देव देवतांची आणि संत महात्म्याची भूमी असलेल्या महाराष्ट्रात अनेक देवी देवतांची आणि संतांची मंदिरे आहेत. त्यापैकीच एक गोदावरी तीरावर नाशिक पासून फक्त 65 किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात आदिमाया शक्ती सप्तशृंगी मातेचा Saptashrungi Mata -vani गड आहे. सुमारे 4569 फूट उंचीवर असलेला हा सप्तशृंगी मातेचा गड नाशिक जवळील कळवण तालुक्यात वनी येथे नांदुरी गावाजवळ सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगेत आहे.
ब्रह्मदेवांच्या कमंडलू मधून गिरीजा नदी उत्पन्न झाल्याचे सांगितले जाते. महिषासुराला मारताना देवीने धारण केलेले अठराभुजा रूप आपणास येथे पाहावयास मिळते. येथील देवीची मूर्ती ही स्वयंभू असून मंदिराच्या गाभाऱ्याला असणाऱ्या तीन दरवाजांना शक्तीद्वार,सूर्यद्वार आणि चंद्रद्वार अशी नावे दिलेली आहेत. विशेष म्हणजे या तीनही दरवाजा मधून देवीचे दर्शन घेता येते.तसेच सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी जाण्याचा आणि परत मागे येण्याचा अशी वेगवेगळी दोन मार्गे आहेत. दोन्हीही मार्ग मजबूत पायऱ्यांनी बनवलेले असून गडावर जड वस्तू नेहण्यासाठी लिफ्ट ची सोय केलेली आहे.
भागवतामध्ये आदिमाया शक्तीची 108 शक्तीपीठे सांगितलेली आहेत. त्यातील आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठे आहेत. त्यापैकीच हे अर्धे शक्तीपीठ आहे. देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केल्यानंतर विश्रांतीसाठी देवी या सप्तशृंगी गडावर राहिल्याचे पौराणिक कथेत सांगितले जाते. त्याचप्रमाणे राम आणि सीता येथील आरण्यात वनवासात असताना सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आल्याचेही काही ग्रंथांमध्ये सांगितले आहे. तसेच राम आणि रावण यांच्या युद्धात इंद्रजीताच्या शस्त्र माऱ्यामध्ये रामाचे बंधू लक्ष्मण धारातीर्थ झाले असता हनुमंत राया ने द्रोणागिरी पर्वत उचलून चालवला होता याचा काही भाग खाली पडून सप्तशृंगी गड तयार झाल्याचे एका कथेत सांगितले जाते.
तसेच भगवान दत्तात्रेय महाराज आणि भगवान महादेव अरण्यात फिरत असताना त्यांना अरण्यात कोणीतरी तपश्चर्या करीत असल्याचे समजताच त्यावेळी महादेव दत्तगुरूंना ते पाहण्यासाठी पाठवतात आणि दत्तगुरू त्यांना महादेवाकडे घेऊन येतात. व दत्तगुरु आणि महादेव त्याला म्हणतात की तुझी सर्व इच्छा सप्तशृंगी माता पूर्ण करेल. याचाच अर्थ त्यावेळी सुद्धा सप्तशृंगी मातेचे स्थान या गडावर होते. असे नवनाथ भक्तिसार या पोथीत वर्णन केलेले आढळते. तसेच शाबरी विद्या ची सुरुवात याच सप्तशृंगी गडावरून झाल्याचे सांगितले जाते. संत निवृत्तीनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही काळ सप्तशृंगी मातेचि कठोर उपासना केल्याचे नवनाथ भक्तिसार या ग्रंथात सांगितले आहे.

महिषासुर नावाच्या राक्षसाने भगवान शिव शंकरांच्ची घोर तपश्चर्या नंतर देव,दानव, मानव अशा कोणाकडूनही त्याचा मृत्यू होणार नाही असा वर मिळवलेला होता. परंतु वर देताना ब्रह्मदेवांनी स्त्री असा उच्चार केला नव्हता. ह्याच महिषासुर राक्षसाने पुढे पृथ्वीवर भयंकर अन्यायाचा हैदोष माजवला होता आणि त्याने पुढे स्वर्गावरही आक्रमण करून इंद्रदेवांनाही हाकलून लावले होते. अशातच सर्व देव,ऋषीमुनी, साधू, आणि संत एकत्र येऊन भगवान शंकरांकडे गेले आणि या जाचातून वाचण्याची या सर्वांनी देवांना विनंती केली. परंतु महादेवाने मी त्याला मारू शकत नाही कारण त्याने ब्रह्मदेवांकडून वरदान मिळालेले आहे.
हे काम फक्त आता पार्वती देवीच करू शकते असे सांगून पार्वती देवीकडे त्यांनी हे काम सोपवले. देवांच्या आज्ञेने पार्वतीने भयंकर असे रुद्र रूप धारण करून याच सप्तशृंगी गडाजवळ महिषासुराचा वध केला. आणि देवी विश्रांतीसाठी सात शिखरे असलेल्या सप्तशृंगी गडावर जाऊन बसली. या गडाला सात शिखरे असल्यामुळेच सप्तशृंगी गड असे नाव पडले. देवीला तेथे सप्तशृंगी माता असे म्हटले जाऊ लागले. या ठिकाणी देवीची वारा प्रमाणे आभूषणे ठरवले जातात. वर्षभर या देवीला भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. देवीच्या मुख्य मंदिरात जाण्यासाठी साधारणपणे पाचशे ते सहाशे च्या दरम्यान पायऱ्या चढाव्या लागतात.
देवीचे मंदिर गुहेच्या जवळ असून तेथील एका डोंगराला महिषासुराला मारताना देवीचा बान लागला होता ती खून म्हणजे डोंगराला पडलेली चीर तेथे पाहावयास मिळते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर देवीची आठ फूट उंचीची भव्य दिव्य आणि प्रसन्न अशी मूर्ती दिसते. देवीच्या 18 हातामध्ये वेगवेगळी अविधे आहेत. डोक्यावर सुवर्ण मुकुट, कानामध्ये कर्णफुले, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र, कमरपट्टा पायात तोडे, गळ्यात आणि अंगावर विविध अलंकार देवीला घातलेले आपल्याला दिसतात.
वर्षभरात देवीचे प्रमुख तीन उत्सव साजरे केले जातात. त्यातील पहिला शाकंभरी पौर्णिमा उत्सव, दुसरा चैत्र नवरात्रीचा आणि तिसरा आश्विन नवरात्रीचा उत्सव सप्तशृंगी गडावर साजरा केला जातो. या तीनही वेळेस विविध तीर्थक्षेत्रावरून कावडीने पाणी आणून देवीचा अभिषेक केला जातो. संत ज्ञानेश्वर महाराजांची कुलस्वामिनी म्हणून सप्तशृंगी देवीला ओळखलं जातं. तसेच छत्रपती शिवाजी महाराजदेखील सुरतेची लूट केल्यानंतर देवीच्या दर्शनाला येथे आले होते असे सांगितले जाते. हे तीर्थक्षेत्र 14000 वर्षांपूर्वीचे असून महर्षी मार्कंडेय ऋषींनी दुर्गा सप्तशृंगीची संकल्पना मांडली ती याच शिखराजवळ.
येथे पहाटेची काकड आरती झाल्यानंतर देवीची पूजा केली जाते. पूजेनंतर देवीला वस्त्र चढवले जातात. देवीची मूर्ती उंच असल्यामुळे देवीला पैठणी किंवा अकरा वार शालू नेसवला जातो. देवीला नेसवल्या जाणाऱ्या पैठणीचे प्रत्येक दिवसानुसार रंग ठरवलेले असतात. सोमवारी पांढरी, मंगळवारी हिरवा, बुधवारी जांभळा, गुरुवारी पिवळा, शुक्रवारी निळा शनिवारी लाल आणि रविवारी गुलाबी रंगाचा शालू देवीला नेसवला जातो. भाविकांना ज्या दिवशी पूजा करायची आहे त्यानुसार साडीचा रंग सांगितला जातो. सोन्याचे विविध दागिने देवीला घातले जातात.नवग्रहांची शक्ती देवी मध्ये असल्यामुळे त्यानुसार आधी मायेचा शृंगार केला जातो.
वारानुसार कुंकू लावले जाते. सोमवारी ओम किंवा बेल पान, मंगळवार आणि बुधवार पिंपळपान, गुरुवारी स्वस्तिक, शुक्रवारी गोल पाकळी,शनिवारी शंख आणि रविवारी सूर्य अशाप्रकारे वारानुसार देवीला कुंकू लावले जाते. दीड ते दोन तास सुरू असलेली ही पूजा मन अगदी प्रसन्न करते. रामनवमी पासून ते पौर्णिमेपर्यंत येथे भाविकांची गर्दी वाढू लागते. खानदेश मधून येथे बरीच मंडळी पायी दिंडीत येत असतात. साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तृतीयपंथीयांची एक छबिना मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत राज्यभरातील तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
गडावर असलेल्या शिवालय तलावावर स्नान करून त्यांनी सोबत आणलेल्या मूर्तींना शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक करत अर्धनारी नदेश्वर देवीचे पूजन करून छबीन्याला सुरुवात होते. सप्तशृंगी माता,यल्लमा माता आदि देवींच्या मूर्तींना साज चढवून नैवेद्य साडीचोळी आणि पूजा करून त्यांचा छबिना काढण्यात येतो. शिवालय ते सप्तशृंगी मंदिराच्या पहिल्या पायरी पर्यंत डफांच्या निनादात या मिरवणुकीत भक्तिरसात नाहून निघालेल्या या तृतीयपंथी मिरवणुकीत वाद्याच्या तालावर ठेका धरत नृत्य करतात. याचप्रमाणे महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यामध्ये ही देवीची विशेष पूजा होते .
येथील देवीची मूर्ती झुकलेली का आहे याविषयी एक कथा आहे. सप्तशृंगी देवीची स्थापना मार्कंडेय ऋषींनी केली होती. मार्कंडेय ऋषी रोज देवीला श्लोक आणि पुराने ऐकवायचे आणि म्हणून देवी मार्कंडेय पर्वताकडे कान लावून झुकलेली असायची. म्हणून देवीची मूर्ती येथे झुकलेली आहे. मुंबईपासून 160 किलोमीटर तर पुण्यापासून 210 किलोमीटर असलेल्या या तीर्थक्षेत्राला दर्शनासाठी आलेले भाविक नाशिक जिल्ह्यातील इतर तीर्थक्षेत्रांना आणि पर्यटन स्थळांनाही भेट देतात. जसे की भारतातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र यापैकी आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक मधील त्रिशीमाही पठारावर वसलेली जैन राजे यांनी बनवलेल्या पांडवलेणी गुफा. येथे जवळजवळ 24 लेण्या आहेत.
जैन शिलालेख आणि कलाकृती या व्यतिरिक्त येथे एक बुद्धाची मूर्ती सुद्धा आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट असलेला दूध सागर धबधबा आणि देशातील सर्वात मोठा धार्मिक जमाव म्हणजे बारा वर्षातून चार वेळा भरला जाणारा लोकप्रिय कुंभमेळा, तसेच नाशिक मधील प्रसिद्ध धार्मिक स्थान म्हणजे 1794 मध्ये गोपीबाई पेशवे यांनी बांधलेले कालाराम मंदिर, तसेच ऐतिहासिक अत्यंत महत्त्वाचे स्थान स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर यांचे जन्मस्थान असलेले भगुर, बारा ज्योतिर्लिंगाच्या मूर्ती आणि वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकला असलेले प्रसिद्ध मुक्तिधाम मंदिर,तसेच सुला वाईन यार्ड आणि शिक्का संग्रहालय, तसेच हरिहर किल्ला अशा अनेक धार्मिक आणि पर्यटनीय स्थळांना येथे आलेले भाविक भेट देतात.
👌👌