श्री स्वामी समर्थ यांचे निष्ठावंत शिष्य श्रीकृष्ण सरस्वती महाराज ( Shri krishna Saraswati ) होते.कोल्हापूर मध्ये शिरोळ तालुक्यात नांदणी गावात नरसिंह वाडी जवळ आप्पा भटजी आणि सौ अन्नपूर्णाबाई हे सतशील कुटुंब राहत होते.दर शनिवारी आणि दर पौर्णिमेला नरसिंहवाडी ला जाण्याचा त्यांचा नित्यनियम होता. लग्नाला अनेक वर्ष झालेली असताना सुद्धा त्यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे अन्नपूर्णाबाई नरसिंह वाडीला श्री नरसिंह सरस्वती महाराजां समोर पुत्रप्राप्तीसाठी नेहमी विनंती करायच्या.
तसेच त्यांचे पती आप्पा भटजी यांना सुद्धा देवाकडे पुत्र मागा अशी विनंती करायच्या. शेवटी एके दिवशी दत्त पादुकेवर डोके ठेवून आपल्या पत्नीचा हट्ट त्यांनी सांगितला. त्याच रात्री आप्पांना श्री नरसिंह सरस्वती यांचा दृष्टांत झाला आणि नरसिंह सरस्वती म्हणाले की अरे काळजी काय करतोस मीच तुझ्याकडे पुत्र रूपाने येईल. आनंदाने त्यांनी ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली आणि दोघेही फार आनंदी झाले. पुढे थोड्याच दिवसात अन्नपूर्णाबाईंना गर्भधारणेची चिन्हे दिसू लागली.
पुढे मग वैद्य पंचमी म्हणजे 7 फेब्रुवारी 1836 रोजी त्यांच्या पोटी साक्षात दत्त अवतारी सुपुत्र जन्माला आला. मग मोठ्या थाटाने त्याचे बारशै करून त्याचे नाव श्रीकृष्ण ठेवण्यात आले. ज्योतिषांनी पत्रिका मांडून सांगितले की या बाळाची थोर अवधूत योगी होण्याची लक्षणे आहेत. हा ब्रह्मचारी राहून लोक उद्धाराचे काम करेल. हे भविष्य ऐकून आप्पा महाराजांना त्यांना झालेल्या दृष्टांताची आठवण झाली. गंमत म्हणजे हा अद्भुत बालक जन्मापासून रडलाच नाही. तसेच मातेचे दूधही पीत नसे आणि सदा आनंदात राहत असे.
थोडा मोठा झाल्यानंतर एक घास मुखी घालत नसे. बळच दिले तर थुंकून टाकत असे. पण तरीही तो तेजस्वी आणि आनंदी दिसत असे. बालपणी बरीच वर्ष हे बाळ बोलत नसे.पाच वर्षाचा झाल्यानंतर थोडेफार बोलू लागले परंतु त्याचे बोलणे इतरांना समजत नसायचे. एका उंच दगडाचे सिंहासन बनवून त्यावर बसून आपल्या मित्रांना बोलून घ्यायचा आणि मी तुमची तळमळ नष्ट करीन असे म्हणायचा. त्याचे मित्र आणि गावातील लोक त्याला वेडा म्हणून हसण्यावारी न्यायचे. परंतु त्याचे माता-पिता मात्र दत्तप्रभूंचा दृष्टांत ध्यानात ठेवून काहीच बोलत नसायचे. पुढे त्याची मुंज झाल्यानंतर मनसुळीला कुलस्वामी खंडेरायाला भेटायला जातो असा हट्ट श्रीकृष्ण करू लागला. मन घट्ट करून माता पित्याने त्याला जाण्याची परवानगी दिली आणि त्याच्यासोबत शिदोरी बांधून दिली.
चालत चालत कृष्णा बेडग गावाजवळील एका विहिरीजवळ आला आणि तिथे पाण्यात खेळत बसला. तो खेळत असताना एक कुत्रा त्याची शिदोरी घेऊन पळाला. त्याचवेळी एक स्त्री पाणी भरण्यासाठी तिथे आली होती. तिला पाहून पाण्यातून बाहेर येऊन तिचा पदर धरून मला भूक लागली मला खायला दे असे तो म्हणू लागला. त्या स्त्री ने त्याला घरी नेऊन दहीभात खाऊ घातला. घरी एकही घास न खाणारा कृष्णा तिच्या हातचे मात्र खाऊ लागला होता. जेवण झाल्यावर झाले आता काम झाले असे म्हणून आता पुढे गेले पाहिजे असे तो म्हणू लागला. कृष्णा ने तिला पुत्रवती भव! असा आशीर्वाद दिला होता. आणि तिने दिलेली थोडीशी शिदोरी घेऊन कृष्णा पुढे निघाला.
त्या स्त्रीला या दैवी बालकाचा जणू छंदच लागला होता. पुढे खरोखरच त्या निपुत्रिक स्त्रीला पुत्र प्राप्ती झाली होती. पुढे मंगसुळीला खंडेरायाच्या मंदिरी प्रत्यक्ष दर्शनासाठी देवाकडे हट्ट धरून बसला होता. शेवटी शिवशंकरांनी नंदीवर बसून पार्वती मातेसह त्याला दर्शन दिले आणि म्हणाले अरे तू माझाच अंश आहेस. आता तू अक्कलकोटी जाऊन नृसिंहभान यांना जाऊन भेट. थोड्या दिवसातच कृष्णा नांदणी गावात परत आला. पुढे चार वर्षांनी श्रीकृष्ण आपल्या मातापित्यांना सांगू लागला की,आता तुमची आमची नाती सुटली.
मला अक्कलकोटला नरसिंहभान स्वामींच्या दर्शनासाठी जायचे आहे. असा हट्ट करू लागला. आई-वडिलांनी दत्त महाराजांचा दृष्टांत आठवून मोठ्या कष्टी मनाने त्याला परवानगी दिली. परवानगी मिळताच श्रीकृष्ण अक्कलकोट ची वाट चालू लागला. इकडे स्वामी समर्थ महाराज सकाळपासूनच माझा कृष्ण येणार माझा कृष्ण येणार असे बोलत वाट पाहत बसले होते. कृष्णा अक्कलकोटला पोहोचताच. स्वामी समर्थ महाराजांनी त्याला कवटाळले, त्याचे मुके घेतले. आणि त्याला हाताला धरून लांब अरण्यात एकांतात घेऊन गेले. असे सात दिवस झाल्यानंतर श्रीकृष्णाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी त्याला सावध केले आणि मठात घेऊन आले.
श्रीकृष्णाने स्वामींचे अपार स्तवन मांडले. त्यावर स्वामी त्याला म्हणाले की तू माझाच अंश आहेस. आता खूप कार्य करायचे आहे. तेव्हापासून स्वामी महाराजांनी त्याचे नाव श्रीकृष्ण सरस्वती असे ठेवले. आता तुझा सांगाती गाणगापूर वरून येथे येईपर्यंत तू येथेच रहा. मग त्याच्याबरोबर तू कोल्हापूरला जा असे म्हणून स्वामींनी स्वतःच्या हाताने त्याला चुरमा लाडू आणि गोडधोड भरवले. पुढे असे तीन महिने झाल्यानंतर स्वामी म्हणू लागले की अजून मित्र का येत नाही. इतक्यात गाणगापूर वरून एक कुष्टी ब्राह्मण येऊन स्वामींना आपले कुष्ठरोग दूर करण्याबद्दल विनंती करू लागला. तेव्हा स्वामी त्याला म्हणाले तू आता या श्रीकृष्ण सरस्वती महाराजांबरोबर कोल्हापूरला जाऊन त्यांची सेवा कर. म्हणजे तुझा कुष्ठरोग नाहीसा होईल.
इतक्या लांब चालत आल्यानंतर परत आता कोल्हापूरला जायला तो ब्राह्मण काय तयार होईना. परंतु स्वामींनी त्याला नंतर आदेशच दिला. तेव्हा स्वामी समर्थ महाराजांची क्षमा मागून तो ब्राह्मण श्रीकृष्ण सरस्वती यांच्याबरोबर कोल्हापूरला जायला निघाला. वाटेत एका गावात एका अडलेल्या बाळांतीणीची एका आशीर्वादाने श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी सुटका केली. ते पाहून ब्राह्मणाचा महाराजा वरती विश्वास बसला. आणि हे आपल्याला बरे करतील अशी त्याची खात्री पटली.
पुढे कोल्हापूरला येऊन तेथील राम मंदिरात महाराज मुक्कामी थांबले. त्याचवेळी तेथे एक स्त्री दर्शनासाठी आली होती. तिला बारा वर्षे संबंध बाधा होती. महाराजांच्या दर्शनाने तिच्या बाधेतून तिची मुक्तता झाली. या घटनेनंतर अनेक लोक महाराजांच्या दर्शनासाठी येऊ लागले. त्यातील फडवणीस नावाचा एक ग्रहस्थ महाराजांना आपल्या घरी येण्यासाठी विनंती करू लागला. एके दिवशी महाराजांनी त्या कुष्ठरोगी ब्राह्मणाला पंचगंगेवर जाऊन स्नान करण्यास सांगितले. त्याने तसे करतात त्याचे कुष्ठ नाहीसे झाले, तो एकदम स्वस्थ झाला होता. मग तो अगदी आनंदाने महाराजांकडे आला. महाराजांनी त्याला घरी जाण्यास सांगितले आणि महाराज फडणवीस यांच्याकडे आले.काही दिवस तिथे राहून महाराज म्हैसाळकर यांच्याकडे गेले.
एके दिवशी म्हैसाळकरांना घेऊन महाराज कुंभार गल्लीतील ताराबाई शिर्के या गणिकेच्या घरी गेले आणि जेवायला वाढ असे म्हणू लागले. आपल्या हातचे शिजवलेले अन्न महाराजांना कसे द्यायचे या विचाराने ताराबाई म्हणाली की मी तुम्हाला कोरडा शिधा देते. असे म्हणून ती सीधा आणण्यासाठी आत मध्ये गेली तेव्हा महाराज निघून गेलेले होते. ताराबाईचा दर पौर्णिमेला वाडीला जाण्याचा नियम होता. तसेच तिला पोटसुळाची असह्य व्याधी होती. त्यानंतरच्या पौर्णिमेला तिच्या स्वप्नात दत्तप्रभू येऊन सांगू लागले की, मी तुझ्याकडे भिक्षेसाठी आलो होतो परंतु तू मला ओळखले नाही. आता म्हैसाळला जा म्हणजे तुझी व्याधी बरी होईल. आता वाडी ला येण्याची जरुरत नाही. ताराबाई लगेच म्हैसाळला आली आणि महाराजांची क्षमा मागू लागली.
तेव्हा महाराज आई मी तुझ्याकडे येतो असे म्हणून तिच्याकडे राहिला आले. ताराबाईच्या आईला म्हणजे भिमाबाईला हे मुळीच आवडले नाही. तसेच ती नेहमी महाराजांची निंदा करीत असायची.एकदा सर्वजण सारीपाट खेळत असताना महाराज तिथे येऊन तिला काहीतरी बोलले. याचा राग येऊन भीमा बाईंनी त्यांना आपल्या खोलीत नेऊन झोपवले आणि बाहेरून घराला कुलूप लावून घेतले. खेळ झाल्यानंतर पाहिले तर कुलूप घराला तसेच आणि महाराज मागच्या औदुंबराच्या एका झाडावर बसलेले दिसतात.
ते पाहून भिमाबाई सुद्धा महाराजांची भक्त झाली. ताराबाईंचा मुलगा दत्तूबा ही महाराजांच्या सेवेत होता. असे अनेक शिष्य सद्गुरूंचे त्यावेळी झाले होते. तसेच या सर्वांना त्यांच्या उपाश्य देवतेने साक्षात्कार देऊन श्री कृष्ण सरस्वती महाराजांची सेवा करण्यास सांगितले होते. एकदा असेच एका भक्ताच्या मनात आले की हे सर्वजण एका गणिकेच्या घरी राहतात.आपण यांचे मन वळवू आणि यांना दुसरीकडे कुठेतरी एका चांगल्या जागेवर घेऊन जाऊ. असे म्हणून हरीपंत आणि वेणू माधव यांनी अनुष्ठान मांडले. 14 दिवस झाल्यानंतर महाराज वेणू माधव यांना म्हणाले की ऐक माधवा, पंढरीच्या पांडुरंगावर एक आना कर्ज झाले आहे अर्धे त्यातून फिटून गेले अर्धे अजून बाकी आहे. त्यामुळे हे अनुष्ठान, उपवास कधीही त्याला कर्जमुक्त करू शकणार नाही.
तुझे हे सर्व कष्ट व्यर्थ आहेत. माधवला हे काहीच कळत नव्हते. परंतु त्याच रात्री रामदास आणि हरिपंत या दोघांनाही एकच स्वप्न पडले होते. मारुतीरायांना एका मोठ्या खांबास बांधले आणि ताराबाई जवळ बसून म्हणते की माझे तर पुण्य अपार आहे मी तीन जन्म कष्ट करून या हनुमंताला माझ्याजवळ बांधला आहे. एरवी हा कसा माझ्याजवळ राहिला असता. हे स्वप्न ऐकून वेणी माधवांना महाराजांच्या बोलण्याचा अर्थ कळाला आणि त्याने अनुष्ठानाचा हट्ट सोडून दिला. नंतर ताराबाईंच्या काणी ही स्वप्नाची बातमी पडली आणि तिला अहंकार झाला की मीच गुरूंची आवडती आहे आणि माझीच भक्ती श्रेष्ठ आहे.
ताराबाईंचा अहंकार महाराजांना कळून आला आणि त्यावेळी त्यांनी एक लीला केली. सगळेजण एकदा वनभोजनाला गेले असताना ताराबाईच्या हातात चुरमुरे देत महाराज म्हणाले आई हे खात बसा आणि स्वामी तिथून आड मार्गाने निघून लीला करत करत स्वामी राजापूरला आले. इकडे कोल्हापूरला ताराबाईंनी अन्न पाणी सोडले होते आणि महाराजांच्या आसनावर डोके ठेवून रडत रडत त्यांची वाट पाहत बसली होती. तेव्हा स्वामींचा तिला दृष्टांत झाला की आई मी बरोबर 21 दिवसांनी तुला येथे बसलेला दिसेल. अन्नपाणी सेवन कर. तुझा अहंकार घालवण्यासाठी मी हे सर्व केले आहे. पुढे बरोबर 21 दिवसांनी स्वामी कोल्हापूरला आले. कोल्हापूरला आल्यानंतर स्वामींनी अनेक चमत्कार केले. तसेच भक्तांचे रोग निवारण करून महामारीला आळा घातला.
कित्येक भक्तांना जीवावरच्या संकटातून वाचवले. भक्तांना योग्य मार्गावर आणले. हिमालयातून योगी तपस्वी स्वामींच्या दर्शनासाठी येत असायचे. श्री स्वामी समर्थांच्या भक्तांचे राहिलेले नवस फेडण्यासाठी त्यांना कोल्हापूरला महाराजांकडे येण्याचा दृष्टांत होत असायचा. असेच एका स्वामी भक्ताला श्री स्वामी समर्थांच्या रूपात त्यांनी दर्शन दिले होते. आनंदी होऊन तो म्हणाला होता की अक्कलकोटी तुमचे रुद्ररूप होते येथे तुमचे शांत रूप आहे. असे म्हणतात महाराजांनी पाठ फिरवली आणि त्याला आपला हनुमंत अवतार दाखवला. अशा अपार लीला करत महाराज सर्वसामान्यांच्या जीवनाचे कल्याण करत होते आणि अनेक भक्तांना श्री स्वामी समर्थ रूपात दृष्टांत देत होते.
पुढे श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी 20 ऑगस्ट 1900 रोजी पहाटेच्या वेळी देह विसर्जन केला आणि वैराग्यठीत त्यांना समाधी देण्यात आली. पुढे त्यांच्या शिष्यांनी गंगावेस येथे दुसरी समाधी तयार केली. या नवीन समाधीला निजबोध मठी म्हणून ओळखले जाते. हे नवीन ठिकाण वैराग्यमठिपासून फार जवळ आहे. महाराजांचे शिष्य व्यास यांनी या नवीन मठी साठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे त्या मठीला व्यासमठी असेही म्हटले जाते. महाराजांचे संपूर्ण चरित्र चे चरित्रकार मुजुमदार यांनी लिहिलेले असून त्याला “श्रीकृष्ण विजय “असे नाव देण्यात आलेले आहे.
तसेच महाराजांची शिष्य परंपरा खालील प्रमाणे सांगण्यात येते. कृष्णा लाड, वासुदेव दळवी,रामभाऊ फारिक, म्हादबा, वेणीमाधव, व्यास, बाळकृष्ण राशिवडेकर, महादेव भट, नामदेव महाराज, अनंत आळतेकर हे महाराजांचे पूर्वीचे शिष्य होते. हल्लीच्या काळात माधवराव टिकेकर, देवनार, यांनी मुंबईमध्ये महाराजांच्या आज्ञेने अनेकांना या संप्रदायाची दीक्षा दिली. पूज्य नामदेव महाराजांचे शिष्य स्वर्गीय श्री नानासाहेब गद्रे (पुणे), श्री नाना परांजपे (लोणावळा), श्री ज्ञानेश्वर काटकर (प्रज्ञापुरी कोल्हापूर) यांनीही स्वामिभक्तीच्या प्रसाराचे कार्य केले.तसेच कोल्हापूर रायगड, कर्जत अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाराजांचे मठ बांधण्यात आलेले आहेत.
👌👌