परिवर्तनाची पेरणी करणारे समाज सुधारक, क्रांतिकारी युग पुरुष, आणि अध्यात्मिक गुरु संत सेवालाल महाराज ( Sant Sevalal Maharaj ) यांचे कार्य फक्त बंजारा समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण मानव जातीला प्रेरक ठरतील असे होते.संत सेवालाल महाराजांचा जन्म सोमवार दिनांक 15 फेब्रुवारी 1739 रोजी बंजारा कुटुंबामध्ये आंध्र प्रदेशामध्ये अनंतपूर जिल्ह्यात गुट्टी तालुक्यात बावन बरड नावाच्या गावात झाला होता. सध्या हे गाव सेवागड म्हणून ओळखले जाते.
सेवालाल महाराजांचे संपूर्ण नाव सेवा भीमा नाईक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक व आईचे नाव धर्मनी देवी असे होते. त्यांच्या आई-वडिलांचा प्रमुख व्यवसाय बैलांच्या पाठीवर धान्याची पोती वाहून नेण्याचा होता. भीमा नाईकांना चार पुत्र होते. प्रथम सेवालाल म्हणजेच सेवाभाया, दुसरे बत्तू, तिसरे आप्पा, आणि चौथे भाना. यांच्यापैकी सेवालाल महाराज हे ज्येष्ठ होते. सेवालाल महाराज जगदंबेचे परम भक्त होते. रामावत क्षत्रिय कुळामध्ये ते आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले होते. सेवालाल महाराजांच्या आई मूळच्या कर्नाटक मधील जयराम वडतीया घराण्यातील राजकन्या होत्या.लग्नानंतर त्यांना जवळपास बारा वर्षे मूलबाळ नव्हते.
जगदंबा देवीची त्या नेहमी पूजाअर्चा करत असत. पुढे देवीच्या कृपाशीर्वाद यामुळे त्यांच्या पोटी सेवालाल महाराजांचा जन्म झाला असा त्यांचा विश्वास होता. सुरुवातीपासूनच ते विरक्त स्वभावाचे होते. त्याकाळी बंजारा समाज निरक्षर होता. त्यामुळे सेवालाल महाराजांनी अजन्म अविवाहित राहून समाजाची सेवा करण्याचे कार्य हाती घेतले होते. मालवाहतुकीसाठी जगभर बंजारा समाज भटकत होता. जगातील अनेक परंपरा त्यांनी भारतात आणल्या होत्या. त्याचबरोबर भटक्या संस्कृतीचे दर्शन त्यांनी जगभर घडवले.
आजही बंजारा समाजात एक भाषा एक पेहराव टिकून आहे. संत सेवालाल महाराजांनी समाजातील खूप प्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या काळात दारूबंदी करून स्त्रियांना अधिकार देण्यात आले होते. बंजारा समाज निरक्षर असल्याने महाराजांनी लोकगीते,भजन, लडी च्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. त्याकाळी समाजाला भजनाची आवड होती हे ओळखून बंजारी बोले भाषेत लडी व भजन रचना करून समाजात त्यांनी धार्मिक व सांस्कृतिक बदल घडून आणले.
संत सेवालाल हे दूरदृष्टी,त्यागी,बुद्धी व प्रामाणिक विचाराचे संत व थोर समाज सुधारक होते. संत सेवालाल महाराजांचे क्रांतिकारी विचार मानवाला वास्तववादी विचार करण्यास भाग पाडतात. महाराजांनी बंजारा समाजाचा विचार, सेवाभावी शिकवण आपल्या कंठात सुरक्षित ठेवलेली होती . शिकायचं, शिकवायचं, शिकून राज्य घडवायचं अशी शिकवण संत सेवालाल महाराजांनी समाजाला दिली होती. पुढे आंध्र प्रदेशातून ते महाराष्ट्रात आले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले होते. दिल्ली येथे त्यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी पंचायत भरवण्यात आली होती. या पंचायतीला बंजारा समाजासह इतर समाजही मोठ्या प्रमाणात जमा झाला होता.
तिकारी बंजारा समाजात परिवर्तनाचा विचार मांडून जनतेला विधायक कार्याने दिशा देणारे संत सेवालाल महाराज होते. सेवाभायांचा जन्म झाला त्या काळात जगावर विज्ञानवादी विचारसरणीने राज्य करण्यास सुरुवात झाली होती. विज्ञान विचारवादी सरणीने नवीन शोध लागून जग संपर्कात येऊ लागले होते. नवीन शोध लागल्यामुळे जगात विज्ञानाचे महत्त्व पटायला लागले होते. त्यावेळी विज्ञानाचे महत्त्व साऱ्या जगाला पटत होते. दैवी अवतार आणि कल्पनिक बाबींना काही स्थान उरले नव्हते. इस 18 व्या शतकात भारतात लक्षणीय सामाजिक सुधारणा झालेली होती. तथागत गौतम बुद्ध,सम्राट अशोक,सम्राट राजा भोज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असे थोर राजे होऊन गेले होते. त्यांनी त्यांच्या कर्तुत्वाने साम्राज्य स्थापन केले होते. त्याचप्रमाणे संत सेवालाल महाराजांनी सेवाभावी कार्य आणि विज्ञानवादी विचारांना पुढे आणले होते.
सेवालाल महाराजांनी समाज तसेच देशाला उद्देशून सांगितलेले त्यांच्या भाषेतील काही विचार आजही प्रेरणादायी आहेत. “जान जो, छान जो, भजन मानजो “ म्हणजे कोणतीही बाब माहिती करून घ्या, शिकून घ्या, त्यास पडताळून पहा आणि नंतर त्याचा अवलंब करा. असे ते सांगायचे.तसेच येणाऱ्या काळात रुपयाला तांब्याभर पाणी मिळेल,कोणाला भजू नका पुजू नका मुलांना शाळा शिकवा. त्याचप्रमाणे जंगल संरक्षण करा, भेदभाव करू नका, सन्मानाने जगा, इतरांना दुखवू नका, वाईट बोलू नका, मुली जिवंत देवी आहेत आणि स्त्रियांना सन्मान द्या , धैर्यवान जगा, मनन केल्याने आत्मिक शांती मिळते, माणुसकी वर प्रेम करा, समाजातील बंधुता भंग करू नका असे अनेक मौलिक संदेश त्यांनी त्यांच्या भाषेत समाजाला दिले होते.
सत्य परिस्थिती पाहून बोलणारे सेवाभावी सेवालाल महाराज. अनेक वर्षांपूर्वीच्या पाण्याच्या व निसर्गाच्या हालचाली पाहून पाण्याच्या समस्या बद्दल त्यांनी लोकांना मार्गदर्शन केले होते.सर्व समाज एकत्र यावा यासाठी महाराज भारतभर दौरा करून लोकांना प्रबोधन करत होते. ज्ञान व सत्याचे महत्त्व लोकांना पटवून देत होते. सेवालाल यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य मानव जातीच्या कल्याणासाठी खर्च केले होते. क्रांतिसिंह सेवालाल महाराजांनी समाजाला गौर बंजारा भाषेत कित्येक उपदेश केले होते.
जसे की,रपीया कटोरो पांळी वक जाय (एक रुपयाला एक वाटी पाणी विकले जाईल),कसाईन गावढी मत वेचो। (खाटकाला गाय विकू नका),जिवते धंणीरो बीर घरेम मत लावजो।( नवरा जिवंत असणाऱ्या स्त्रीला आपल्या घरात आणू नका )चोरी लबाडीरो धन घरेम मत लावजो।( चोरी लबाडी करून पैसे कमवू नका ),केरी निंदा बदी चाडी जूगली मत करजो। ( दुसऱ्याची चुगुली, चाडी, निंदा किंवा भांडणे लावू नका ),जाणंजो छाणंजो पछच माणजो। ( जाणीवपूर्वक मंथन करूनच काम करा )ये जो वातेर पत रकाडीय वोन पाने आड पान तारलीयुंव। ( या सर्व गोष्टीचे आचरण करून जो आदर करेल त्याला मी पानाड पान प्रमाणे तारेल ) अशा अनमोल मानवतावादी विचारांचे संत सेवालाल महाराज नेहमी मानव हितवादी विचार मांडायचे.
शेवटी त्यांनी मंगळवार दिनांक 4 जानेवारी 1773 रोजी रुईगड ( Ruigad) तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ येथे समाधि घेतली. वाशिम जिल्ह्यातील पोहरागड ( Poharagad ) येथे सुद्धा जगदंबा देवीच्या मंदिरा शेजारी त्यांची समाधी आहे. काहींच्या मते त्यांचे त्यांच्या निधनानंतर पोहरागड येथे त्यांना समाधी देण्यात आली होती. तर काहींच्या मते महाराजांची ती विश्रांतीची आणि देवीची भक्ती करण्याची जागा होती. सध्या त्यांचा कोणीही पूर्वाधिकारी नसून त्यांचे उत्तराधिकारी म्हणून रामराव महाराज यांनी त्यांचे काम पाहिले.
संत सेवालाल महाराजांना संत हाथीराम बाबा, बाबा लखीशाह बंजारा, संत गोविंद गुरु बंजारा, तसेच शूरवीर गोर राजवंशी बंजारा समुदाय आणि अख्खा बंजारा समाज आदरणीय गुरु मानतात. बंजारा समाज हा निसर्ग पूजक आहे. परंतु आज काही तांड्यावर जाऊन पाहणी केल्यास अंधश्रद्धा वाढलेली दिसून येते. त्यामुळे बदलत्या काळात ज्ञान व विज्ञानाचा आधार घेऊन अनेक कार्यक्रम केले जातात. आणि संत सेवालाल महाराजांच्या विचारांचे कार्य जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्या शौर्यगाथा बंजारा समाजाच्या साहित्य बरोबरच शीख धर्मीयांच्या इतिहासात सुद्धा आढळतात.
बंजारा समाजामध्ये सेवालाल महाराजांवर रचली गेलेली लोकगीते गायली जातात. आणि गुलाबी रंगाचे ध्वज फडकवले जातात.तसेच त्यांचे भक्त त्यांच्या दर्शनासाठी पोहरागड आणि रुईगड या दोन्ही ठिकाणी जातात.