संत जोगा (Sant Joga Parmanand ) मूळचे महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये असलेल्या बार्शी या गावचे रहिवासी होते. “राहे बार्शी माझी आपण l ईश्वर चिंतन करून l कालक्रमण करीतसे l असा उल्लेख दासो दिगंबर कृत संत विजय ग्रंथात आठव्या प्रसंगात आढळतो. संत जोगा परमानंद यांची निश्चित जन्मतिथी उपलब्ध नाही परंतु संत जोगा हे तेरावे शतकातील महापुरुष होते हे नक्की. इसवी सन 1338 मध्ये त्यांनी समाधी घेतली, म्हणजेच माघ वद्य चतुर्थी शके 1260 हा काळ त्यांच्या समाधी काळ म्हणून वर्तवीला जातो. ते संत नामदेवांच्या समकालीन होते.
‘भक्तविजय’ या ग्रंथात महिपती महाराज असे म्हणतात की ,संत जोगा परमानंद जातीने शूद्र असून त्यांचा जन्म तेली समाजातील एका कुटुंबात झाला होता. त्यांच्या गुरुचे परमानंद हे होते आणि त्यांचे नाव जोगा होते त्यामुळे त्यामुळे त्यांना जोगा- परमानंद असे संबोधले जाई कारण ही गुरु शिष्याची जोडी त्याकाळी प्रसिद्ध होती. . ते भगवंताची नित्यनेमाने उपासना करीत होते. त्यांनी आयुष्यभर वैराग्य पाळल्याचे सांगितले जाते. त्यांचा दृष्टिकोन विशाल होता, प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी त्यांनी चांगल्या प्रकारे करून दाखवल्या परंतु त्यांच्या मते प्रपंचातील सुख हे क्षणभंगूर, क्षणैक आहे, शाश्वत सुख प्राप्त करायचे असल्यास कठोर ईश्वर भक्ती करून परमात्म्याची प्राप्ती केली पाहिजे. संत चरित्रकार महिपती त्यांच्याविषयी म्हणतात,
“जोगा परमानंद भक्त। बारस्त ग्रामात होता राहत॥
अखंड आणि विरक्त। वैराग्य भरीत सर्वदा ॥ “
संत जोगा यांच्या कठोर ईश्वर भक्तीमुळे आणि वैराग्यवृत्तीने ते लोकांमध्ये आदरणीय मानले जाऊ लागले. जोगा परमानंद वृत्तीने अतिशय विरक्त होते. त्यांनी आयुष्यभर साधुत्व पत्करले होते. त्यांनी जीवनभर कसलाच हव्यास ठेवला नाही व संपत्तीची लालसा धरली नाही, म्हणून ते सत्त्वशील साधुपुरुष म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या आयुष्यातील बराच काळ भजन आणि नाम स्मरणात जात असायचा तसेच ते उच्च दर्जाचे कवी होते.पृथ्वीतलावर सर्वाभूती परमेश्वर भरलेला असून सर्व प्राणिमात्र परमेश्वराचे निरनिराळे अवतार आहेत. असा त्यांचा विश्वास होता, आणि त्याप्रमाणेच ते वागत व जगत होते.
ते नामदेवांच्या परिवारातील असल्याने नेहमीच पंढरपूराला जात होते. व ईश्वर भक्तीत विलीन होत होते. संत जोगा हे पंढरीच्या विठ्ठलाचे उपासक असल्याने त्यांच्याकडे माणसांविषयी, संतसज्जनांविषयी व्यापक समान दृष्टी होती. आपल्या अंतःकरणात देव प्रगट व्हावा अशी इच्छा त्यांनी मनी बाळगली होती. ते गीतेचे अभ्यासक आणि उपासक होते. त्यातच त्यांना परमानंद मिळत होता. ते रोज मंदिरात जात आणि नाम जप करत आणि गीतेतील एक, एक श्लोक ते म्हणायचे. त्याचप्रमाणे संत जोगा जमिनीवर उठत बसत एक एक नमस्कार घालीत देवळाकडे जायचे असा त्यांचा नित्यक्रम होता, असे सांगितले जाते.
त्यांच्या एका आख्यायिकेनुसार सांगितले जाते की, जोगा महाराज नित्यक्रमाने देवळाकडे नमस्कार करीत जात असताना एके दिवशी त्यांच्या कृपा आशीर्वादाने एका सावकारास पुत्ररत्न प्राप्त झाले. म्हणून त्या सावकाराने जोगा महाराजांना मोठ्या थाटाचा भरजरी पीतांबर नेसवला; नेसलेले नविन वस्त्र जमिनीवर नमस्कार घालताना मळेल म्हणून जोगा यांनी सकाळी देवळाकडे जाताना नमस्कार जरा हळूहळू आणि जपून घातले. त्यामुळे जोगा महाराजांना मंदिरात पोहोचण्यास बराच उशीर झाला.
रोजच्याप्रमाणे नमस्कार घातले पाहिजेत तसे ते घातले नसल्यामुळे.दुपार झाली तरी ७०० नमस्काराची संख्या पुर्ण झाली नव्हती. आपल्या नित्यनमस्कारास उशीर होऊन आरतीची वेळ चुकल्यामुळे ते फार दुःखी झाले आणि याचे कारण नवा पीतांबरच ठरल्यामुळे पीतांबराचा आपणास मोह पडला ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी स्वदेहास कठोर शिक्षा करण्याचे ठरविले. जोगांनी ती शिक्षा म्हणून एका शेतकऱ्याकडून दोन बैल घेतले आणि त्या बदल्यात त्या शेतकऱ्याला त्यांनी ते पितांबर दिले. त्यांनी आपल्या पायाला दोऱ्या बांधल्या आणि त्या दोऱ्या बैलांच्या जूवाला बांधून त्यांना पळवले. बैलं सैरावैरा पळल्यामुळे त्यांना जखमा झाल्या, तेव्हा पांडुरंगाने येऊन दोऱ्या तोडून काढले अशी माहिती सांगितली जाते. असे महिपतींनी भक्त विजयात म्हटले आहे.
असे त्यांनी स्वतःला देह दुःख करून घेतले होते. एवढा ध्यास त्यांनी ईश्वरभक्ती टळल्याचा करून घेतला होता. आणि मग तेथून पुढे त्यांनी कायमची विरक्ती स्वीकारली. “वृषभ पळती अरण्यात। त्यामागे ओढत जातसे॥” अशा प्रकारची काव्यरचना त्यासंबंधित उपलब्ध आहे ‘ पुढे महिपती म्हणतात.
“मग आपुले सोडूनि चरण। तयासी दिधले अलिंगन।
कृपादृष्टी पाहतांचि जाण। दिव्य शरीर जाहले॥”
श्रीविठ्ठल जोगा यांना म्हणतात, देहास एवढे कडक शासन का केले? आणि नंतर ईश्वरी कृपाशीर्वादाने जोगाचे शरीर पुन्हा पूर्ववत झाले. अशा वैराग्यशील संतांची चमत्कार कथा अभंगरचनेतून ते सांगतात. जोगा परमानंदांचे आजही सहा अभंग रचना उपलब्ध आहेत. ते उत्तम दर्जाचे आणि प्रचलित कवी होते. ईश्वर चिंतनातून आणि विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून त्यांनी बरेच अभंग, कविता, आणि काव्यरचना लिहिलेल्या असाव्यात पण संत जोगा परमानंद खूप जुन्या काळातील संत असल्यामुळे त्यांचे साहित्य जास्त प्रमाणात उपलब्ध नाही. जोगांचे अभंग लिहिण्याचे काम संत नामदेवांचे गुरूविसोबा खेचर आणि जनाबाई यांनी केल्याचे सांगितले जाते.
त्यांचे अभंग आणि काव्यरचना कमी प्रमाणात आहेत पण विविध विषयांना विचारात घेऊन केलेल्या आहेत. श्रीविठ्ठल भेट, सद्गुरुकृपा, ईश्वर भेट, संतदर्शन व त्यांच्याबद्दल सद्भाव यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी अभंगरचना केल्या आहेत.जशी नामदेव महाराजांच्या अभंगात प्रेरणा होती, तशी संत जोगा महाराजांच्या अभंगातून भक्तांच्या जीवनातील आर्तता, अनुताप, वात्सल्य, कारुण्य, विस्मय इत्यादी भावनांची जाणीव दिसून येते, त्याप्रमाणे जोगा परमानंदाच्या अभंगातून उत्कटतेचाही प्रत्यय आपणास येतो. त्यांना जी भावावस्था प्राप्त होत असे त्याचे वर्णन त्यांनी एका अभंगात व्यक्त केले आहे. असाच एक अनुभव पुढील अभंगातून ते मांडतात,
“मन निवाले निवाले। कैसे समाधान झाले।
संत आलिया अवसरी। नवल आरतीयांची परी।”
सद्गुरूभेटीने गुरूंबद्दलची भावावस्था ते येथे व्यक्त करतात. सद्गुरू भेटीने डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले आहेत; असे सांगून संत जोगी म्हणतात संताची संगत,सोबत आणि त्यांचा सहवास म्हणजे एक प्रकारचा आनंद सोहळाच असतो. संतभेट आणि गुरुभेट झाल्यानंतर मनाची काय अवस्था होते हे त्यांनी वर्णन करून सांगितले आहे
‘आनंदले नरनारी। परमानंद प्रगटले l
“परामानंदे वाहे पूर। तेणे गहिवर न संवरे।
प्रेम पाझरती लोचन। पाहता जगजीवन।”
अशा प्रकारची जोगांची भक्तिभावना आहे. तसेच त्यांचे वर्णनकौशल्य अत्यंत प्रभावी आहे. त्यांच्या कविता हया भक्तिमय आणि भावनिक आहेत. परमेश्वराच्या दर्शनाने त्यांना झालेला परम आनंद आणि पांडुरंगाचे विलोभनीय रूप हे त्यांनी त्यांच्या कवितेतून व्यक्त केले आहे. जोगा परमानंदाची सहज आणि सोपी अशीच होती. मनातल्या खऱ्या भक्ति भावाने त्यांचे शब्द काहीसे ओलावले आहेत. त्यांच्या काही अभंगामधून त्यांनी भक्तीभावनेतून केलेले ईश्वराचे वर्णन अगदी आनंदाश्रू ढाळणारे आहेत.
तसेच त्यांनी वर्णिलेले प्रसंग मुळातच भक्तिभावना व्यक्त करण्यासाठी आवेगाचा गहिवर आहे. त्यांचे सर्वच काव्य भक्तिमय आहेत. नेहमीच संत जोगा यांनी आपल्या मनातील संतांविषयी वाटणारी आदराची भावना, संतांचे परमार्थ कार्य, ईश्वरविषयक भक्तिभाव जोगा आपल्या कवितेतून व्यक्त करतात. तसेच संत जोगा परमानंदांनी श्रीकृष्णभक्तीविषयी बऱ्याच अभंगरचनाही केलेल्या आहेत. आणि हे सर्व ज्ञान केवळ गुरू परमानंदांमुळे मला प्राप्त झालेले आहे असे ते सांगतात. ‘उठोनि प्राप्त काळी। येती कृष्णाजवळी। जोगा म्हणे तेणे। परमानंद काज।’ असे कृष्णभक्तीचे वर्णन जोगा परमानंद आपल्या कवितेतून करताना दिसतात. कृष्णाचे सुंदर रूप, त्याचे विविध चमत्कार, स्वरूप विषयांचे सुंदर वर्णन साध्या सोप्या भाषेत जोगानी केलेले आहे.
जोगा परमानंद यांनी अभंग, आरत्या आणि काही पदे यांची रचना केली आहेत. त्यांनी एक सुरेख पण अर्थपूर्ण रूपकही रचले आहे. हे संपूर्ण रूपक तंबाखू ओढण्याच्या चिलीम प्रकारावर आधारित आहे. जोगांना चिलीम ओढण्याचे व्यसन होते असे सांगितले जाते या चिलीम ओढण्याच्या प्रकारालाच गुरगुंडी असेही म्हणतात. या व्यसनाचे वर्णन त्यांनी त्यांच्या अभंगातून केलेले आहे
“बैसोनि संता घरी हो। घेतली गुरगुंडी ॥ ध्रु०्॥
आधी ब्रह्मांड नारळ। मेरू सत्त्व तो आढळ ॥
सत्व, रज, तम असे त्रिगुण,मी ’पणाचा अहंकार, विषय वासनांचा धूर निघून जाणे आणि आत्मानंद संतकृपेने मानवी देहाला लाभणे, अशी एका रूपकातून रचना तसेच पारमार्थिक विचार व्यक्त करण्यासाठी संत जोगा परमानंदांनी सर्वसामान्यांना सांगितली. जेणेकरून अनाकलनीय, आध्यात्मिक विचार सामान्य लोकांना सहज समजावा. आणि म्हणूनच त्यांनी रूपकाचा वापर काव्यरचना मधून केला असावा असे वाटते.. असे रूपक म्हणजे त्यांचा स्वतःचा अध्यात्मिक भक्तिमय अनुभव आणि विचार म्हणून त्यांनी सांगितले आहेत असे आढळून येते..
1 thought on “संत जोगा परमानंद | Sant Joga Parmanand”