संत संताजी जगनाडे महाराज | Santaji Jagnade Maharaj

संताजी महाराजांचे (santaji Jagnade Maharaj )पहिले आडनाव सोनवणे होते. ते मूळचे चाकणचे रहिवासी होते. त्यांच्या वंशावळीचा विचार केला असता त्यांचे  खापर पंजोबा पांडुरंग होते. पांडुरंगाला दोन मुले होती एकाचे नाव नारायण व दुसऱ्याचे नाव महादेव होते. नारायणाच्या मुलाचे नाव भिवासेठ होते. भिवाशेठ यांचा मोठा व्यापार असल्याने त्यांना लोक सेठ म्हणायचे. भिवासेठ च्या पत्नीचे नाव होते गिरीजाबाई आणि मुलाचे नाव होते विठोबा. विठोबाच्या पत्नीचे नाव होते मायाबाई आणि या मयाबाई सुदुंबरे गावातील काळे कुटुंबातील होत्या आणि या मयाबाई म्हणजेच संताजी महाराजांच्या आई आणि विठोबा हे त्यांचे वडील.

संताजी नेहमीच मामाच्या गावी राहिल्याने ते सुदुंबरे गावचे झाले. त्यांचा जन्म ही या सुदुंबरे गावीच 8 डिसेंबर 1624 मध्ये झाला.तसे पाहता खेड, सुदुंबरे आणि चाकण ही तिन्ही गावे जवळजवळच आहेत.जगनाडे महाराजांचे ज्यावेळी यमुनाबाईशी लग्न झाले. त्यावेळेस त्यांचे वय 11 वर्षे व यमुनाबाईंचे वय सात वर्षे होते. त्यांना जो पहिला मुलगा झाला त्याचा लवकरच मृत्यू झाला. त्यांना त्याचे दुःख सहन करावे लागले. त्यांना दोन आपत्ये होती. एक मुलगा बाळोजी आणि दुसरी मुलगी होती तिचे नाव होते भागीरथी.अशा या संत संताजी जगनाडे महाराजांना एकूण 75 वर्षांचे आयुष्य लाभले.

त्या काळी ज्यावेळेस जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथा त्या काळच्या न्यायालयीन आदेशानुसार इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या त्या दुःखात सामील असणारे संताजी जगनाडे महाराज एक होते. कारण ते त्या गाथेचे लेखक होते. तसेच तुकाराम महाराजांचे एकूण 14 टाळकरी त्यापैकीही ते एक होते. तब्बल सोळा वर्षांचा सहवास तुकाराम महाराजांचा त्यांना लाभला. म्हणून तुकाराम महाराजांचे पंतू गोपाळबुवा महाराज यांनी अभंगातून संतांजींचे वर्णन खालील प्रमाणे केले आहे.

संताजी तेली बहुत प्रेमळ I अभंग लिहित बसे जवळ II
    धन्य त्याचे भाग्य सबळ I संगे सर्व काळ तुकीयाचा II
    संतु तुका जोडी I लावी ज्ञानाची गोडी II

या जोडीने सर्व समाजाला ज्ञानाची गोडी लावण्याचे काम केले. संताजी महाराजांचे अक्षर फार सुंदर असल्याने त्यांना गाथा लिखाणात त्याचा फार फायदा झाला.संत तुकाराम महाराज आणि संताजी जगनाडे महाराज यांची भेट म्हणजे एक फार सुंदर योगायोग होता. चाकण नगरीमध्ये चक्रेश्वराचे पुरातन एक मंदिर आहे. येथे नेहमीच संत तुकाराम महाराज कीर्तनासाठी जायचे. संत बहिणाबाई पाठक यांच्या चरित्रातून अशी माहिती मिळते की संत तुकाराम महाराजांच्या हयातीतच त्यांच्याच अभंगावर कीर्तने व्हायची.

असेच तुकाराम महाराजांचे एक कीर्तन चक्रेश्वर मंदिरामध्ये होते. आणि त्यात कीर्तनाच्या वेळेस संताजी आणि संत तुकाराम महाराजांची भेट झाली. त्यावेळी संताजी महाराजांचे वय साधारणता दहा वर्ष होते. आणि तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीच्या मुलाचे नाव संताजीच होते व त्याचा मृत्यू साधारणता वयाच्या दहाव्या वर्षीच झाला होता. म्हणून कुठेतरी त्यांच्या त्या मुलाची आठवण म्हणून आणि संताजींचे कार्य पाहून संताजी व तुकाराम महाराजांचे नाते जुळले असावे असे म्हटले जाते. तेथून पुढे ते  सोळा वर्षे एकमेकांच्या सानिध्यात राहिले.

खुद्द तुकाराम महाराजांचे पंतू गोपाळ महाराज सांगतात की संताजी जगनाडे महाराजांचा सर्वकाळ तुकाराम महाराजांबरोबर गेला. या दोघांच्या वयामधील अंतरही सोळा वर्षांचे होते. तुकाराम महाराज जे सांगतील ते संतांजीसाठी मार्गदर्शक होते, तसेच तुकाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आवडी म्हणजेच जिजाबाई यांचे माहेर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात होते. त्यांचे आडनाव गुळवे होते. तसेच संताजी महाराजांच्या पत्नी यमुनाबाई यांचेही माहेर खेडच होते. म्हणजे तुकाराम महाराज व संताजी जगनाडे महाराज  या दोघांचे सासर एकच होते. तुकारामांच्या गाथेमध्ये ज्यांनी त्यांचे चरित्र लिहिले ते महिपती धाराबादकर यांनी त्यांच्या भक्त लीलामृतमध्ये  तुकाराम महाराजांसंबंधित असलेल्या संताजी महाराजांचा जो संपर्क होता त्या विषयी लिहिताना ते असे सांगतात.

तुकयाच्या संगे वैष्णव जन I श्रेष्ठ निधडे असती कोण कोण II
संताजी तेली बहुत प्रेमळ I अभंग लिहित बसे जवळII

म्हणजेच तुकाराम महाराजांबरोबर निधड्या छातीचे,धाडसी, साहसी  मंडळी सुद्धा होती, की जी मंडळी  धाडसीपणाने त्यांच्यासोबत काम करायचे, टीकाकारांना व विरोधकांना न घाबरता त्यांच्यासोबत काम करायचे आणि त्यामध्ये संताजी जगनाडे महाराज सुद्धा होते. तसेच गाथा बुडवल्यानंतर 18 दिवस तुकाराम महाराजांनी त्याच इंद्रायणीच्या काठावर उपोषण केले व एक प्रकारचा सत्याग्रहच केला. सुरुवातीला न्यायालयाचा आदेश असल्याने कोणीही पुढे यायला तयार नव्हते.

घरातील माणसे सोडली तर कोणीच तुकाराम महाराजांसोबत नव्हते. परंतु निधड्या छातीचे वैष्णव संताजी जगनाडे महाराज हे त्या ठिकाणी त्यांच्यासोबत होते. पाच दिवसानंतर लोकांमध्ये एक जागृती निर्माण होऊन जर संताजी तेथे थांबू शकतात तर आपण का नाही असा विचार करून एक एक माणूस तिथे जाऊ लागला. संताजींनी तेथे परत गाथा लिहिण्यास सुरुवात केली होती. येणाऱ्या लोकांकडे ते त्यांच्याकडे असलेल्या अभंगाची विचारणा करू लागले. तसेच त्यांच्या मुखवत असलेले अभंग लिहू लागले. संताजींनी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता लिखाण चालूच ठेवले. आणि 18 व्या दिवशी त्यांनी लिहिलेली गाथा  तुकाराम महाराजांना अर्पण केली असे म्हटले जाते.

तसेच तुकाराम महाराजांच्या पश्चात पन्नास वर्षे त्यांनी ही गाथा जपली. तिचा संभाळ केला. अनेक संकटे यादरम्यान आली परंतु त्या सर्व संकटांना तोंड देण्याचे काम संताजींनी केले. एवढेच नव्हे तर संताजींचा मुलगा बाळोबा यांनी सुद्धा या गाथेत फार मोठे लिखाण केल्याचे सांगितले जाते. इतिहासात तसे पुरावे आढळतात. काहीजण तर असे म्हणतात की जे लोक तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी जायचे त्यांना  गाथेचे एक एक पान तुकाराम महाराज प्रसाद म्हणून द्यायचे. आणि संताजी ते पुन्हा लिहायचे. खरे तर ही गाथा 8500 अभंगांची होती  असे सांगितले जाते. अनेक अभंग आजही मिळत आहेत व तुकाराम महाराजांचे नवनवीन विचार आपल्याला पहावयास मिळत आहेत.

 म्हणून तुकाराम महाराजांचे सहकार्य करणाऱ्या त्यांच्या पत्नीचे जसे आपल्यावर उपकार आहेत तसेच संताजी महाराजांचे सुद्धा आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांच्या शिष्य बहिणाबाई पाठक यांनी सुद्धा तुकाराम महाराजांच्या चरित्राचा भाग आपल्यापर्यंत पोहोचण्याचे काम केले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी अनेक विषयावर भाष्य केले व लिखाण केले. त्यातील जातीभेदावर कनिष्ठ आणि श्रेष्ठ असा भेदभाव नष्ट करण्याचे काम तुकाराम महाराजांनी केले होते. आणि हेच काम पुढे संत जगनाडे महाराजांनी चालू ठेवले होते. त्यासंबंधी त्यांचा “ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म “असा एक अभंगही प्रसिद्ध आहे.

संतु आणि तुका हे पूर्ण देशाचे असल्याचे मत संत जगनाडे महाराजांनी त्यांच्या अभंगातून मांडले आहे. तसेच त्यामध्ये ते सांगतात की  निसर्गाने निर्माण केलेल्या फक्त दोनच जाती आहेत आणि त्या म्हणजे स्त्री आणि पुरुष आहेत आणि त्या फक्त लिंगावर आधारित आहेत. संताजी पुढे म्हणतात.

मारवाडी मारवाडचा, गुजराती गुजरातचा.
कानडी कानड्याचा, मुसलमान तो दिल्लीचा.
मराठी महाराष्ट्राचा, कोकणी कोकणचा.
  पण संतु तुका या देशाचा.

संत तुकाराम महाराजांच्या चरित्रात एक असा प्रसंग आहे की, तुकाराम महाराज नेहमी वारीसाठी पंढरपूरला जायचे परंतु एकदा आजारी पडल्याने त्यांना जाता आले नाही. त्याची खंत आणि एक निरोप त्यावेळी त्यांनी विठ्ठलाला पत्राच्या माध्यमातून पोहोचता केला. परंतु ज्या लोकांकडे त्यांनी हे पत्र पाठवले त्यांच्यामध्ये संताजी अग्रगण्य होते असे म्हणतात. खरंतर संताजींचा सहभाग तुकाराम महाराजांच्या चरित्रात फार मोठा होता. तुकाराम महाराजांवर न्यायालयाने बहिष्कार टाकण्याचे आदेश दिले असतानाही त्यांच्याबरोबर राहणारे संताजी हे एकमेव होते.

 जगद्गुरु संत तुकाराम महाराजांबद्दल बहिणाबाई लिहितात की “तुकोबांचे हात लिहितात जे जे ते ते सहज पांडुरंग “ अर्थात त्यांना म्हणायचे आहे की तुकारामांचे प्रत्येक अक्षर हे साक्षात पांडुरंग आहे. अशा या महान जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे साथीदार, अभ्यासू, ज्ञानी, प्रेमळ  आणि धाडसी एवढेच नव्हे तर  एवढ्या महान संताबरोबर तब्बल सोळा वर्ष सानिध्यात राहिलेले संत संताजी जगनाडे महाराज होते.

Leave a Comment