संत निवृत्तीनाथ ( Sant Nivruttinath ) हे ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू होते. संत निवृत्तीनाथांचा जन्म 1268 मध्ये सांगितला जातो. काही ठिकाणी त्यांच्या जन्म आणि समाधी सालाबद्दल एक दोन वर्षांचा फरक आढळतो. निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठल पंत हे त्यांच्या गुरूंच्या आदेशानुसार संन्यासी जीवनातून परत संसारात आले होते .संन्यास निवृत्ती नंतर पुन्हा संसारात आल्यावर त्यांना जे पहिले आपत्य झाले त्याचे नाव निवृत्ती ठेवण्यात आले असे म्हटले जाते.
निवृत्तीनाथांचे गुरु हे गहिनीनाथ होते . ते नाथ संप्रदायाशी संबंधित होते व त्यांनीच संत निवृत्तीनाथांना दीक्षा दिली . त्यांच्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे सर्वांत मोठे होते. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी ज्ञानेश्वरी सामान्य लोकांना समजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला होता.‘निवृत्तिचे ध्येय कृष्ण हाचि होय । गहिनीनाथे सोय दाखविली ॥’,असे निवृत्तिनाथांनीच आपल्या एका अभंगात लिहून ठेवले आहे.
संत निवृत्तिनाथांची ख्याती आणि महत्त्व ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून सांगितली जाते. निवृत्ती महाराजांचे वडील विठ्ठल पंत यांना संसारात विरक्ती येऊ लागली होती , त्यांचे लक्ष संसारात लागेना म्हणून त्यांनी संन्यास घ्यायचे ठरवले आणि त्यासाठी ते काशीला गेले. काशी येथे रामानंद नावाच्या सदगुरू कडून विठ्ठलपंतांनी संन्यासदीक्षा घेतली. काशीला आपल्या गुरुच्या चरणी ते सेवा करून अध्यात्मातील ज्ञान संपादन करीत होते. पुढे रामानंदांच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत आळंदीला परत आले आणि त्यांनी परत संसारास सुरुवात केली . त्यानंतर विठ्ठलपंतांना निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई अशी चार मुले झाली.
विठ्ठल पंतांनी वडील या नात्याने आपल्या मुलांना स्वतः संपादन केलेले सर्व ज्ञान दिले परंतु त्या काळात आळंदीत राहणाऱ्या काही कर्मठ लोकांना हे मान्य नव्हते .विठ्ठल पंतांना सांगण्यात आले की तू संन्यास धर्मातून परत गृहस्थाश्रमात आला आहे आणि ते धर्माला मान्य नाही. तुला देहांत प्रायश्चित्तच घ्यावे लागेल याशिवाय दुसरे प्रायश्चित्त असू शकत नाही . ते जर घेतले तरच तुमच्या मुलांच्या मुंजी होतील. हे ऐकून विठ्ठल पंत खूप दुःखी झाले , त्यांना काय करावे सुधरत नव्हते . त्यांनी आपल्या पत्नीशी सविस्तर चर्चा केली ,एक दिवस मुले झोपेत असताना विठ्ठलपंत आणि त्यांची धर्मपत्नी रुक्मिणी यांनी रात्रीच घर सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला .
मजल दरमजल करत ते प्रयागला पोहोचले, आपल्या पाठीमागे मुलांचे काय होईल याची चिंता त्यांना होतीच पण सगळे देवावर सोडून त्यांनी पवित्र गंगा नदी मध्ये जाऊन जलसमाधी घेतली आणि त्यांचं जीवन संपवले . इकडे आळंदी मध्ये सकाळी मुलं उठल्यावर आई वडील त्यांना दिसेनात . बरीच शोधा शोध घेतल्यावर त्यांना कळून चुकले की आपले आई-वडील आपल्याला सोडून कायमचे निघून गेलेले आहेत किंवा त्यांचा घात तरी झाला असावा. ही चारही मुलं आई-वडिलांच्या छत्राला कायमची पारखी झाली होती. लहान वयात पोरकेपणाचे दुःख त्यांना भोगावे लागत होते किती वाईट अनुभव असतील ते…. आपल्या आई वडिलांच्या मागे निवृत्ती नाथांनी आपल्या भावंडाची काळजी घेतली .
जेव्हा विठ्ठल पंतांना वाळीत टाकले होते आणि समाजाने सांगितले की तुम्ही आमच्याशी संपर्क ठेवायचा नाही त्यावेळी विठ्ठल पंत म्हणाले की माझी एक चूक झाली आहे त्या पश्चातापाची शिक्षा म्हणून त्यांनी स्वतःला शिक्षा करून घ्यायचे ठरवले आणि ती शिक्षा म्हणून त्यांनी त्र्यंबकेश्वरला 18 मैलाची पायी प्रदक्षिणा करण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी 18 मैलाची दरवर्षी पायी प्रदक्षिणा घालून पश्चाताप व्यक्त करत असतानाच त्यांची सर्व मुले त्यांच्याबरोबर असायची.
एकदा प्रदक्षिणा घालत असताना घनदाट अरण्यातून एक वाघ आला आणि या सर्व भावंडांची मोठी धावपळ झाली. या धावपळीमध्ये जीव वाचवण्यासाठी निवृत्तीनाथ आणि ही बाकीची त्यांची भावंडे वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसली. त्यानंतर निवृत्तीनाथ त्यांच्या भावंडांना सापडलेच नाही.विठ्ठल पंत आणि त्यांच्या भावंडांनी खूप दिवस वाट बघितली. त्यांना वाटले की वाघाने निवृत्तीनाथांना खाऊन टाकले असावे परंतु निवृत्तीनाथ जिकडे पळाले ते एका गुहेत लपले होते. आणि नेमके त्याच गुहेत गहिनीनाथ होते.
विठ्ठल पंत अनेक दिवस गहिनीनाथांचा शोध घेत होते पण ते त्यांना कधीच सापडले नाहीत .त्याच गुहेत निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांकडून नाममंत्र स्वीकारला असे सांगितले जाते. जेव्हा निवृत्तीनाथ त्या गुहेतून बाहेर आले तेव्हा ते पूर्ण नाथ होऊनच आले होते.गहिनीनाथांचा त्यांना उपदेश झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचे क्रांतिकारक परिवर्तन झाले होते.

त्यावेळी नामदेवांनी आणि विठ्ठलपंतांनी निवृत्तीनाथांना मुंजीसाठी विचारणा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी निवृत्तीनाथांना ब्राह्मणत्व स्वीकारण्याबद्दल काय वाटत होते ते संत नामदेवांनी त्यांच्या अभंगांमधून सांगितले आहे. ते म्हणतात- नको मला तुमचा तो धर्म, नको मला तुमचे ब्राह्मणत्व, नको मला ती मुंज, मी क्षत्रिय नाही,ब्राह्मणही नाही, वैश्यही नाही,शूद्रही नाही, मला वर्ण,जाती,कुळ यांचे अधिकारही नकोत,मी देवही नाही, ऋषीमुनी साधूही नाही, मी पृथ्वी,अवतेज, आकाशही नाही, मी सगुण साकारही नाही, मी निर्गुण निराकारही नाही, तर मी आहे अनाधी, अनंत, अव्यत्य, अविनाशी ज्याला आत्मबोध होईल त्यालाच माझे स्वरूप समजेल म्हणून त्यांना मराठीतले पहिले विद्रोही मानले जाते.
संत निवृत्तीनाथ असे परिपूर्ण होते की ते फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या आग्रहाखातर पुन्हा पुन्हा मुंजेची परवानगी मागण्यासाठी जायचे. त्यांनी ‘आपले संपूर्ण ज्ञान ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासूनही निवृत्त झाले असे निवृत्तिनाथांबद्दल सांगितले जाते. निवृत्तीनाथांबद्दल ज्ञानेश्वरांना अतिशय आदर होता तसा त्यांनी काही ठिकाणी त्याचा उल्लेख ही केलेला आहे. निवृत्तिदेवी, निवृत्तिसार आणि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही निवृत्तिनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते परंतु ते अनुपलब्ध आहेत.
निवृत्तेश्वरी असा एक ग्रंथ आहे , ज्ञानेश्वरीप्रमाणेच यामध्येही गीतेवरील भाष्य केलेले आढळते पण हा ग्रंथ निवृत्तीनाथांनी लिहिला आहे हे अजून पुराव्यानिशी सिद्ध झालेले नाही. सटीक आणि समाधि बोध अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची लिहिली होती ती धुळे येथील श्रीसमर्थवाग्देवता मंदिरात आहेत.जेव्हा संत निवृत्तीनाथ वारकरी संप्रदायामध्ये विलीन होऊन निवांत झाले .
यावेळी त्यांनी त्यांच्या अभंगांमधून पाच वेळा असा उल्लेख केला आहे की, आपणाला ब्राह्मणत्व व मुंज करण्याचा अधिकार मिळावा म्हणून वनवन फिरणाऱ्या या बिचाऱ्यांचा वनवास काही संपत नव्हता परंतु संत नामदेव निवृत्तीनाथांना भेटल्यानंतर त्यांच्या विचारांनी आणि मार्गदर्शनाने हा वनवास संपला. त्यानंतर शास्त्री पंडितांनी ज्ञान नाकारूनही भक्ती प्रस्थापित झालेल्या संत नामदेव आणि सगळी विद्वत्ता असूनही ब्राह्मणत्व नाकारलेले संत ज्ञानेश्वर आणि भावंडे यांची भेट ही इतिहासातील अत्यंत एक चांगला योग समजला जातो.
कारण त्यावेळी ज्ञानेश्वर भावंडांना चांडाळाचा दर्जा देण्यात आलेला होता. त्याकाळी त्यांना शुद्रापेक्षाही खालच्या दर्जाचे मानले जात होते.अशा परिस्थितीमध्ये नामदेवांसारखा शिंपी आणि भोजलिंगासारखा आळंदीतला सुतार यांनी त्यांना आश्रय दिला. जेव्हा त्यांच्या जातीतील लोक त्यांना जवळही येऊ देत नव्हते .तेव्हा एका सुताराने आणि एका शिंप्याने या भावंडांना जवळ केले होते. आणि त्यानंतर ही भावंडे बहुजनांची होऊन गेली. संत निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ होते.
नाथपंथ हा गुरु परंपरा मानणारा पंथ आहे. म्हणजे एका गुरुने एक शिष्य करायचा त्याच्याच कानात गुरु मंत्र सांगायचा, तसेच त्याच्याच कानात गुरुज्ञान सांगायचे. त्या काळी त्याला कानफुके गुरु म्हटले जायचे. परंतु ही परंपरा खंडित करून गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना सांगितले की मी तुला दिलेले हे सर्व ज्ञान तू तुझ्या भावंडांना वाटून टाक. गहिनीनाथांनी केलेली ही एक क्रांतीच होती.
मग पुढे निवृत्तीनाथांनीही ज्ञानेश्वरांना सांगितले की हे ज्ञान तू सगळ्या जगाला मराठीतून समजेल असे वाटून टाक. अशी दुसरी क्रांती संत निवृत्तीनाथांनी केली. तेथून पुढे वारकरी सांप्रदायांमध्ये ही परंपरा खंडित होऊन कोणीही कोणाकडूनही गुरुज्ञान घेऊ लागले आणि कितीही शिष्य करू लागले. ज्ञानेश्वरी मध्ये एकूण 9033 ओव्या आहेत. त्यामधिल 2800 ओव्या संत श्री निवृत्तीनाथाविषयीच आहेत. म्हणून जर आपणाला संत निवृत्तीनाथांना समजून घ्यायचे असेल तर त्या ओव्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आणि त्यावरून ज्ञानदेवांमध्ये निवृत्तीनाथांचे स्थान किती होते हे आपणास लक्षात येते.
निवृत्तीनाथ हे एकाच वेळी आपल्या भावंडाचे गुरु मायबाप आणि भाऊ झाले होते. त्यांनी आपल्या सर्व भावंडांना शिष्य करून घेतले होते. निवृत्तीनाथांची गाथा एकूण 374 अभंगाची असून त्यापैकी हरी गुण गाणारे 134, सद्गुरु दृष्टांतावर 77, पंढरीचे महात्म्य 20, काल्याच्या कीर्तनाचे 13, नाम महात्म्य 52,संत महात्म्य 7, उपनिषद 41 आणि ज्ञानावर 30 अशी एकूण 374 अभंगांची त्यांची गाथा उपलब्ध आहे. ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्थ झाल्यानंतर मुक्ताई अन्नपाणी’ त्यागून परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरी आपला देह ठेवला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आली आहे. निवृत्तिनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला असते.
निवृत्तिनाथांनीच ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी ज्ञानेश्वरी सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला व ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहून काढली. मुक्ताई या आपल्या भावंडांच्या समाधीनंतर सद्गुरू निवृत्तीनाथ यांनी शके १२१८ मध्ये नाशिक येथील त्रंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली तो दिवस होता ज्येष्ठ कृ. त्रयोदशी म्हणजेच १७ जून १२९७ .या समाधीवर पुढे इ. स. १८१२ मध्ये दगडी बांधकाम करून एक मंदिर उभारण्यात आले. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेले निवृत्ती महाराजांचे हे मंदिर समस्त वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे.