श्री क्षेत्र पंढरपूर | Pandharpur

 महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर ( Pandharpur ) एक तालुका आहे. हे शहर चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले आहे. भीमाशंकरला उगम पावणारी भीमा नदी पंढरपूर जवळ गेल्यानंतर अर्धचंद्राकृती आकार घेते म्हणून या नदीला पंढरपूरला चंद्रभागा नदी असे म्हणतात. पंढरपूर तालुक्याला प्राचीन काळात पुंडलिकपूर असेही म्हणत.मध्ययुगीन कानडीशिलालेखात त्याचा“पंढरी“असाही उल्लेख आहे.

अकराव्या ते बाराव्या शतकात यादव राजांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासाठी अनेक देणग्या दिल्या असे म्हणतात. त्या देणग्यांमुळे मंदिराचे व्यवस्थापन व्हायचे परंतु आदिलशहाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी अफजलखानाने पंढरपूर शहरासह मंदिराचेही मोठे नुकसान केले होते. पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर होयसाळ काळात होयसाळ राजा विष्णुवर्धन यांनी बांधले आहे असे म्हणतात.पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे मुख्य हिंदू मंदिर असून महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. पंढरपूर धामाचे वैशिष्ट्य म्हणजे हे एक शाश्वत धाम आहे असे शास्त्रात सांगितले आहे.

दुसरे म्हणजे येथे देवाचे चरणस्पर्श करता येतो. पूर्वीच्या काळात देवाला अलिंगनही देता येत होते मात्र ती प्रथा सध्या बंद केलेली आहे. तसेच येथे भगवान पांडुरंग भक्तांची वाट पाहत उभे आहेत. इतर ठिकाणी भक्त देवाची वाट पाहत असतात.आणि त्यांनी तसे संत नामदेव महाराजांना सांगितले देखील होते की आषाढी आणि कार्तिकी एकादशीला मला विसरू नका मला भेटायला यावे. भगवान पांडुरंगाची मूर्ती ही स्वयंभू आहे ही  कोणीही बनवलेली नाही असे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे.तसेच ज्या विटेवर विठ्ठल ( vitthal ) उभे आहेत ती वीट म्हणजे साक्षात इंद्र समजले जातात. अशी अनेक वैशिष्ट्य या पंढरपूर धामाची सांगितली जातात.

पंढरपूरच्या विठ्ठलला संतांनी विष्णुकृष्ण रूप मानलेले आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यातील गडद-पंधरवाड्याच्या आठव्या दिवशी द्वापार युगाच्या शेवटी भगवान कृष्णाने विठ्ठलाच्या रूपाने अवतार घेतला होता असे मानतात. विठ्ठल द्वारकेतून पंढरपूरला येताना ते जरी काळे असले तरी त्यावेळी त्यांच्या तोंडावर पांढरी वाळू पसरलेली होती म्हणून त्यांना पांडुरंग असे म्हणतात.
 विष्णुपुराणात पांडुरंगाचे वर्णन संस्कृत भाषेत आहे. त्याचा अर्थ आहे की, सर्व क्षेत्रात वरिष्ठ क्षेत्र पंढरी, सर्व तीर्थात वरिष्ठ तीर्थ चंद्रभागा, सर्व देवांमध्ये वरिष्ठ देव श्री विठ्ठल, आणि सर्व भक्तांमध्ये वरिष्ठ भक्त श्री पुंडलिक आहेत. आणि असेच थोर वर्णन संत तुकारामांसह अनेक संतांनी आपापल्या अभंगामधून केले आहे.

 श्री विठ्ठल आणि भक्त पुंडलिक हे कोण होते हे खालील प्रमाणे सांगितले जाते. दोपार युगात मुचुकुंद  नावाचा एक पराक्रमी राजा होऊन गेला. देवदैत्याच्या युगामध्ये देव त्यांची नेहमी मदत घेत असत. एकदा एका मोठ्या युद्धामध्ये देवांनी त्यांची मदत मागितली. त्यावेळी मुचुकुंद राजाने देवांना विजय मिळवून दिला. मग देवांनी प्रसन्न होऊन त्यांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा मुचुकुंद राजाने मी फार थकलो असून  मला एकांतात झोप हवी आहे परंतु जो कोणी माझी निद्रानाश करेल तो माझ्या नजरेने भस्म व्हायला हवा असा वर मागितला. देवांनी तथास्तु म्हटले. आणि नंतर राजा एका गुहेमध्ये निद्रादिन झाले.

पुढे काल्यवन नावाचा बलाढ्य राक्षस श्रीकृष्णांकडे युद्धासाठी आला. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी युक्ती वापरून तेथून पळ काढला.काल्यवन राजा खुश होऊन कृष्णाच्या मागे धावू लागला परंतु श्रीकृष्णाने ज्या ठिकाणी राजा मुचुकुंद  निद्रादिन झाले होते त्यांच्याकडे त्यांना घेऊन गेले आणि आपल्या अंगावरचा शालू मुचुकुंद राजांच्या अंगावर टाकून स्वतः अंधारात लपून बसले. काल्यवन राक्षसाला  वाटले की श्रीकृष्णच या शालू खाली झोपलेले आहेत आणि म्हणून त्यांने झोपलेल्या मुचुकुंद राजाला  लाथा मारण्यास सुरुवात केली. झोपेतून उठलेल्या मुचुकुंद राजाने क्रोधित नजरेने  काल्यवनाकडे पाहताच तो भस्म झाला.

नंतर श्रीकृष्णांनी मुचुकुंद राजाला त्यांनी केलेल्या युक्तीची माहिती दिली आणि म्हणाले तुमची ही इच्छा मी तुमच्या पुढच्या जन्मी पूर्ण करेल. आणि हाच राजा मुचुकुंद पुढे भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्माला आल्याचे म्हटले जाते. भगवान श्री विठ्ठल कोण होते हे खालील प्रमाणे सांगितले जाते. एकदा श्रीकृष्ण आपल्या रुसून गेलेल्या पत्नीला म्हणजे रुक्मिणीला शोधण्यासाठी गेले असता त्यांना त्यांनी मुचकुंद राजाला दिलेल्या वराची आठवण झाली. आणि ते पुंडलिकाला भेटण्यासाठी चंद्रभागेतिरी लोहदंड तीर्थाजवळ गेले. तेव्हा भक्त पुंडलिक त्यांच्या आई-वडिलांची सेवा करत होते.

श्रीकृष्ण दरवाज्यात उभे होते परंतु भक्त पुंडलिकाने सेवा बंद न करता भगवान श्रीकृष्णांकडे त्यांना उभे राहण्यासाठी एक वीट फेकली. आणि सेवा पूर्ण होईपर्यंत त्यावर उभे राहण्यास सांगितले. त्यावेळीचे श्रीकृष्णांचे हे रूप म्हणजे पांडुरंग समजले जातात आणि ती वीट म्हणजे साक्षात इंद्रदेव समजले जातात. इतिहासानुसार फक्त पुंडलिक पंढरपूर मध्ये पाच हजार वर्षांपूर्वी आले होते.अशी आहे भगवान श्री  विठ्ठल आणि भक्त पुंडलिकाची कथा.

अशा ह्या पंढरपुरात भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला फार मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रातून तसेच अनेक राज्यांमधून भाविक दिंड्यांमध्ये तसेच स्वतःच्या वाहनाने  या यात्रेला जातात. इतर दिवशीही पंढरपूरमध्ये भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक भागांमधून भावीक जात असतात. अंदाजे आषाढी एकादशीला पंढरपूर मध्ये तीन ते चार लाख भाविक जमा होतात. म्हणून पंढरपूर मध्ये भक्तांना मुक्कामी राहण्यासाठी इतर सुविधाही पुरवण्यात येतात. पंढरपूर मध्ये विठ्ठल भक्तांना राहण्यासाठी अलीकडच्या काळात फार मोठे भक्तनिवास बांधण्यात आलेले आहे.

बोलायला तर ते भक्तनिवास आहे परंतु दिसायला आणि तेथे दिल्या जाणाऱ्या सुविधा एखाद्या 5स्टार हॉटेल पेक्षा कमी नाहीत.येथे राहण्यासाठी भाविक ऑनलाईन तसेच स्वतः तिथे जाऊन सुद्धा रूम बुक करू शकतात. देशातील कोणत्याही ठिकाणाहून भाविक रेल्वेने अथवा एसटी बसेसने किंवा स्वतःच्या वाहनाने पंढरपूरला जाऊ शकतात. विठ्ठल मंदिरापासून तीन किलोमीटर रेल्वे स्टेशन आणि दोन किलोमीटर एसटी स्टँड आहे.. विठ्ठल मंदिराच्या रस्त्यावरच सुंदर श्रीकृष्ण मंदिर आहे. आणि या मंदिराजवळच पूजेचे साहित्य, पेढे खेळन्या, मिठाई अशी अनेक प्रकारची दुकाने असलेला बाजार आहे.

भगवान विठ्ठलाच्या या मंदिरात श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांचे शेजारीच वेगवेगळी मंदिरे आहेत. वारकऱ्यांची पंढरपूरची प्रदक्षिणा करण्याची प्रथा फार जुनी आहे आणि ती या श्रीकृष्ण मंदिरापासूनच सुरू होते. येथे आलेले सर्व भक्त अगोदर चंद्रभागेमध्ये स्नान करून  भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन भगवान विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. चंद्रभागेच्या दुसऱ्या बाजूला फार मोठे अलीकडच्या काळात बांधलेले इस्कॉन मंदिर आहे. तेथे भगवान श्रीकृष्णाची छान मोठी मूर्ती आहे.

 मुख्य मंदिराकडे दर्शनासाठी जाताना भाविकांना मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाही. आपले मोबाईल व मौल्यवान साहित्य तेथे उपलब्ध असलेल्या लॉकरमध्ये ठेवूनच आपणास दर्शनासाठी जावे लागते. विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच संत चोखामेळा महाराजांचे मंदिर आहे. येथे दर्शन घेऊन नंतर भाविक नामदेव पायरीचे दर्शन घेतात. सतत पांडुरंगाच्या भक्तीत राहून संत नामदेव महाराजांनी येथे समाधी घेतली होती तसेच त्यांची बहीण संत जनाबाईने ही येथे समाधी घेतली होती. त्यानंतर भावीक पांडुरंगाच्या मुखदर्शनाच्या ठिकाणी जाऊन मुखदर्शन घेऊ शकतात.

ज्या भाविकांना पांडुरंगाचे चरण स्पर्श करून दर्शन घ्यायचे आहे त्यांना दर्शन रांगेच्या मंडपातून जाऊन दर्शन घ्यावे लागते. याच पांडुरंगाच्या मंदिराजवळ माता रुक्मिणीचे मंदिर आहे.त्यानंतर भक्त मंदिराच्या उत्तरेच्या व पश्चिमेच्या दरवाजातून बाहेर येऊ शकतात. पश्चिम द्वाराजवळच ताक विठोबा मंदिर आहे. ताक विठोबाचा अवतार पांडुरंगांनी भक्तांच्या सेवेसाठी घेतला होता.बऱ्याच भक्तांना या ताक विठोबा विषयी माहिती नाही.उत्तरेच्या दरवाजा जवळच भक्तांना लाडूचा प्रसाद दिला जातो.पंढरपूर पासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर गोपाळपूर परिसरात विष्णूपाद मंदिर आहे.

हे भगवान विष्णूंचे मंदिर आहे. येथेही जाऊन बरेच भक्त दर्शन घेतात. तसेच पंढरपूर मधील प्रभुपात घाट, श्री राधा पंढरीनाथ मंदिर, कैकाडी महाराज मठ, तुळशी वृंदावन, तनपुरे महाराज मठ आदि ठिकाणी जाऊन भक्त दर्शन घेतात.तर काही भाविक पंढरपुर जवळ असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळी व तीर्थस्थळी जाऊन  आनंद घेतात. जसे की सोलापूर मधील भुईकोट किल्ला, हुतात्मा बाग, इंद्रभवन, शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान, मल्लिकार्जुन मंदिर इत्यादी ठिकाणी भेट देतात.असे आहे हे पंढरपूर धाम

Leave a Comment