पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर,सांस्कृतिक केंद्र आणि स्वच्छतेचा आदर्श. याच पुण्यातील शनिवार वाडा सुद्धा प्रसिद्ध आहे. या आधुनिक जिल्ह्याच्या शहरात अगदी मध्यभागी शिवाजी रोडवर म्हणजेच शिवाजी रोड आणि केळकर रोड यांच्या चौकात हे मंदिर आहे . पुणे कार्पोरेशन पी एम टी बस स्टॉप आणि मेट्रो स्टेशनच्या अगदी जवळच समस्त पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ( Shrimant Dagadusheth Halwai Ganpati ) आहे. गणेशोत्सव म्हटला की मोठ्या प्रख्यात गणपती मंदिरांची नावे आपल्या डोळ्यासमोर येतात.
त्यामध्ये पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर प्रामुख्याने दर्शनीय आहे. बाहेर गावाहून पुण्यात आलेला व्यक्ती दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी गेला नाही असे शक्यतो होत नाही. केवळ गणेशोत्सव साजरा करण्यापुरते नव्हे तर श्रद्धेपोटी समाजाने दिलेल्या पैशातून, सामाजिक कार्याच्या माध्यमातून मानवतेचे महामंदिर उभा करण्याचा प्रयत्न करणारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्टआणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ गणपती मंडळाने जगभरात नावलौकिक संपादन केला आहे. जेव्हा भारतावर इंग्रजांचे अधिपत्य होते तेव्हा दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. समाजात त्यांना त्या काळी खूप मानत होते.
त्यांना श्रीमंत ही पदवी लोकांकडून मिळाली होती. त्यांच्या या प्रतिष्ठित व्यक्तिमत्वामुळे ब्रिटिशांनी सुद्धा त्यांना नगरसेठ हे भूषण देऊन सन्मानित केले होते. संपत्ती, मान,धन, प्रतिष्ठा हे सर्वच श्रीमंत दगडूशेठ यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्यावर साक्षात देवाचे वरदहस्त होते असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. त्या काळात एकदा पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. या भयंकर आजारावर कोणताच ठोस उपाय नसल्यामुळे यावेळी अनेक लोकांचे जीव जात होते. प्लेगच्या या महामारी मध्ये लाखो लोकांनी जीव गमावले होते. या रोगाच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या एकुलत्या एक मुलाचे निधन झाले होते.
त्यामुळे दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांना महाभयंकर दुःख झाले होते. त्यांच्याकडे सर्व वैभव असताना सुद्धा ते नैराश्यात गेले होते. हे कुटुंब दुःखात असताना एकदा त्यांना त्यांचे गुरु माधवनाथ महाराज यांनी एक सल्ला दिला. ते दगडूशेठ यांना म्हणाले की, एवढे दुःख करत बसण्यापेक्षा तुम्ही एक गणपतीच दत्तक घ्याआणि त्या गणपतीची मुलाप्रमाणे काळजी घ्या.त्याची कीर्ती जगभर पसरेल. गुरूंच्या सांगण्यानुसार श्री दगडूशेठ आणि लक्ष्मीबाई यांनी पुण्याच्या श्री कुंभार यांच्याकडून एक सुंदर गणपतीची मूर्ती बनवून घेतली. तसेच भक्तिभावाने त्या मूर्तीची स्थापना केली. या गणपतीची चर्चा हळूहळू गावभर पसरली.
लोक गणपतीच्या दर्शनाला येऊ लागले. लोक त्या गणपतीला श्रीमंत दगडूशेठ यांचा गणपती या नावाने ओळखू लागले. असे म्हणता म्हणता कालांतराने या गणपतीचे नामांतर श्रीमंत दगडूशेठ गणपती असे झाले. या गणपतीची कीर्ती संपूर्ण पुण्यात पसरली. लोक श्रद्धेने या मंदिरात गणपतीच्या दर्शनासाठी येऊ लागले. त्याकाळी इंग्रजांच्या जुलमी राजवटीमध्ये इंग्रजांच्या हुकूमशाहीमुळे लोकांना व्यक्ती स्वातंत्र्य नसल्यामुळे “सोने की चिडिया” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात त्यांचा मनमानी कारभार चालला होता.आपल्या देशाला लुटण्याचा जणू त्यांनी त्या काळात ठेकाच घेतला होता. त्यांच्या विरोधात जो कोणी आवाज उठवेल त्याला शिक्षा दिली जायची.
अनेकदा फाशीची शिक्षा देखील दिली जायची. त्यांच्या या जुलमी राजवटीमुळे सर्व भारतीयांमध्ये संतापाची लाट होती. या संतापाची इंग्रजांना त्या काळात चांगलीच झळ लागली होती. 1857 चा उठाव अयशस्वी ठरला होता परंतु या आगीच्या ठिणग्या मात्र संपूर्ण भारतभर पसरल्या होत्या. आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे या चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे इंग्रजांनी लोकांना एकत्र येण्यास आणि संघटना स्थापन करण्यास बंदी घातली होती. ब्रिटिशांविरोधात बोलणे हा एक प्रकारचा गुन्हा ठरत होता. परंतु आपला देश स्वतंत्र व्हावा असे प्रत्येक भारतीय व्यक्तीला वाटत होते. काही लोक तर यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देण्यासही तयार होते.
त्यातीलच एक होते बाळ गंगाधर टिळक. बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य टिळक या नावाने ओळखले जायचे. त्यांनी लोकांना संघटित करून ब्रिटिशांविरोधात लढा देण्याचे ठरवले होते. त्यासाठी युक्ती म्हणून त्यांनी सार्वजनिक उत्सव साजरे करण्याचे ठरवले होते. आणि यासाठी सार्वजनिक गणेश मंडळे तयार करून लोकांना एकत्र करण्याचे त्यांचे ध्येय होते. यातूनच सार्वजनिक गणेशोत्सव उदयास आला. जो गणपती फक्त घरापुरता मर्यादित होता तो आता मैदानात, चौकात, गावात सगळीकडे बसवला जाऊ लागला.
याची सुरुवात पुण्यातून झाली होती. पुण्यात जोशाने आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा करण्यात येऊ लागला. तेव्हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देखील गणेश मूर्ती आणण्यात आली. तेव्हापासून सुरू करण्यात आलेली ही परंपरा तितक्याच श्रद्धेने आणि विश्वासाने आजही चालू आहे. या गणपतीला तेव्हापासून अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे नवसही केले आणि ते पूर्णही झाले. त्यामुळे नवसाला पावणारा गणपती म्हणून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ओळख आहे. श्री माधवनाथ महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ गणपतीची कीर्ती संपूर्ण जगात पसरली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे परदेशातील अनेक लोक या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. वर्षभर या मंदिरात भक्तांची दररोज गर्दी असते.
येथे गणपतीची पालखी, आरती आणि प्रसाद याचे वेगळेच आकर्षण आहे. त्याकाळी श्रद्धेपोटी बसवलेल्या या गणेश मूर्तीला आज देवत्व लाभले आहे. या मंडळाची स्थापना 1893 मध्ये झालेली असून दगडूशेठ गणपती हा लौकिक प्राप्त झालेला आहे. ती मूर्ती मंडळाने 1968 मध्ये तयार करून घेतलेली आहे. सुप्रख्यात मूर्ती बनवणारे शिल्पकार आणि यंत्र विद्येचा चांगला अभ्यास असणारे शिल्पी शंकर आप्पा यांनी त्याकाळी बनवलेल्या मुर्त्यांपैकी हि मूर्ती त्यांच्या कलेची आठवण म्हणून सांगितली जाते.
ती घडवताना मूर्तिकार नागेश शिल्पी यांचेही या कामात योगदान होते. ही मूर्ती तयार करताना त्यावेळेस सूर्यग्रहण चालू होते असे सांगितले जाते. त्या ग्रहणात विशिष्ट वेळेत मूर्ति मध्ये गणेश यंत्र बसवण्यात आले होते. त्यामुळे त्या मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल अशी शिल्पी यांची श्रद्धा होती. त्यांच्या या विश्वासाचा मंडळातील सर्वजण आदर करीत असल्यामुळे त्यांच्या सांगण्यानुसार श्रद्धापूर्वक आणि सर्व आवश्यक धार्मिक विधी करूनच ही मूर्ती तयार करण्यात आली होती.
शांत प्रसन्न आणि पाहताच पावले थप्प होतील असे भाव या मूर्तीमध्ये आहेत. या बैठ्या मूर्तीचे चारही हात सुट्टे असून डाव्या हातामध्ये मोदक आहे तर उजवा हात वरद म्हणजे आशीर्वाद देणारा आहे. अन्य दोन हातामध्ये कमळ आणि डोक्यावर मुकुट आहे. दगडूशेठ गणपती मूर्तीला सोंडेचे नक्षीकाम हा उत्कृष्ट नक्षीकामाचा नमुना आहे. मूर्तीच्या डोळ्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे डोळ्यामध्ये प्रसन्नता, सात्विकता आणि उदात्तता एकवटलेली आहे. कुठूनही पाहिले तरी गणपती आपल्याकडे पहात आहे याची प्रचिती दर्शन घेणाऱ्या भाविकांना येते. दगडूशेठ गणपतीच्या डोळ्यांमधून दिसणारे भाव पाहून दर्शन घेणारे भक्त आपसूकच गणपती पुढे नतमस्तक होतात. गणपती उत्सव काळात पाच किंवा अकरा नारळाचे तोरण अर्पण करणाऱ्या भाविकांची दर्शनासाठी लागलेली रांग हे दगडूशेठ गणपतीचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले.
पुढे 1984 मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरामध्ये गणपतीच्या मूर्तीची स्थापना झाली. या गणपती मंदिर ट्रस्टचे पूर्वीचे अध्यक्ष प्रतापराव गोडसे, मामासाहेब रासने व आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी पूर्वापार केलेल्या प्रयत्नांना आज यश आले आहे. कुली चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेकाळी अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीला जाऊन मनोभावे दर्शन घेतले व नवस केला होता. अमिताभ बच्चन सुखरूप बरे झाल्यानंतर या दाम्पत्याने गणपतीला सोन्याचे कान अर्पण केले होते.
पूर्वीचे मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर सन 2002 मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले. ट्रस्टच्या तीनही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या हाती सध्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. त्यांनीही त्याच श्रद्धेने,निष्ठेने, भाविकतेने आणि आत्मीयतेने सर्व उपक्रम सुरू ठेवले असून गणपतीचे पावित्र्य जपले आहे तसेच ट्रस्टच्या लौकिका मध्ये भर घातलेली आहे. गणेशोत्सव फक्त आपल्या मंडळापुरताच मर्यादित राहू नये या भूमिकेमधून मंडळाला विधायक वळण प्राप्त करून देण्यासाठी या ट्रस्ट ने राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा चालू केली आहे.
तसेच पुण्यामध्ये गणेशोत्सवा दरम्यान ऋषिपंचमीच्या दिवशी या ट्रस्टच्या मार्फत अथर्वशीर्ष कार्यक्रम घेतला जातो. त्यामध्ये हजारोच्या संख्येने महिला सहभाग घेतात व हा अथर्वशीर्ष उपक्रम जगभर पोहोचला जातो. ट्रस्टतर्फे कोंढव्यामध्ये देवदासी आणि अनौरस मुलांचा सांभाळ करून त्यांना योग्य शिक्षण देणारे बाल संगोपन केंद्र आणि पिताश्री वृद्धाश्रम चालवण्यात येत आहे. तसेच एका गावामध्ये जलसंधारणाची कामे यशस्वी केलेल्या ट्रस्ट तर्फे ससून रुग्णालयातील रुग्णांना उत्तम भोजन सेवा दिली जात आहे. ट्रस्ट तर्फे दरवर्षी सादर केला जाणारा देखावा आणि त्याची विद्युत रोषणाई हा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.