दत्तात्रेयांचा अवतार म्हणून मानले जाणारे शिर्डीचे साईबाबा ( Shirdiche Saibaba ) परब्रम्ह, थोर अध्यात्मिक गुरु, सर्व धर्मीय थोर संत तसेच फकीर म्हणून ओळखले जातात. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील सर्व लोकांमध्ये ते हिंदू मुस्लिम तसेच सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान मानले जातात. वैश्विक स्तरावर त्यांना मान्यता आहे.यांच्या जन्मा बद्दल ठोस असा काहीही पुरावा आढळत नसून साईबाबांचा जन्म ब्रिटिश भारताच्या निजाम राज्यात असलेल्या पाथरी या गावात झाला होता असा दावा केला जातो.
तसेच त्यांना कोणी हिंदू मानते तर कोणी मुस्लिम. परंतु ते सर्व धर्मांचा आदर करणारे चमत्कारी योगी,अध्यात्मिक गुरु होते. ते जीवनभर “सबका मालिक एक हैl” असा जप करत होते. त्याबरोबरच क्षमा,शांती, दान, पुण्य, दुसऱ्यांची मदत करणे, तसेच श्रद्धा आणि सबुरीचा संदेश संपूर्ण मानव जातीला देत होते. त्यांच्या जन्म आणि आई वडिल यांच्या विषयी अद्याप तरी समाधानकारक माहिती मिळालेली नसून ते जेव्हा शिर्डी गावामध्ये दिसले तेव्हा ते सोळा वर्षांचे होते. प्रथम जेव्हा साईबाबा शिर्डीत आले होते तेव्हापासून तीन वर्ष सलग ते शिर्डी मध्ये राहिले व त्यानंतर परत एक वर्ष गायब झाले. त्यानंतर परत 1858 मध्ये ते शिर्डी मध्ये आले.
त्यावरून त्यांचे जन्म वर्ष हे 1838 सांगितले जाते. शिर्डी मध्ये ते एका लिंबाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसायचे. त्यांना बाल वयात ऊन, वारा, थंडीमध्ये कशाचाही सहारा न घेता कडक तपचर्या करताना पाहून शिर्डीकर आश्चर्यचकित व्हायचे. साईबाबांची तपचर्या पाहून शिर्डी मधील म्हाळसापती, काशीराम शिंपी, आप्पा जोगले आणि काही धार्मिक लोक त्यांना भेटण्यास येऊ लागले. त्यांच्याकडून काही मिळालेल्या माहितीवरून साईबाबा काही संत आणि आध्यात्मिक गुरूंना भेटण्यासाठी अधून मधून आपल्या जागेवरून गायब व्हायचे. त्यांच्या नावाबद्दल कोणी जाणून घेत असताना ते म्हणायचे की “ हम तो साई है, गुसाई है “ तेव्हापासून त्यांना साई नावाने लोक ओळखू लागले.साई या शब्दाचा अर्थ मालक किंवा सर्व शक्तीशाली भगवान असा होतो.
सुरुवातीपासूनच ते कपड्याची टोपी, लांब कफनी वस्त्र, पांढऱ्या कापडाची झोळी असा सुफी पोशाख परिधान करायचे. त्यांच्या पोशाखा वरून लोकांमध्ये नेहमीच बाबा हिंदू की मुस्लिम असा संभ्रम पहायला मिळायचा. जवळपास चार ते पाच वर्षे बाबांनी लिंबाच्या झाडाखाली बसून ध्यान केले. त्यानंतर त्यांनी शिर्डीच्या आसपास असलेल्या जंगलामध्ये भ्रमण करत तपचर्या केली. त्यानंतर त्यांना एका जुन्या मज्जित मध्ये राहण्यासाठी भक्तांनी भाग पाडले. तेथे ते एकांत जीवन जगत पाच घरे भिक्षा मागून जेवण करत होते.
मज्जिद मध्ये त्यांनी पेटवलेल्या धुपेने आजारी लोकांवर ते इलाज करत होते. ते नेहमी हिंदूंसाठी रामायण आणि भगवद्गीता तसेच मुस्लिमांसाठी कुराण अध्ययन करण्याच्या सूचना करत असायचे. तसेच बाबा जवळच असलेल्या लेंडी नावाच्या बगीच्याची देखभाल करत असत. पुढे शिर्डीच्या साईबाबांची ख्याती लवकर दूरवर पसरली होती. तसेच शिर्डीतील खंडोबा भक्त पुजारी म्हाळसापती तसेच मेहेर बाबा,उपासणी बाबा, बिडकर महाराज, गगनगिरी महाराज, जानकीदास महाराज, सती गोदावरी माता असे अनेक संत महात्मे साईबाबांचा आदर आणि सन्मान करू लागले होते. सन 1910 मध्ये शिर्डीच्या साईबाबांची ख्याती मुंबई पर्यंत पोहोचली.
चमत्कार करणारे आणि पिडितांच्या दुःखांचे निरसन करणारे संत म्हणून तसेच अवतारी पुरुष म्हणून मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागातून लोक साईबाबांच्या दर्शनासाठी येऊ लागले. त्यानंतर त्यांचे पहिले मंदिर मुंबई जवळ भिवपुरी कर्जत येथे तयार करण्यात आले. धर्म आणि जातीच्या आधारावर वागणाऱ्या लोकांची नेहमीच त्यांनी अवहेलना केली. त्यांच्या शिकवणी नेहमी हिंदू आणि मुस्लिम धर्माच्या मिश्रण स्वरूपाच्या होत्या. ते शिर्डी मध्ये ज्या मशिदी मध्ये राहात होते तिला त्यांनी द्वारकामाई असे नाव दिले होते.
हिंदू आणि मुस्लिम रितीरिवाजांचे त्यांना सखोल ज्ञान आणि मोठा अभ्यास होता. भक्तियोग, कर्मयोग, आणि ज्ञानयोग या त्यांच्या शिकवणीमुळे त्यांच्याकडे लोक प्रभावित होत होते. साईबाबा जीवनभर हिंदू आणि मुस्लिम धर्मग्रंथाच्या व्याख्या मांडत होते. अद्वैत वेदांत चा अर्थ ते हिंदूंना समजावत असत. तसेच दान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत होते. मुस्लिमांच्या नियमित अनुष्ठान मध्ये ते कधीही सामील झाले नाही परंतु मुस्लिम भक्तांना त्यांच्या सणामध्ये कुराण पठण करण्याचा सल्ला ते नेहमी देत असत.
साईबाबांनी आपल्या अवतार कार्यामध्ये अनेक चमत्कार करून भक्तांच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्यातील ईश्वर अंश लोकांना समजत असे. एकदा शिर्डी मधील लक्ष्मी नावाची महिला पुत्रप्राप्तीसाठी सतत चिंतेत असताना एक दिवस ती साई बाबांकडे आपली चिंता घेऊन गेली. साईबाबांनी तिला एक चमचा विभूती दिली व सांगितले की अर्धा चमचा तू आणि अर्धा चमचा तुझ्या पतीला पाण्यातून दे. लक्ष्मीने असे केल्याने काही दिवसातच लक्ष्मीबाई गर्भवती राहिल्या होत्या.
तसेच लक्ष्मीबाई च्या विरोधकाने लक्ष्मीबाईचा गर्भ नाश होण्यासाठी काही गोळ्या लक्ष्मीबाईला फसवून दिल्या होत्या. त्यामुळे लक्ष्मीबाई च्या गर्भातून रक्तस्राव होत होता. तरीही साईबाबांनी दिलेल्या विभूतीमुळे लक्ष्मीबाई चा गर्भपात झाला नाही. तसेच थोड्या कालावधीतच त्यांना पुत्र प्राप्ती झाली होती. असे अनेक चमत्कार साईबाबांनी त्यांच्या जीवन कार्यात केले होते. शेवटी साईबाबांनी आपल्या जवळच्या भक्तांना सन 1918 मध्ये आपण समाधीस्थ होण्याचे संकेत दिले. ते सप्टेंबर 1918 मध्ये थंडी तापामुळे जास्त प्रमाणात आजारी पडले. त्यावेळी त्यांनी अन्न पाणी त्याग केले होते. त्यामुळे त्यांची तब्येत जास्त खालावत चालली होती.
अशातच बाबांनी आपल्या भक्तांना त्यांचे पवित्र ग्रंथ ऐकवण्यास सांगितले होते. शेवटी 15 ऑक्टोबर 1918 रोजी विजयादशमीच्या दिवशी साईबाबांनी आपले अवतार कार्य संपून समाधीस्थ झाले. त्यांच्यावर शिर्डी मधील बुटीवाडामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. पुढे त्या ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली आणि सर्वांचे ते पूजनीय स्थान झाले. याच ठिकाणी आज भव्य दिव्य साई मंदिर उभे झाले असून महाराष्ट्रासह देशभरातून लाखोंच्या संख्येने लोक साई चरणी लीन होण्यासाठी शिर्डीला जातात.शिर्डीच्या साईबाबांच्या मागे कोणीही उत्तराधिकारी नसून त्यांच्या मागे कोणी शिष्य किंवा औपचारिक दीक्षा दिलेली व्यक्ती नाही.
परंतु त्यांचे परम भक्त असलेले म्हाळसापती, माधवराव देशपांडे, बायजाबाई, तात्या कोते, काकासाहेब दीक्षित, हेमाडपंत, बुटी, दासगणू, लक्ष्मी बाई शिंदे, नानावली, अब्दुल बाबा, नानासाहेब चांदोरकर यांनी अनेक साई कथा आणि अनुभव सांगितलेले आहेत. त्यांचे भक्त उपासनी बाबा त्यानंतर मोठे अध्यात्मिक गुरु झाले. अब्दुल बाबा हे सुद्धा साईंचे जवळचे भक्त होते. 1918 ते 1922 पर्यंत मंदिराची देखभाल करण्याचे काम त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले होते. 1954 पर्यंत अनेक मुस्लिम भक्त अब्दुल बाबांकडे येत असायचे. हिंदू मुस्लिम व्यतिरिक्त पारशी धर्माचे होमी भाभा, नानाभोई पालकीवाला असे थोर व्यक्तिमत्व सुद्धा साईंचा सन्मान करत होते. मेहेर बाबा सुद्धा एक पारशी परिवारातील होते.
शिर्डीच्या साईबाबांचे साई चरित्र प्रथम हेमाडपंत म्हणजे अण्णासाहेब दाभोलकर यांनी 1929 मध्ये लिहिले आहे. तसेच संत दासगनु महाराजकृत भक्तीलीलामृत आणि संत कथामृत यामध्येही बाबांचे चरित्र वर्णिले गेले आहे. तसेच सरकारी दस्तऐवजामध्ये संतसाईबाबांचे अवलिया रूप स्पष्ट केलेले आढळते. तसेच त्यामध्ये साईबाबांचे मूळ अज्ञात असल्याचेही सांगितले आहे.