समतावादी आणि मानवतावादी संदेश देणारे संत रोहिदास महाराज ( Sant Rohidas ) यांचा जन्म सन 1267 मध्ये उत्तर प्रदेशातील वाराणसी मधील काशी या ते तीर्थक्षेत्राजवळील शिरगोवर्धनपुर या गावी झाला होता.महाराष्ट्रात रोहिदास नावाने ते ओळखले जातात तर महाराष्ट्र बाहेर त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. काही ठिकाणी रविदास तर काही ठिकाणी रैदास म्हणून त्यांना ओळखतात. त्यांचे वडील रघुराम व आई घुरबिनिया यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला त्याकाळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या या चर्मकार म्हणजे चांभार जातीच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता.
त्यांच्या आईला रघुराणी म्हणून सुद्धा लोक ओळखत होते. या नावांमध्ये अनेक मतभेद विचारवंतांमध्ये आणि अभ्यासकांमध्ये आपणास आढळतात. लहानपणापासूनच परमेश्वर भक्तीत लीन झालेले रोहिदास साधुसंतांच्या संगतीत आले. वडिलोपार्जित चर्मकाराचा व्यवसाय करत असताना नामस्मरण, संत संगतीत ते राहात होते. त्यामुळे त्यांची आई-वडिलांना चिंता वाटायची की हा कामधंदा न करता हेच करतो की काय. म्हणून त्यांनी त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी लोना नावाच्या मुली बरोबर लावून दिला.
.मग त्यांना रोहिदास आपल्या कामाकडे लक्ष देतील असे वाटायचे परंतु विवाहानंतरसुद्धा त्यांची अध्यात्माकडील ओढ कमी झाली नाही. तसेच त्यांची पत्नी लोना त्यांच्या मार्गातील अडथळा बनण्याऐवजी ती त्यांच्या मार्गात त्यांना सहाय्यक ठरली . आणि त्यांची अनुयायी बनली. म्हणून चर्मकार समाजामध्ये लोना हिला ईश्वर मानलं जातं. तर काही लोक तिला आपली मातृदेवता मानतात. म्हणून लहान मुले जेव्हा आजारी पडतात तेव्हा चर्मकार समाजामध्ये लोणादेवतेची पूजा केली जाते. शेवटी मुलगा काय ऐकत नाही आपल्या व्यवसायाकडे लक्ष देत नाही असे पाहून वडिलांनी लोना आणि रोहिदासांना घरातून बाहेर काढले.
घराबाहेर काढल्यानंतर त्यांनी आपल्याच घराच्या मागे एक झोपडी स्थापन केली. आणि भक्तिमार्गासोबतच आपला संसार त्यांनी चालू ठेवला. पुढे लवकरच त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आणि त्याचे नाव त्यांनी विजयदास ठेवले. संतसंगतीमधून ग्रंथाचे ज्ञान, स्मृती श्रुती या ग्रंथातून त्यांनी अवगत केले. गीता, उपनिषदे इत्यादी या सगळ्यांचे ज्ञान रोहिदासांना प्राप्त झाले.
त्या काळात शूद्रांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. तो त्यांचा अधिकारच नव्हता. म्हणून रोहिदासांनी त्यांचे सर्व ज्ञान अनौपचारिक रित्या प्राप्त केलेले होते. त्यांनी संत संगतीत राहून आणि विविध ग्रंथांचे वाचन करून मुबलक धर्म ज्ञान प्राप्त केले होते. आणि त्यानंतर ते धर्माशी संबंधित तत्त्वज्ञानावर बोलू लागले. पुढे लवकरच रोहिदासांची वैष्णव भक्ती लोकप्रसिद्ध होत गेली. त्यानंतर लोक रोहिदासांना ऐकण्यासाठी जमायला लागली. हे सर्व करत असताना त्यांनी पुढे भारतभर भ्रमण करून अजून ज्ञान प्राप्ती केली व धर्माचा प्रसार केला. त्यांच्या बाबतीत काही अख्यायिका सुद्धा आहेत.
संत रोहिदास नेहमी गंगास्नान करून भक्तिमार्गाला जायचे. एकदा रोहिदास गंगा स्नान करत असताना ही गोष्ट ब्राह्मणांना सोसली नाही. एक शूद्र गंगेवर जाऊन स्नान करतो आणि गंगेला बाटवतो ही गोष्ट काय चांगली नाही म्हणून त्यांना विरोध केला. आणि त्यांचे गंगास्नान बंद करून टाकले. परंतु संत रोहिदास ज्या गंगेच्या डोहामध्ये कापड भिजू घालायचे त्या डोहामध्ये जणू काय गंगा अवतीर्ण झाली. आणि या आख्यायिकेवरूनच मराठीत एक म्हण पडली “मन चंगा, तो कठोती मै गंगा “ म्हणजे जर तुमचे मन चांगले असेल, पवित्र विचार असतील तर गंगा तुमच्या कटोरी मध्ये असते. म्हणूनच संत रोहिदासांनी मनाच्या पवित्रतेला,शुद्धतेला प्रथम स्थान दिले होते. आयुष्यभर संत रोहिदास दारिद्र्यात जगले . अनेक प्रसंग असे आले की त्यांना सदनता प्राप्त होईल.
परंतु त्यांनी त्या सर्व गोष्टींचा स्वीकार केला नाही. एका आख्यायिकेनुसार एक साधू त्यांच्याकडे येऊन त्यांनी परिस दिला आणि त्यांना सांगीतले की या परिसाचा उपयोग करून तुझे दारिद्र्य तू दूर कर आणि ते त्यांच्याकडे परिस ठेवून जातात. परंतु रोहिदास त्या परिसाचा उपयोग करत नाही.अशाचप्रकारे त्यांचे शिष्यत्व पत्करलेल्या संत मीराबाई आपल्या गुरुने दारिद्र्यामध्ये राहू नये म्हणून आपल्या जवळील एक हिरा रोहिदासांना देतात. परंतु रोहिदास या हिऱ्याचाही वापर करत नाहीत. नंतर त्यांना साक्षात ईश्वर काही नाणी देतात. आणि रोहिदासांना दिलेली ही नाणी पुढे आपोआप वाढतच जातात.
परंतु तरीही रोहिदास त्या नाण्यांचा स्वतःच्या जगण्यासाठी वापर करत नाहीत. मग परमेश्वर त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना सांगतात की तू या नाण्यांचा स्वीकार कर. नंतर रोहिदास ईश्वराची अज्ञा असल्याने त्या वाढत जाणाऱ्या नाण्यांपासून काशीमध्ये एक मंदिर बांधतात. आणि तिथे एक अन्नछत्र चालवतात. परंतु त्यांनी आपल्या संसारी अडचणी सोडवण्यासाठी किंवा भागवण्यासाठी शेवटपर्यंत त्या नाण्यांचा उपयोग केला नाही
त्या काळात धार्मिक बाबतीत वादविवाद चालत असत. एकमेकांना आव्हाने केली जात असत. संत रोहिदासांनी अनेक धर्मशास्त्र जानणाऱ्या पंडितांबरोबर अशा प्रकारचे वाद विवाद केलेले आपणास पाहावयास मिळतात. त्यानंतर त्यांनी शंकराचार्यांबरोबर झालेल्या वाद-विवादात ते हरल्यानंतर कबीरांच्याकडे ते जातात. मग संत कबीर त्यांना ज्ञान प्राप्तीसाठी गुरु करण्याचा सल्ला देतात. त्यानंतर ते रामानंदांचे शिष्य बनतात की जे कबीरांचे सुद्धा गुरु होते.
मग त्यांच्याकडे अधिकच ज्ञान प्राप्ती होते. रोहिदासांच्या दोहोंमध्ये गुरूंचे महात्मे त्यांनी सांगितलेले आहे. रामदासाने लिहिलेल्या भक्तमाल या ग्रंथामध्ये रामदासांनी जे बारा शिष्य सांगितले आहेत त्या बारा शिष्यामध्ये त्यांनी रोहिदासांचा उल्लेख केलेला आढळतो. आणि त्यावरून रामानंद हे रोहिदासांचे गुरु होते हे आपल्या लक्षात येते. शिखांचा गुरु ग्रंथ साहिब मध्ये रोहिदासांनी निर्माण केलेल्या चाळीस पदांचा समावेश आढळतो. म्हणजे रोहिदासांनी निर्माण केलेले काव्य साहित्य हे किती उच्च दर्जाचे आहे यावरून लक्षात येते. त्यांना दीर्घायुष्य लाभले होते.त्यामुळे संत कबीरांच्या मृत्यूनंतर संत रोहिदास काही काळ जिवंत होते.
त्यांचा मृत्यू चित्तोड या ठिकाणी झाला असून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिष्या संत मीराबाई यांनी त्यांची छत्री तेथे उभारलेली आहेअसे म्हणतात.अनेक राजघराण्यातील व्यक्ती, राज सिंहासनावर बसणाऱ्या व्यक्ती ज्यांनी रोहिदासांचे शिष्यत्व पत्करले परंतु तरी देखील आपली संपतिक स्थिती सुधारण्याचा कधीही त्यांनी प्रयत्न केला नाही त्या संपत्तीचा वापर करावा असं त्यांना कधीच वाटलं नाही. राणीधली,मीराबाई दिल्लीचा बादशाह सिकंदर लोधी, काशीचा राजा दीपा असे राजघराण्यातील अनेक लोक त्यांचे शिष्य झाले होते.
या राज घराण्यातील लोकांची आपल्या गुरूंसाठी वाटेल ते करण्याची तयारी होती परंतु रोहिदासांनी स्वतःसाठी कधीही त्यांच्या संपत्तीचा वापर केला नाही. मरेपर्यंत त्यांनी आपले दारिद्र्यातच जीवन व्यतीत करून ईश्वर भक्तीकडेच त्यांचे पूर्ण लक्षित केंद्रित ठेवले होते. ते नेहमीच धार्मिक संघर्षामध्ये,जातीयतेच्या उच्च नीच वादामध्ये नेहमीच समन्वयाची भूमिका घेत असत. तसेच समाजातील कर्मकांड उच्च नीच भेदभाव यावर विरोध दाखवत असत.
संत कबीर आणि संत रोहिदास हे समकालीन होते. परंतु कबीरांची वाणी जरा कठोर होती. सामाजिक धार्मिक अंधश्रद्धा यावर संत कबीर अतिशय कठोर टीका करायचे परंतु संत रोहिदास मात्र नेहमी नम्र भूमिका घेत असत. आणि नेहमीच त्यांनी त्यांच्या मधु वाणीतूनच समाजाला प्रबोधन केले. एवढेच नव्हे तर संत रोहिदासांनी हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्याचा फार मोठा प्रयत्न केला. हिंदू-मुस्लीम भेद नसल्याचे ते त्यांच्या काव्यांमधून नेहमी सांगत असत. आपल्या कर्माला ते प्रथम प्राधान्य देत होते.तसेच साधू होऊन भिक्षा मागणे बरे नव्हे असेही ते सांगत असत. हरिनाम करत हाताने सतत काम करावे असे ते त्यांच्या अभंगातून सांगतात.
रोहिदास हे निर्गुण निराकाराचे पूजक होते आणि म्हणून ईश्वर कुठल्याही मूर्तीत नसून तो सर्वत्र असल्याचे ते सांगतात. तसेच देवाच्या बाह्य पूजेला त्यांनी नेहमीच विरोध केला. देवाला दूध द्यावे म्हटले तर ते वासराने आधीच उष्टे केलेले असते. देवाला पुष्प अर्पण करावे तर त्याचे परागकण आधीच मधमाशांनी प्राशन केलेले असतात. अशी देवाच्या बाह्य पूजेची ते उदाहरणे देत होते मनुष्य जन्माने मोठा होत नाही तर तो कर्माने मोठा होतो. असे ते अभंगातून सांगतात.
मूर्तीमध्ये ईश्वर नसून जो सत्याने ईश्वर भक्ती करेल त्याला ईश्वर घरी येऊन दर्शन देतो असे ते सांगतात. तसेच पशुहत्येला विरोध आणि शाकाहाराचा त्यांनी पुरस्कार केला. ते नेहमी पायताणे तयार करण्यासाठी मृत पाण्याच्या चमड्याचा वापर करायचे. त्याचप्रमाणे त्यांनी राम राज्याची कल्पनाही केली भुकेलेला अन्न तहानलेला पाणी आणि उच्च नीच भेदभाव नाही हेच खरे रामराज्य असे त्यांनी अभंगातून सांगितले.