सौंदत्तीची यल्लमा | Saundattichi Yellamma

देवी रेणुका यल्लम्मा ही एक महासती आणि पतिव्रता स्त्री होती. तिची भक्ती आणि श्रद्धा इतकी महान होती की ती आपल्या पतीच्या सेवेसाठी वाळूच्या घागरी तून पाणी आणत असे. अशी ही यल्लमा देवी ( Saundattichi Yellamma ) नवसाला पावणारी आहे असा भक्तांचा विश्वास आहे. यल्लमा देवीचे  हे मंदिर फार पुरातन असून भारतामध्ये कर्नाटक राज्यात सौंदत्ती या शहरापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराचे बांधकाम चालुक्य किंवा राष्ट्रकूट शैलीतील जैन वास्तू कलेप्रमाणे वाटते.

इ.स. 1514 मध्ये रायबागचे बोमाप्पा नाईक यांनी ते पूर्ण केल्याचे सांगितले जाते. सिंधाचल किंवा रामगिरी पर्वतरांगेचा एक भाग असलेल्या डोंगरावर हे मंदिर असून सौंदत्ती शहराजवळील सापडलेल्या पुराव्यानुसार हे मंदिर तिसऱ्या शतकापूर्वीचे असून तिसऱ्या शतकातील भांडे सुद्धा येथे सापडले होते. हे मंदिर यल्ल प्रभा नदी जवळच आहे. कर्नाटक मधील सौंदत्तीची यल्लमा म्हणजेच माहूरची रेणुका आहे. असा भक्तांचा विश्वास आहे आणि ती इथे कशी आली त्याची एक कथाही आहे. या देवीला येथे सौंदत्ती, यल्लमा, रेणुका, अंबिका अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.

एका पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात एक रेणुक नावाचा राजा आपली पत्नी भोगावती बरोबर राज्य करत होता. मात्र त्या दोघांना आपत्य नव्हते. एकदा ते दोघे तीर्थक्षेत्र करत असताना काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन परत येत असताना त्यांना ऋषी अगस्ती भेटले. चर्चेतून अगस्ती ऋषींना त्यांनी आपल्याला मूलबाळ नसल्याचे सांगितले. त्यावेळी अगस्ती ऋषींनी त्यांना एक उपाय सांगितला की त्रिवेणी संगमावर पुत्रकामेष्टी हा यज्ञ करण्यास सांगितला. त्यावेळी हा यज्ञ करण्यासाठी त्याकाळचे ऋषीमुनी, वेदिक, राजे आणि महाराजे या सर्वांना आमंत्रण गेली आणि होम हवन व यज्ञाला सुरुवात झाली.

यज्ञ सुरू होताच थोड्या वेळातच यज्ञातून सुगंधी धूर निघू लागला. ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले आणि अगस्ती ऋषी अग्नि कुंडाजवळ गेले आणि त्या कुंडातून अतिशय सुंदर तेजस्वी कन्या प्रकट झाली आणि सर्वांना आनंद झाला. अगस्ती ऋषींनी त्या कन्येला राणी भोगावतीकडे सोपवले. राजाने त्या कन्येचे नाव रेणुका ठेवले. मात्र राजाच्या दुसऱ्या राण्यांना हे पाहवत नव्हते. एकदा त्यांनी या रेणुकाचा म्हणजेच कन्यारूपी देवीचा वध करण्याचा कट रचला. तिला मारण्यासाठी गारोड्याकडून एक विषारी साप तिच्या पाळण्याखाली सोडला. तो साप पाळण्यावर चढला असता त्याचे आपोआप दोन तुकडे झाले आणि तो खाली पडला.

राजाला हे कळताच राजा तिथे आला. ते पाहून आपल्या कन्येवरील अनिष्ट टळले म्हणून राजा रेणुका देवीच्या दर्शनासाठी गेला. तेव्हा त्याला दुर्गादेवीच्या हाताला रक्त लागलेले दिसले. हे पाहून दुर्गा देवीनेच आपल्या कन्येचे प्राण वाचवले असे राजाच्या मनात आले आणि राजा प्रसाद घेऊन घरी आला व सर्व राण्यांना प्रसाद दिला असता सर्व राण्यांनी राणी भोगावतीची क्षमा मागितली.
 दिवसा मागून दिवस सरत गेले आणि रेणुका आता मोठी झाली होती. राजा तिच्या लग्नाच्या चिंतेत असताना एक दिवस दुर्गा मातेने स्वप्नात येऊन राजाला अगस्ती ऋषी तुम्हाला योग्य तो वर सुचवतील असे सांगितले.

पुढे अगस्ती ऋषींनी राजाला शंकररुपी जमदग्नी ऋषींचे स्थळ सुचवले. त्याचप्रमाणे रेणुक राजाने दक्षिणेकडे येऊन रेणुकाचे लग्न जमदग्नी ऋषी बरोबर लावले. पुढे त्यांना पाच मुले झाली. एक दिवस नित्यनेमाप्रमाणे रेणुका पूजेचे पाणी आणण्यासाठी नदीवर गेली असता देवीने चित्ररथ नावाच्या गंधर्वाला आपल्या बायकांबरोबर जलक्रीडा करताना पाहिले. ते पाहून तिच्याही मनात काही विचार आले परंतु जमदग्नी ऋषी तिच्याबरोबर नसल्यामुळे ती तो आनंद घेऊ शकली नाही. पाणी घेऊन देवी आश्रमात  गेल्यानंतर जमदग्नी ऋषी अंतरज्ञानी असल्यामुळे त्यांना हे समजले.

त्यामुळे ते भयंकर रागवले आणि त्यांनी आपल्या चारही पुत्रांना बोलवून रेणुका देवीचे शीर उडवण्याचा आदेश दिला. चौघांनीही मातृ प्रेमापोटी असे करण्यास नकार दिला. म्हणून जमदग्नी ऋषींनी चौघांनाही शाप देऊन ठार केले. शेवटी ऋषींनी आपला पाचवा मुलगा परशुरामाला बोलून आपल्या मातेचा वध करण्याची आज्ञा दिली. ज्यावेळी रेणुकाचा वध करण्यासाठी परशुराम धावला त्यावेळी एक दलित स्त्री मध्ये आली त्यामुळे परशुरामाने मातेसह तिचेही शिर उडवले. हे पाहून जमदग्नी ऋषींनी परशुरामास वर मागण्यास सांगितले परंतु परशुरामाने आपल्या भावंडासह मातेला ही जिवंत करण्याचा वर मागितला.

मग ऋषींच्या आशीर्वादाने या सर्वांना जिवंत करताना रेणुका मातेचे शीर त्या महिलेला लागले व महिलेचे रेणुका मातेला लागले. आणि देवीचे शिर लागलेल्या महिलेला ऋषींनी पत्नी म्हणून स्वीकारले. या मध्ये आलेल्या स्त्रीचे नाव येलुमक्कलताई  होते आणि  ती दलित समाजाची होती. या कन्नड शब्दाचा अर्थ सात मुलांची आई असा होतो. म्हणूनच या महिलेला यल्लमा देवी म्हणून ओळखले जाऊ लागले.येथे यल्लमा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाण्याअगोदर यल्ल प्रभा नदी मध्ये जोगूळ बावी या ठिकाणावर जावे लागते. त्या तीर्थामध्ये स्नान करून मगच भावीक मुख्य मंदिरामध्ये जातात.

या तिर्थांमध्ये स्नान करून अंगाला लिंबाचा पाला गुंडाळून तसेच तोंडात लिंबाचा पाला धरून मगच भक्तगण देवीच्या दर्शनासाठी जातात. ही येथील खास प्रथा आहे.देवीच्या मुख्य गाभाऱ्यात जाताना मध्येच एक देवी लागते. तेथे हा लिंबाचा पाला काढला जातो आणि देवीला एक पूर्ण फेरा मारून तेथील परशुरामाचा  पाळणा हलवावा लागतो. हा लिंबाचा पाला अंगाला लावणे किंवा नेसणे म्हणजे पूर्ण शरीर शुद्धी करणे हाच त्याच्यामागे उद्देश आहे. येथील जोगतीन म्हणजेच देवदासी हा लिंबाचा पाला स्त्रियांना नेसवत असतात आणि काढतही असतात. त्यानंतर भक्त मुख्य सौंदत्ती देवीच्या दर्शनासाठी निघतात.

काही अंतरावरच डोंगराच्या काही पायऱ्या चढून गेले की तेथे सौंदत्तीचे मंदिर आहे. डोंगर चढून वर गेल्यानंतर पूजेचे साहित्य पेढे खेळण्या आणि इतर दुकाने लागतात. दुकानात लाखो लोकांची गर्दी असते. तेथून भावीक देवीच्या ओटीचे आणि पूजेचे साहित्य घेऊन देवीच्या मुख्य मंदिरात प्रवेश करतात. आणि देवीचे मनोभावे दर्शन घेतात.तसेच मंदिर परिसरात परशुराम गणेश मल्लिकार्जुन संत एकनाथ आणि सिद्धेश्वर यांच्याही मूर्ती आहेत. तेथेही भक्तगण आपले डोके टेकवतात. त्याचप्रमाणे मंदिराचा परिसर भव्य, दिव्य आणि  निसर्गरम्य असून परिसरात दीप माळा आणि एक जलकुंड आहे.

भाविक या जलकुंडात स्नान करूनच देवीच्या दर्शनासाठी जातात. तसेच मंदिराच्या मागच्या बाजूस योनी कुंडम,कुमकुम कुंडम, अरीहाण कुंडम तेथे लोक स्नान करतात. तसेच येथील जोगूळ बावी कुंडात स्नान केल्याने त्वचा रोग नष्ट होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. या यल्लमा देवी विषयी काही अपप्रचार आढळतात. ते म्हणजे ही देवी ओल्या झाडाला आग लावते, माणसाला किन्नर बनवते, फार क्रोधी आणि कडक आहे .परंतु या सर्व खुळ्या कल्पना असून आई यल्लमा देवी फार प्रेमळ आहे. भक्तांच्या नवसाला पावणारी आहे.

या सौंदत्तीच्या यल्लमाचा वर्षातून दोनदा ऑक्टोबर आणि एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या यात्रा भरतात. कर्नाटक सह महाराष्ट्र,गोवा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू अशा विविध प्रदेशातून लाखोच्या संख्येने भाविक येथे जमतात. बेळगाव पासून 90 किलोमीटर अंतरावर आणि कोल्हापूर पासून 193 किलोमीटर अंतरावर हे यल्लमा देवीचे मंदिर आहे.
    

2 thoughts on “सौंदत्तीची यल्लमा | Saundattichi Yellamma”

Leave a Comment