( अभंग क्रमांक – 1521, 1092, 3726, 3687, 3877 )
अभंग ( Abhang )
एक एका साह्य करू । अवघे धरू सुपंथ ।।१।।
कोण जाणें कैसी परी। पुढे उरी ठेवितां ।।२।।
अवघे धन्य होऊं आतां । स्मरविता स्मरण ||३||
तुका म्हणे अवघी जोडी। ते आवडी चरणांची ।।४।। १५२१
अर्थ – अहो जन हो तुम्ही व आम्ही (सर्वजण) मिळून एकमेकांच्या साह्याने चांगली वाट धरूया. नाहीपेक्षा म्हातारपणी तरी परमार्थ करू, देवाचे नामस्मरण करू.जर कांही कसर ठेवली तर असा प्रकार होईल कि आयुष्य शिल्लक राहील किंवा नाही.कोण जाणे? म्हणून नामस्मरण करविणारा व करणारा असे मिळून आता सर्व धन्य होऊं तुकाराम महाराज म्हणतात विठोबारायांचे चरणांची आवड धरण्याने सर्व काही प्राप्त होते.
चिंतन– तुकोबांनी साधकांकरीता, भक्तांकरीता लिहिलेला अभंग दिसतो. या अभंगाचे एक विशेषत्व जाणवते. अभंगात तीन चरणांत अवघा शब्द आहे.
१) “अवघे” धरू सुपंथ
२) “अवघे” धन्य होऊ जाता
३) तुका म्हणे “अवघी” जोडी
संतांचा अवघा शब्द आवडता आहे.
अभंग
कंठी राहो नाम । अंगी भरोनिया प्रेम ।।१।।
ऐसे द्यावे कांही वान। आलो पतित शरण ।।२।।
संताचिये पायीं । ठेवि वेळोवेळा डोई ।।३।।
तुका म्हणे तरे । भवसिंधु एकसरे ।।१०९२
अर्थ– देवा तुमचे नाव माझ्या कंठात रहावे व त्याविषयीचे प्रेम शरीरात भरलेले असावे. अशी काही देणगी द्या मी पातकी सुद्धा तुम्हाला शरण आलो आहे. संताच्या पायावर मी वेळोवेळी मस्तक ठेवीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात एका तडाख्यात मी संसार सागरातून तरून जावे.
चिंतन -महाराज, देवाकडे दान मागतात. जे कायम दिले जाते त्यास दान म्हणतात. संत देवाकडेच मागतात, देवच मागतात टिकावू मागतात व अतिशय विनयाने मागतात कि
आम्ही पतीत आहोत.
अभंग
पाहतां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ||१||
करिती नामाचे चिंतन । गडी कान्होबाचे ध्यान ।।२।।
आली चावी डाई। धांवे वळत्या मागे गायी ।।३।।
एके ठायीं काला । तुका म्हणे भाविकाला ।।४।। ३७२६
अर्थ– देव हा गोपाळांचे उचिष्ट म्हणजे त्यांचे उष्टे त्यांच्या देखत खात आहे. कान्होबाचे गडी श्रीहरीच्या नामाचे चिंतन व ध्यास करतात. संत तुकाराम महाराज म्हणतात कि,आलेला डाव खेळावा व गाईचे रक्षणही करावे. तुकाराम महाराज भाविकांना म्हणतात, हरि व तुम्ही एका ठिकाणी काला करा.
चिंतन – श्रीकृष्णांनी तीन ठिकाणी चरित्र केले अर्थात गोकुळात असताना ! घरात, गांवात व रानात, तीन भावात, सख्य, वात्सल्य व माधुर्य.
घरात – आईवडिलांच्या बरोबर वात्सल्यभाव
गांवात – गौळणीबरोबर माधुर्यभाव
रानांत – गोपाळाबरोबर सख्यभाव
गौळणींना रासक्रीडेनिमित्ताने सुख दिले व गोपाळांना काल्याच्या निमित्ताने सुख दिले.
काल्यामध्ये गौळणी नाहीत व रासक्रिडेमध्ये गोपाळ नाहीत. अधिकार परत्वे विभाग केले. अर्थात गोपाळ, सवंगडी हे सख्यभावाचे अधिकारी आहेत. गोपाळ श्रीकृष्णाचे मित्र होते. त्यात प्रमुख आठ होते. १) अर्जुन २) उज्वल ३) सनंदन ४) मधुमंगल ५) श्रीदामा ६) सुबल ७) गंधर्व ८) स्तोककृष्ण, या आठ पैकी दोन अति जवळचे होते मधुमंगल व श्रीदामा.
अभंग
उपजोनिया पुढती येऊं। काला खाऊं दहीभात ।।१।।
वैकुंठी तो ऐसे नाही । कवळ कांही काल्याचे ।।२।।
एकमेका देऊ मुखीं । सुखी घालूं हुंबरी ।।३।।
तुका म्हणे वाळवंट । बरवे नीट उत्तम ।।४।। ३६८७
अर्थ – संत तुकाराम महाराज म्हणतात उपजुनी पुढती येऊ म्हणजे पुन्हा जन्म घेऊन व पुन्हा दहीभाताचा काला खाऊं अशा प्रकारच्या काल्याचे घास वैकुंठातसुद्धा नाहीत. ते एकमेकांच्या तोंडामध्ये देऊन सुखाने हुमहुम (आरडाओरड) करून खाऊ . तुकाराम महाराज म्हणतात काल्याला यमुनेचे, चंद्रभागेचे, इंद्रायणीचे किंवा गोदावरीचे वाळवंट हे उत्तम स्थळ आहे. अशा ठिकाणीच काल्याच्या ह्या कार्यक्रमाला पुन्हा येऊ.
चिंतन – तुकोबारायांनी या अभंगात काल्याचे महत्व सांगितले आहे. वारकरी सांप्रदायात काल्याच्या कीर्तनचे विशेष महत्व आहे. हे कलशस्थानी आहे. ज्याप्रमाणे मंदिराच्या कळसाचे काम झाले म्हणजे मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. तसे काल्याच्या कीर्तनाने सप्ताह सोहळ्याची सांगता होते. या काल्याचे महत्त्व सांगताना महाराज म्हणतात. असा काला वैकुंठातही मिळत नाही.
अभंग
कृष्णाचिया सुखें भूक नाही तहान । सदा समाधन सकळांचे ।।१।।
कळलेचि नाही झाले किती दिस । बाहेरील वास विसरली ।।२।।
विसरू कामाचा तुका म्हणे झाला । उद्वेग राहिला जावे यावे ||३||३८७७
अर्थ – श्रीकृष्णाच्या सुखाच्या योगाने तहानभूक नाहीसी होउन ते सर्वही सर्वकाळ समाधानामध्ये राहिले. एवढे समाधान श्रीकृष्णाच्या नामस्मरणात आहे. कृष्णाच्या स्मरणात किती दिवस झाले हेही त्यांना समजले नाही व बाहेरचे सर्व विषय ते विसरले. तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या नामस्मरणात त्यांना कामाचा विसर होऊन त्यांची जन्ममरणांची चिंता नाहीसी झाली.
चिंतन – या तीन चरणाच्या अभंगात महाराज श्रीकृष्ण सुखाचे सहा पैलू सांगतात.
१) ज्यांना श्रीकृष्ण सुख मिळाले त्यास तहानभूक लागत नाही.
२) गोकुळातील सर्वांना हे सुख मिळाले.
३) कृष्ण सुखात किती दिवस जातात ते कळत नाही.
४) या सुखामुळे विषयांचा, शरीराचा विसर पडला आहे.
५) कृष्णसुखामुळे कामाचा व इतर दोषांचा विसर पडतो.
६) ज्यांना कृष्ण सुख मिळाले त्यांचे जन्ममरण संपते.
कृष्णसुखाच्या प्रथम सुखाचा, संसारीक सुखाचा, उच्च सुखाचे चिंतन करावे लागेल म्हणजे कृष्णसुखाची महती कळेल. अशी महाराजांनी सुखाची व्याख्या सांगितली आहे.
👌👌