श्री क्षेत्र शनि शिंगणापूर हे ( Shani Shingnapur )गाव अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यामध्ये आहे. सूर्यपुत्र शनि देवाचे जागृत देवस्थान असून देशभरातील लोकांचे हे आस्था स्थान आहे. महाराष्ट्रात शनि देवांची अनेक तीर्थक्षेत्रे आहेत परंतु शिंगणापूर येथील तीर्थक्षेत्र एक आगळे वेगळे तीर्थक्षेत्र आहे. केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर सर्व भारतातील हे सर्वश्रेष्ठ असे तीर्थक्षेत्र आहे. याचा अनुभव येथे आल्यावरच सर्वांना होतो. येथील भगवान शनींची स्वयंभू मूर्ती काळ्या रंगाची असून त्या मूर्तीची उंची पाच फूट नऊ इंच आणि रुंदी एक फूट सहा इंच आहे.
या स्वयंभू मूर्तीची कथा येथील पूर्वज सांगतात की सुमारे दीडशे वर्षांपूर्वी किंवा त्याही अगोदर या परिसरात मुसळधार पाऊस पडला होता.शिंगणापूरच्या पूर्वेला एक लहानसा ओढा वाहत होता की ज्याला पानस ओढा म्हणतात. त्यावेळी ओढ्याला मोठा पूर आला असता भगवान शनीची मूर्ती वाहत आली होती आणि ती एका बोरीच्या झाडाला अडकली होती.पूर ओसरल्यानंतर गावातील गुराखी गाईंना चरण्यासाठी पानस ओढ्याजवळ घेऊन गेले असता त्यांना बोरीच्या झाडाला अडकलेली काळ्या रंगाची प्रचंड शिळा दिसली. त्यांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी काठीच्या टोकाने मोठ्या कुतूहलाने त्या शिळेला स्पर्श करू लागले. त्याचवेळी एका मुलाने शिळेवर काठी आपटली असता त्या शिळेतून रक्त वाहू लागले. आणि काठीच्या जागी व्रण उमटला.
ते पाहून सर्वांनी गावाकडे धूम ठोकली आणि गावात हा – हा म्हणता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. बरेच लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि आपल्या डोळ्यांनी हा चमत्कार पाहिला. रात्र झाल्यामुळे सर्वजण घरी गेले पण कोणालाच रात्रभर झोप लागली नाही.त्याचं रात्री एका भक्ताच्या स्वप्नात शनि महाराजांनी त्याला दर्शन देऊन सांगितले की काल तु जे पाहिलेस ते दुसरे कोणी नसून साक्षात मीच शनिदेव आहे. तेथून मला घेऊन जा आणि माझी प्रतिष्ठापना करा. दुसऱ्या दिवशी या भक्ताने सर्व गावकऱ्यांना ही हकीगत सांगितली. आणि क्षणाचाही विलंब न लावता गावकरी बैलगाडी घेऊन घटनास्थळी गेले. आणि मूर्तीला हात लावून उचलण्याचा प्रयत्न केला पण मूर्ती तसुभर सुद्धा हलण्यास तयार नव्हती.
मग त्या दिवशी शनिदेव पुन्हा त्या भक्ताच्या स्वप्नात आले आणि दृष्टांत दिला की, जे कोणी मामा- भाचे असतील त्यांनीच उचलून मला बोराच्या फांदीवर ठेवावे आणि काळ्या रंगाचे दोन बैल जे नात्याने सख्खे मामा- भाचे असतील त्यांनाच जोडलेल्या गाडीत मला बसून नेले तर मी येईल आणि गावात आणल्यानंतर सुद्धा माझी प्रतिष्ठापना सख्या मामा – भाच्यांच्या हातूनच केली पाहिजे. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी त्याप्रमाणे केले. आणि देवांच्या दृष्टांताप्रमाणेच मूर्ती गावात आणल्यानंतर दृष्टांत झालेला भक्त स्वतःच्या जागेत त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू इच्छित होता परंतु बैलगाडी गावात ज्या ठिकाणी थांबली तिथून गाडी थोडी सुद्धा हलत नव्हती.
म्हणून त्याच जागेवर गावकऱ्यांनी श्रद्धापूर्वक मूर्तीची प्रतिष्ठापना केली. अशा प्रकारे शनी शिंगणापूरला शनि देवांची प्रतिष्ठापना झाली. त्यानंतर अनेक दिवस ती मूर्ती एका साध्या चौथर्यावर विराजमान होती. त्यानंतर काही दिवसांनी सोनई गावचे जवाहर लोढा यांनी देवाला संतती मिळावी म्हणून नवस केला आणि त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पुढे त्यांनी आत्ता आपण पहात आहोत हा मोठा चौथरा नवस म्हणून बांधला.हा चौथरा बांधत असताना त्या मूर्तीभोवती कितीही खोदले तरी मूर्तीचा तळ लागत नव्हता.मग पुन्हा शनिदेवांनी गावकऱ्यांच्या स्वप्नात येऊन सांगितले की तुम्ही चौथरा अवश्य बांधा परंतु मला हलवू नका. आणि त्याच प्रमाणे गावाने चौथरा बांधला.आणि विशेष म्हणजे त्या नवीन चौथऱ्याची उंची वाढवून सुद्धा शनि देवांच्या मूर्तीची उंची मात्र पाच फूट नऊ इंच अशीच पूर्ववत राहिली.
सुमारे दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी शिंगणापूर येथे भगवान शनि देवांचे आगमन झाले. तेव्हा येथे छोटीशी वस्ती होती. आता येथे वाढलेली लोकसंख्या, पक्के रस्ते, भक्तांसाठी योग्य त्या सोयी सुविधा आहेत आणि आता या देवस्थानाला वैभवाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. शिंगणापूर गाव हे आज संपूर्ण भारतात शनिशिंगणापूर म्हणून ओळखले जात आहे. या गावाचा अधिपती शनिदेव आहे. या गावात एकाही घराला दरवाजा,कडी कोंडा नाही. अर्थात कुलूप लावणे हा प्रकार येथे पाहण्यास मिळत नाही. त्यामुळे हे गाव विश्वविख्यात झाले आहे. भगवान शनिदेव यांच्या इच्छेनुसार येथील घरांना कुलपे नसतात.
साक्षात शनि देवांच्या सांगण्यावरून “ मी तुमचे रक्षण करीन, तुम्ही निश्चित रहा “ आणि म्हणूनच देवाचा आदेश लोक नम्रपणे मानतात. कितीतरी वर्ष झाले गावातील घरे सताड उघडी असून आज पर्यंत गावात एकदाही चोरी झाली नाही.जर चोरी झालीच तर चोर आंधळा होतो अशी मान्यता आहे. शनिदेव आपला पाठीराखा आहे. जो पापकर्म करतो त्याला शनिदेव त्वरित दंड देतात असा गावकऱ्यांचा विश्वास आहे. भक्तांनी येथे यावे, भक्तिभावाने दर्शन घ्यावे व कृतार्थ होऊन जावे अशी गावकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे शनिशिंगणापूरचे गावकरी शनि देवांचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या सर्व भक्तांचे नेहमी स्वागतच करतात.
वृक्ष आहे पण सावली नाही.
चौथऱ्याच्या उत्तरेला लिंबाचे जुने झाड होते. (काही वर्षापूर्वी ते तोडले आहे.) जेव्हा जेव्हा लिंबाच्या झाडाची फांदी मूर्तीवर येई तेव्हा तेव्हा ती फांदी जळून खाक होत होती किंवा तुटून पडत होती. फांदी तुटताना मात्र कुणालाही इजा होत नसे. लिंबाच्या झाडाच्या फांदीची सावली मूर्तीवर कधीच पडू शकली नाही म्हणून म्हटले जाते की, ‘वृक्ष आहे पण सावली नाही. दहा वर्षांपूर्वी एक चमत्कार घडला होता. याच लिंबाच्या झाडावर एकदा वीज पडली. नेमकी त्याच वेळी तेथून लग्राची वरात चालली होती; परंतु कुणालाही दुखापत झाली नाही. झाडाला मात्र आग लागली होती, बारा तास झाड जळत होते.
आग विझविल्यानंतर झाड परत हिरवेगार दिसू लागले, खरे तर वीज पडल्यावर झाड शुष्क होऊन जात असते; पण इथे मात्र तसे झाले नाही. हा एक दैवी चमत्कारच मानला जातो. असे आहे इथले वैशिष्ट्य ! देवता आहे, पण मंदिर नाही ! द्वार-मार्ग आहे, पण दरवाजा नाही !वृक्ष आहे, पण सावली नाही !
दर्शन-विधी
शनि-शिंगणापुरातील या स्वयंभू देवस्थानाच्या चमत्कारामुळे व कीर्तीमुळे महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून अगणित भक्तगण शनिदेवांच्या दर्शनास येतात. देवाचे दर्शन घेऊन माणसांना परमानंद प्राप्त होतो. इतर तीर्थांप्रमाणे येथे दर्शनासाठी रांगेत तिष्ठत राहण्याची आवश्यकता नाही किंवा पुजाऱ्याच्या इशाऱ्याप्रमाणे चालण्याचीही जरुरी नाही. वेळेचे बंधन नाही अन् भक्तांना लुटणे नाही. तुमच्या इच्छेनुसार पूजा-साहित्य घेऊन स्वहस्ते पूजन करू शकता. शनि-मूर्तीच्या चौथऱ्याजवळ आंघोळ करून ओल्या वस्त्रानिशी जाणे आवश्यक आहे. वस्त्र कोणतेही असू देत; पण आंघोळ करून ओल्या वस्त्रासह जावे लागते.
आंघोळीची व्यवस्था ट्रस्टने विनामूल्य केली आहे. फक्त पुरुषच आंघोळ करून भगवान शनीची पूजा-अर्चा करू शकतात.येथे मूर्तीजवळ स्त्रियांना प्रवेश नाही. स्त्रिया लांबूनच शनिदेवांचे दर्शन घेतात. शनिदेवांनी दिलेल्या दृष्टांताप्रमाणे हा रिवाज येथे पडला आहे. शनिदेवता येथे गुप्त रूपाने राहतात. थंडी-वाऱ्यात आणि उन्हा-पावसात, विना मंदिर रात्रंदिन उभे आहेत, भक्तांचे कल्याण करीत आहेत. शनिदेवाची पूजा-अर्चा, अभिषेक करण्यासाठी जे पाणी लागते त्यासाठी एक स्वतंत्र विहीर आहे.
या विहिरीचे पाणी केवळ परमेश्वराच्या पूजा-पाठासाठीच वापरले जाते. ज्याप्रमाणे स्त्रियांना मूर्तीस स्पर्श करण्यास अधिकार नाही, त्याचप्रमाणे या विहिरीजवळही त्या जाऊ शकत नाहीत. स्त्रियांना भटजीद्वारा अभिषेक करण्यास परवानगी आहे. गरिबांना येथे भोजन, कपडा, पादत्राणे इत्यादींचे केलेले दान पीडाहारी मानले जाते.

यात्रा
शनिजयंती- वैशाख महिन्याच्या अमावास्येच्या दिवशी म्हणजे शनिदेवांच्या जन्मदिवशी येथे मोठा उत्सव आयोजित केला जातो.
शनि अमावास्या – शनिवारच्या दिवशी जर अमावास्या आली तर त्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते.
गुढी पाडवा – चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे साडेतीन मुहूतपैिकी एक सुमुहूर्त दिवस होय. या नूतन वर्षारंभी श्रद्धाळू लोक कावडीत गंगाजल भरून व कावड खांद्यावर घेऊन येथे येतात व पूजा-अर्चा करतात. या दिवशी सर्वांना भंडाऱ्याचा प्रसाद दिला जातो. या शनिशिंगणापूर मध्येच ग्रामदेवता लक्ष्मी माता, उदासी बाबा समाधी स्थान, श्री दत्तप्रभू मंदिर, विघ्नहर्ता श्री गजानन मंदिर, कैलास पती श्री शंकर मंदिर, वैकुंठपती श्री विष्णू मंदिर अशी प्राचीन छोटी छोटी देवस्थाने आहेत. भक्तगण या ठिकाणीही जाऊन निष्ठाभावाने दर्शन घेतात.
कलियुगाचे भगवान शनि-
वर्तमानकाळाला कलियुग म्हणतात, कलियुग म्हणजे यांत्रिक गुण होय. सुईपासून अवजड अशा मशिनरी व यंत्र जगात तयार होतात.कारखाने, रेल्वे, वायुयानापासून ते दैनिक जीवनात उपयुक्त अशी स्टीलची भांडी, भवन निर्माणसाठी लागणारी लोखंडी सामग्री आपण पाहतो जिकडे पाहावे तिकडे लोखंड पडते.तसेच तेल, पेट्रोलियम, रसायन, कोळसा याप्रमाणे सर्वांमध्ये शनी देवाचा निवास आहे.माणसाच्या शरीरातील रक्ताच्या लौहतत्वात शनिदेव विराजमान होऊन आपणास जीवनदान देतात. शनी आपल्या आयुष्याचा धनी आहे. शनीच्या कृपाप्रसादाशिवाय माणसास दीर्घायू प्राप्त होऊ शकत नाही.
शनीविना आध्यात्यिकता व सामूहिक सुखी संसाराची कल्पना करता येत नाही, सगळे कष्ट, संकटे यांसारख्या पीडांचा स्वामी शनि आहे. या सर्व व्याधींना दूर ठेवायचे असेल तर, जीवन सुखमय बनावायचे असेल तर शनिदेवांची उपासना करा. येणाऱ्या आगामी वर्षात व्यक्ती, समाज आणि राष्ट्राला अनेक संकटांशी सामना करायचा आहे. संकटांपासून मुक्त होण्याचा सरळ उपाय म्हणजेच शनि उपासना होय,
शनि-कृपा प्राप्त करण्याचे काही सरळ उपाय सांगितले आहेत •
1 ) शनिवारच्या दिवशी सूर्योदयाच्या अगोदर किंवा सूर्यास्तानंतर पिंपळाच्या वृक्षावर गूळमिश्रित पाणी शिंपडा आणि मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावून,अगरबत्ती लावून प्रणाम करा.
2) शनिव्रत, शनिमंत्र, शनिस्तोत्र, शनि चालीसा यांचे पठण-श्रवण करा. शनिवारी काळ्या कुत्र्याला,काळ्या गाईला किंवा कावळ्याला गोड रोटी खायला द्या.
3) सुपात्र अशा दीन-दुःखी भिकाऱ्याला काळे वस्त्र , उडीद, तेल किंवा स्टीलची दैनिक जीवनात उपयोगी पडणारी सामग्री दान करा.आपण करीत असलेल्या नोकरीशी ईमान राखा.आंधळे, पांगळे, गरीब, कष्टाची कामे करणाऱ्या लोकांवर शनीचा प्रभाव असतो त्यांची सेवा केल्याने विशेष पुण्य लाभते आणि शनीची मर्जी राहते. ज्या लोकांवर शनिदेव प्रसन्न असतात ती लोक खूप श्रीमंत असतात. समाजसेवा, मानवता आणि दीन-दुबळ्यांची सेवा करण्यासाठी आपला थोडा वेळ द्या. शनिप्रतिमेचे दर्शन, पूजन आणि तेलाने अभिषेक करा.शनि-संस्थानद्वारा तयार केलेले सिद्ध शनि-कवच, शनियंत्र व काळ्या घोड्याचा नाल धारण करा.
येथे आपण कसे याल ?.
महाराष्ट्रातील नगर – औरंगाबाद या राज्यमार्गावर नगरपासून ४० कि. मी. अंतरावर मुख्य रस्त्यापासून पश्चिमेस पाच कि.मी. आत गेल्यावर श्री क्षेत्र शिंगणापूर हे गाव लागते. मुख्य रस्त्यालगत घोडेगावला उतरावे लागते. तेथून शिंगणापूरपर्यंत पक्की सडक असून ऑटोरिक्षा, बस व इतर वाहनातून जाता येते. काही गाड्या तर थेट शिंगणापूरपर्यंत असतात. सुमारे शंभर दीडशे घरांचे शिंगणापूर क्षेत्र हे आजही जुन्या चालीरीतीप्रमाणे लोकजीवन असलेले क्षेत्र म्हणून ओळखले जाते.
तसेच काही भाविक शनी शिंगणापूरच्या जवळ असलेल्या काही प्रख्यात तीर्थक्षेत्रांना आणि पर्यटन स्थळांना भेटी देतात. अहमदनगर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेला बेगम चांदबिबी महाल, नेवासा मध्ये असलेले संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या शिळेवर बसून ज्ञानेश्वरी लिहिली ती शिळा म्हणजे “पैस” . शनिशिंगणापूर पासून सात किलोमीटर वर अंतरावर असलेले जगदंबा मातेचे मंदिर म्हणजे “रेणुका दरबार “ शिंगणापूर पासून ते 30 किलोमीटर अंतरावर असलेले देवगड येथील सद्गुरू श्री किसनगिरी महाराजांचे मंदिर.
शनिशिंगणापूर पासून 68 किलोमीटर अंतरावर असलेले “मोहटादेवी मंदिर”, शिंगणापूर पासून 72 किलोमीटर अंतरावर असलेले आदर्श गाव “राळेगणसिद्धी “ आणि शिंगणापूर पासून 75 किलोमीटर अंतरावर असलेले शिर्डी साईबाबा मंदिर भारतातच नव्हे तर विदेशातही प्रसिद्ध असलेले संत श्री साईबाबांची समाधी अशा ठिकाणांनाही भाविक भक्तगण अवश्य भेट देतात.