श्री क्षेत्र तुळजापूर | Shri Kshetra Tuljapur

तुळजापूर (Tuljapur) हे गाव बालाघाटाच्या एका कड्यावर वसलेले असून धाराशिव (उस्मानाबाद ) जिल्ह्याचा तो एक तालुका आहे. माता तुळजाभवानीचे मंदिर असलेले हे तुळजापूर ( Tuljapur ) महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यापासून सुमारे  19  किलोमीटर अंतरावर आहे. सोलापूर या जिल्ह्याच्या शहरापासून 42 किलोमीटर दूर आहे. इतिहास आणि पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानलं जातं. तर काहींच्या मते सतराव्या किंवा अठराव्या शतकातील आहे.

हे मंदिर कदंब वंशातील मराठा महामंडलेश्वर मरारदेव यांनी बांधले असे म्हणतात. आणि येथील आई तुळजाभवानीची मूर्ती ही स्वयंभू असून ती शालिग्राम दगडाची आहे.या मंदिराच्या ट्रस्टचे विश्वस्त हे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात.  कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेता युगात प्रभू रामचंद्रांसाठी, द्वापार युगात धर्मराज युधिष्ठेरासाठी आणि कलियुगात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आशीर्वाद रूपाने ही देवी धावून आल्याचे सांगतात.

आपल्या भारत देशात आदिमाया शक्तीची 108 शक्तीपीठे आहेत. त्यातील साडेतीन शक्तीपीठे ही महाराष्ट्रात आहेत. या साडेतीन शक्तीपीठांपैकी आई तुळजाभवानी हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती,भवानी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. ही देवी स्मृति देवता, प्रेरणा देवता व छत्रपती शिवाजी महाराजांची कुलमाता समजली जाते. प्रत्येक युद्धाच्या वेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेऊनच लढण्यासाठी निघत.. यवनांच्या राज्यकाळात त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी आई तुळजाभवानीने प्रसन्न होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना एक तलवार दिली होती असं म्हणतात.

सर्वजण त्या तलवारीला भवानी तलवार म्हणत. म्हणून आजही लोक“जय भवानी,जय  शिवाजी“असा नारा लावतात.    शारदीय नवरात्र उत्सवात तुळजापूर मध्ये देवीची फार मोठी यात्रा भरते. त्याचप्रमाणे शाकंभरी नवरात्र उत्सव, अश्विनी पौर्णिमा तसेच चैत्री पौर्णिमेलाही तुळजापूर मध्ये फार मोठे उत्सव साजरे होतात. आणि भाविक मोठ्या प्रमाणात तुळजापूरला आई तुळजा भवानीच्या दर्शनासाठी जातात. अनेक प्रांतातून  विविध जाती धर्माचे लोक देवीच्या दर्शनासाठी जातात तर काही भक्त दरवर्षी देवीची वारी करतात. तुळजापूरच्या आई तुळजाभवानीचे अहमदनगर हे माहेर आणि तुळजापूर हे सासर समजले जाते. तसेच ती तेली कुटुंबाची मुलगी समजली जाते आणि याची एक आख्यायिका सुद्धा आहे.

अहमदनगरमध्ये निजामांच्या राज्यात भुरानशहा  नावाचा एक जमीनदार राज्य करत होता. त्याला निजामांची साथ होती.तो फार क्रूर अत्याचारी आणि वासनिक होता. म्हणून तेथील जनता त्याला फार कंटाळली होती. यावेळी एका जानकोजी देवकर नावाच्या तुळजाभवानीच्या भक्ताने तुळजापूरला जाऊन येथील जनतेची सर्व व्यथा आई भवानीला सांगितली. आणि आमच्या आया बहिणींची मदत करण्यासाठी साकडे घातले. भक्तांच्या विनंतीला जगदंबा एका मुलीच्या रूपाने जानकोजी देवकरांच्या घरी आली आणि मी तुमची मुलगी आहे असे सांगितले.

जानकोजी प्रेमळ असल्याने त्यांनी तिचे आपल्या घरीच पालन पोषण केले. या काळातच तिने भुरानशहाचे हरण करून त्याला सबक शिकवली आणि देवी परत तुळजापूरला गेली.तुळजापूरच्या  या देवीला तुळजाभवानी का म्हणतात याचाही एक इतिहास आहे. अन्नपुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीच्या अवताराची कथा सांगितली आहे. असे म्हणतात कृतयुगात कर्दन नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनुभूती फार सुंदर आणि पतिव्रता होती. तिला एक पुत्ररत्न प्राप्त झाले परंतु, त्यांचा हा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण पती कर्दन ऋषींचे लवकरच निधन झाले.

पतीच्या निधनानंतर पत्नी अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय घेतला. परंतु अल्पवयीन मुलाला मागे एकटे सोडून जाऊ नये असे एका महान ऋषींनी तिला सांगितले. त्यामुळे तीमेरू पर्वताजवळ असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात जाऊन त्या ठिकाणी एका आश्रमात घोर तपचर्या करत बसली. तपचर्या सुरू असताना तेथील एक कुकर दैत्य तिच्या सौंदर्यावरती बहाळला.त्याच्या मनात वाईट वासना येऊ लागल्या आणि त्याने तिला स्पर्श केला. त्यामुळे अनुभूतीची तपचर्या भंग पावली. अशा या वासनी दैत्यापासून रक्षण करण्यासाठी तिने आधीमायेची मदत मागितली. त्यावेळी तिच्या मदतीला देवी धावून आली.

आणि देवीने दैत्याशी युद्ध करून त्रिशूलाने दैत्याचे शिर ऊडवून त्याला ठार केले ,म्हणून देवी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. पुढे त्वरिताचे तुळजापूर झाले आणि भक्त देवीला तुळजाभवानी म्हणू लागले. तसेच भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरत पूर्ण करणारी  म्हणून त्वरिता तुळजा असेही तिला लोक म्हणू लागले. आणि संपूर्ण भारतात तिला कुलस्वामिनी मानू लागले. अशा या आई तुळजाभवानीच्या तुळजापूरच्या मंदिरात दक्षिण दरवाज्यास परमार दरवाजा म्हणतात. जगदेव परमार या थोर भक्ताने आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केल्याचे म्हटले जाते.

आणि तशी श्लोक रचनाहि या परमार दरवाजावर कोरलेली आहे. पश्चिम दिशेला गर्भ ग्रह असून चांदीच्या सिंहासनात प्पूर्वभूमुख अशी तुळजा मातेची प्रसन्न मूर्ती आहे. मूर्ती गंध की शिळेच्या सुवर्णप्रमाणबद्ध आहे. अष्टभुजा महिषासुरवर्धिनीचे मनोहर रूप आहे. आणि ही देवी भवानीची  मूर्ती स्थलांतर करणारी मूर्ती आहे. वर्षातून तीन वेळा ही मूर्ती पलंगावर विसावली जाते. मंदिरांच्या भिंतीवर छोटे छोटे देवी-देवतांचे शिल्प आहेत. सभा मंडपात उत्तरेस देवीचे शैनग्रह आहे. येथे एक चांदीचा पलंग आहे तसेच मंदिराच्या परिसरात कल्लोळतीर्थ, गोमुख तीर्थ,सिद्धिविनायक मंदिर,भवानी शंकर मंदिर,होम कुंड,मातंगी मंदिर अशी तीर्थे आहेत.

भवानी तीर्थात पुरुष आणि महिलांना स्नान करण्यासाठी वेगवेगळी ठिकाणे आहेत. तेथे स्नान करण्यासाठी प्रत्येकी काही पैसे आकारले जातात. आणि स्नान उरकल्यानंतर आपण दर्शनाकडे जातो .दर्शनासाठी जात असताना वाटेतच एक गणपती मंदिर आहे. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराकडे जाताना सुरुवातीला राजे शहाजी प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून सरळ भक्त आई भवानीच्या दर्शनासाठी जाऊ शकतात परंतु, नवरात्री सारख्या उत्सवांच्या दिवशी व गर्दीच्या वेळी भक्तांना दर्शन घेण्यासाठी तेथे दर्शन रांगेचे  वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.

जसे की “धर्मदर्शन रांग “ ह्या रांगेतून भाविकांना सरळ मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत दर्शनासाठी जाता येते. दुसरे म्हणजे “मुखदर्शन” या रांगेतून भाविकांना काही अंतरावरून देवीचे मुखदर्शन करता येते . आणि ज्या भाविकांना वेळ नाही त्यांना सुमारे 300 रुपयात तात्काळ थेट भवानी मातेच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येते.एकदा तुळजापूरच्या मानकरयांनी  माहूरगड ला जाऊन रेणुका मातेची एक खून म्हणून  तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोरच आदिशक्ती मातंगीची स्थापना केली. तेव्हापासून भाविक आदिशक्ती मातंगीचे दर्शन घेऊन मग आई तुळजाभवानीचे दर्शन घेतात तसेच उत्सवात देखील अगोदर रेणुका मातेचा अग्निकुंड पेटवतात व नंतर त्या निखाऱ्याने तुळजाभवानीचा अग्निकुंड  पेटवतात.

तसेच होळीच्या दिवशीही आधी आदिशक्तीची होळी पेटते व नंतर तुळजाभवानीची.आई भवानी मातेला रोज भाजी भाकरीचा, दूध खिरीचा, पुरणपोळीचा, पंचपानांच्या विड्यांचा, आणि दही भाताचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. तसेच दसऱ्याला मांसाहाराचा किंवा खारा नैवेद्य दाखवण्याची सुद्धा प्रथा आहे. परंतु हा मांसाहाराचा नैवेद्य देवीच्या मुखाजवळ न दाखवता तो देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवला जातो हे अनेक भक्तांना माहिती नाही.

ज्यावेळी देवीने महिषासुराचा वध केला त्यावेळी महिषासुराणी त्याची शेवटची इच्छा म्हणून दोन इच्छा व्यक्त केल्या.पहिली म्हणजे त्याचं नाव देवीच्या अगोदर घेण्यात यावं म्हणून देवीला महिषासुरवर्धिनी असेही म्हणतात. आणि दुसरी इच्छा म्हणजे दसऱ्याला त्याला मांसाहाराचा नैवेद्य दाखवावा. म्हणून तेथे दसऱ्याला देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. अशीच एक अंबाबाईच्या परडीची म्हणजेच ताटाची कथा आहे. महासती रेणुका माता ही जगदगमी नावाच्या ऋषीची पत्नी होती. तिच्या मनामध्ये एकदा चित्ररत नावाच्या गंधर्वाला बघून कामवासनेचे विचार आले.

अंतर ज्ञानामुळे हे जगद्गगमी ऋषींना समजले. आणि त्यांनी तिला आश्रमातून निघून जाण्यास सांगितले व कुष्ठरोग होण्याचा शापही दिला. तिची ही अवस्था बघून यावेळी तिला  एकनाथ आणि जोगीनाथ नावांच्या संत पुरुषांनी जंगलात जाऊन भगवान शिवाची उपासना करण्यास सांगितले. ही उपासना करत असताना तिने स्वतःच्या जेवणासाठी पाच घरे अन्न मागण्यासाठी व जंगलातील फळे तोडून आणण्यासाठी बांबूच्या लाकडापासून एक टोपली तयार केली. त्या टोपलीलाच देवीची परडी किंवा ताट म्हणतात. आणि हे जेवण करत असताना तिचा मुलगा परशुरामाच्या आठवणीत त्याला एक घास काढून ठेवण्यासाठी तिने छोटी टोपली बनवली. म्हणून त्या ताटात असलेल्या छोट्या द्रोणाला परशुराम असे म्हणतात. ही कथा आपल्याला रेणुका पुरानात ऐकावयास मिळते.

 श्री क्षेत्र तुळजापूर मध्ये भक्तांना मुक्कामी राहण्यासाठी दोन भक्त निवास आहेत. त्यातील एक मंदिराच्या शेजारीच आहे. त्याला 24 भक्तनिवास असे नाव आहे. या भक्तनिवासात फक्त 24 खोल्या असल्याने याला 24 भक्त निवास नाव पडले. आणि दुसरे म्हणजे 108 भक्तनिवास. देवीच्या कवड्याच्या माळेत 108 कवड्या असतात म्हणून याला 108 भक्तनिवास नाव दिले आहे. हे भक्त निवास मंदिरापासून जवळच असून तेथे प्रशस्त पार्किंगची व्यवस्था ही आहे. तीन मजल्यांचे किल्ल्याच्या आकाराचे असलेले हे प्रशस्त भक्तनिवास  असून या भक्तनिवासाच्या आजूबाजूचा परिसरही फार सुंदर आहे. तसेच या भक्तनिवासात मोठे गार्डन असून भक्तांच्या चहा नाश्त्यासाठी एक कॅन्टीनही आहे. अल्प दरात येथे भक्तांच्या  चहा नाश्त्यांची सोय होते परंतु येथे जेवणाची व्यवस्था नाही.

भक्त ऑनलाइन तसेच ऑफलाइन किंवा फोन करून सुद्धा आपल्या रूमचे बुकिंग या ठिकाणी करू शकतात. येथील रिसेप्शनची सर्विस चांगली असून 270 रुपये पासून 2400 रुपयांपर्यंत भक्तांच्या संख्येनुसार आणि रूम मध्ये दिल्या गेलेल्या सोयीनुसार येथे रूम उपलब्ध आहेत. फक्त निवासात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे असून पहाटे तीन ते सकाळी सात वाजेपर्यंत भक्तांना आंघोळीसाठी येथे सोलर सिस्टिमद्वारे गरम पाणी मिळते. अनेक भक्तगण तुळजापूर मध्ये असलेल्या संत गजानन महाराजांच्या भक्त निवासात राहतात. तेथे भक्तांना फ्री जेवण मिळते.

  तुळजापूर पासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या धाराशिव जिल्ह्याच्या जवळपास अनेक तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळे आहेत. तेथे जाऊन बरेच भाविक आनंद लुटतात. जसे की सोनारी या गावांमध्ये नाथ संप्रदायाच्या चौदाव्या शतकातील एक मठ आणि काळभैरवनाथाचे मंदिर आहे. धाराशिव पासून हे 90 किलोमीटर आहे. तसेच धाराशिव पासून लगभग 15 किलोमीटर अंतरावर दत्त मंदिर संस्थान, कळम तालुक्यातील येरमाळ्यात येडेश्वरी देवी, उस्मानाबाद शहरात भारतातील प्रख्यात हजरत रामयुद्दीन दर्गा, या दर्ग्याच्या यात्रेला भारतातून हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात जातात. तसेच उस्मानाबाद शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेर या गावी  राष्ट्रीय संत गोरोबाकाका कुंभार यांचे मंदिर आहे.

त्याचप्रमाणे जवळच  सातव्या शतकातील बालाघाट पर्वतरांगेमध्ये धाराशिव लेणी कोरलेली आहे. तसेच सोलापूर औरंगाबाद रोडवर येडशी या गावात तुळजापूरच्या तुळजाभवानीची धाकटी बहीण येडेश्वरीचे मंदिर आहे.उस्मानाबाद पासून 23 किलोमीटर अंतरावर भगवान शिवशंकरांचे रामलिंग मंदिर आहे. तसेच उस्मानाबाद मध्ये परंडा तालुक्यात दहा एकर जागेमध्ये असलेला परांडा किल्ला आहे. तसेच उस्मानाबाद शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर नळदुर्ग किल्ला ही आहे.

Leave a Comment