( अभंग क्रमांक- 233 , 1810 , 2523 , 3290 , 392)
अभंग (Abhang)
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ।।१।।कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू । उतरी पैलपारू भवनदीचा ।।२।।कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ।।३।।तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीव ।।४।।२३३
अर्थ- कृष्ण माझी आई, बाप, बहिण, भाऊचुलता आहे. माझा गुरु कृष्ण, मला तारणारा कृष्ण, संसार सिंधुतून पार पाडणारा कृष्णच आहे. माझे मन कृष्ण, जन कृष्ण, सोयरा मित्र कृष्णच आहे. संत तुकाराम म्हणतात कृष्ण हेच माझे सर्व काही आहे . कृष्णाच्या चरणाशीच मला विश्रांतीची अनुभूती येते. ह्याला जीवापासून वेगळे करू नये असे मला वाटते.
चिंतन – तुकोबाराय या अभंगात देवाबद्दल आपलेपण दाखवितात. माझा शब्द अभंगात ९ वेळा आहे. वास्तविक तुकोबांनी म्हणायला पाहिजे होते. कनकाई माझी माता, बोल्होबा माझा पिता । याचे कारण संतांचे हृदय हे आकाशाएवढे व्यापक असते. किंबहुना ज्याचे हृदय व्यापक त्यांनाच संत म्हणावे. संसारी माणसांचे जीवन अति संकुचित असते. ते आई-वडिलांना पण माझे म्हणत नाहीत तर माझी बायको, माझी मुलं, मुलं पण म्हणतात पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची मम्मी माझ्या पप्पाची.
अभंग -घेईन मी जन्म याजसाठी देवा । तुझी चरणसेवा साधावया ।।१।। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन। घालू लोटांगण महाद्वारी ।।२।। आनंद निर्भर असो भलतेठायी। सुखदुःखा नाही चाड आम्हा ।।३।। आणीक सायास न करी न घरी आस। होईन उदास सर्वभावे ।।४।।मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी। होय सांगो तैसी तुका म्हणे ।।५।।१८१०
अर्थ – हे देवा तुमची चरणसेवा साधण्याकरीता मी जन्म घेईन, हरिनामाचे कीर्तन व संपूजन करुन तुमच्या महाद्वारी लोटांगण घालीन, आनंदाने परिपूर्ण भरलेले आम्ही कोठेही बाधा वैषयिक सुखदुःखाची आम्हाला चाड नाही. दुसरे काही उपाय करणार नाही व स्वीपुर धनादिकांची इच्छा करणार नाही, सर्व भावाने त्याविषयी म्हणजे संसाराविषयी उदासीन राहीन. तुकाराम महाराज म्हणतात. मोक्ष हा आमच्या घरी आम्ही जसे सांगू तसे काम करनारी दासी होईन.
चिंतन- या अभंगात महाराज प्रतिज्ञा करतात अथवा संकल्प करतात कि . प्रतिज्ञा करण्याचा अधिकार सर्वांना आहे. माणसेच तीन प्रकारची असल्यामुळे प्रतिज्ञा तीन प्रकारच्या होऊ शकतात, तामस, राजस, सात्विक तसेच (अतिसात्विक व अतितामस)
१) दुर्योधनाने प्रतिज्ञा केली होती, पांडवांना सुईच्या अग्रावर राहील एवढी माती देणार नाही, पण तो मातीत मिळाला. सिकंदर, हिटलर नेपोलियन वगैरे या वर्गात मोडतात , जग जिंकण्याची महत्त्वकांक्षा होती पण हे असेच मेले. २) रावणाने चार प्रतिज्ञा केल्या होत्या. १) सगळे देव बंदीखान्यात घालायचे २) लंका सोन्याची करायची ३) येथून स्वर्गास शिडी लावायची ४) समुद्राचे खारे पाणी गोड करायचे . पण शेवटी रावणाचा सर्वनाश झाला.
अभंग – क्षणक्षणा हाचि करावा विचार l तरावया पार भवसिंधू ।।१।। नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ।।२।।संतसमागमें धरूनि आवडी l करावी तातडी परमार्थाची ।।३।l तुका म्हणे इहलोकींच्या वेव्हारे l नये डोळे धुरे भरूनि राहो ।।४।। २५२३
अर्थ – भवसमुद्रामध्ये बुडालेल्या लोकांनी पलीकडे जाण्याचा विचार वारंवार करावा, तो असा कि हा देह नाशिवंत असून कधीतरी लयास जाणारा आहे. याचे आयुष्य काळ खातो म्हणून सावध व्हावे. संतसंग धरण्याची प्रीति धरुन परमार्थ साध्य करुन घेण्याची लगबग करावी. तुकाराम महाराज म्हणतात, ऐहिक प्रपंच व्यवहाराच्या मस्तीने अंध (अविचारी) होऊन राहू नये.
चिंतन– तुकोबारायांचा हा फार प्रसिध्द अभंग आहे. या अभंगात महाराज उपदेश करतात, माणसाने सतत विचार करावा, इतर पशु-पक्षापेक्षा माणसांचा मेंदू मोठा आहे. या मेंदूत सात कोटी तंतू आहेत, प्रत्येक तंतूत एक कोटी स्मृती साठविण्याची क्षमता आहे. असे शास्त्रज्ञांचे मत आहे. माणसाचा जन्मच डोक्याकडून झाला आहे, म्हणून कोणतेही कार्य करतांना प्रथम विचार करावा व नंतर काम करावे. खातांना विचार करावा आपण काय, कोणाचे, कसे, कुठे खातो आहे. याचापरिणाम काय होईल, तसेच पहातांना, ऐकतांना, बोलताना, जातांना, हाताने काम करतांना विचार करावा.म्हणजे पश्चात्ताप, दुःख होणार नाही, मानव विचार प्रधान प्राणी आहे. विचारामुळे मानवाचा मोठा विकास झाला आहे. विचारामुळे जीवन घडते. अविचारामुळे जीवन बिघडते.
पिकलिया सेंद कडुपण गेलेl तैसे आम्हा केले पांडुरंगे ।।१। काम क्रोध लोभ निमाले ठायीचि । सर्व आनंदाची सृष्टि झाली।। आठव नाठव गेले भावाभाव। झाला स्वयंमेव पांडुरंग ॥३॥ तुका म्हणे भाग्य या नांवे म्हणीजे । संसारी जन्मीजे याचि लागी॥४॥ ३२९०
अर्थ– शेंदाडे पिकली असतां त्यातील कडुपण जाते, तशी आमची स्थिती पांडुरंगांनी केली आहे. आमच्या देहाच्या ठिकाणी काम, क्रोध, लोभ हे विकार होते ते जागच्या जागी मेले. म्हणून आम्हांला सर्व सृष्टि आनंदरूप झाली आहे. देहादि प्रपंचाचा आठव आणि त्याविषयीच्या अनाठव विस्मरण व तत्संबंधी भावाभाव हे सर्व नाहींसे होऊन माझा देह प्रत्यक्ष पांडुरंग स्वरूप झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशी जीवदशा नष्ट होउन ब्राह्मी स्थिति ज्याला प्राप्त होईल त्यालाच भाग्यवंत म्हणावे व ह्याकरिताच संसारात जन्म घ्यावा.
चिंतन– तुकोबारायांचा हा स्थितीपर अभंग आहे. मानव जन्म मिळून आम्ही वैष्णवांनी काय साधले , कोणती दशा, अवस्था आम्हास प्राप्त झाली याचे वर्णन महाराज करतात, चार चरणांचा अभंग आहे. हे अभंग म्हणजे राजवाडे आहेत. राजवाड्यास चार दरवाजे असतात. पूर्व, पश्चिम, दक्षिम, उत्तर, कोणत्याही प्रवेश द्वारातून राजवाड्यात प्रवेश करता येतो. तद्वत न्यायाने कोणत्याही चरणांतून अभंगात प्रवेश करता येतो. अर्थात ही वक्त्याची हातोटी असते. आम्ही भाग्यवान आहोत असे चौथे चरण आहे. भाग्याचे तसे तीन प्रकार पडतात. सर्व संतांनी, वेदांनी, शास्त्रांनी सांगितले आहे की मनुष्यजन्म मिळणे हे मोठे भाग्य आहे.
अभंग -कृपावंत किती । दीन बहु आवडती ।।१।। त्यांचा भार वाहे माथां । करी योगक्षेम चिंता ।।२।। भुलो नेदी वाट l करीं धरूनि दावी नीट ।।३।।तुका म्हणे जीवे । अनुसरल्या एका भावे ।।४।। ३९२
अर्थ- देव हा भक्ताविषयी एवढा कृपाळू आहे, की त्याला आपले दीन भक्त फार आवडतात त्यांचा सर्व संसाराचा भार आपण घेऊन त्यांच्या योगक्षेमाची तो काळजी करतो. ते एखादे वेळी चुकभुलीनें परमार्थाचा मार्ग सोडून आड वाटेने जाऊ लागले तर तो त्यांना हात धरून सरळ मार्ग दाखवितो. तुकाराम महाराज म्हणतात देव आपल्या ठिकाणी एकनिष्ठपणानें अनुसरलेल्या भक्तांच्या ह्या सर्व गोष्टी करतो.
चिंतन – देवाचा स्वभाव सांगणारा हा अभंग आहे. देवाचा स्वभाव कृपाळू आहे. स्वभाव त्याला म्हणतात जो बदलत नाही. आपली म्हण आहे स्वभावास औषध नाही.