रत्नागिरी या जिल्ह्याच्या शहरापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर असलेले गणपतीपुळे ( Shri kshetra Ganpatipule ) हे गाव पेशवे कालीन प्राचीन लंबोदराच्या स्वयंभू स्थानामुळे अष्टविनायका प्रमाणेच भक्तांच्या श्रद्धेचे ठिकाण आहे. अरबी समुद्राच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर असलेले हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सागराच्या मधुर लाटांच्या सानिध्यामध्ये आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये असल्यामुळे येथील गणेशाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारत देशामधून लाखोंच्या संख्येने भाविक जातात.
वर्षभरात साधारणपणे 15 ते 20 लाख भाविक व पर्यटक गणपतीपुळ्याच्या गणपतीला दर्शनासाठी जातात. भारताच्या आठही दिशांना आठ वेगवेगळ्या प्रमुख देवता असून त्यातील गणपतीपुळ्याचा गणपती ही देवता पश्चिम द्वार असलेली मुख्य देवता मानली जाते. इ.स. 1600 पूर्वीचे गणपतीचे मंदिर असलेल्या गणपतीपुळे डोंगराच्या पायथ्याशी सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगराळ भागात स्थापन झालेली ही स्वयंभू गणपतीची मूर्ती आणि चारशे वर्ष जुने मंदिर अत्यंत सुप्रसिद्ध आहे. या ठिकाणी निसर्ग प्रेमी शांततेच्या
शोधात कोकणातल्या या सुप्रसिद्ध ठिकाणी भेट द्यायला पर्यटक आणि गणपती भक्त येत असतात. गणपतीपुळे गावात ग्रामदेवता म्हणून आई चंडिका माता आहे. हे मंदिर मुख्य स्वयंभू गणपती मंदिरापासून पाचशे मीटर अंतरावर आहे. येथे प्राचीन कोकण संग्रहालय हे नवीन उभारलेले असून पूर्वी जुन्या काळात कोकणातली माणसे कशी राहायची, त्यांचे राहणीमान, खाद्यपदार्थ,सर्व काही प्राचीन कोकण संग्रहालयामध्ये पाहायला मिळते. येथे प्रवेश फी म्हणून पन्नास रुपये चार्ज आकारला जातो. जर आपणास कॅमेरा
फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग करायची असेल तर वीस रुपये अधिकचे भरावे लागतात. प्राचीन कोकण फिरताना जर आपणास काही गोष्टी समजत नसतील तर टूर गाईड येथे विनामूल्य उपलब्ध असतात. बाजूला गणपतीपुळे बीच हिरव्यागार पान झाडांनी आणि खरपूट्यानी वेढलेला आहे. या ठिकाणी गणपती मूर्ती स्वयंभू प्रगट झाली याचा दृष्टांत त्र्यंबक भट भिडे हे गणपतीपुळे गावचे प्रमुख ग्रहस्थ यांना झाला होता. मंदिराच्या बाहेर त्यांच्या पादुका आहेत. या स्वयंभू मंदिरातला प्रदक्षिणा घालायची असल्यास संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते. ही प्रदक्षिणा म्हणजे एक किलोमीटर अंतराचा प्रवास होतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच
प्रदक्षिणा सुरू होते आणि मंदिराच्या उजव्या बाजूला प्रदक्षिणा पूर्ण होते. गणपतीपुळ्याचे गणपती मंदिर हे पहाटे पाच पासून रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडे असते. पहाटे पाच ची आरती करून दर्शन रांगेस सुरुवात होते. दुपारी आणि सायंकाळी मंदिरामध्ये मोफत खिचडी प्रसाद दिला जातो. मंगळवारी आणि संकष्टी चतुर्थीला येथे फार मोठी गर्दी असते. या दिवशी येथे विशेष अभिषेक होत असतात. तसेच मनसोक्त दर्शन करायचे असल्यास शनिवार आणि रविवार सोडून इतर दिवशी येथे
आल्याने निवांत दर्शन होते. बरेच लोक अरबी समुद्रात जाऊन हात पाय धुऊन मंदिराकडे दर्शनासाठी येतात. मंदिराजवळ सुद्धा हात पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे.तसेच येथे थंड स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय आहे. मंदिरात जाण्या अगोदर बाहेरच मूषक देवता यांची मूर्ती आहे. त्यांच्या कानात आपल्या सर्व इच्छा व्यक्त करून भक्त गणपतीच्या दर्शनासाठी जातात. गणपतीपुळ्यातील येथील स्वयंभू गणपती बाप्पा हे नवसाला पावणारे आहेत. अशी भाविकांची श्रद्धा आहे. पावसाळ्यात हा समुद्र
इतका खवळतो की मंदिराच्या पायथ्याशी येऊन नमस्कार करतो. मंदिरा शेजारी असलेल्या बीचवर बऱ्याच वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुरू असतात. ज्यामध्ये बनाना राइड , जेट्स की, स्पीड बोट राईड इत्यादी.आणि हे सर्व 200 पासून सहाशे रुपये पर्यंत अनुभवायास मिळते. लहान मुलांसाठी येथे हॉर्स राईड, कॅमल राईड, बाईक राईड इत्यादी खेळण्यास मिळते. येथे अजून काही बीच आहेत तेथेही इतर अवघड ऍक्टिव्हिटी स्कुबा डायव्हिंग आणि इतर काही ऍक्टिव्हिटी अनुभवयास मिळतात. येथे एक हजार रुपयांमध्ये अनेक

प्रकारच्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करण्यास मिळतात. गणपती बाप्पांचे दर्शन झाल्यानंतर 25 रुपयांमध्ये आपण लाडू प्रसाद घेऊ शकतो. तसेच गणपती मंदिरा शेजारी छोटी-मोठी दुकाने आहेत. त्यामध्ये मोदक प्रसाद,मालवणी खाजा,लाडू आणि इतर चैनीच्या वस्तू मिळतात. उन्हाळ्याच्या दिवसात येथे लिंबू सरबत, गोळा, नारळ पाणी, उसाचा रस इत्यादी थंड पेय मिळतात. गणपती दर्शनासह भक्तांना इतर ठिकाणी फिरायचे असल्यास येथे चार-पाच दिवसांचा मुक्काम करून अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहिली जाऊ शकतात.जसे की, रत्नदुर्ग किल्ला, बीव्हा पॅलेस, महाबळेश्वर मंदिर, परशुराम मंदिर, विघ्नेश्वर मंदिर इत्यादी. तसेच ही ठिकाणे
फिरण्यासाठी येथे गणपती टूर्स अँड ट्रॅव्हल तर्फे आपण सहज बजेट ट्रीप मध्ये फिरू शकतो. मंदिरात दिला जाणारा विनामूल्य प्रसाद आणि भक्तनिवासात 80 रुपये मध्ये पोटभर जेवण आपण करू शकतो. जर आपणास हॉटेलचे जेवण जेवायचे असेल तर शंभर ते दोनशे रुपये पर्यंत व्हेज थाळी येथे मिळतात. नॉनव्हेज मध्ये जेवायचे असेल तर तीनशे ते चारशे रुपये पर्यंत येथे थाळी मिळतात. या व्यतिरिक्त ही भक्तांना आणि पर्यटकांना येथील प्रेक्षणीय स्थळांचा उपभोग घ्यायचा असेल तर रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड गाव हे कवी केशवसुत यांचे जन्म ठिकाण आहे तेथे कवी केशवसुत यांचे स्मारक उभारलेले आहे. तसेच लोकमान्य टिळक यांचे जन्म ठिकाण रत्नागिरी बस स्टॅन्ड पासून एक किलोमीटर अंतरावर आहे. त्या ठिकाणी त्यांचे जुने घर आणि स्मारक पाहायला मिळेल.
येथे सोमवार सोडून इतर वारी सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपण भेट देऊ शकता. पुणे आणि मुंबई मधून गणपतीपुळे जाण्यासाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे इतरही महत्त्वाच्या शहरांपासून गणपतीपुळे या ठिकाणी जाण्यासाठी खाजगी आणि एसटी बसेस च्या सुविधा आहेत. मुंबईवरून रोडने जाण्यासाठी मुंबई गोवा हायवे बेस्ट आहे. इकडे एसटी बसेस सुद्धा आहेत. तसेच प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट म्हणून गणेश कृपा लक्झरी बसेस आहेत . रेल्वेने कमी खर्चात प्रवास करायचा असेल तर रेल्वे प्रवास अतिउत्तम. रेल्वेने जाताना रत्नागिरीला उतरावे लागते. मुंबई ते रत्नागिरी रेल्वेने फक्त दीडशे रुपये तिकीट आहे.
रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून गणपतीपुळे 40 किलोमीटर आहे. रत्नागिरी बस स्टॉप पासून गणपतीपुळे ला एसटी बसेस आहेत. तसेच आपण रिक्षानेही गणपतीपुळेला जाऊ शकतो. मंदिरापासून 800 ते 1000 मीटर अंतरावर मोठे गणपतीपुळे फक्त निवास आहे. या ठिकाणी स्वस्त दरात राहण्याची सोय आहे. गणपतीपुळे भक्त निवासात येशील एसी,नॉन एसी या सर्व प्रकारच्या रूम उपलब्ध आहेत.एकट्यासाठी शंभर रुपयापासून ते साडेतीनशे रुपये पर्यंतच्या रूम्स येथे उपलब्ध आहेत.तसेच कुटुंबासाठी साडेतीनशे पासून साडेनऊशे रुपये पर्यंत येथे रूम्स उपलब्ध आहेत. भक्तनिवासात राहायचे असल्यास तेथे जाऊनच बुकिंग करावे लागते.
या ठिकाणी मिळणारे जेवण, नाश्ता, चहा,कॉफी इत्यादी स्वस्त दरात मिळते. चहा दहा रुपये,नाश्ता तीस रुपये, आणि जेवण 80 रुपयांमध्ये पोटभर करू शकता. गणपतीपुळे येथे महाराष्ट्र टुरिझम (MTDC ) चे रिसॉर्ट आहे , तेथेही चांगली सोय आहे . तसेच येथे ठिकठिकाणी हॉटेल, प्रायव्हेट रूम, लॉजेस उपलब्ध आहेत.
गणपतीपुळेच्या बीच वर पोहताना काळजी घेणे गरजेचे आहे. या समुद्रात (Strong rip Current ) आहे. पाण्याच्या लाटेबरोबर समुद्रात आत खेचण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे नवख्या व्यक्तीने किंवा पोहता न येणाऱ्याने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या समुद्रावर अशा अनेक घटना घडलेल्या आहेत त्यामुळे लाईफ गार्ड किंवा जास्त गर्दी असेल तेथेच पोहणे सुरक्षित असते.