पृथ्वी दुभंगून एक आठ वर्षाची मूर्ती प्रगटली त्यांना स्वामी समर्थ म्हणतात. जीवनात भेडसवणाऱ्या असंख्य समस्या निवारणासाठी ज्यांनी त्यांच्या अवतार कार्यात अनेक लीला केल्या त्या स्वामी समर्थांच्या नावाने अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर जवळ नाशिक जिल्ह्यात श्री क्षेत्र दिंडोरी ( Shri Kshetra Dindori ) येथे कार्यरत आहे.
ज्याप्रमाणे श्री स्वामी समर्थांनी गुरू प्रणित मार्ग स्थापित केला त्यावरूनच हा मार्ग आलेला आहे. या कार्यात साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांचे मार्गदर्शन लाभले आहे. भविष्यातील अध्यात्मिक मार्गाची तयारी म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील नारायणदास नावाच्या अगदी पाच वर्षाच्या मुलावर श्री स्वामी समर्थ महाराज बारकाईने लक्ष ठेवून होते. घरची श्रीमंती, व्यापार, चांगली संस्कृती अशीच सर्व काही अनुकूलता त्यांच्याकडे होती. सुशील पत्नी, मुले बाळे सर्व काही व्यवस्थित होते. सोबत महाराजांची सेवा होती. म्हणूनच व्यवहारात असून सुद्धा त्यांच्या अंतर मनातून वेगळीच वादळे थैमान घालत होती. त्यांच्या मनाला कसली तरी ओढ लागली होती. एक दिवस भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी नारायणदास यांना स्वप्नदृष्टांत दिला होता.
दृष्टांतात श्री स्वामी समर्थ महाराजांनी पुढे उभे राहून विचारले असे किती दिवस चालायचे. आमची काही आठवण आहे का? पुढच्या कामाची काही जबाबदारी लक्षात आहे का ? लगेच डोक्यात एका लख्ख प्रकाशाच्या लाखेने आंतरिक ओढीची आणि सलोख्याची साखळी जोडली गेली. आपण कोण आहोत, कोठून आलो, आपले या जगात काय काम आहे. याची स्पष्ट जाणीव नारायणदास यांना झाली. ते लगेच गुरूंच्या चरणी लीन झाले. त्यांच्या मनात आनंदाच्या उर्मी उसळू लागल्या आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले.
स्वामी महाराज म्हणाले आता तुला कार्य पुनर्स्थापित करायचे आहे. या कार्याची पुनर्रचना वेगळी असेल. आधीचे कार्य नवीन तंत्रज्ञान वापरून पुढे आणायचे आहे. परंतु नारायणदास म्हणाले माझा एक हट्ट आहे महाराज. याच क्षणी घरा दारावर तुळशीपत्र ठेवून पाणी सोडतो महाराज. मला तेजाची तपचर्या करण्याची पूर्ण इच्छा आहे. त्यानंतर तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. त्याच क्षणी त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून पाणी सोडले. महाराज म्हणाले तेजाची तपश्चर्या अगस्ती ऋषी सारख्या महामुनींनी केली आहे.
मूळ रूपाच्या तेजापासूनच तेज वाढेल असे म्हणून नारायणदासांना स्वामी महाराजांनी नरसोबाच्या वाडीला नेहून तेजाच्या तपचर्याची दीक्षा संगमावर दिली होती. नारायणदासांना अनुग्रह देण्याचा विधी करताना त्यांना एका विशिष्ट आसनामध्ये बसवण्यात आले. एका बाजूस साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ व दुसऱ्या बाजूस नारायणदास बसून त्यांना विधी पूर्वक दीक्षा दिली गेली व सांगितले आज पासून तुझे नाव गाव पुसले. आज पासून तुझे नाव नारायणदास श्री श्रीपाद श्रीवल्लभ महाराज पिठले असे राहील. साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ यांनी पिठले महाराज यांचे गुरूपद घेऊन संपूर्ण जबाबदारी घेतली. त्यावेळी स्वामींनी पिठले महाराजांचा हात धरला आणि त्यांना हिमालयात घेऊन गेले. तेथे पिठले महाराज स्वामी महाराजांना म्हणाले महाराज एक शेवटचा हट्ट पुरवावा.
आपल्या मूळ रूपाचे दर्शन द्यावे. स्वामींनी त्यांना दिलेल्या दर्शनाचे स्वामींचे ते रूप तेज निधी गुरु गीता या ग्रंथात सविस्तर वर्णले आहे. पुढे 1889 ते 1910 पर्यंत श्रींनी पिठले महाराजांकडून कलियुगात मानसरोवर पासून एका गुप्त ठिकाणी घनघोर तपश्चर्या करून घेतली. त्यानंतर श्रीपादगुरूंनी सर्व तीर्थ भ्रमणाचा आदेश पिठले महाराजांना दिला. श्री शक्ती स्वरूपाचा साक्षात्कार यासाठी तुला जगत जननी आदिशक्ती ला प्रसन्न करावे लागेल त्या जगदंबेच्या आशीर्वादानेच तु विजयी होशील असे म्हणून वैष्णव देवीचे दर्शन घेऊन महाकालीला प्रसन्न करण्यासाठी महाकाली स्तोत्र दिले. पुढे 1910 ते 1946 पर्यंत तीन तपे त्यांच्याकडून श्रीं नी श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर येथे गुप्त ठिकाणी करून घेतली. या तपस्या दरम्यान 21 मे 1922 मध्ये दिंडोरी येथे या योजनेला आकार देणाऱ्या एका महत्त्वाच्या व्यक्तीचा जन्म झाला.
ज्याच्यासाठी परमपूज्य श्री पिठले महाराजांना साक्षात श्री श्रीपाद श्रीवल्लभ दीक्षा देत होते. प्रभूंनी श्री पिठले महाराजांना सांगितले मानवतेच्या प्रचंड प्रकल्प कार्यासाठी या काळात तुझ्याकडे एक आर्त जिज्ञासू राम भक्त येईल. तो आपलाच माणूस आहे. त्याचे गुरूपद घेऊन मार्गदर्शन करायचे आहे, एवढेच आपले कार्य राहील. तो शिष्य पुढे त्यावर युक्तीने मात करून सर्वसामान्य माणसांना मार्गदर्शन करेल. मानवतेचा सर्वार्थाने उत्कर्ष करणारा एक प्रचंड प्रकल्प उभा राहील. आता त्या शिष्याकडून सर्व तयारी करून घे.
मग पिठले महाराजांनी नाशिकला पेठे हायस्कूलच्या बाजूला रविवार कारंजा समोर बेळे गल्लीत एका खोलीत श्री श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री स्वामी समर्थ यांना अभिप्रेत असलेला असा श्रींचा दरबार स्थापन केला. तो अर्त विव्हल,जिज्ञासू राम भक्त दुसरा तिसरा कोणी नसून सद्गुरु परमपूज्य मोरेदादा होते. खंडेराव आप्पाजी मोरे हे त्यांचे पूर्ण नाव होते. दिंडोरी मध्ये हे आपली शेती सांभाळत होते. पुढे 1948 मध्ये मोरेदादांची भेट पिठले महाराजांशी झाली व स्वामी इच्छेने पिठले महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला.
त्यानंतर 1948 ते 1974 पर्यंत जवळजवळ 26 वर्षे श्रींच्या प्रकल्पाबाबत पिठले महाराजांनी तेजोनिधी परम पूज्य मोरे दादांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. सद्गुरु परमपूज्य पिठले महाराज बोलत, देता, घेता, ध्यानी,मनी, स्वप्नि एकच ब्रीद वाक्य पुन्हा पुन्हा बजावत असत. समर्थांच्या इच्छेत इच्छा मिळवून राहा, समर्थांना भूषणावह होईल असे वागा. ही शिकवण देताना तेही त्याच स्वरूपात मग्न असत. इ.स.1974 साली सद्गुरु परमपूज्य पिठले महाराजांच्या महानिर्वाणानंतर मोरे दादांनी नाशिकचा दरबार दिंडोरीला स्थापन केला. या मागचे कारण मोरे दादांचे वडील श्री आप्पाजी मोरे पाटील शेतीनिष्ठ, शूर, धाडसी, बुद्धिमानी आणि परोपकारी व्यक्ती होते. दिंडोरी गावात त्यांना सन्मान व आदर होता. गोरगरिबांचे ते कनवाळू होते.
आपण दिंडोरी येथे श्री स्वामी समर्थांच्या कार्याला सुरुवात केली तर नक्कीच आपल्या मूळ प्रकल्पाला गती येईल म्हणून मोरे दादांनी दिंडोरी प्रणित आपले पहिले श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू केले. तिथे दादांनी 40 वर्षे अविश्रांत कार्य करून हजारो सेवेकऱ्यांना स्वयंपूर्ण करून सोडले.तेजनुद्धी परमपूज्य सद्गुरु श्री मोरेदादांनी 1978 पासून पुढे महाराजांच्या आशीर्वादाने या गुरु प्रणित कार्यासाठी वेगवान घोडदौड करून मानवी आवाक्याबाहेरचे कार्य उभे केले. या दरम्यान वीस मार्च 1955 रोजी पाप मोजणी एकादशीच्या दिवशी मोरे दादांच्या पोटी एक मूल जन्माला आले. स्वतः रामभक्त असल्यामुळे त्यांनी या मुलाचे नाव श्रीराम ठेवले.
पुढे 1978 पर्यंत त्यांनी निष्ठावान माणसे घडवली. व परमात्म्याचे कार्य करण्याची योजना राबवली. सेवा मार्गात विनामूल्य मार्गदर्शन व त्या संबंधी वाडमय ही माफक दरात ठेवल्यामुळे तळागाळातील लोकही सेवा मार्गाचा लाभ मिळू लागली. सर्व साहित्य व ज्ञानाच्या बाबतीत कोणतीही गोपनीयता न ठेवता पुढील पिढीसाठी ज्ञानदान करणारी पुस्तकही सहज उपलब्ध करून दिली. तथाकथित धर्म मार्तंड यांनी महिला वर्गासाठी हजारो आध्यात्मिक ग्रंथ व ज्ञानापासून वंचित ठेवले त्या महिलांना सद्गुरु परमपूज्य मोरेदादांनी प्रचार प्रसाराचे आधारस्तंभ बनवले. गुरुचरित्र सारख्या वेगतुल्य ग्रंथाचे पारायण करण्यासाठी महिलांना असलेली बंदी दादांनी दूर केली.
अशी अनेक जनहित कार्य आपल्या वडिलांना करताना श्रीराम पाहत होता. श्रीराम जसजसा मोठा होऊ लागला तस तसा तोही या सेवा मार्गात रुजू झाला.आणि हळूहळू तो श्रीराम अण्णासाहेब मोरे या नावाने स्वामी सेवेकरांचा लाडका झाला. अण्णासाहेब मोरे यांच्याकडून सुद्धा या स्वामी कार्यात हातभार लागत असताना 1988 मध्ये सद्गुरु परमपूज्य मोरेदादा स्वर्गवासी झाले. त्यांच्या महानिर्वाणानंतर अण्णासाहेब मोरे यांच्याकडे सर्व कामगिरी आली. आपण कोणी थोर आहोत याची क्वचितही जाणीव येऊ न देता अण्णासाहेब अविवरत आपल्या लाखो भक्तामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना दत्त अवतारी श्री स्वामी समर्थांच्या सानिध्यात घेऊन जात आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक लहान थोर महिला पुरुष वृद्ध सर्वांनाच या विश्वव्यापी शक्तीमध्ये सामावून घेत आहेत.
हा अवघड मार्ग सोपा केलेले गुरू माऊली श्री स्वामी समर्थ महाराजांचा देह अविष्कार असल्याचा विश्वास सेवेकरांमध्ये आढळतो. दिंडोरी मधून उगम पावलेला हा श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवामार्ग राष्ट्रनिर्मितीसाठी, राष्ट्र उभारणीसाठी, आणि सामुहिक सह भावनेसाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यात घराघरात पोहोचून एक प्रकारची सामाजिक बांधिलकीच बनला आहे. या मार्गामध्ये निरपेक्ष मदत कार्य, सहकार्य, सेवा मूल्य सामाजिक कार्य ,सहानुभूती व सहिष्णतेने केले जात असून हरवलेली माणुसकी आणि उदात्त मानसिकता यांचा हा झरा आहे.
दिंडोरी प्रणित या कार्यात सर्वांसाठी बाल संस्कार पासून ते शास्त्र युक्त प्रशिक्षणापर्यंत तसेच आधुनिक ऑरगॅनिक शेती पासून ते लोकहित विचार मंथन आणि राष्ट्रहित कार्यात अध्यात्मिक मार्गाने लाखो लोक आपापल्या क्षमतेप्रमाणे सहभाग घेतात. ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत गुरु प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात अनावश्यक कर्मकांडातून लोकांना मुक्त केले जात असून दिंडोरी सह राष्ट्रातील सर्व केंद्राच्या माध्यमामधून सेवेचे, ज्ञानाचे, अध्यात्मिक प्रगतीचे, आरोग्याचे, आपुलकी व सामाजिक बांधिलकीचे धडे दिले जातात. तसेच प्रश्न उत्तराच्या माध्यमातून अध्यात्मिक सेवा देऊन आणि श्री स्वामी समर्थ आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून लाखो लोकांच्या दुःखाचे व आरोग्याचे प्रश्न सोडवले जातात.
या संस्कार चळवळीमध्ये सामील होण्यासाठी आणि दान पुण्य करण्यासाठी लाखो श्री स्वामी समर्थ भक्त आपापल्या परीने कसोटीने प्रयत्न करतात.
श्री स्वामी समर्थ