पुराणानुसार ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांनी पृथ्वी निर्माण केली. पृथ्वीचे पालन पोषण करणारे, संरक्षण करणारे सुद्धा हेच देव आहेत. या तिन्ही देवांचे एकत्रित रूप म्हणजे गुरुदेव दत्त आहेत. महाराष्ट्रात आणि भारत देशामध्ये दत्ताची अनेक मोठी मंदिरे आहेत. परंतु नारायणपूर ( Shri Kshetra Narayanpur ) येथील दत्त मंदिरातील मूर्ती एकमुखी आणि षडभुज असल्यामुळे प्रचलित आहे.
इतर ठिकाणी सामान्यता त्रिमूर्ती आणि षडभुज मूर्ती असतात.पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यात सासवड पासून पाच-सहा किलोमीटर आणि पुण्यापासून 30-35 किलोमीटर अंतरावर नारायणपूर नावाचे गाव आहे. हे गाव पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आहे, या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्यावर पराक्रमी राजे छत्रपती संभाजी राजांचा जन्म झाला होता. याच पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूर हे गाव आहे. या नारायणपूर गावामध्ये देवाधिदेव गुरुदेव दत्ताचे भव्य मंदिर आहे.
आजच्या कलयुगामध्ये सुद्धा मनापासून भक्ती केल्यानंतर देव दिसतो, याचे एक उदाहरण नारायणपूर मध्ये आहे. हे दंतकथा नसून एक सत्य कथा आहे. माता पारूबाई कृष्णाजी बोरकर आणि पिताजी कृष्णाजी बोरकर यांना पाच अपत्ये होती आणि याच अपत्यापैकी एक थोरले अपत्य म्हणजे अण्णा महाराज म्हणजेच नारायण महाराज यांचा जन्म 27/09/1939 साली हिवरे या गावी त्यांच्या आजोळी झाला होता. ते सगळी लहान भावंड असतानाच अण्णाच्या वडिलांचा मृत्यू झाला.
नंतर सगळी जबाबदारी अण्णा महाराज यांच्यावर पडली. अण्णा शेतामध्ये भरपूर कष्ट करत होते, कष्ट करता करता अण्णांना भक्तीची ओढ लागली होती. पुढे अण्णा येथील नारायणेश्वर देवाची भक्ती करायला लागले. त्यानंतर त्यांना एकदा नारायणपूरला आल्यानंतर चमत्कार घडला नारायणेश्वर यांनी अण्णांना ध्वनी स्वरूपात येऊन दर्शन दिले, अण्णांना ध्वनी स्वरूपात नव्हे तर संपूर्ण दर्शन पाहिजे होते, म्हणून त्यांनी नारायनेश्वरांना सांगितले की मला संपूर्ण दर्शन पाहिजे व नारायणेश्वर यांनी सांगितले की हे बालका तुला गुरु प्राप्त करावा लागेल,गुरु ज्ञान घ्यावे लागेल, त्यावेळी तुला माझे संपूर्ण दर्शन मिळेल.
नंतर अण्णा आपल्या मूळ गावी आले आणि अण्णा मनापासून भक्ती करायला लागले, भक्ती करता करता अनेक दिवस निघून गेले आणि नारायणपूर मध्ये त्यांच्या घराशेजारी औदुंबराचे झाड उगवले, आणि त्या औदुंबराच्या झाडाला अण्णा दररोज प्रदक्षिणा घालू लागले. असे दिवसा मागून दिवस गेले. अशी अण्णांची अफाट भक्तीमुळे अतूट नाते तयार झाले जसे की देवाला भक्ता शिवाय करमत नाही. आणि भक्ताला देवा शिवाय करमत नाही.सूर्य उगवताच अण्णा औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असायचे.असा त्यांचा नित्यक्रमच झाला होता. अशातच एकदा सकाळच्या वेळी औदुंबर वृक्षाची पूजा करत असताना अचानक सूर्यप्रकाश त्या औदुंबराच्या झाडावर आला, आणि त्याच सूर्यप्रकाशातून अण्णांना गुरुदेव दत्ताचे दर्शन झाले.
आजही ते झाड नारायणपूरला गेल्यानंतर प्रथमदर्शनी दिसते.त्याच ठिकाणी अण्णांना गुरुदेव दत्ताचे दर्शन झाले.त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पादुका आहेत. पुढे काही दिवसांनी 1964 मध्ये अण्णांनी तीन मुखी दत्ताचे मंदिर बांधले . पुढे नंतर 1986 मध्ये एक मुखी दत्ताची मूर्ती स्थापन केली.जे एक मुखी दत्त आहेत हे स्थान असे आहे की आपण तिथे गेल्यानंतर मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होते आणि मन प्रसन्न होते. एक मुखी दत्ताचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात गेल्यावर तिथे असे सुविचार आहेत की आपल्याला जीवन जगण्याचे मार्ग सापडतात. जगावे कसे हे आपल्याला कळते,हे आपल्याला तेथील सुविचार यावरून कळते.
आजच्या कलियुगातील देव म्हणावे तर ते म्हणजे अण्णा महाराज.आपण नारायणपूरला गेल्यानंतरच कळते की देव आहे की नाही.
नारायणपुरला आल्यानंतर श्री गुरुदेव दत्ताचे दर्शन घेतल्यानंतर आपल्या मागे कितीही वाईट शक्ती असो किंवा कोणतेही व्यसन असो, ते नक्कीच सुटते. अशी जागृत शक्ती गुरुदेव दत्तांमध्ये आजही आहे. नारायणपुरला गुरुवारी आणि पौर्णिमेला लाखो लोक येतात. त्या लाखो लोकांना मुक्त अन्नदान प्रसाद मिळतो. तेथे काम करण्यासाठी नोकर नसतात. ते सगळे अण्णांचे शिष्य आहेत.
हा प्रसाद देणार कोण हा प्रश्न लाखो लोकांना पडत असतो, प्रत्येक तीर्थक्षेत्री काम करायला नोकर असतात पण नारायणपूरला काम करण्यासाठी नोकर नसतात.ते फक्त अण्णांचे शिष्य असतात. त्यामध्ये गरीब भक्तांबरोबरच मोठा नोकरदार वर्ग व लाखो पगार कमावणारे लोक सुद्धा असतात. असे अनेक भाविक गुरुदेव दत्ताच्या सेवेला नारायणपूरला येतात. कोणी साफसफाई करतात तर कोणी जेवण वाढायला असतात, काही जण भांडी घासतात.तेथे अनेक भाविक समाजकार्यासाठी काम करत असतात.
अण्णांचे समाज कार्य खूप मोठे आहे. ते ब्रह्मचारी होते , त्यांनी लग्न केलेले नाही . त्यांचा संसार नाही.परंतु त्याचे समाज कार्य खूप मोठे आहे. अण्णा महाराज कित्येक मुला मुलींचे शिक्षण,लग्न मोफत करून द्यायचे. अण्णांनी अशी अनेक मोठी कार्य केली होती.तसेच निसर्गोपचार केंद्रे उभारली होती. एवढे महान कार्य अण्णा महाराजांनी केले. शंकराचार्यांनी जसे चारधाम निर्माण केले, त्याप्रमाणे अण्णा महाराजांनी चार गुरुदेव दत्ताची मंदिरे बांधली आहेत.पण कोणाकडे एकही रुपयाची वर्गणी मागितली नाही.
तेथे अनेक भक्त स्वइच्छेने वर्गणी द्यायचे. त्या चारही मंदिराची कामे अण्णांच्या शुभहस्ते झाली होती. मध्य प्रदेश,कन्याकुमारी,बंगाल, हिमाचल प्रदेश या ठिकाणी अण्णांनी हे शुभकार्य केले. तेथे मंदिरात पाच वाजल्यापासून रुद्राभिषेक चालू असतो.दुपारी प्रवचन आरती असते, साडेबारा वाजता शेवटची आरती असते. येथे प्रामुख्याने गुरुवार आणि पौर्णिमेला दत्तभक्त वारी करत असतात. तसेच गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंतीला येते फार मोठा उत्सव भरतो. दत्त जयंतीचा सोहळा येथे तीन दिवस चालतो. आणि या सोहळ्याला लाखो लोक येथे येतात आणि गुरुदेव दत्ताचे दर्शन घेतात. नारायणपूर मंदिरामध्ये जो होम अग्नी असतो, तो सतत 21 वर्षे अविरत चालू होता. अशी ही गुरुदेव दत्ताची महान शक्ती होती. येथे दत्त जन्म सोहळा सायंकाळी साजरा केला जातो.
मोठ्या प्रमाणात विजेची रोशनाई, फटाक्यांची आतेशबाजी, पादुकांचा हत्ती, घोडे, आणि उंट यांच्यासोबत पालखी सोहळा आणि मिरवणूक, शोभेचे दारू काम, किर्तन सोहळा, आणि दत्त जन्म पाळणा कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांनी नारायणपूर या दिवशी भक्तिमय आणि रम्यमय झालेले असते.जीवन म्हणजे काय आणि ते जगायचे कसे हे आपल्याला नारायणपूरला आल्यावरच समजते.
येथे या दिवशी भक्तांचा महापूर ओसंडलेला असतो. तसेच अनेक दुःखी, आजारी, घरातील मोठ्या समस्या, बाधित, आणि पीडित अशा सर्व लोकांच्या मनोकामना येथे पूर्ण होतात असा भाविकांचा विश्वास आहे.
म्हणून हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे हे चांगदेव महाराजांचे गाव असून येथे हेमाडपंथी शिवमंदिर सुद्धा आहे. याच शिवमंदिरात नारायण महाराजांनी तपचर्या केल्याचे सांगितले जाते. सध्या हे ठिकाण फार मोठे मंदिर, गुरुचरित्र पारायणाची जागा, भक्तनिवास आणि भोजनाची मोफत व्यवस्था अशा अनेक सुविधांनी परिपूर्ण झाले आहे.नारायणपूरला जाण्यासाठी सासवड रस्त्याने पुण्याच्या दिशेकडे जाऊन जाता येते तसेच सातारा हायवेने जाऊन डावीकडील बाजूस नारायणपूरला जाण्यासाठी रस्ता आहे.