संत वामनभाऊ | Sant Vamanbhau

वाचासिद्धी प्राप्त झालेले संतश्रेष्ठ वामनभाऊ ( Sant Vamanbhau ) महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत, सिद्ध पुरुष आणि कीर्तनकार होते. वाचासिद्धी प्राप्त होणे म्हणजे ज्यांच्या तोंडून निघालेले शब्द खरे ठरणे तसेच त्यांना पुढे होणाऱ्या गोष्टींची म्हणजे भूतकाळातील घटनांची चाहूल लागत असे.

रझाकारांच्या जुलमी राजवटीमध्ये चिंचोली तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील गहिनीनाथ गडावरील नाथ मंदिर आणि इनाम मध्ये मिळालेली 103 एकर 13 गुंठे जमीन वामन भाऊ यांनी परत मिळवली होती. संत भगवान बाबा संत वामन भाऊ यांना आपले जेष्ठ बंधू मानत होते. संत वामन भाऊ यांचा जन्म 1 जुलै 1881 मध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील फुलसांगवी या गावामध्ये झाला होता. आई राहीबाई आणि वडील तोलाजी सोनवणे या एका शेतकरी कुटुंबामध्ये वामन भाऊंचा जन्म झाला होता.

माता राहीबाई भाग्याची खाण ।
पिता तोलाजी हा पुण्यवान ।।
पुत्र जन्माला रत्ना समान ।
तयासी शोभे नाव वामन ॥

परंतु वामन भाऊ फक्त 42 दिवसांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले होते. आईच्या जाण्यामुळे त्यांच्या पालन पोषणाची पूर्ण जबाबदारी त्यांच्या आज्जीवर आली होती. त्यामुळे त्यांच्या आज्जीने त्यांचे संपूर्ण संगोपन केले. वामन भाऊवर त्यांचे चुलते तुकाराम बुवा यांचा संसारीक आणि आध्यात्मिक प्रभाव पडला होता. तुकाराम बुवा हे फार धार्मिक होते. हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचन, काकडा आरती आणि भगवंताचे नामस्मरण असा त्यांचा दिनक्रम असे.

संत वामन भाऊ लहानपणापासूनच फार हुशार असल्यामुळे आणि चुलते तुकाराम बुवा यांच्या सतत सानिध्यात राहिल्याने त्याचा लहानपणापासून आध्यात्मिक प्रवास सुरू झाला होता. त्यांच्या गावात शाळेची व्यवस्थीत सोय नसल्यामुळे पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग दोन खोल्यांमध्ये भरत होते. त्यामुळे दोन वर्षांमध्येच वामन भाऊंनी चारही वर्षांचा अभ्यास पूर्ण केला. आणि शिक्षकांना म्हणाले की मला आता चौथी पास झाल्याचे प्रमाणपत्र द्या.

परंतु शिक्षकांची कायदेशीर अडचण असल्यामुळे तसे ते देऊ शकले नाहीत. त्यानंतर वामन भाऊंनी त्यांच्याकडे असलेले जुने ग्रंथ, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा इत्यादींचा भरपूर अभ्यास केला. पुढे त्यांचा विवाह फुलसांगवी गावची विठोबा राख यांची कन्या राहीबाई हिच्याशी झाला होता. एकदा तिथेच एका गावात थोर संत बंकट स्वामी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होता.

संत वामन भाऊ काका तुकाराम भाऊ यांच्यासोबत त्यांच्या कीर्तनाला गेले होते. बंकट स्वामी हे स्वानंद सुख निवासी जोग महाराज यांनी आळंदी येथे उभारलेल्या वारकरी शिक्षण संस्थेचे एक आधारस्तंभ होते. बंकट स्वामींचे भारत भ्रमण चालू असताना जर कोणी त्यांना योग्य तरुण आढळला तर त्याची निवड करून त्याला अध्यात्मिक आणि वारकरी सांप्रदायिक शिक्षणासाठी ते आळंदीला पाठवत असत. तसेच संपूर्ण शिक्षण दिल्यानंतर त्याला परत त्याच्या घरी पाठवत असत.

अशाप्रकारे बंकट स्वामीची कारकीर्द फार प्रसिद्ध होती. अशा या बंकट स्वामींच्या कीर्तनासाठी वामन भाऊ आणि त्यांचे काका गेले होते. या कीर्तनामध्ये बंकट स्वामी यांनी आळंदी मध्ये असलेल्या या वारकरी शिक्षण संस्थे विषयी माहिती दिली होती. ज्यावेळी बंकट स्वामी यांचे कीर्तन संपले त्यावेळी वामन भाऊ यांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले आणि म्हणाले कृपया मला तुमच्या सोबत घेऊन चला आणि तुमच्या आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये माझे नाव घाला असा त्यांनी आग्रह धरला.

वामन भाऊ यांची आध्यात्मिक शिक्षणाची आवड पाहून आणि त्यांची शिक्षणाची तळमळ पाहून बंकट स्वामींनी त्यांना होकार दिला. पुढे वामन भाऊ आळंदीला गेले. आळंदीच्या या वारकरी सांप्रदायिक आणि अध्यात्मिक शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असताना त्यांची संत भगवान बाबा यांच्याशी पहिली भेट झाली. वामन भाऊ हे भगवान बाबा यांच्यापेक्षा मोठे असल्यामुळे भगवान बाबा त्यांना भाऊ म्हणायचे त्यामुळे त्या संस्थेतील संपूर्ण वारकरी वामन भाऊंना भाऊ म्हणू लागले होते.

तेव्हापासून संत वामन हे संत वामन भाऊ या नावाने प्रसिद्ध झाले. पुढे वामन भाऊंचे वारकरी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समाज हितासाठी आणि समाज अवलोकन करण्यासाठी संत वामन भाऊ हे महाराष्ट्र भ्रमण करण्यासाठी निघाले. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण केल्यानंतर ते नारायण गडावर पोहोचले. या ठिकाणी त्यांची अनेक कीर्तने झाली.

त्यानंतर वामन भाऊ जेव्हा गहिनीनाथ गडावर गेले त्यावेळेस गहिनीनाथ गडावर असलेले यादव बाबा यांनी वामन भाऊंची योग्यता पाहून तुम्ही याच ठिकाणी राहा म्हणून आग्रह केला. तसेच पुढे यादव बाबा यांनी गहिनीनाथ गडावर वामन भाऊ यांना आपले उत्तर अधिकारी म्हणून नेमले. यादव बाबांच्या आज्ञेने वामन भाऊ गहिनीनाथ गडाच्या गादीवर विराजमान झाले परंतु यामध्ये अनेक आव्हाने होती. यादव बाबांना व्यवस्थित दिसत नसल्या मुळे बरेच लोक त्याचा फायदा घेत होते.

त्यामुळे काही काळ गहिनीनाथ गड अस्ताव्यस्त झाला होता. गडाच्या पायथ्याशी असलेल्या नाथ मंदिर आणि गडाच्या एकूण 103 एकर 13 गुंठे जमिनीवर येथे राहत असलेल्या एका मुसलमानाने ताबा मिळवला होता. तसेच ही जमीन कसण्यासाठी त्याने त्याचे नातेवाईकही गोळा केले होते. तसेच हे सर्व तेथे गडाच्या जमिनीवर मनमानी कारभार करत होते. त्याबरोबरच आजूबाजूच्या गरीब लोकांना आणि देव भक्तीसाठी येणाऱ्या लोकांना त्रास देत होते.

सर्वप्रथम वामन भाऊंनी या मुजाहिरच्या ताब्यातून जमीन आणि गड सोडण्याचे ठरवले. हे करण्यासाठी त्यांनी कायदेशीर मार्ग अवलंबला. त्यासाठी आवश्यक असलेले सर्व जुने पुरावे वामन भाऊंनी गोळा केले. मंदिराचे हेमाडपंथी बांधकाम, मंदिराची रचना, जुने शिलालेख व त्यासंबंधी इत्यादी पुरावे वामन भाऊंनी गोळा केले होते. हे सर्व पुरावे वामन भाऊंनी पाटोदा तहसील मध्ये जमा केले. त्याकाळी पाटोदा तहसील मध्ये वकील, तहसीलदार, मामलेदार व इत्यादी नोकरदार सर्व मुसलमान होते. तरीसुद्धा वामन भाऊंनी मोठ्या निष्ठेने,आत्मविश्वासाने आणि न घाबरता सर्व पुरावे सादर केले.

कोर्टाच्या तारखेनुसार 2 जानेवारी 1951 रोजी या सर्व प्रकरणाचा निकाल लागला आणि ही संपूर्ण जागा आणि मंदिराचा ताबा वामन भाऊ यांना मिळाला. अशा प्रकारे वामन भाऊंनी गहिनीनाथ गडाची जमीन आणि मंदिर सुरक्षित केले. पुढे हाच मुसलमान वामन भाऊ यांच्याकडे आला आणि म्हणाला आमची परिस्थिती गरिबीची आहे. माझे कुटुंब उपाशी मरेल मला यातील जमिनीचा काही तुकडा द्या. ही वेळ मात्र वामनभाऊ साठी परीक्षेची होती.

वामन भाऊ एवढे प्रेमळ होते की त्यांनी संपूर्ण 103 एकर जमीन कसण्यासाठी त्या मुसलमानाला परत देऊन टाकली. ते म्हणाले माझ्यासाठी हा देव महत्त्वाचा आहे आणि हे मंदिर. या रझाकारांच्या जुलमी राजवटीमध्ये संपूर्ण समाज विकलांग झाला होता. गावोगावामध्ये निरक्षरता,व्यसन आणि अज्ञान याचे थैमान माजले होते. कित्येक गावामध्ये अध्यात्मिकता तर दूरच परंतु साधे एकही मंदिर नव्हते. लोकांमध्ये एकता दिसत नसे. या सर्व गोष्टींचे निरीक्षण करून वामन भाऊंनी प्रबोधन करण्याचे ठरवले.

त्यांच्या कीर्तन, प्रवचन आणि प्रबोधन कार्यक्रमांमध्ये वामन भाऊ मुलांना शाळेत घाला,रूढी परंपरा सोडून द्या, अंधश्रद्धा पाडू नका असे मोलाचे संदेश देत होते व लोकांना संघटित करून एकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. इस 1945 मध्ये डोईठाण गावात तालुका आष्टी जिल्हा बीड येथून त्यांनी पहिला हरिनाम सप्ताह सुरू केला. पुढे जेव्हा संत भगवान बाबा यांच्या विरोधात कट कारस्थाने रचली गेली, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी नाराज होऊन संत भगवान बाबा नारायण गड सोडून धौम्य गड म्हणजे धुम्या डोंगरावर आले.

त्यावेळी संत भगवान बाबा यांना प्रोत्साहन देण्यासाठी संत वामन भाऊ भगवान बाबांच्या भेटीला गेले होते. झालेल्या प्रकाराबद्दल वामन भाऊंनी भगवान बाबांचे सांत्वन केले. तसेच भगवान बाबांना त्यांनी आशीर्वाद दिला की तू स्वतः लक्ष्मीपुत्र आहेस. तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. त्यानंतर स्वतः भगवान बाबांनी भगवान गडाची उभारणी केली. वामन भाऊ यांना तसेच भविष्यात घडणाऱ्या घटनांची चाहूल लागत असे. अशी अनेक उदाहरणे आहेत.

यामधील एक उदाहरण म्हणजे ज्यावेळी वामन भाऊंचे गुरु बंकट स्वामी समाधी घेणार आहेत हे त्यांना माहीत नसताना सुद्धा देखील शेवटच्या क्षणी वामन भाऊ त्या ठिकाणी पोहोचले आणि शेवटची मांडी वामन भाऊंनी त्यांना दिली. तसेच वामन भाऊ पोहोचल्यानंतर बंकट स्वामी यांनी आपला देह ठेवला.

अशा अनेक घटनेवेळी अनेक उदाहरणांमधून भविष्यात घडणाऱ्या घटना विषयी वामन भाऊ यांना चाहूल लागायची हे दिसून येत होते. तसेच संत वामन भाऊ यांच्या वाचा सिद्धीचीही अनेक उदाहरणे आहेत. त्यातील एक उदाहरण म्हणजे भगवान बाबा ज्या वेळी नारायण गडावरून धौम्य गडावर आले होते त्यावेळी त्यांची भेट घेतल्यानंतर संत वामन भाऊ यांनी भगवान बाबांना आशीर्वाद देऊन तू लक्ष्मीपुत्र असल्याने तुला काहीच कमी पडणार नाही असे सांगितले होते.

त्याच प्रमाणे भगवान बाबांनी भगवानगडाची निर्मिती करत असताना कशाचीच कमी पडली नाही. सर्वसामान्य लोकांनी भगवान गड बांधण्यासाठी मदत केली. अशाप्रकारे संत वामन भाऊ यांच्या वाचासिद्धी ची प्रचिती येते. पुढे संत वामन भाऊ यांनी 24 जानेवारी 1976 रोजी आपला देह ठेवला. त्यांचे “संत वामनभाऊ जीवन कार्य” नावाचे चरित्र पुस्तक प्रकाशित झालेले आहे.

Leave a Comment