संत तुकाराम महाराज | Sant Tukaram Maharaj

पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीच्या काठी वसलेल्या देहू नावाच्या गावात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा ( Sant Tukaram Maharaj ) जन्म झाला होता. असे स्वतः संत तुकाराम महाराज यांनी लिहून ठेवलेले आहे. संत तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज विश्वंभर बाबा हे होते.

हे विश्वंभर बाबा संत ज्ञानदेव आणि संत नामदेव यांच्या समकालीन होते. तसेच त्यांचे जवळचे स्नेही होते आणि त्यांनी वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसारासाठी त्यांच्या सोबत काम केले होते. विश्वंभर बाबाची पांडुरंगा वरची निष्ठा पाहून स्वतः पांडुरंगांनी देहूला येण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला याच विश्वंभर बाबांनी देहू मध्ये इंद्रायणी काठी पांडुरंगाची मूर्ती स्थापन करून सध्याचे विठ्ठल मंदिर बांधलेले आहे.

येथूनच देहूमध्ये पांडुरंगाच्या भक्तीची परंपरा सुरू झाली.विश्वंभर बाबाला दोन मुले हरी आणि मुकुंद होते. हे दोघे वारकरी संप्रदायातून राजदरबारी गेले आणि युद्ध सेनेमध्ये सामील झाले होते. या दोघांचे एका युद्धामध्ये निधन झाले. परंतु विश्वंभर बाबांची पत्नी अमाबाई हिला विठ्ठलदृष्टांत झाला की, मी तुमच्यासाठी पंढरपूर सोडून देहूला आलो आणि तुम्ही राज दरबारी आश्रय घेता हे काही बरोबर नाही.

त्यामुळे अमाबाई आपल्या उर्वरित कुटुंबीयांसहित देहू ( Dehu ) गावात राहायला आल्या. यातील मुकुंदाची पत्नी सती गेली होती आणि हरीची पत्नी गरोदर होती तिला मुलगा झाला त्या मुलाचे नाव विठ्ठल ठेवण्यात आले होते.अशा प्रकारे विश्वंभर बाबा – हरी – विठ्ठल- पदाजी – शंकर – कान्होबा -बोल्होबा आणि संत तुकाराम महाराज अशी त्यांची वंशावळ होती. कान्होबा हे नाव पुन्हा तुकाराम महाराजांच्या भावाला ठेवण्यात आले होते. बोल्होबा यांना सावजी, तुकोबा आणि कान्होबा अशी तीन मुले होती.

बोल्होबांच्या पत्नीचे म्हणजे तुकाराम महाराजांच्या आईचे नाव कणकाई असे होते. तुकोबांच्या आई देहू जवळील लोहगावच्या होत्या. तुकाराम महाराजांना आजोबाचा फार लळा होता. त्यामुळे तुकाराम महाराजांची बरीचशी कारकीर्द लोहगावला झाली होती.तसेच तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नी त्यांच्या आजोळच्या म्हणजे लोहगावच्या होत्या. तुकाराम महाराजांचे कुटुंब शिक्षित, क्षत्रिय, श्रीमंत, धार्मिक आणि सुसंस्कृत होते. त्यांच्याकडे शेतीवाडी, सावकारी, व्यापार आणि महाजनकी होती त्यामुळे एकूणच हे कुटुंब समृद्ध होते. शेतीवाडी होती म्हणून कुणबी म्हणायचे, व्यापार करत होते म्हणून वाणी म्हणायचे.

पुढे सगळेच सोडून दिले म्हणून त्यांना गोसावी म्हणायचे.त्यांचे कुळणाव आंबिले होते व आडनाव मोरे होते. ज्या काळी गीता लिहिली गेली त्याकाळी क्षत्रिय आणि ब्राह्मण उच्च वर्गीय होते तसेच वैश्य आणि शूद्र हे शूद्र समजले जायचे. परंपरेच्या समाजकंटकांनी क्षत्रीयांना सुद्धा त्या काळात शुद्रामध्ये टाकले होते. त्यामुळे तुकोबा स्वतःला शूद्र म्हणून घ्यायला लागले होते. त्यांच्या अनेक अभंगांमध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख शूद्र म्हणून केला आहे. त्या काळात दक्षिणेमध्ये मुसलमान सत्तेचा अंमल होता.

विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही या तीन दक्षिण भारतावर राज्य करीत होत्या. त्यापैकी आळंदी आणि देहू या परिसरावर आदिलशहाचे म्हणजे बिजापूरच्या राजाचे राज्य होते त्यामुळे समाज धर्महीन झाला होता. सगळीकडे अंधाधुंदी चालली होती. अशा काळात तुकाराम महाराजांचा जन्म सोमवार दिनांक 21 जानेवारी इस 1608 मध्ये झाला होता.

तुकाराम महाराज 22 वर्षांचे असताना छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले होते. आणि तुकाराम महाराज गेले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज 18 -19 वर्षाचे होते. श्रीमंत घरी जन्माला आल्यामुळे संत तुकाराम महाराजांचे बालपण अत्यंत लाडाकोडात गेले. वडील बल्होबांनी त्यांना धर्म आणि व्यवहाराचे शिक्षण दिले होते, घरातील थोरला मुलगा सावजी हा सर्व कारभार पाहत होता.

पुढे हळूहळू त्याचा संसारातून जीव उडाला म्हणून कुटुंबाच्या कारभाराची जबाबदारी तुकाराम महाराज यांच्यावर आली होती आणि याच कारणामुळे तुकोबांचे लग्न वयाच्या तेराव्या वर्षी करण्यात आले. त्यांचा लोहगाव मधील त्यांच्या मामाची मुलगी रुक्मिणी हिच्याशी पहिला विवाह झाला. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी चालवत असताना त्यांची कीर्ती, कौतुक आणि नावलौकिक झाला. अशातच अचानक त्यांच्यावर संकटे येण्यास सुरुवात झाली. त्यांची पहिली पत्नी रुक्मिणी दम्याच्या त्रासामुळे मरण पावली.

म्हणून त्यांचा दुसरा विवाह पुण्यातील सावकार आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाबाई हिच्याशी झाला. अतिशय चांगला संसार चालू असताना पुढे लगेच वडील बोल्होबा यांचे निधन झाले. पुढे एक वर्षांनी आई कनकाईचे निधन झाले. त्याच वर्षी सावजीच्या पत्नीचेही निधन झाले त्यामुळे सावजी निराश होऊन तीर्थयात्रेचे निमित्त करून घराबाहेर निघून गेले ते पुन्हा आलेच नाहीत. परंतु तरीही तुकोबांनी धीर सोडला नाही. घरातला कर्तुत्ववान माणूस म्हणून त्यांनी पुन्हा एकदा आयुष्य उभा करण्याचा प्रयत्न केला.

परंतु वयाच्या 21व्या वर्षी त्यांना महाभयंकर दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागला. 1629, 1630 आणि 1631 महाभयंकर दुष्काळ पडला होता. शिवाय हा दुष्काळ पुढे अनेक वर्षे राहिला.या दुष्काळाचे वर्णन रामदास स्वामीं आणि परदेशातून भारतात आलेल्या काही जणांनी केलेले आहे. या दुष्काळात माणसे माणसाचा जीव घेत होते, ब्राह्मण चोरी करू लागले होते, माणसाच्या आणि जनावरांच्या प्रेताचे खच दिसत होते.अशा प्रकारचे वर्णन श्री रामदास स्वामी यांच्या साहित्यात मिळते.

असा दुष्काळ सावकारांना फार आवडतो परंतु तुकाराम महाराजांनी या दुष्काळात गरिबांसाठी आपल्याकडे होते नव्हते तेवढे वाटून दिले. इतर सावकारांप्रमाणे गरिबांच्या अडचणीचा फायदा घेण्याची त्यांची वृत्ती नव्हती त्यामुळे त्यांच्याकडे होते नव्हते ते सगळे संपले त्यांच्याकडील सगळे संपल्यानंतर मात्र त्यांच्या संसाराची वाताहत झाली. त्यांना कोणी उसनेवारी आणि कर्जही देत नसे. मग हे 21माणसांचे कुटुंब सांभाळायचे कसे. शिवाय संत तुकाराम महाराजांना महादेव, विठोबा, नारायण आणि भागुबाई अशी चार अपत्य होती. नातेवाईकांकडून तुकोबांची चेष्टा होऊ लागली होती कारण भरपूर शेतीवाडी आणि संपत्ती असून सुध्दा त्यांना व्यवस्थित संसार करता आला नाही.

म्हणून तुकोबा चिंतन करू लागले. पुढे ते भामनाथ च्या डोंगरावर कठोर तपश्चर्या करू लागले. पंधरा दिवस ते घरी गेलेच नाहीत. त्याच काळात त्यांना साक्षात्कार झाला. इस 1632 मध्ये सुफी संत बाबाजी चैतन्य उर्फ शेख शहाबुद्दीन मान्यहाळ यांनी स्वप्नामध्ये येऊन तुकाराम महाराजांना साक्षात्कार रुपी आदेश देऊन तुकारामांचे शिष्यत्व पत्करले आणि ते त्यांचे गुरु झाले. पुढे हळूहळू दुष्काळ निघून गेला परिस्थिती बदलली परंतु तुकारामांची मनस्थिती बदलत नव्हती. त्यांना परलौकिकाचा नाद लागला होता.

ते पुन्हा लौकिकामध्ये येण्यास तयार नव्हते. लोकांना दिलेली स्वतःच्या वाट्याची कर्ज खतं त्यांनी इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकले. छोटा भाऊ कान्होबाला मात्र त्याची कर्ज खते देऊन टाकली. बारा वर्षांच्या दुष्काळात जे काही भंगलेले देऊळ शिल्लक होते त्याची पुनर्बांधणी करण्यासाठी त्यांनी राहिलेले पैसे वापरले आणि पूर्ण वेळ कथा, किर्तन,ध्यान, मनन, चिंतन यामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतले.

तसेच ते भंडारा डोंगरावर जाऊन पुरातन ग्रंथांचा अभ्यास करू लागले. अशाप्रकारे निसर्गाच्या आणि परमेश्वराच्या सानिध्या मध्ये त्यांनी आपला जीव ओतला. त्यानंतर त्यांना संत नामदेव आणि विठ्ठल यांचा साक्षात्कार झाला की, तू आता अभ्यास बंद कर. तू आता परमेश्वराचे ध्यान आणि चिंतन करत झालेल्या अभ्यासातून, ध्यानधारणेत आणि ईश्वर सेवेतून तुला जगण्याचा साक्षात्कार झालेला आहे. .आता तू अभंग आणि कविता लिहिण्यास सुरवात कर मग तुकोबारायांनी अभंग लिहिण्यास सुरुवात केली.

संत नामदेवांना शंभर कोटी अभंग लिहायचे होते परंतु त्यांच्याकडून ते झाले नाही. त्यांनी दृष्टांतातून तुकाराम महाराजांना आदेश दिला कि उरलेले लिखाण कार्य आता तू पूर्ण कर.पुढे तुकारामांचे अभंग लिहिणे तर चालू होतेच त्याबरोबर लोकांना सुद्धा साक्षात्कार मिळावा यासाठी ते कीर्तन आणि प्रवचनातून लोकांना उपदेश करत होते. असेच एकदा आळंदी मध्ये कीर्तन करत असताना रामेश्वर भट्ट तुकोबारायांच्या मुखी वेद ऐकून फार संतापले. तुकोबांची प्रसिद्धी ऐकून रामेश्वर भटांना ते सहन होत नव्हते. ते म्हणाले तू वेदांचा उच्चार करायचा नाही कारण तू शूद्र आहेस .

तुकाराम महाराज म्हणायचे स्वतः विठ्ठलच माझ्याकडून हे बोलून घेत आहे. रामेश्वर भट्ट म्हणाले तुझे हे सर्व काव्य तू पाण्यामध्ये बुडवून टाक. जर पांडुरंगाची तुझ्यावर खरंच कृपादृष्टी असेल तर पाण्यातही तुझे लिखाण नष्ट होणार नाही आणि खरोखर तसेच घडले. तुकाराम महाराजांनी स्वतः लिहिलेल्या अभंगाच्या सर्व वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकल्या. तसेच त्यांनी त्या दुःखापोटी तेरा दिवस उपोषण केले.

हे 1645 मध्ये घडले होते. तुकाराम महाराज ( Tukaram Maharaj ) उपोषणाला बसल्यानंतर रामेश्वर भट्ट यांच्या देहाच्या लाह्या झाल्या. तेराव्या दिवशी खरोखर तुकाराम महाराजांनी लिखाण केलेल्या वह्या पाण्यावर तरंगून वर आल्या तिथून पुढे रामेश्वर भट्ट यांनी तुकोबा पुढे शरणागती पत्करली आणि ते देहूत राहू लागले व तुकाराम महाराजांची भक्ती करू लागले.असेच एकदा दोन संन्याशी तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला लोहगाव मध्ये आले होते. त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा रामेश्वर भट्ट सारखी तुकाराम महाराजांची पुण्याच्या दादोजी कोंडदेव यांच्याकडे तक्रार केली कि, हा शूद्र माणूस वेदांचे ज्ञान लोकांना सांगतो म्हणून त्यांना शिक्षा द्या.

मग दादोजी कोंडदेव यांनी तुकाराम महाराजांना बोलावून घेतले. तुकाराम महाराजांचे पुण्यामध्ये कीर्तन केल्यानंतर दादोजी कोंडदेव त्यांचे शिष्य झाले. त्यांनी उलट त्या ब्राह्मणांना शंभर रुपये दंड ठोठावला.
असेच एकदा बीडचा देशपांडे म्हणून व्यक्ती आळंदीला ज्ञानेश्वरांच्या चरणी लीन होऊन साक्षात्काराची मागणी करत होता. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला दृष्टांत दिला कि तू देहूला जाऊन तुकाराम महाराजांची भक्ती कर. बहिणाबाई आणि संत निळोबा हे दोन ब्राह्मण संतांनी देखील तुकाराम महाराजांचे शिष्यत्व मिळवले होते. सुरवातीच्या काळात तुकाराम महाराजांना त्या काळच्या कर्मठ ब्राह्मणांनी खूप त्रास दिला परंतु नंतर ब्राह्मणांनीच त्यांना संतपुरुष म्हणून मान्यता दिली.

तसेच संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीत सुद्धा तुकारामांनी त्यांच्या भेटवस्तू स्वीकारल्या नाहीत. उलट त्यांनी शिवाजी महाराजांना जनतेच्या हितासाठी या धनाचा उपयोग करण्यास सांगितले. पुढे वयाच्या 42 व्या वर्षी 19 मार्च सोळाशे पन्नास मध्ये तुकाराम महाराजांचे निर्वाण झाले. समकालीन अभ्यासकांनी लिहून ठेवले आहे की संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले.

तसेच स्वतः तुकाराम महाराजांनीही असेच लिहून ठेवले आहे. शेवटी रामेश्वर भट्ट यांनी सुद्धा संत तुकाराम महाराज यांचे थोर महात्म्य अभंगातून वर्णिले आहे. एवढेच नव्हे तर तुकाराम महाराजांना प्रथम जगद्गुरु रामेश्वर भट्ट म्हटले होते. त्याचप्रमाणे रांगडे आणि भांडारकर या दोन थोर पुरुषांनी तुकाराम महाराजांना जगद्गुरु म्हणून संबोधले आहे. तसेच चित्रे यांनी तुकाराम कसे जगद्गुरु आहेत हे सिद्ध करून दाखवले आहे. तसेच बहिणाबाई आणि इतर अनेक संत थोर महात्म्यांनी तुकोबारायांची स्तुती केलेली आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगाशिवाय कीर्तन होऊच शकत नाही असे मोरोपंतांनी सांगितले आहे. तसेच संत निळोबाराय यांनी तर तुकाराम महाराजांच्या स्तुतीत एक ग्रंथ लिहिला आहे.

संत एकनाथ महाराजांच्या वंशजानी सुद्धा संत तुकाराम महाराजांची स्तुती केलेली आहे. पंडित कवी रंगनाथ स्वामी यांनीही तुकाराम महाराज किती मोठे आणि इतर संतांपेक्षा कसे वेगळे आहेत हे सांगितलेले आहे. एवढेच नव्हे तर इतर धर्मांच्या संतांनी सुद्धा तुकारामांचे गुणगान गायले. आजही तुकाराम महाराजांचे अभंग आणि चरित्र अभ्यासल्याशिवाय अध्यात्मातील अभ्यास पूर्ण होत नाही आणि कीर्तनकार सुद्धा कीर्तनकार होऊ शकत नाही.

1 thought on “संत तुकाराम महाराज | Sant Tukaram Maharaj”

Leave a Comment