संत कैकाडी महाराज |Sant Kaikadi Maharaj

अलीकडच्या काळातील महान तपचर्या करणारे श्री कैकाडी महाराज ( Sant Kaikadi Maharaj ) हे एकमेव संत होय. राष्ट्रसंत, महान तपस्वी संत राजाराम भागुजी जाधव म्हणजेच कैकाडी महाराज होय. त्यांना काही जण कैकाडी बाबा म्हणायचे. अहमदनगर जिल्ह्यातील सरस्वती नदीच्या तटावर वसलेले श्रीपुरनगर अर्थात श्रीगोंदा हे तालुक्याचे ठिकाण असून तेथून 30 किलोमीटर अंतरावर मांडवगण नावाचे गाव आहे. साधू संतांची भूमी असलेल्या याच गावी मांडव्य ऋषींची समाधी आणि तपोभूमी आहे. आणि म्हणूनच या गावाला मांडवगण असे नाव पडले.

याच मांडवगण गावात कटाक्ष आणि वटाक्ष नावाच्या दोन नद्या एकत्र येऊन संगम पावतात. या संगमा जवळच असलेल्या वनात मांडव्य ऋषींची समाधी आणि स्वयंभू श्री सिद्धेश्वराचे मंदिर आहे. तसेच सती सावित्री व कैकाडी महाराज यांचाही जन्म याच गावात झाला होता.येथेच कैकाडी महाराजांचे वडील श्रीमंत भागुजी खंडूजी जाधव राहत होते. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तसेच तामिळनाडू अशा ठिकाणी आढळणारा हा कैकाडी समाज भटक्या विमुक्त जातीत मोडतो. कैकाडी महाराजांचे वडील भागुजी  जाधव हे या गावातच वास्तव्यास होते. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी होती.

म्हणजेच कैकाडी महाराजांना दोन भाऊ आणि एक बहीण होती. त्यांचे थोरले बंधू पांडुरंग भागुजी जाधव हे मांडवगण याच ठिकाणी असतात. तसेच धाकटे बंधू कोंडीराम बुवा जाधव हे पंढरपूरला वास्तव्यास असतात. त्यांची आई रेऊबाई यांनी त्यांच्यावर फार महान संस्कार करून त्यांना वाढवले. तसेच पत्नी विठ्ठलाई ( कोंडाबाई ) यांची त्यांना भक्कम साथ होती. त्यांचे पुतणे ह. भ. प. श्री रामदास उर्फ शिवराज कोंडीराम जाधव हे पंढरपूर मध्ये श्री कैकाडी महाराज यांच्या मठाचे कामकाज पाहतात. तर दुसरे पुतणे ह. भ.प.श्री भागुजी उर्फ भागवत पांडुरंग जाधव हे मांडवगण येथेच निवासी असतात.

 राष्ट्रसंत श्री कैकाडी महाराज यांचा जन्म राम नवमीला इ. स 1907 मध्ये मांडवगण या ठिकाणी झाला. आणि मृत्यू  21ऑक्टोबर 1978 या दिवशी पंढरपूर मध्ये झाला. त्यांना एकूण 71 वर्षांचे आयुष्य मिळाले. त्यांच्या या आयुष्यात त्यांनी संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण दिली. मानवांनो माणुसकीला जागा, माणुसकीला जागा, जरा माणसात मिसळूनी वागा. असा संदेश ते समाजाला द्यायचे. जगाला असा दिव्य संदेश देणाऱ्या महान तपस्वी संत कैकाडी महाराजांनी आपण कमीत कमी 60 वर्षे तरी तपचर्या करावी असा निर्धार केला होता. म्हणून एक दिवस ते अचानक त्यांच्या या सुखी कुटुंबातून सर्व  सुखांचा त्याग करून घराबाहेर पडले.

आणि त्यानंतर त्यांच्या मनात” हे विश्वचि माझे घर” अशी भावना निर्माण झाली व त्यांनी समाज परिवर्तनासाठी स्वतःचा देह झिजवला. त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले. त्यामुळे त्यांना कन्नड, तेलगू अशा काही भाषाही येत होत्या.त्यांच्या प्रबोधनातून हे दिसून येते.त्यांनी महाराष्ट्रसह अनेक प्रांतामध्ये जाऊन समाज प्रबोधन केले व कठीण  तपचर्या करत देवाचे मनोमन नामस्मरण केले.त्यांच्या त्या कडक तपचर्येमध्ये 36 वर्ष त्यांनी मौन पाळले, 12 वर्षे सतत उभे राहूनच तपचर्या केली. उभे राहूनच ते झोपत होते, हिमालयात जाऊन 5 वर्ष तप केले. तसेच 2 वर्षे ते अज्ञात वासात राहिले. आणि या सर्व तपश्चर्या त्यांनी एकाच वेळेस पूर्ण केल्या.

ते अज्ञातवासात असताना त्यांना परमेश्वराने एका लहान बालकाच्या रूपात साक्षात दर्शन दिल्याचेही सांगितले जाते.राष्ट्संत श्री कैकाडी महाराजांनी आपल्या कारकीर्दीत कोणाकडूनही पैसे घेतले नाही. तसेच ते कपडेही फार कमी वापरायचे. साधी राहणी  व कधीही अन्न वाया जाऊ देत नसत. तसेच कोणालाही पाया पडू देत नसत.” तुम्ही देव होऊ नका, संत होऊ नका तुम्ही फक्त माणसं व्हा माणसं  “ हाच संदेश ते समाजाला देत होते.म्हणून-

संत कैकाडी कैकाडी I दरारा आसमंती II
 कुळ-विठूचे लावून I खनिल्या विषमतेच्या भिंती II

अशा थोर काव्यरचना अनेक संत महापुरुषांकडून केल्या जातात. कीर्तने, प्रवचने, अंधश्रद्धा निर्मूलन, बालविवाहास प्रतिबंध,अस्पृश्यता निर्मूलन याद्वारेच त्यांनी समाज प्रबोधन केले. त्यानंतर पंढरपूर येथे मंदिर बांधण्यासाठी भाविकांकडून त्यांनी सहस्त्रकोटी नाम जप करून घेतला. कैकाडी बाबांचे बंधू कोंडीराम काका यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्री बाबांच्या प्रेरणेने अनाथ मंदिराची निर्मिती करून सर्व जगाला एकात्मतेची शिकवण दिली.

या मंदिरामध्ये अजून पर्यंत रोज गोरगरिबांना अन्नदान व वस्त्रदान केले जाते. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन ते खूप आवडीने म्हणत. परमपूज्य रामदास महाराज जाधव.( पंढरपूर) हे राष्ट्रसंत कैकाडी महाराजांचे पुतणे आणि संत कोंडीराम काकांचे ते चिरंजीव होते. ते पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे कामकाज पहातात.     

   कैकाडी महाराज मठ पंढरपूर Kaikadi Maharaj Math

हा मठ पंढरपूरचे विशेष आकर्षण आहे. भारताच्या ऐतिहासिक आणि प्राचीन काळामधील या मठात एक भारतमाता मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये ज्या मूळ मानवापासून सर्व जगाची उत्पत्ती झाली त्याची मूर्ती आपणास पाहावयास मिळते. तसेच या मंदिरामध्ये तिन्ही लोक आपणास पहावयास मिळतात. स्वर्गलोक, पृथ्वीलोक,आणि पाताळलोक अशी या मठाची निर्मिती करण्यात आलेली आहे. माशाच्या तोंडासारखा मठाच्या प्रवेशद्वाराचा आकार  तयार केलेला आहे तसेच पार्वती सोबत गणपती, कौशल्ल्या मातेसोबत श्रीराम, अंजना माते सोबत श्री हनुमान, रेणुका मातेसोबत श्री परशुराम, माता देवकी आणि पिता वसुदेव यांच्या सोबत श्रीकृष्ण अशा देवतांच्या मुर्त्या बसवण्यात आलेल्या आहेत.

त्याचप्रमाणे ब्रह्म विष्णू महेश यांच्यासह  श्री गुरुदेव दत्त मंदिर आणि भारतमाता शकुंतलाबाई यांची झोपडी अशी छोटी छोटी मंदिरेही आहेत. गजानन महाराज, साईबाबा, गाडगे महाराज,  श्री स्वामी समर्थ, स्वामी स्वरूपानंद, श्री वल्लभाचार्य,संत सावता माळी, संत रोहिदास, संत कबीर, अशा अनेक महान संतमहापुरुषांच्या मूर्त्याही येथे  बसवण्यात आलेल्या  आहेत. एवढेच नव्हे तर मठात भारतीय स्वराज्य संस्थापक महात्मा गांधी आणि अशा अनेक स्वातंत्र्यवीरांच्या मूर्त्या आणि देखावे बसवलेले आहेत. तसेच महाराजांच्या तपचर्येसंबंधित देखावेहि येथे बसवण्यात आलेले आहेत.

एवढेच नव्हे तर महाभारतातील काही देखावे, सूर्यनारायण आणि अष्टगृह असणारा देखावा, श्री विष्णू व त्यांचे बारा अवतार दाखवणारा देखावा, हनुमान लंकेला जाताना ची पूर्णाकृती असे अनेक प्रकारचे देखावे या मठात आपणास पहावयास मिळतात.मुर्त्या आणि कलाकृती यांनी साकारलेला  हा मठ एक आगळा वेगळा मठ आहे. असा मठ कुठेही आपणास पहावयास मिळणार नाही. त्याचप्रमाणे बद्रीनाथ धाम, रामेश्वर धाम, द्वारका धाम अशा अनेक धामांच्या कलाकृतीही तेथे बसवण्यात आलेल्या आहेत.त्याचप्रमाणे मेरू पर्वत जो समुद्रमंथनासाठी प्रख्यात आहे.

तसेच राम लक्ष्मण आणि सीता यांचा सीतेच्या वनवासातील देखावा, भक्त पुंडलिकांचा आई-वडिलांसोबत चा देखावा, तसेच यमराज देखावा ही येथे आहे.भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाष चंद्र बोस असे देखावेहि तेथे आहेत, त्याच प्रमाणे पृथ्वीलोक  गोष्ट आणि काही देखाव्यांबद्दलची माहिती त्या ठिकाणी आपणास लिहिलेली पहावयास मिळते. एवढेच नव्हे तर काही चित्र स्वरूपात देखावे सादर करण्यात आलेले आहे.

Leave a Comment