संत गोरा कुंभार | Sant Gora Kumbhar

विठ्ठलाचे भक्त आणि वैराग्याचे धगधगीत प्रतीक संत गोरोबा कुंभार (Sant Gora Kumbhar ) यांचा जन्म सन 1267 मध्ये महाराष्ट्रातील धाराशिव (उस्मानाबाद ) तेर या गावी झाला. तेर या गावाला तेर ढोकी असेही संबोधलं जातं. तेर या गावाचा 3000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. पूर्वी सातवाहन राजाच्या काळात पैठण ही मुख्य राजधानी आणि तेर हे गाव उपराजधानी समजले जायचे. परंतु सध्या हे गाव फक्त एक खेडे म्हणून राहिले आहे.

कुंभार हा पहिला कलावंत किंवा शास्त्रज्ञ मानला जातो. कारण त्यांना लागणारे चाक एक शास्त्र आहे. तसेच त्यांना लागणारी भट्टी आणि इतर साहित्य  हिसुद्धा शास्त्रीय सामग्री आहे. एका अर्थानं कुंभार हा जुन्या काळातील भांड्याचा कारखानदार होता. त्यामुळे त्याकाळी कुंभार इतके श्रीमंत होते की कुंभार इतरांना कर्जही देत असत. पूर्वी सगळा संसार गाडग्या मडक्यांचा होता. उतरंडी पासून ते रांजणापर्यंत सगळीकडे खापराची भांडी असायची. आज खापराच्या वस्तू घरामध्ये नाहीत परंतु सगळा इतिहास खापरापासूनच सुरू झालेला आहे.

म्हणून वस्तू संग्रहालयामध्ये आपनास खापराच्या वस्तू पाहावयास मिळतात. आणि हडप्पा, मोहनजोदाडो पासून खापरांचे नमुने पाहायला मिळतात. भारतामध्ये जवळजवळ आकरा हजार वर्षांचा इतिहास खापरांच्या वस्तूमध्ये सामावलेला होता.त्याकाळी निर्गुण मातीला सगुण बनवण्याचे काम हे कुंभाराचे होते.त्याकाळी कुंभाराला कुलाल म्हणायचे. कुलाल म्हणजेच कुंभार,तेर गावातील माती काम जगप्रसिद्ध काम समजलं जायचं.जगभर इथले व्यापारी संबंध होते. परदेशातील प्राचीन काळातील वस्तू अजूनही येथे आपणास पहावयास मिळतात. म्हणजेच इथले कुंभार जगप्रसिद्ध कुंभार होते.

जगभर त्यांनी बनवलेली मातीची भांडी विकली जात होती. या कामांमध्ये गावांमधील सर्व धर्मांतील लोकांचा सहभाग होता. या गावात पूर्वीपासूनच सत्तर महादेवाची मंदिरे आहेत. तसेच प्राचीन काळातील जैन मंदिर आहे एवढेच नव्हे तर या गावात लिंगायत समाजाचे केंद्र, नाथ संप्रदाय केंद्र, माडवा सांप्रदाय केंद्र, आणि गोरोबांच्या रुपात वारकरी संप्रदायाचे केंद्र होते.एवढी सगळी परंपरा असलेल्या या गावात कुलाल वंशी संत गोरोबांचे कर्तुत्व एवढे भारी ठरले की आज  ते गाव गोरोबांच्या नावाने ओळखले जाते.वडील माधव बुवा आणि आई रखुमाई यांना एकूण आठ अपत्ये होती.

तेर नगरीत गोरोबांचे कुटुंब सुरुवातीपासूनच  धार्मिक वृत्तीचे होते. ते त्यांच्याच गावातील काळेश्वर या ग्रामदैवताचे उपासक होते. जातीने कुंभार असलेले हे कुटुंब कुंभारकाम करून आपला उदरनिर्वाह करायचे. त्यांच्या वडिलांना गावात माधव बुवा म्हणून ओळखले जायचे. त्यांना एकूण आठ आपत्य होती. परंतु आठही आपत्य फार काळ टिकली नाहीत. आठही मुलांच्या मृत्यूनंतर माधव बुवांनी स्वतःच्या हाताने दारुण हृदयाने त्यांना पुरले. परंतु एके दिवशी साक्षात पांडुरंग माधवबुवा यांच्या घरी एका ब्राह्मणाच्या रूपात आले.

पांडुरंगाला ओळखताच माधव बुवांनी टाहो फोडला. आणि आपली सर्व हकीगत त्यांना सांगितली. माझ्या सर्व मुलांना मी स्वतःच्या हातानेच पुरल्याचे सांगताना मी फार दुःखी जीवन जगत आहे असे ते म्हणाले. मग पांडुरंगाने मी तुमच्या सातही मुलांना स्वर्गात पाठवले आहे असे सांगत एका मुलाला गोरीतून काढून त्यांच्या हातात दिले. आणि त्यांना गोरीतून काढल्यामुळे त्यांना गोरोबा नाव देण्यात आले.संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांचे ते समकालीन संत होते परंतु संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई,संत सोपान आदी संत मंडळींमध्ये ते वडीलधारी होते.

अशा या महान विठ्ठल भक्त असणाऱ्या गोरोबाकाकांनी शके 1239 चैत्र कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच 20 एप्रिल 1317 रोजी समाधि घेतली. त्यांची ही समाधी धाराशिव जिल्ह्यातील तेरढोकी गावात असून तेथे त्यांचे समाधीमंदिर आहे.त्यांना एकूण 50 वर्षांचे आयुष्य मिळाले.त्यांच्या या पन्नास वर्षांच्या आयुष्यात परंपरेने आलेले कुंभारकाम करत,विठ्ठल नामाचा जप करत, पांडुरंगाचे व संतांचे महात्म्य सांगणारे अनेक अभंग रचले. आणि या त्यांच्या मार्मिक अभंगामधूनच त्यांनी समाज प्रबोधन केले.

गोरोबाकाकांनी भरपूर अभंग रचल्याचे सांगितले जाते परंतु गोरोबांचे एकूण फक्त 23 अभंग पहायला मिळतात. त्यातील 15 अभंग त्यांनी संत नामदेवांवर लिहिलेले आहेत. तसेच अनेक संतांच्या अभंगामधून संत गोरोबा काकांची विठ्ठल भक्ती आणि त्यांच्या कर्मयोग व जीवन परिचय समजतो. संत मुक्ताबाई त्यांच्या अभंगातून म्हणतात….

संत हा गोरोबा,जुनाट पै जुने I हाती थापटणे अनुभवाचे II
परब्रम्ह म्हातारा, निवाला अंतरीI वैराग्याच्या वरी,पाल्हाळला ll

याचाच अर्थ जुन्यात जुने संत गोरोबा हे संत अनुभवाने फार श्रेष्ठ असून साक्षात परब्रह्म आहेत आणि आता ते अंतरी विसावले आहेत. अशा या महान संतांना लोटांगण घालून शरण जावे.

त्याचप्रमाणे संत एकनाथ महाराजांनी संत गोरोबा कुंभार ( Gora Kumbhar ) यांच्यावर एकूण 30 अभंग लिहिले. तसेच अनेक संतांनी आपापल्या अभंगांमधून संत गोरा कुंभार यांना वर्णिले. आणि या सर्व लिखाणामधूनच संत गोरा कुंभार यांची विठ्ठल भक्ती किती श्रेष्ठ होती ते आपणास दिसते. संत गोरोबा कुंभार यांच्या विषयी एक दीर्घ कथा संत एकनाथ महाराजांच्या अभंगातून  आपणास पाहावयास मिळते. ही कथा एवढी दीर्घ आणि प्रख्यात आहे की या कथेवर मराठी भाषेसह हिंदी, गुजराती, कानडी, तेलगू अशा अनेक भाषांमध्ये  चित्रपट तयार झाले. 80 वर्षापासून म्हणजेच 1940 पासून गोरोबाकाका वर चित्रपट  तयार झाले. आणि म्हणूनच संत गोरोबाकाका यांची भक्ती आणि महती सर्वदूर पसरली.

ती कथा अशी आहे की, ते एकदा भांडी तयार करण्यासाठी चिखल तुडवताना इतके विठ्ठल नामात दंग झाले की त्यांना त्यांचे मूल खेळ खेळत पायाखाली आल्याचे समजलेच नाही. बायको ओरडत होती. आजूबाजूचे लोक आरडाओरडा करत होती. तरी त्यांना समजलेच नाही. उलट मी माझे काम करत असताना तू मला का ओरडत आहेस म्हणून ते आपल्या बायकोवर धावून गेले. बायकोने रागावून तुम्ही माझे मूल मारले आहे असे म्हणत परत माझ्या अंगाला हात लावायचा नाही असे म्हटले. कदाचित त्यांची भक्ती किती श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी एकनाथ महाराजांनी असा हा चमत्कार सांगितला असावा.

बायकोच्या सांगण्यावरून मग त्यांनी पण घेतला की, परत मी तुझ्या अंगाला कधीच हात लावणार नाही. काही दिवस लोटल्यानंतर त्यांची पत्नी संती हिने आपली बहीण रामी हिला आपल्या वडिलांना सांगून गोरोबांशी लग्न करण्यास सांगितले. कारण तिला वाटले की, एकच मुलगा होता आणि तोही मृत पावला आणि त्यांनी माझ्या अंगाला हात लावणार नाही असा पणही घेतलेला आहे. परंतु आपणास आपत्य हवे आहे. मग सासर्‍यांनी अट घातली की माझ्या पहिल्या मुलीला जसे सांभाळले तसेच माझ्या या मुलीलाही सांभाळा.

मग रामीशी त्यांचा विवाह झाला. एक दिवस दोन्ही पत्नी गोरोबांच्या शेजारी झोपल्या असताना झोपेत नकळत त्यांनी दोघींचे हात आपल्या अंगावर ओढून घेतले. जेव्हा ते जागे झाले त्यावेळेस त्यांना पश्चाताप झाला  की आपण पण घेतला असताना सुद्धा आपल्या हातून हे कृत्य घडले. मग रागाने त्यांनी स्वतःचे दोन्हीही हात तोडून टाकले. पुढे काम करता येत नसल्याने थोड्याच दिवसात गोरोबांचा संसार चालेनासा झाला. मग साक्षात पांडुरंगाने कुंभाराचे आणि रुक्मिणीने कुंभारनीचे रूप धारण करून गोरोबांकडे निघाले. एवढ्यात गरुड म्हणाले मीही येतो गाढवाचे रूप घेऊन.

तिघेही तेर या गावी गोरोबाकाकांकडे जाऊन त्यांची सर्व कामे करू लागले. आणि त्यांचा संसार भरभराटीस आणला. त्यावेळी त्या काळात असे सांगितले जाते की, साक्षात विठ्ठलाने मडकी बनवल्यामुळे त्या प्रत्येक मडक्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत असायचा. तसेच गोरोबांनी ज्या विटा बनवल्या होत्या त्या विटा पाण्यावर तरंगत असत. नंतर गोरोबांचे समकालीन सर्व संत आषाढी एकादशीला दिंडी घेऊन पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी निघाले. मग विठ्ठलाला असे वाटले की, हे आता गोरोबाकाका यांच्याकडे त्यांना घेण्यासाठी  येतील आणि मला ओळखतील म्हणून विठ्ठल पंढरपुरास निघून गेले.

परंतु तरीही ज्ञानदेवांच्या लक्षात आले की देव इथे येऊन गेलेले आहेत. हे त्यांनी गाडगे कानाला लावून विठ्ठल विठ्ठल आवाज ऐकून सांगितले. मग ते आपल्याबरोबर गोरोबा काकांना घेऊन पंढरपुरास गेले. आणि पंढरपूरच्या यात्रेतील कीर्तनाच्या वेळेस नामदेवांनी त्यांना हात वर करण्यास सांगितले. गोरोबा काकांनी हात वर करताच त्यांना नवीन हात फुटले.

आणि मग ते टाळ्या वाजू लागले. तेवढ्यात कीर्तनाच्या गर्दीतून त्यांचे मूल सुद्धा रांगत रांग आले. अशा या सहकारी अतिशय प्रिय मित्र संत नामदेवांच्या सहाय्याने गोरोबा काकांचा संसार परत पूर्वस्थ झाला. त्यामुळे गोरोबाकाकांच्या अनेक अभंगामधून संत नामदेवांचे गुणगान केल्याचे आढळते.

Leave a Comment