शेगुडचा खंडोबा | Shegudcha Khandoba

देशातील बारा मल्हार मंदिरांपैकी कर्नाटक मध्ये पाच आणि महाराष्ट्रात सहा मल्हार मंदिरे आहेत. त्यातील एक शेगुडचे खंडोबा मंदिर ( Shegudcha Khandoba )अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत या तालुक्याच्या शहरापासून करमाळा रोडवर फक्त चौदा किलोमीटर अंतरावर अहिल्यानगर सोलापूर सीमेलगत आहे. तसेच सोलापूर मधील करमाळा या तालुक्याच्या शहरापासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. कर्जत करमाळा रस्त्याच्या कडेलाच हे अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वीचे खंडोबा मंदिर दोन ते तीन एकरामध्ये विस्तारलेले आहे.

रस्त्याच्या बाजूने मंदिराचा दक्षिण दरवाजा असून हा दरवाजा फार लहान असल्यामुळे याला खिडकी दरवाजा असे म्हणतात. मंदिराच्या पूर्वेला मंदिराचा मुख्य दरवाजा असून तो फार मोठा आहे आणि दरवाजा वरती नगर खाण्याचे बांधकाम केलेले आहे. या दरवाज्यावरती इस 1773 मधील एक शिलालेख असून त्यावर मल्हारराव शंकर, रायाजीराव महीपत, विठ्ठलराव महिपत पुंडे यांचा नामोल्लेख आढळतो. त्यावरून या महान व्यक्तींनी दरवाजाचे आणि तटबंदीचे बांधकाम केल्याचे समजते.

या मंदिराच्या चोहोबाजूंनी मजबूत काळ्या दगडाचे बांधकाम केलेले असून चारही बाजूने ओव्हरी आहेत. मंदिराच्या कोटावर सज्जा आहे आणि नगर खाण्यात आणि सज्जावर जाण्यासाठी मुख्य दरवाजापासून दगडी पायऱ्यांचा जिना आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश केल्यानंतर दरवाज्याच्या समोरील बाजूस आपल्याला मोठी लांब देवडी दिसते. त्या देवडी मध्ये अनेक देव देवतांचे फोटो असून देवडीच्या बांधकामावर असलेल्या शिलालेखातून या देवडीचे काम शिंपी समाजाच्या लोकांनी केल्याचे समजते.

देवडी च्या समोरील बाजूस नंदी आणि मेघदंबरीत पादुका आहेत. तसेच एका पादुकाचे चित्र चार मेंढ्यांच्या शिरावर कोरलेले आहे.
मुख्य मंदिराच्या समोरील बाजूस प्रांगणातील दगडी फरशीवर लोटांगण घालणाऱ्या अवस्थेत पुरुष भक्ताची प्रतिमा कोरलेली आहे. ती प्रतिमा अहिल्यानगर जिल्ह्यातील चांभार समाजातील एका व्यक्तीची आहे असे सांगितले जाते. पूर्वीच्या काळात मंदिराच्या कलश्याचे काम चालू असताना मंदिर कळस स्थिरावत नव्हता त्यावेळी या व्यक्तीने आपल्या पोटाच्या आतड्याने वात लावल्याचे सांगितले जाते. त्यावेळी मंदिराचा कळस स्थिरावला असल्याचे सांगतात. म्हणून त्या चर्मकाराचे ते स्मारक समजले जाते.

येथील मुख्य मंदिराची रचना एखाद्या मंडपाप्रमाणे दिसते. परंतु आता येथे भव्य सभामंडप नव्याने तयार करण्यात आला आहे. येथील पूर्वीचा दगडी खांबावरील मंडप काढला जाऊन नवीन मंडप तयार केल्याचे ग्रामस्थ सांगतात. मुख्य मंदिराच्या गर्भगृहात खाली उतरून जावे लागते. गर्भगृहात खंडोबा आणि म्हाळसा देवी यांची लहान आकाराची स्वयंभू छोटी लिंगे आहेत. या लिंगांना मुखवटे लावून लिंगाच्या बाजूने योनीचा आकार काढलेला आहे. तसेच याच लिंगांच्या पाठीमागील बाजूस चौथऱ्यावर देव खंडोबा, माळसादेवी आणि बाणाई देवी यांच्या बैठ्या अवस्थेतील मुर्त्या आहेत. येथील कोटाच्या एका कोपऱ्यात तीर्थाची विहीर असून ती पूर्णपणे दगडी बांधकाम करून बांधलेली आहे. तसेच विहिरीच्या दोन्ही बाजूस खाली जावून तीर्थ घेण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.

तसेच मंदिरात एक मोठा लाकडी घोडा बनवलेला असून मिरवणुकीच्या वेळेस उत्सवासाठी व दर्शनासाठी त्याला बाहेर काढतात. तसेच कोटाच्या उत्तर बाजूस सतीशिळा आहेत. व उत्तर बाजूस एक मोठी गणपती मूर्ती आहे. त्याचप्रमाणे कोटाच्या पश्चिम व उत्तर बाजूने एक ओढा आहे. ओढ्यामध्ये दक्षिण बाजूस घुमटीत पादुका असून या ठिकाणी लोक नवसाचे बळी देतात. याच ठिकाणी इ.स. 1990 मध्ये नवीन मंडपाचे बांधकाम चालू असताना जुन्या मंडपाचे अवशेष गाडले गेल्याचे ग्रामस्थ सांगतात.

येथे पूर्वी शेगुड नावाचे फार मोठे जंगल होते. या जंगलात एका चंदनाच्या झाडाच्या खोडात मी आहे असा दृष्टांत शेगुड जवळील महाळुंगी या गावाच्या एका खंडोबा भक्ताला झाला होता. त्यावेळी त्या भक्ताने आपल्या सहकार्यांसह देवाच्या दृष्टांतानुसार त्या चंदनाच्या झाडाच्या खोडातून स्वयंभू खंडोबा मूर्ती बाहेर काढली. पुढे काही वर्षानंतर येथील एक जहागीरदार श्री पुण्य यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार करून मंदिराभोवती मजबूत दगडी भिंत बांधली. दोन-तीन एकरातील हया भव्य मंदिरात शत्रुवर पाळत ठेवण्यासाठी एक जागा आहे. मंदिर परिसरात आतमध्ये विठ्ठल रुक्माई मंदिर, गणपती मंदिर, प्रांगणात भव्य दिव्य दोन दीपमाळ आहेत. तेथे रोजच्या सेवेत एक गणेश नावाचे पुजारी आहे. पुजाऱ्यांना फोन करून बाहेरून येणाऱ्या भक्तांसाठी येथे राहण्याची व जेवणाची सोय केली जाते.

येथे सोमवती अमावश्या, दत्त जयंती म्हणजे मार्गशीष पौर्णिमेला तसेच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे उत्सव साजरे केले जातात. सोमवती अमावशीला देव माळुंगी गावात असलेल्या एका डोहावर अंघोळीला जात असतात असा भक्तांचा विश्वास आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला येथे घटस्थापना होते. तसेच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला येथे खंडोबा आणि म्हाळसादेवी यांचा लग्न सोहळा साजरा केला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी येथे देवाचा यात्रेत जयघोष करत छबिना निघतो. रात्रीच्या वेळी या छबिन्यात लाकडी घोड्याला खांद्यावर घेऊन लोक नाचतात. आणि पहाटेच्या वेळी छबिना मिरवणूक पूर्ण होऊन पहाटेच्या वेळी मंदिरात पोहोचते.

तसेच सकाळी गावात मोठा कुस्त्यांचा आखाडा भरून उत्सवाचा शेवट होतो. शेगुडच्या खंडोबा दर्शनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून आणि सोलापूर जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने भाविक दरवर्षी येतात. तसेच आजूबाजूच्या परिसरातील गाव खेड्यांमधून नेहमीच भक्त खंडोबाच्या दर्शनाला येतात. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबाचे अनेक भक्त या ठिकाणी छोटे जागरण गोंधळ घालून दर्शनाचा लाभ घेतात. अशा या तीर्थक्षेत्री जाणारे भाविक येथील जवळच्या काही पर्यटन स्थळांना आणि तीर्थक्षेत्रांना भेटी देतात.

जसे की कर्जत पासून 21 किलोमीटर अंतरावर असलेले अष्टविनायकापैकी सिद्धटेकचा सिद्धी विनायक आणि अंबालिका साखर कारखाना,कर्जतमधील गोदडेज महाराज मंदिर, जामखेडचे नागेश्वर मंदिर, देशातील एकमेव असलेले दुरगाव येथील दुर्योधनाचे मंदिर, सौताड्याचा रामेश्वर धबधबा, धाकटी पंढरी समजले जाणारे धनेगावचे विठ्ठल रुक्माई मंदिर, खर्डा येथील किल्ला आणि संत सिताराम बाबा यांचे समाधी मंदिर,, महादेव मंदिर चोंडी, पीर बाबा दर्गा जामखेड, कर्जतचे रेहकुरी काळवीट अभयारण्य अशी इत्यादी दर्शनीय आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी तसेच राशीनच्या जगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविक जातात. येथे जाण्यासाठी अनेक एसटी बसेस आणि खाजगी वाहनांचा पर्याय निवडता येतो.

Leave a Comment