संत निळोबाराय | Sant Nilobaray

संत निळोबा ( Sant Nilobaray) हे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पिंपळनेर गावचे होते. तसेच ते घोडनदीच्या काठी  प्रभू रामचंद्राने स्थापन केलेल्या राम लिंगाचे उपासक होते. त्याचप्रमाणे  संत निळोबाराय शिरूर या गावचे वतनदार होते. त्यांचे आडनाव कुलकर्णी आणि उपनाव मकाशीर होते. ऐतिहासिक लिखाणा मधून ते इ स 1713 ते इ स 1757 मध्ये त्यांचे उल्लेख आढळतात. इस 1713 मध्ये ते कुलकर्णी वतन चालवण्याइतके व सांभाळण्याइतके  वयाने  मोठे होते असे आढळते.

ते संत तुकाराम महाराजांचे समकालीन नव्हते तर तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायणबुवा यांच्या पेक्षा ते वयाने लहान होते. त्यांच्या वडिलांचे नाव मुकुंदपंत आणि आईचे नाव राधाबाई होते. ते लहान असतानाच त्यांचे वडील मुकुंदपंत यांचे निधन झाले. दुःखी आई, वयाने पत्नी ही लहान आणि स्वतःही लहान असल्याने त्यांना हा धक्का पेलवत नव्हता. त्यावेळी आपणाला योग्य सल्ला कोण देणार या विचाराने ते गांगारून जायचे. एक दिवस ते आपले कुलदैवत श्री राम लिंग यांच्या मंदिरात जाऊन अनन्य भावाने देवाला शरण गेले. तेव्हापासून साधक वादक इतरांचे ऐकावे व मनाला पटेल तेच करावे असाच त्यांनी जीवन प्रवास ठेवला. राम लिंगाला साक्षी ठेवून ते प्रत्येक काम करू लागले.

काही दिवसांनी निळोबांना पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु अशातच वृद्ध झालेल्या आईचे निधन झाले. त्यावेळी निळोबा राय प्रचंड दुःखी झाले वडिलांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असतानाच मातेचे निधन झाल्याने ते फार कष्ट झाले होते. त्यामुळे पुत्रप्राप्तीचा आनंदही त्यांना फारसा झाला नाही. वडिलांच्या उद्देशाप्रमाणे निळोबांची वागणूक चोख असायची. शुद्ध आचार विचार व सात्विक असे निळोबा कधीही कोणाचा द्वेष करत नसत. तसेच खोटे बोलत नसत. अतिथीला भोजन,यातकाला दान,भजन,पूजन व आत्म चिंतन हा त्यांचा जीवनक्रम असे. त्यामुळे त्यांचा लौकिक वाढतच होता. त्यामुळे त्यांची कीर्ती लवकरच सर्वदूर पसरली.

हळूहळू थोर माणसे निळोबारायांना भेटायला येऊ लागली. परंतु निळोबांचे हे मोठेपण भावकीला पहावेनासे झाले. म्हणून ते त्यांची निंदा करायचे व त्यांच्याबद्दल गैरसमज पसरू लागले. एके दिवशी सकाळीच निळोबा पूजेला बसलेले असतानाच गावातील चावडीवर सारा वसुली करणारा अंमलदार आला होता. देवपूजा करत असताना मध्येच उठायचे नाही असा निळोबांचा नियम होता. आणि हे विरोधकांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी अंमलदाराचे कान फुंकले तुम्ही येऊन एवढा उशीर झाला असतानाही निळोबा तुम्हाला हिशोबाचे दप्तर घेऊन दाखवायला आले नाहीत.

कदाचित हिशोबातही  घोटाळे असतील असे भलतेच सांगून अंमलदाराला फुगून दिले. मग काय अंमलदाराचा राग अनावर झाला आणि अंमलदार स्वतः उठून निळोबांच्या घरी गेला आणि ओरडून निळोबाला धमकावले. लगेच उठून चावडीला चल आणि मला हिशोब दे असं म्हणत काही घोटाळा तर नाही ना केला तू असं काहीतरी अंमलदार बोलत होता. कधीही कोणावरच न रागवणारे निळोबा पराकष्टी होऊन देवाला नमस्कार करून दप्तर घेऊन चावडीला गेले व अंमलदाराला हिशोब दाखवला. सर्व हिशोब चोख  असलेला पाहून अधिकारी वरमला. व त्याचा राग शांत झाला.

परंतु देवपूजेत विघ्न आल्याने निळोबा कष्टी झाले होते. या कुलकर्णी वतनामुळे देव दुरावला जात असेल तर हे वतन  नको मला अशी भावना त्यांच्या मनात येऊ लागली. योग्य वेळी सावध नाही झालो तर परमेश्वर प्राप्ती कधी होणार असा विचार करत पारावर बसलेले निळोबा ताटकन उठले आणि शेवटी हिशोबाचे सर्व दप्तर राम लिंगाच्या मंदिरात जाऊन देवापुढे ठेवले आणि म्हणले की संभाळा हे ती कुलकर्णी वतनाची नोकरी नको मला. आता हा निळोबा फक्त भक्तीच करणार असे देवाला बोलून ते घरी गेले आणि बायकोला हाक मारली मैनाबाई बाहेर येताच मी निघालो,मला घरात राहायचे नाही.

या संसाराचा आणि सर्व संपत्तीचा मी त्याग करणार आहे,मी तीर्थस्थळांना जाणार आहे, तू मला संमती दे. असे बोलू लागले.वयाने लहान असलेल्या मैनाबाई त्यांच्या शब्दाबाहेर नव्हत्या. परंतु त्या चकित होऊन म्हणाल्या की या वयातच बाहेर जाणे बरे आहे का? परंतु निळोबारायांनी त्यांना समजावले वयाचा काही संबंध नाही. संसार करावा हा मनाचा संस्कार आहे. संसारात सुख नाही हे कळाल्यानंतर वयाचा प्रश्न येतोच कुठे असे म्हणत तुझ्या सुखासाठी मला अडवू नकोस. तुला उने पडणार नाही. असे बोलून झाल्यावर मैनाबाई म्हणाल्या तर मलाही संसार नको.  जिकडे तुम्ही तिकडे मी.

असे ऐकल्यावर निळोबाराय चकितच झाले. आणि एका वस्त्रानिशी निळोबांचे कुटुंब घराबाहेर पडले. निघण्यापूर्वी आपले घर ब्राह्मणाला दान देऊन टाकू म्हणजे अखेरचा एक भूतकाळ सुद्धा नाहीसा होईल आणि परमार्थासाठी तीर्थयात्रेच्या वाटेला लागू.. त्यागाशिवाय वैराग्यात आनंदही नाही.असे म्हणून घराचे दार उदक ब्राह्मणाच्या हाती सोडून ते निघाले. कधीही कोणीही न बघितलेला असा हा चमत्कार पाहण्यासाठी गावातील सर्व मंडळी जमा झाली होती. निळोबांना विनंती करत होते नका जाऊ परंतु निळोबांनी कोणाचेही ऐकले नाही.असं हे कुटुंब शिरूरहून पायी निघाले ते थेट पारनेरला आले.

पारनेर हे पूर्वी पारस्य ऋषींचे पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते. व्यासांचे पुत्र पाराशर येथेच राहत असत. तसेच त्याकाळी पारनेरला ब्राह्मणांची वस्ती मोठी होती. म्हणून पारनेरलाच राहायचे असे निळोबांनी ठरवले. त्याकाळी पारनेरला  दिवसा पुराण, प्रवचन आणि रात्री कीर्तने व्हायची. ते पुढे आषाढी वारीला सहकुटुंब पंढरीला गेले.पंढरपूर मध्ये चार दिवस राहून पांडुरंगाचे दर्शन घेऊन पुन्हा तेथून निघाले व थेट देऊला आले.देहूमध्ये त्यांची तुकाराम महाराजांचे धाकटे बंधू नारायण बुवा यांच्याशी भेट झाली. नारायण बुवांबरोबर तीर्थयात्रा करण्याची आणि तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन यावर वर्णन ऐकण्याची इच्छा त्यांनी नारायणबुवांकडे व्यक्त केली. नारायणबुवा हो म्हणाले व त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली.

तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमनाचे वर्णन ऐकून निळोबा व मैनाबाई यांचे  देहभान हरपले. नारायण बुवांबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर शेवटी दोघेही पांडुरंगाचे दर्शन घेऊन पंढरपूर वरून निळोबा पारनेरला गेले व नारायणबुवा देहूला गेले.परंतु निळोबारायांनी नारायणबुवांकडून तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन ऐकल्यानंतर पारनेर मध्ये त्यांना अहोरात्र तुकाराम महाराजांचा ध्यास लागला. ते रात्रंदिवस तुकाराम – तुकाराम  असा जप करू लागले. अक्षरशः मैनाबाईंना त्यांची कशी समजूत काढावी हेच समजेना.

निळोबांनी खाणेपिणे वर्ज केले होते. सर्वांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु निळोबांनी कोणाचेच ऐकले नाही. लोक सांगायचे तुकाराम महाराज वैकुंठाला जाऊन अनेक वर्षे लोटली आहेत आता ते कधीही तुम्हाला भेटू शकणार नाही. तुम्ही आता हा अट्टाहास सोडून द्या. परंतु निळोबाराय तुकाराम महाराजांची भेट झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही असे म्हणायचे. 42 दिवस त्यांची ही अवस्था होती. शेवटी पांडुरंगाला हे पहावेना. म्हणून स्वतः पांडुरंग प्रगट होऊन निळोबारायांना म्हणाले की निळोबा मी स्वतः वैकुंठ नायक भगवान विष्णू आहे. तरी आता तू उठ तुका आणि मी एकच आहे.

निळोबा म्हणाले की अहो देवा जर तुका आणि तुम्ही एकच आहेत तर तुम्ही तुकाराम महाराजांच्या रूपात का आले नाही मला भेटायला. त्यांची तुकाराम महाराजांवरील एकनिष्ठ भक्ती पाहून पांडुरंगाने  पुन्हा त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला व म्हणाले की निळोबा आता बघ माझ्याकडे. निळोबाने डोळे उघडताच  समोर साक्षात तुकाराम महाराज दिसले. निळोबांनी त्यांचे पाय धरले आणि दर्शन घेतले.मग तुकाराम महाराजांनी त्यांना’ राम कृष्ण हरी ‘हा मंत्र दिला तसेच आपल्या गळ्यातील विना व तुळशीची माळ निळोबांच्या गळ्यात घातली.

तसेच आमचे शतकोटी अभंग झाले परंतु त्यांची पंचोत्री राहिली ती तेवढी तुम्ही पूर्ण करा व नाम महिमा प्रगट करून समाजाला भक्तिमार्गाला लावा असे म्हणून तुकारामाने निळोबांच्या कपाळी बुक्का लावला. आणि शेवटी म्हणाले निळोबा पुन्हा असा हट्ट करू नकोस मी सदैव तुझ्या जवळ आहे आणि परत ते वैकुंठाला गेले. त्यानंतर श्री सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे निळोबांनी प्रथम 332 श्लोकात  सद्गुरुरायांचे स्तुतीवर्णन केले व अभंगाची पंचोत्री  पूर्ण केली. तसेच चांगदेव चरित्र इत्यादी रचना ही पूर्ण केल्या.

 सद्गुरूंचे दर्शन झाल्यावर निळोबा पुन्हा तेजोमय झाले. आणि नंतर निळोबा पारनेरला नागेश्वर मंदिराशेजारीच एका वाड्यात राहू लागले. त्यांना अनुग्रह देण्यासाठी वैकुंठाहून संत तुकाराम महाराज पुन्हा आले ही चर्चा सर्वत्र पसरली. आणि निळोबारायांची कीर्ती आणखीनच वाढू लागली. अनेक थोर मंडळी व साधू पुरुष त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. त्यांच्या कीर्तनांना आणि प्रवचनांना भरमसाठ गर्दी होऊ लागली. पुढे काही काळ लोटल्यानंतर त्यांची मुलगी चंद्रभागा मोठी झाली. जुन्नर मधील बेल्हे गावात कुलकर्णी नावाचा मुलगा योग्य वर आहे असे पाहून पुरोहितांनी निळोबांना ही माहिती दिली. आणि लग्नाला दोन्ही बाजूने संमतीही मिळाली.

लग्न जमल्यामुळे निळोबांचे पुरोहित  पारनेरचे पोळद यांनाही समाधान वाटले. घरात काहीच नसतानाही कार्य कसे पार पाडायचे, याची चिंता निळोबांना आणि मैनाबाईंना पडली. लग्नाचा तिथी मुहूर्त निश्चित झाला आणि कुंकुम पत्रिका पांडुरंगाला पोहोच करून लग्नाला यायची विनंती निळोबांनी केली. त्याचप्रमाणे  हे लग्न व्यवस्थित पार पडण्यासाठी आमची लाज राखा अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना ही केली. पांडुरंगाने आपला एकनिष्ठ भक्त म्हणून त्यांची हाक ऐकली आणि त्यांनी विठ्ठलभट नावाच्या गृहस्थांच्या रूपाने तीर्थयात्रा करत निळोबांच्या घरी गेले.

मी पंढरीहून आलो आहे. दोन-तीन दिवस तुमच्याकडे मला राहू द्या. तुमच्या घरी लग्न असल्याने माझ्या जेवनाचीही सोय होईल म्हणून मी आलो आहे असे म्हणत पडेल ती कामे करत विठ्ठल भट्ट त्यांच्यात मिसळून गेले.वऱ्हाड  घरी आल्यानंतरही त्यांनी उत्तम नियोजन केले. सर्व कामे वऱ्हाडाला  वाटेला लावेपर्यंत भटांच्या रूपाने पांडुरंगाने करून घेतली. आणि चंद्रभागेला आदराने वाटे लावले. सर्व पाहुणे गेल्यावर शेलापागोटे देऊन विठ्ठलभटांना  मान द्यावा म्हणून निळोबांनी त्यांना हाक मारली.

परंतु नुकताच घरात शिरलेला विठोबा कुठेही दिसेनासा झाला. निळोबांनी ओळखले हा विठोबा दुसरा तिसरा कोणी नसून वैकुंठपंढरीचा प्रत्यक्ष पांडुरंग होता. निळोबा रडू लागले. आणि म्हणाले हे दयासागरा मी शरण आलो तुम्हाला असे म्हणत निळोबांनी त्यांच्यावर अभंग ही रचला. संत निळोबाराय यांनी एकूण 1900 अभंगांच्या रचना केल्याचे सांगितले जाते. अशा या महान संताला कोटी कोटी प्रणाम .

Leave a Comment