भक्तीचे शक्तीपीठ श्री क्षेत्र नरसिंह वाडी ( Shree Kshetra Nrusinhwadi ) तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर हे तीर्थक्षेत्र मिरजेपासून जवळच असून दत्त भक्तांची जणू पंढरीच आणि दत्त महाराजांचे प्रमुख स्थान म्हणून ओळखले जाणारे व भक्तांसाठी फार प्रिय आणि श्रद्धेचे स्थान मानले जाते.या तीर्थक्षेत्राला अनेक जण नरसोबाची वाडी, नृसिंहवाडी किंवा नरसिंहवाडी असेही म्हणतात.
तसेच या तीर्थक्षेत्राला दत्तप्रभूंची राजधानी म्हणतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येने दत्तभक्त येथे दत्त महाराजांच्या दर्शनासाठी जातात. दत्त महाराजांच्या परम वास्तव्यामुळे येथील भूमी अतिशय पवित्र,पावन, तेजमय आणि ऊर्जावान झालेली आहे. कृष्णा आणि पंचगंगा संगमावर ही पवित्र भूमी वसलेली आहे.नृसिंह सरस्वती महाराजांनी तपश्चर्या साठी नृसिंहवाडीच्या कृष्णा, वेण्णा, शिवा, भद्रा, भोगावती कुंभी आणि सरस्वती या सप्त नद्यांच्या संगमावर तब्बल बारा वर्षे वास्तव्य केले होते. त्यांनी त्यांच्या तपश्चर्याने येथील भूमी पावन
करून घेतली होती .दत्त महाराजांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ आणि दुसरा अवतार म्हणजे नृसिंह सरस्वती महाराज होय. अशा या परम पूण्य भूमीमध्ये दत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर वाडीमध्ये वास्तव्य केलेल्या अनेक थोर संत पुरुषांची समाधी स्थाने सुद्धा आपणास दिसतात. नृसिंह सरस्वती महाराज नरसिंह वाडीला ज्यावेळेस आले तो काळ होता 1456 मधला. पण त्यावेळेस महाराज वाडीला येणार आहे म्हणून थोर योगीराज श्री रामचंद्र योगी महाराज स्वामीराज 100 वर्षे अगोदर म्हणजे इ.स. 1356 मध्ये येऊन राहिले होते. आजही त्यांची जिवंत समाधी वाडीमध्ये आहे. आजही भक्त आपली मागणी,आपले गाऱ्हाणे आपली
इच्छा त्यांच्या मार्फत नरसिंह महाराजांकडे सादर करत असतात आणि त्या प्रार्थनेनुसार अनेक भाविकांना त्या आशा आकांक्षा पूर्ण झाल्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे. रामचंद्र योगी महाराजांचे हे जे जिवंत समाधीचे स्थान आहे ते आपण घाटाच्या पायऱ्या उतरून जाताना एका भल्या मोठ्या पिंपळाच्या वृक्षाखाली आहे. थोडे पुढे गेल्यावर मारुतीचे एक छोटे मंदिर आहे. म्हणून अनेक भक्त रामचंद्र स्वामी महाराजांच्या समाधी स्थळी दर्शन घेऊन नंतर दत्त महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी खाली पायऱ्या उतरून संगमावर जातात. आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी काही भक्त या समाधीला प्रदक्षिणा घालताना दिसतात.
मंदिराच्या जवळपास अनेक साधू संतांच्या समाध्या आहेत त्यात नारायण स्वामींची पण समाधी आहे. नरसिंह सरस्वती महाराजांनी नारायण स्वामी महाराजांना सप्तनदी संगमात जाऊन संन्यास दीक्षा दिली होती. कोल्हापूर मधील माता अंबाबाईचे सुद्धा त्यांच्यावर विशेष प्रेम होते. म्हणूनच कोल्हापूर मधील अंबाबाईच्या मंदिरात नारायण स्वामींचा मठ आहे. या ठिकाणी नारायण स्वामींची उत्सव मूर्ती सुद्धा आहे. त्यानंतर नारायण स्वामी जवळ कृष्णानंद स्वामी महाराजांचे स्थान आहे. कृष्णानंद स्वामी हे नारायण स्वामींचे शिष्य
होते तसेच ते संस्कृत मधील मोठे पंडितही होते. त्यांनी अनेक संस्कृत ग्रंथ लिहिले. तसेच गोपाळ स्वामी यांची सुद्धा जिवंत समाधी वाडीत आहे. हे थोर योगी समजले जातात. कारण त्यांच्या समाधीनंतर 100 वर्षांनी त्यांच्या गळ्याला त्यांच्यावर असलेल्या अस्व वृक्षाच्या मुळीने विळखा घातला होता. त्याचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांनी पुजाऱ्यांना स्वप्नात येऊन तो विळखा काढून टाकण्यास
सांगितले होते. पुजाऱ्यांनी ज्यावेळेस हा विळखा काढला त्यावेळेस समाधीची जी स्थिती होती ती शंभर वर्षांपूर्वी जशी होती तशीच होती असे निदर्शनास आले होते. समाधीच्या वेळी ठेवलेली आरती आणि फळे आहे त्या स्थितीत होती . महाराजांच्या आज्ञेनुसार नंतर समाधीचा दरवाजा बंद करण्यात आला . त्याचप्रमाणे तेथे मौनी स्वामींचे स्थान आहे. हे मौनी स्वामी सदा सर्वकाळ आत्मचिंतन मध्ये मग्न असायचे. ते अखंड मौन पाळून राहायचे. त्यांना एकदा यज्ञाच्या वेळेस तूप मिळाले नाही म्हणून चिंतामग्न असलेल्या पुजाऱ्यांना
त्यांनी कृष्णा नदीतून घागरी भरून आणण्यास सांगितले. विशेष म्हणजे पुजाऱ्यांनी भरून आणलेल्या पाण्याच्या घागरी अखंड तुपाने भरून निघाल्या. एवढे त्यांचे तप सामर्थ्य होते. तेथेच बाजूला ब्रह्मानंद स्वामींचे मंदिर आहे. तेही फार मोठे योगी होते. त्यानंतरचे स्थान म्हणजे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचे स्थान आहे. यांना दत्त सांप्रदायामध्ये साक्षात दत्त अवतार समजले जाते. टेंबे स्वामी महाराजांनी दत्त संप्रदायाची उपासना करण्यासाठी अनेक ग्रंथ, मंत्र स्तोत्र लिहिले आहेत . टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र सर्वांना माहीत आहे . तसेच गुरुचरित्र ग्रंथाचे फळ मिळवून देणारा वाचण्यासाठी सहज सोपा आणि अलौकिक असा “सप्तशती गुरुचरित्र” ग्रंथ हा सुद्धा टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला आहे.
ज्याचे पारायण घराघरात होताना दिसते.अनेक भाविक मंडळी टेंबे स्वामींच्या समाधी सानिध्यात गुरुचरित्राचे पारायण करतात आणि या पारायणाची फलश्रुती तात्काळ मिळते. याच मंदिरांमध्ये आतल्या भिंतीवर स्वामी महाराजांचे असलेले संपूर्ण जीवन चरित्र चित्रांच्या मार्फत रेखाटलेले आहे. अशा या पवित्र मनोहर स्थानामध्ये दत्त महाराजांच्या पादुकांचे म्हणजे प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती महाराजांचे स्थान आहे. येथे मनोभावे दर्शन घेऊन भक्त मंडळी जेथे पादुका आहेत तेथे प्रदक्षिणेची सेवा करतात.दर्शन घेऊन पुढे जात असताना आपण दक्षिण द्वारा जवळ येतो. या ठिकाणच्या छोट्या खिडकीतून पादुकांचे सुंदर मनोहर दर्शन सुद्धा जवळून करता येते.
प्रदक्षिणा करत असताना मागच्या बाजूस आल्यास त्या ठिकाणी जान्हवी आणि अन्नपूर्णा मातेची स्थापना केलेली आहे. त्याच्याच अगदी मागच्या बाजूला ओवरीमध्ये तीर्थ मिळण्याची जागा आहे. अशा रीतीने प्रत्येक जण नृसिंहवाडी मध्ये जाऊन मनोभावे दत्त महाराजांसोबत सर्व समाधींचे दर्शन घेत असतात. मंदिरामध्ये दुपारी तीन ते चार या वेळेत महाराजांना अत्यंत प्रिय असलेल्या पवमान सुक्ताचा पाठ केला जातो. पवमान सूक्त मध्ये महाविष्णूची स्तुती केलेली आहे. या वेळेत काहीजण महाराजांचे नामस्मरण करत 108, 21,11 अशा प्रदक्षिणा सुद्धा करतात. या प्रदक्षनेने अनेकांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत अशी मान्यता सुद्धा आहे.
संध्याकाळी साडेसात वाजता महाराजांची धुपारती केली जाते. त्यावेळी आवर्जून दर्शन घेण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे नरसिंहवाडी चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रोज रात्री निघणारी नरसिंह महाराजांची पालखी. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर द्वारांमध्ये ही पालखी ठेवून तेथे महाराजांची भक्तीरसामध्ये परिपूर्ण असणारी पदे म्हटली जातात. त्यावेळी इतर भक्तमंडळी सुद्धा या पालखीमध्ये सेवा करताना दिसतात.वाडीमध्ये येणारे अनेक भक्त या पालखी सोहळ्याचा आनंद अनुभवतात. किंबहुना काही भक्त यासाठी वाडीमध्ये मुक्काम करतात. शनिवारच्या दिवशी पालखी सोहळ्याला तर आवर्जून लोक लांबून लांबून येऊन शनिवारी मुक्कामी वाडीमध्ये येतात. येथे गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचे वाचन सामूहिक रित्या केले जाते ,वर्षातून अनेक वेळा त्याचे आयोजन होते. अशा या सामूहिक वाचन दरम्यान अनेक नियोजक भाविक भक्तांना मोफत चहा, नाश्ता आणि जेवण देतात. तसेच वाचण्यासाठी ग्रंथ पुरवतात.
मिरज पासून 16 कि.मी.,सांगली पासून सुमारे 30 किलोमीटर, कोल्हापूर पासून 52 किलोमीटर असलेल्या या तीर्थस्थळी जाण्यासाठी हैदराबाद ते कोल्हापूर तसेच चेन्नईपासून पुण्यापर्यंत, बंगळूर वरून कोल्हापूर पर्यंत, दिल्ली वरून कोल्हापूर पर्यंत, मुंबई आणि पुण्यावरून कोल्हापूर आणि सांगली पर्यंत ट्रेन उपलब्ध असतात. तसेच कोल्हापूर आणि सांगली पासून नरसोबाच्या वाडी पर्यंत ऑटो रिक्षा, सिटी बसेस,एसटी बसेस आणि खाजगी वाहने उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे इचलकरंजी, कुरुंदवाड,जयसिंगपूर, शिरोळ, निपाणी, बोरगाव, बेळगाव,चिकोडी इत्यादी प्रमुख शहरांमधून नरसोबाच्या वाडीला जाता येते.