संत निरंकारी मिशन | Sant Nirankari Mission

शीख धर्मातील निरंकारी या शब्दाचा अर्थ “निराकार” असा होतो. मूर्ती पूजा ऐवजी ईश्वर भक्ती, माणसाच्या शरीरात असलेला ईश्वरी अंश इत्यादी वैशिष्ट्यांमुळे गावागावातील तरुण फार पूर्वी सुरू झालेल्या निरंकारी मिशन मध्ये भरभरून समाविष्ट होत आहेत. पंजाब मधून सुरू झालेले निरंकारी मिशनचे जाळं संपूर्ण देशभरात घराघरात कसं पोहोचलं. निरंकारी मिशन ( Sant Nirankari Mission ) मध्ये सहभागी झालेल्या लोकांना निरंकारी मिशनचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत का पोहोचू वाटत आहे. अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर निरंकारी मिशनचा अभ्यास केल्यानंतर मिळतात.

25 मे 1929 पासून निरंकारी मिशनची सुरुवात झाली. बाबा बुटा सिंह या मिशनचे संस्थापक होते. त्यांचा जन्म सध्या पाकिस्तान मध्ये असलेल्या हाडवाल गावात झाला होता. लहानपणापासून त्यांचा ओढा अध्यात्माकडे जास्त होता. साधारणता 18 व्या वर्षी एका धार्मिक कार्यक्रमात भजन म्हणत असताना त्यांची ओळख काहन सिंह नावाच्या एका सद्गुरू बरोबर झाली. काहन सिंह यांनी बुटा सिंह यांना खऱ्या ईश्वर भक्तीची ओळख करून दिली.अज्ञानामुळे लोक खऱ्या ईश्वर भक्ती पासून कसे दुरावले आहेत याबद्दल त्यांनी बाबा बुटा सिंह यांना सांगितले. त्यांचे विचार बुटा सिंह यांना खूप भावले.

त्यांनी तोच विचार समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याची जबाबदारी आपल्यावर घेतली. त्या जबाबदारीतून त्यांनी वैश्विक बंधुता या तत्वावर सर्वात पहिल्यांदा निरंकारी मिशनचा पाया रचला होता. त्या कार्यात त्यांना साथ मिळाली होती बाबा अवतार सिंह यांची. आपल्या या मिशन मधून कोणत्याही नवीन धर्माची किंवा धार्मिक संस्थेची निर्मिती होणार नाही याचीही त्या दोघांनी त्याकाळी काळजी घेतली होती. त्यांच्या मते निरंकारी मिशनचे कार्य फक्त एकच होते ते म्हणजे लोकांना समता मानवता बंधुता याचे महत्त्व पटवून देणे. सामाजिक एककेतून आपण मानव कल्याण कसे साध्य करू शकतो हा मुख्य उद्देश घेऊन बाबा बुटा सिंह यांनी लोकांमध्ये प्रबोधन करण्यास सुरुवात केली होती. त्या प्रबोधनाला ते सत्संग असे म्हणायचे.

त्याकाळी त्यांच्या प्रबोधनातून प्रभावित झालेले लोक हळूहळू त्या मिशनमध्ये सहभागी व्हायला लागले होते. पुढे 1946 साली बाबा बुटा सिंह यांनी आपल्या पदावर अवतार सिंह यांची नेमणूक केली. अवतार सिंह यांचा जन्म सध्या पाकिस्तान मध्ये असलेल्या थिपल गावचा होता. त्यानंतर अवतार सिंह यांनी मिशनचे कार्य जबाबदारीने लोकांपर्यंत पोहोचण्याच्या कामाची सुरुवात केली. भारताच्या फाळणीनंतर त्यांनीच प्रथम निरंकारी मिशनच्या मुख्य शाखेची स्थापना दिल्लीमध्ये केली. वैश्विक बंधुता हे आंदोलन कार्य आणखी वेगाने व्हावे अशी त्यांची इच्छा होती. मग त्यानंतर त्यांनी देशाच्या वेगवेगळ्या भागात सत्संग घेण्यास सुरुवात केली.

त्या सत्संगामध्ये प्रवचना बरोबरच लंगर मध्ये मिळणारे मोफत जेवण, सांस्कृतिक कार्यक्रम, मानवा प्रती असलेला सेवाभाव अशा गोष्टींचा समावेश केला. त्यामुळे हळूहळू निरंकारी मिशन मध्ये लोकांचा सहभाग प्रचंड वेगाने वाढला. बाबा अवतार सिंह यांना त्या काळी साथ देणारे त्यांचे सर्वात आवडते शिष्य बाबा बचन सिंह हे होते. पुढे जेव्हा बाबा अवतार सिंह हे मिशनच्या सर्वोच्च पदावरून पायउतार झाले तेव्हा त्यांनी त्यांचे पद बाबा बचन सिंह यांच्याकडे सोपवले. बाबा बचन सिंह यांचा जन्म सुद्धा सध्या पाकिस्तान मध्ये असलेल्या पेशावर शहरात झाला होता. परंतु निरंकारी मिशन मध्ये आल्यापासून त्यांनी भारतालाच आपले कर्मस्थान मानले.

बाबा बचन सिंह यांनी सत्य, प्रेम आणि शांती यांचा संगम घडवून लोकांना ईश्वरभक्तीची खरी ओळख करून दिली. त्यांनी त्यांच्या सत्संगामध्ये प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला व बाल संघटन, तरुण मार्गदर्शन व सामूहिक विवाह सोहळे यांचा समावेश केल्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग निरंकारी मिशन बरोबर जोडला गेला. तरुण मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली होती. ते मंडळाच्या कार्यकर्त्यांना सेवा दल म्हणून ओळखत होते.

त्याशिवाय सेवा दलाला त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच पुरातन कर्मकांड आणि अंधश्रद्धा यांचाही त्यांनी ठासून विरोध केला.परंतु त्यांना त्यांच्या त्या कार्याची मोठी किंमत चुकवावी लागली. दांभिकतेला असलेला त्यांचा विरोध समाजातील काही ठराविक लोकांना आवडला नाही. त्यामुळेच काही समाजकंटकांनी त्यांना भर रस्त्यात गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर निरंकारी मिशनची विस्कटलेली घडी त्यांचे सुपुत्र बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी यशस्वीरीत्या पुन्हा बसवली.

त्यांच्या काळात संत निरंकारी मिशन हे देशातील गावागावात पोहोचले. मुंबई,बेंगलोर,दिल्ली, पटना, चेन्नई यांसारख्या मोठमोठ्या शहरात त्यांनी आयोजित केलेल्या सत्संगाच्या कार्यक्रमांना लोकांनी लाखोच्या संख्येने हजेरी लावली. गावाकडच्या लोकांमध्ये ईश्वराच्या भक्तीबद्दल असलेले अज्ञान त्यांनी त्यांच्या सत्संगाच्या माध्यमातून गावोगावचे सत्संगाचे ग्रुप ॲक्टिव्ह करून घालवण्याचा मोठा प्रयत्न केला.

त्यांना असे गावोगावचे ग्रुप करण्यात मोठे यश आले. त्यानुसार त्यांनी तरुणांना आवडतील असे कार्यक्रम नियोजित करण्यास सुरुवात केली. जसे की सामूहिक गायन, कविता, भजन, प्रवचन, वाचन, नृत्य अशा कला सादर करण्यासाठी त्यांनी तरुणांना सत्संगाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले. सोबतच वाचन संस्कृती वाढवावी म्हणून देशातील 14 वेगवेगळ्या भाषेत पुस्तके प्रकाशित केले. त्या पुस्तकांमध्ये सत्संगामध्ये आजवर झालेली प्रवचने लोकांपर्यंत पोहोचले.

लहान मुलांमध्ये चांगल्या संस्काराची बीज पेरणी व्हावी म्हणून हसती दुनिया सारखी कॉमिक बुक सुद्धा त्यांनी प्रकाशित केले. त्याचा निरंकारी मंडळाला खूप फायदा झाला. करोडोच्या संख्येने सेवा दलामध्ये लोकांनी सहभाग नोंदवला. मिशनच्या कार्याने प्रभावित झालेले लोक सत्संगामध्ये लाखो करोडो रुपयांच्या देणग्या आणि अन्नधान्य देऊ लागले. तसेच काही लोक कार्यक्रमाची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारू लागले. कोणी तरुणांच्या लग्नासाठी मदत करू लागले तर कोणी इव्हेंट मॅनेजमेंट चा खर्च उचलू लागले.

अशा रीतीने निरंकारी मिशन देशात ऍक्टिव्ह झाले. निरंकारी मिशनचे कार्य आणि पसारा एवढा वाढला होता की बाबा हरदेव सिंह यांच्या अनुयायांनी त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळावी अशी मागणी लावून धरली होती. परंतु पुढे काही कारणास्तव ही मागणी मागे पडत गेली. त्यानंतर हरदेव बाबांनी कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड,अमेरिका अशा परकीय देशांमध्ये निरंकारी मिशनचे कार्यक्रम केले. त्या देशातील सेवाधार्यांनी सत्संगाचे कार्यक्रम आयोजित केले होते. अशाच एका कार्यक्रमाला जात असताना कॅनडाच्या रस्त्यावर बाबा हरदेव सिंह यांच्या गाडीला अपघात झाला. त्यामध्येच 13 मे 2016 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

त्यांच्यानंतर निरंकारी मिशनच्या पाचव्या गुरुस्थानी त्यांच्या पत्नी माता सविंदर हरदेवजी यांची निवड करण्यात आली. त्यांनी देखील आपल्या पतीप्रमाणे लोकांना मार्गदर्शन केले. सत्याची कास आणि शिक्षणाचा ध्यास हा त्यांच्या सत्संगाचा सार असायचा. लोक त्यांची मधुर वाणी ऐकून प्रभावित व्हायचे. परंतु ते जास्त काळ चालले नाही. लवकरच त्यांनाही देवाज्ञा झाली. 5 ऑगस्ट 2018 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. परंतु त्यापूर्वी त्यांनी आपली मुलगी सुदिक्षा यांच्याकडे निरंकारी मिशन ची सर्व सूत्रे सोपवली होती.

आज सुदिक्षा हरदेव सिंह सत्संगामध्ये सर्वांना मार्गदर्शन करतात. सध्याची स्थिर झालेली तरुणाई हा त्यांच्या उपदेशाचा मुख्य विषय असतो. तरुणांमध्ये जागरूकता आली तरच देश खऱ्या अर्थाने जागा होईल अशा उद्देशाने सत्संगामध्ये तरुणांना चांगल्या प्रकारे मोटिवेट केले जाते. म्हणूनच त्यांनी निरंकारी मिशन अंतर्गत एन वाय एस सारखं संघटन बनवले आहे. ज्यामध्ये तरुणांना त्यांचे विचार मांडण्यासाठी स्वातंत्र्य दिले जाते. या अभिनव प्रयोगामुळे आज काल नव्या दमाचे तरुण मिशन सोबत जोडले जात आहेत.

शहरांची सफाई, रक्तदान शिबिरे, शाळा कॉलेज आणि सामाजिक संस्थांना दिल्या जाणाऱ्या देणग्या,नेत्रदान शिबिर,अपंगांना आणि वरिष्ठांना दिल्या जाणाऱ्या मोफत वैद्यकीय सुविधा, वृक्षारोपण अभियान यांसारखी कामे करताना निरंकारी मिशन सारखी संघटना बघताना धार्मिक कार्यक्रमाबरोबर काय काय करू शकते आणि लोकांचे कसे संघटन बनवू शकते याचा अंदाज लागतो.

विखुरलेल्या युवाशक्तीला एकत्र आणणे आणि त्यांच्या मार्फत समाज उपयोगी कामे करून घेणे हे सध्याचे सगळ्यात अवघड काम निरंकारी मिशन अंतर्गत करण्यात येते. आता देशातील जनतेसाठी दिल्लीमध्ये सर्व सुखसुविधायुक्त असं मोठं हॉस्पिटल उभारण्याच काम होणार आहे असं माता सुदिक्षा यांनी जाहीर केले आहे. तेथे उपचार पूर्णपणे मोफत करण्यात येतील असे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment