चोळप्पाला सांगितले की, तुला या बाईला माझ्या सेवेत ठेवायचे असेल तर तिने येथे तुला कामात मोठी मदत करणे गरजेचे आहे. चोळप्पा म्हणाला की,महाराज बाई स्वभावाने गरीब दिसते, तसेच ती व्याधीग्रस्त आहे. नक्की हिची मला कामात मदत होईल. चोळप्पाच्या म्हणण्याप्रमाणे या बाईने स्वामी सेवेमध्ये बरेच दिवस चांगले काम केले.काही दिवसातच तिचा पाय पूर्णपणे बरा झाला होता. परंतु ती ठणठणीत झाल्यानंतर ती चोळप्पाच्या कामांमध्ये आणि स्वामी महाराजांच्या मठामध्ये येणाऱ्या लोकांमध्ये मध्यस्थी करू लागली. तिचे काही निर्गुण उघडपणे दिसू लागले होते. तसेच स्वामी महाराजांच्या सेवेत पूर्वीपासून असलेल्या लोकांना ती हळूहळू दूर करण्याचा प्रयत्न करत होती. काही दिवसानंतर ती महाराजांवर सत्ता गाजवू लागली.
महाराजांनाही ती धारेवर धरू लागली. महाराजांना उठा म्हटले की उठावा लागत होते व बसा म्हटले की बसावे लागत होते. तिचे नाव सुंदराबाई काडगावकर असे होते परंतु तिला सर्वजण सुंदरामाई असे म्हणायचे. तिने महाराजांवर एवढा अधिकार गाजवला होता की महाराजांकडे कोणाला दर्शन घेण्यासाठी आणि प्रार्थना करायची असेल तर अगोदर सुंदराबाईची ( Sundarabai ) परवानगी घ्यावी लागायची. थोडक्यात स्वामी महाराज तिच्या धाकात राहत होते. एवढे अंतरज्ञानी स्वामी अशा एका सर्वसाधारण बाईच्या धाकात कसे काय राहिले असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना सहज पडतो. परंतु तिचे प्रारब्ध बलवान होते आणि ती मागील जन्मीची फार पुण्यवान होती. असे स्वामी चरित्रात काही नोंदी आढळून येतात
तिने स्वामींवर एवढी सत्ता गाजवली होती की, महाराजांकडे कोणीही आले तर त्याची अगोदरच सर्व चौकशी ती करायची. एवढेच नव्हे तर तुमचे काम झाले तर तुम्ही मला काय द्याल इथपर्यंत तिची मजल गेली होती. थोडक्यात ती फक्त स्वामी सेवा नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी तेथे काम करत होती. त्यामुळे हळूहळू स्वामींचे पूर्वीपासूनचे भक्त आपोआप दूर झाले होते कारण स्वामी महाराज स्वतः तीच्या वचनात होते. तिने हळूहळू महाराजांची आंघोळ घालण्यापासून ते जेवण देण्यापर्यंतची सर्व सेवा स्वतःकडे घेतली होती. महाराज जेव्हा जेवत नसेल तेव्हा लहान लेकराला जसा दम भरतात तशी महाराजांना ती दमही द्यायची.
एकदा असे घडले की, सुंदराबाईचे दुर्लक्ष असताना एक भक्त आला आणि थेट महाराजांपर्यंत पोहोचला आणि त्याने महाराजांना प्रसाद भरवला. तिचे तिकडे लक्ष गेल्यानंतर ती एवढी चिडली की ती त्याला धमकाऊ लागली.तसेच तिने महाराजांना तोंड उघडण्यास सांगितले व त्यांच्या घशात बोट घालून तो प्रसाद बाहेर काढला. एवढा अधिकार तिने गाजवला होता तरीही स्वामी महाराज तिला काहीही बोलत नव्हते.असाच एक प्रसंग म्हणजे एका मुंबईच्या गृहस्थाने स्वामी महाराजांसाठी डाळिंबे घेऊन आला होता. स्वामींना डाळिंब हे फळ फार आवडायचे. तो ग्रहस्थ मठात पोहोचताच सुंदराबाईने त्याचे डाळिंबाचे बाजके हिसकावून घेतले आणि सोडून पाहिले. त्यातील एक डाळिंब बाहेर काढून ते फोडले त्यावेळी डाळिंबाचे काही दाणे जमिनीवर खाली पडले.
तसेच तिने तिच्या नातवाला हातातील डाळिंब खाऊ घातले आणि जमिनीवर पडलेले डाळिंबाचे दाणे महाराजांना भरवले.
महाराजांनी सुद्धा गुपचूप ते खाल्ले. हे सगळे दृश्य बाळप्पा आणि भुजंगा यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. ते पाहून त्या दोघांनाही खूप राग आला होता. मग ते दोघेही तिच्या अंगावर धावून गेले ,परंतु महाराजांनी त्यांना थांबवले. महाराज त्यांना म्हटले असे काहीही करू नका वेळ आल्यावर तिला सगळं कळेल. अशा प्रकारे महाराजांचे जुने भक्त आणि तिच्यामध्ये नेहमीच वाद विवाद होत असे. सुंदराबाई एक ब्राह्मण कुटुंबातील स्त्री होती तसेच स्वामी सोबत राहुन सुद्धा तिच्यामध्ये काहीही बदल होत नव्हता.
जास्त काही भांडण झाले तर मी माझा जीवच देते असे म्हणून सर्वांना घाबरवायची. एकदा अशीच ती विहिरीवर मी जीव देते म्हणून गेली असता महाराजांनी तिची बळच समज काढून माघारी आणले होते. तिची समजूत काढण्यासाठी महाराज फार पटाईत होते. एकदा अशीच ती चिडून आपल्या माहेरी जाऊन बरेच दिवस राहिली होती. काहीही भांडण झाले तर महाराज माझ्या बाजूने बोलत नाहीत म्हणून तिला खूप राग यायचा. नंतर एक दिवस महाराज सर्व सेवेकऱ्याना म्हटले की, चला आपण सुंदराबाईला तिच्या माहेरून घेऊन येऊ. मग सगळेजण चालत चालत सुंदराबाई च्या माहेर गावी गेले आणि तिची समजूत काढून तिला पुन्हा अक्कलकोटमध्ये आणले. सुंदराबाईची स्वामी महाराजांवर अपार श्रद्धा होती. फक्त तिच्या स्वभावामुळे ती स्वामींपासून दूर व्हायची.
असेच एकदा अक्कलकोटच्या भंडार खाण्यामध्ये स्वामी महाराज एका खाटेवर पडले होते. तेथे एक वेडा नेहमी फिरत असायचा. त्या वेड्या माणसाने आजूबाजूला कोणी नाही हे पाहून स्वामी महाराजांचे पाय दोरीने घट्ट बांधले व त्या दोरीचे एक टोक स्वतःच्या गळ्यात घातले आणि महाराजांना फरपटत ओढत चालू लागला. सुंदराबाई काहीतरी छोट्याशा कामासाठी दुसरीकडे गेली होती. लवकरच सुंदराबाईच्या निदर्शनास येताच ती जोरजोरात रडू लागली. तिचा आरडाओरडा ऐकताच बरेच लोक तिथे जमा झाले आणि स्वामींना त्या वेड्याच्या तावडीतून सोडवले. सुंदराबाईंचे स्वामीवर अपार प्रेम होते परंतु ती लोभी आणि स्वार्थी स्वभावाची होती.
असेच एक दिवस तेथील एक जहागीरदार स्वामींच्या दर्शनासाठी येणार होते. दिवस मावळेपर्यंत तिने त्या जहागीरदाराची वाट पाहिली. शेवटी ती स्वामींना जाऊन म्हणाली की ते जहागीरदार दर्शनासाठी येणार होते का आले नाहीत. कारण तिला त्या जहागीरदाराकडून पैसे आणि वस्तू स्वरूपात काहीतरी घ्यायचे होते.स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या लोकांकडून ती काही ना काही स्वार्थ साधून घ्यायची. यावरून स्वामी महाराज तिला कधी कधी चिडवायचे. स्वामींबरोबर एक माकडीन असायची.
अक्कलकोट मधील एका ब्रिटिशांनी ती पाळलेली वानरीन होती. परंतु ती नंतर कोणालाही चावायची. तेव्हा ब्रिटिशांनी तिला गोळी घालून मारण्याचा प्लॅन केला. हे सगळे महाराजांना समजताच एका माणसाकडे स्वामींनी निरोप दिला की, तिला मोठ्याने ओरडून सांग की महाराजांनी तुला बोलावले आहे. तसे करताच वानरीन महाराजांकडे उड्या मारत मारत आली आणि महाराजांचे पाय चाटू लागली. तसेच तिच्या डोळ्यांमध्ये पाणीही दिसत होते. मग महाराजांनी तिला सांगितले की यापुढे तू बाहेर कुठेही जायचे नाही. पुढे ती महाराजांकडे कायमस्वरूपी शांतपणे राहिली. नंतर तिने कोणाचाही चावा घेतला नाही. महाराजांनी तिला सुंदरा नाव ठेवले होते.
सुंदराबाईंना चिडवण्यासाठीच महाराजांनी त्या माकडीनेचे नाव सुंदरा ठेवले होते. एवढे प्रेम सुंदराबाई आणि महाराजांमध्ये होते. परंतु काही दिवसांनी स्वामी भक्तांची सुंदराबाईं बद्दल तक्रार अक्कलकोटच्या राणी साहेब आणि अक्कलकोटचे मामलेदार यांच्याकडे केली होती की, आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी गेल्यानंतर तिथे एक बाई आम्हाला अडवते. आणि स्वार्थासाठी काहीतरी मागतच असते. अशा तिच्या अनेक तक्रारी वाढत असताना अक्कलकोटच्या राणीसाहेबांनी सोलापूरच्या मामलेदारांना तिला अटक करण्याची परवानगीही दिली होती.परंतु नेहमीच स्वामींच्या सेवेत असणाऱ्या सुंदराबाईंना अटक करण्याची कोणाची हिम्मत होत नसे.
पुढे राणी साहेबांनी अक्कलकोटचे नानासाहेब बडवे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली. मग नानासाहेब बडवे चार-पाच फौजदारांना घेऊन स्वामी समर्थ यांच्याकडे आले. परंतु नानासाहेब बडवे यांची ही अवस्था तीच झाली. तिचा तेथील अधिकार आणि स्वामी सेवा बघता अक्कलकोटचे कारभारी नानासाहेब बडवे यांचेही तिला अटक करण्याचे धाडस होईना. शेवटी स्वामी त्यांना म्हणाले की राणीसाहेबांचा आदेश तुम्ही पाळणार का नाही. मग त्यांनी सुंदराबाईला आज पासून तू स्वामींच्या जवळ क्षणभरही थांबायचे नाही असा आदेश दिला आणि तिला पकडून नेले. त्यावेळी सुंदराबाई ची कारकीर्द संपली असे म्हणतात.
परंतु श्री स्वामी समर्थांच्या अवतीभवती असणारे भक्त,सेवक,शिष्य ही सर्व स्वामी महाराजांची पात्रे किंवा स्वरूपे असल्याचे म्हटले जाते. कारण एवढी सामान्य बाई स्वामी समर्थांवर एवढी सत्ता गाजवेल असे अजिबात होऊ शकत नाही. असे म्हटले जाते की तिला तिथून घेऊन गेल्यानंतर सुद्धा ती अनेकांना अक्कलकोट मध्ये दिसायची. तसेच श्री स्वामी समर्थांनी त्यांचा देह ठेवताना त्यांना चमच्याने सुंदराबाईने पेज भरवली होती. सुंदराबाईंना सुंदरामाई म्हणण्याचे कारण म्हणजे तिने स्वामींची आई सारखी सेवा केली होती. भक्तगणांना काहीतरी बोध घेण्यासाठी आणि आपल्या ठिकाणावर आपण विचार करण्यासाठी स्वामी महाराजांनी असे अनेक पात्र केल्याचे त्यांच्या चरित्रात सांगितले जाते.