संत गाडगे बाबा | Sant Gadage Baba

संत गाडगे महाराज ( Sant Gadge Baba ) यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी शेंडगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती या ठिकाणी झाला होता. त्यांचे पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर असे होते. त्यांचा जन्म धोबी म्हणजेच परीट जातीत  एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांच्या  घरची परिस्थिती एकदम गरीबीची आणि हालाखीची होती. त्यांचे वडील नेहमी दारूच्या नशेमध्ये असायचे. त्यामुळे अतिशय हालाखीच्या परिस्थितीत त्त्यांना जगावे लागत असे.

शेवटी त्यांच्या वडिलांचे निधन या दारूच्या व्यसनापायीच झाले. त्यांच्या वडिलांनी मरताना त्यांच्या आईला सांगितले की तू माझ्या मुलाला व्यसनापासून दूर ठेव.या व्यसनापायी माझे फार मोठे नुकसान झाले आहे. तसे त्याचे होऊ नये. असे ते बायकोला नेहमीच म्हणायचे.वडिलांच्या निधनानंतर गाडगे महाराजांना त्यांच्या दोपूर येथील चंद्रभान मामांनी सांभाळले. त्यांची आई रोज मजुरी करून उदरनिर्वाह करत असे व गाडगे महाराज गोसावी भक्तांमध्ये गुरे राखायचे . नेहमीच गुरे राखताना ते गोसावीभक्त भजन करायचे. भक्ती गीते गायचे .

त्यांचे पाहून गाडगे महाराजांनाही भक्ती गीते गायचा आणि भजन करण्याचा नाद लागला. पुढे ते 14-15 वर्षाचे झाल्यावर त्यांच्या आईने त्यांच्या लग्नाचा विचार केला व त्यांचे लग्न कमलापूर या गावच्या कोंती नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह करून दिला. पुढे दोघेही मेहनतीने शेती करायला लागले. परंतु त्यांच्या आई सखुबाई यांचे 1मे 1923 रोजी निधन झाले आणि 5 मे 1923 रोजी त्यांचा एकुलता एक मुलगा गोविंदाचेही निधन झाले.या दुःखाने ते खचून न जाता ते आपल्या मेहनतीने संसार चालवत होते.

त्यांची शरीरयष्टी मजबूत होती. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मामाच्या शेतीवर घेतलेल्या कर्जामुळे त्यांची शेती सावकाराने लिहून घेतली. आणि सावकार जेव्हा त्या शेतीचा कब्जा घ्यायला आला तेव्हा गाडगे महाराज सावकाराच्या  पाठीमागे काठी घेऊन लागले. तसेच सावकाराच्या मागे त्यांनी बैल पळवले. आणि सावकारास पळवून लावले. त्याकाळी थोड्याशा कर्जापायी सावकार जमिनीचा कब्जा करत असत. परंतु महाराजांनी सावकाराला  पळून लावल्यामुळे ती एक क्रांतीच झाली. त्यामुळे लोक त्यांचे कौतुक करायला लागले.

आपले वडील व्यसनापायी मरण पावल्याने त्यांना त्यांच्या गरिबीची जाणीव होती. त्यामुळे ते लोकांना सांगत असायचे की गरिबीत जगावे परंतु सावकारी कर्ज घेऊ नये. परंतु लोक त्यांचे काही ऐकत नसत. याबरोबरच ते समाजाला नवस करू नये,देवाला कोंबडं कापू नये, असे सांगायचे. हळूहळू  काही लोकांना हे पटू  लागले. यातूनच त्यांना प्रबोधनाची आवड निर्माण होऊ लागली. पुढे ते महाराष्ट्र राज्यातील एक क्रांतिकारी संत म्हणून ओळखले जाऊ लागले.

याबरोबरच ते समाजसेवेचे कामही करू लागले. सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना जाऊन शिक्षणाचे व स्वच्छतेचे  महत्त्व ते पटवून देत होते. पुढे त्यांनी संपूर्ण आयुष्य दीनदलित व पीडीतांच्या सेवेत समर्पित केले होते. त्यानंतर ते सामाजिक कीर्तन व प्रबोधन करू लागले. व कीर्तनाच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना अंधश्रद्धा व अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाज सुधारक बनले.

त्यांनी दिनदुबळ्यांची,अपंगांची, आणि अनाथांची सेवा करण्यास सुरुवात केली. देवळात जाऊ नका, मूर्तीची पूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, देवाच्या बाह्यपूजेला महत्त्व देऊ नका अशी शिकवण त्यांनी आयुष्यभर समाजाला दिली. माणसात देव शोधणाऱ्या या महान संतांच्या कार्याला पाहून लोक त्यांना पैशाच्या आणि वस्तूंच्या स्वरूपात देणगी देऊ लागले. परंतु त्यांनी त्या संपत्तीचा उपयोग आपल्या जगण्यासाठी न करता त्या पैशांमधून त्यांनी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनाथ लोकांसाठी धर्मशाळा व अनाथाश्रम सुरू केले. रंजले गांजले दीनदुबळे अपंगांना हे आमच्यासाठी देव आहेत असे ते म्हणायचे आणि त्याच कामात ते रमायचे.

संत गाडगे महाराजांची वेशभूषा साधारण होती. डोक्यावर मोकळे केस त्यावर खापराची टोपी, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात मडके. असा त्यांचा वेश होता. महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या दुर्गुण दोषांची जाणीव करून देत असताना व्यसनाच्या आहारी जाऊ नका देवांच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातीभेद करू नका, देव दगडात नसून माणसात आहे असे ते प्रबोधन करत. त्यांच्या या प्रबोधनाचा परिणाम म्हणून सन 1931 मध्ये वरवंडे नावाच्या गावातील लोकांनी त्यांच्या गावात पूर्णपणे पशुहत्या बंद केली होती.

सन 1952 मध्ये पंढरपूर मध्ये एका कीर्तन परिषदेतून सर्व कीर्तनकारांनी दलितांची सेवा करण्यासाठी लोकांना प्रबोधन करावे असे मत त्यांनी मांडले. तसेच गाडगेबाबांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यात सतत सहभाग घेतल्याचेही सांगितले जाते.तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गाडगेबाबांना गुरुस्थानी मानत होते त्याचप्रमाणे महात्मा गांधी व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशीही अधून मधून त्यांची सल्लामसलत होत असे..गाडगे महाराज संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानत होते. परंतु ते म्हणत की मी कुणाचा गुरु नाही मला कोणी शिष्य नाही. त्यांचे हे विचार समाजाला समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा आणि वऱ्हाडी बोली भाषेचा वापर करत होते.

 गाडगे महाराजांनी त्यांच्या मुलीच्या बारशाच्या वेळी रूढीप्रमाणे दारू मटणाच्या जेवणाऐवजी गोड जेवण दिले होते. ते स्वतःहून प्रत्येक अडीनडीच्या कामासाठी तसेच जनहिताच्या कामासाठी सर्वांना एकवटून घ्यायचे. पुढे त्यांनी भारतभर भ्रमण करून कोणी अडचणीत सापडले तर त्याला मदत करायचे . कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी हे काम आयुष्यभर केले. महाराजांनी आळंदी,देहू,पंढरपूर, नाशिकचे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. दवाखाने बांधले. गरीब लोकांसाठी अन्नछत्र उभारली. कुष्ठरोग्यांची सेवा केली. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस याप्रमाणे त्यांनी कीर्तनाद्वारे आपले लोक शिक्षणाचे कार्य ऋणमोचन मधून विदर्भातून सुरू करून विदर्भामध्ये लक्ष्मीनारायणाचे एक मंदिरही बांधले.

भुकेलेला अन्न,तहानलेल्या पाणी, बेघरांना आसरा, अंधरोगीना  औषधोपचार, गरिबांना शिक्षण, उघड्या नागड्यांना वस्त्र, मुक्या प्राण्यांना अभय, दुःखी निराशांना हिम्मत, गरीब तरुणांचे लग्न असा दशसूत्री कार्यक्रम त्यांनी आयुष्यभर राबवला.तसेच त्यांनी पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा बांधली. संत गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनामधून लोक जागृत करण्याचे कार्य केले. “ गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला “ हे भजन ते आवडीने म्हणत असत . त्यांच्या जीवनावर देवकीनंदन गोपाला असा चित्रपटही प्रसिद्धआहे. शेवटी 1फेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास घेतला. अशा या धकाधकीच्या जीवनात त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढे नदीच्या पुलाजवळ 20 डिसेंबर 1956 रोजी देहावसान झाले.

” गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” या भजनाच्या नामस्मरणात प्रचार करणाऱ्या दृढ श्रद्धा असणाऱ्या या कर्त्या पुरुषाची, समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. तसेच अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नावही देण्यात आलेले आहे.संत गाडगेबाबांच्या चरित्राबद्दल आचार्य अत्रे म्हणतात की सिंहाला पहावे वनात हत्तीला पहावे  रानात तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात.
              

Leave a Comment