संत भानुदास | Sant Bhanudas

संत भानुदास ( Sant Bhanudas ) हे संत एकनाथ महाराज यांचे पंजोबा होते. शके 1370 ते शके 1435 पर्यंत त्यांचा कार्यकाल आढळतो. संत भानुदास यांचा जन्म इ.स.1448 मध्ये ऋग्वेदी ब्राह्मण कुळात झाला होता. त्यांच्या घराण्यात विठ्ठलाची भक्ती वंश परंपरेने चालत आलेली होती आणि त्यांनी स्वतः आयुष्यभर पांडुरंगाची भक्ती आणि कीर्तन सेवा केली. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरा समोर सोळखांबी मंडपाजवळ म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उजव्या बाजूला त्यांची समाधी आहे.

त्यांचे वडील एक ऋग्वेदी ब्राह्मण होते व ते फार हुशार आणि ज्ञानी होते. त्यांच्या लग्नानंतर त्यांना पहिला मुलगा झाला होता. त्यांच्या मुलाचा व्रतबंद झाल्यानंतर तो आपल्या वडिलांसोबत अध्ययन करू लागला. अभ्यासाच्या वेळी तो ब्राह्मण त्याच्यावर एकदा फार रागावला व त्याला शिक्षा केली. पुढे त्या भीतीने तो मुलगा घरातून रुसून गेला . असेच फिरताना त्या मुलाला एक देऊळ दिसले आणि तो तेथे लपून बसला त्या प्राचीन मंदिरात सूर्यनारायणाची मूर्ती होती. सूर्यदेवाला शरण जाऊन तो मुलगा देवाची भक्ती करू लागला ,देवाने दर्शन देऊन त्याला पांडुरंगाची सेवा करण्यास सांगितले.

एके दिवशी तो ब्राह्मण पुत्र सहज देवळाबाहेर आल्यानंतर एका व्यक्तीने त्याला ओळखले. त्या व्यक्तीने त्याला हाक मारताच तो पळत जाऊन लगेच देवळात दडून बसला. आपला मुलगा सापडत नाही म्हणून त्याचे आई-वडील फार दुःखी होते व तपासात होते. त्या व्यक्तीने घरी आल्यानंतर मुलगा देवळात आहे ही बातमी त्याच्या आई-वडिलांना सांगितली.

मग त्याचे आई-वडील त्या व्यक्तीला घेऊन सोबत काही गावकऱ्यांनाही घेऊन देवळाकडे गेले. देवळामध्ये शिरताच आपला पुत्र नारायण मूर्तीच्या चरणावर मस्तक ठेवून सेवा करत आहे हे पाहून आई वडील गहिवरले. त्यांनी त्याला विचारले बाळा तू या देवळात तुझी तहान भूक कशी भागवतोस. त्यावेळेस त्या मुलाने सांगितले की येथे दररोज एक ब्राह्मण येऊन मला भोजन देतो. तो ब्राह्मण साक्षात सूर्यदेव असून तोच आपल्या मुलाची देखरेख करत आहे असा विश्वास त्या भानुदासाच्या आई वडिलांना मिळाला. ते त्या मुलाला घरी घेऊन गेले व सूर्याच्या प्रसादाने आपला मुलगा आपल्याला परत मिळाला याचा त्यांना आनंद झाला. त्यामुळे त्यांनी त्या मुलाचे नाव भानुदास असे ठेवले.

भानुदास परत पळून जाईन म्हणून अभ्यासासाठी त्याच्या आई-वडिलांनी त्याला परत कधीच आग्रह केला नाही. त्यांनी त्याच्या शिक्षणाची काळजी न करता त्याला सोबत घेऊन प्रसन्न मनाने आपला प्रपंच करत होते. भानुदास मोठा झाल्यावर त्याच्या मातापित्याने त्याचा विवाह करून दिला. भरपूर काळ ईश्वर भक्तीत घातल्यानंतर काही दिवसांनी भानुदासाचे आई-वडील वृद्धापकाळामुळे भानुदासाला सोडून गेले. त्यानंतर सर्व प्रपंच भानुदासाच्या अंगावर पडला. कसलाही लोभ न धरता तो फक्त देवाची भक्ती करत राहिला .काही दिवसांनी त्याला प्रपंच चालवणे कठीण होऊ लागले.

त्याचे हे हाल पाहून काही सदग्रहस्थांनी काही पैसे जमा करून भानुदासाच्या हवाली केले आणि त्याला काहीतरी धंदापाणी करण्यास सुचवले. तसेच त्याला त्या पैशांचे कापड खरेदी करून व्यापार करण्यास सुचवले. भानुदासला हा विचार पटला. तसेच तेथील कापड व्यापाऱ्यांनी भानुदासला व्यापार करण्यास शिकवले. परंतु व्यापारातील किमतीचा खोटेपणा त्याला लपवता येत नसे. तो सरळ सरळ मुद्दल किंमत आणि नफ्याची किंमतही गिऱ्हाईकाला सांगत असे. त्यामुळे गिऱ्हाईकाला त्याची व्यापार करण्याची पद्धत फार पसंद पडत असे. पुढे काही दिवसातच सर्व गिऱ्हाईक भानुदासाकडे वळू लागले.

आजूबाजूच्या व्यापाऱ्यांचा माल खपेना. त्यामुळे जवळपास सर्वच व्यापारी भानुदासाचा द्वेष करू लागले. एकदा सर्व व्यापारी फेरीला गेले असता बाजार आटपून सर्वजण एका देवळात बिऱ्हाड करून राहिले. त्याच दिवशी त्या गावात जवळच हरिदासाचे कीर्तन होते. भानुदासने सर्वाना कीर्तनास जाण्याचा आग्रह केला, परंतु त्यातून कोणीही आपला माल देवळात सोडून कीर्तनाकडे येईना. भानुदास त्यांना म्हणाला तुम्ही येथे थांबला आहात तर माझा मालही तुम्ही सांभाळा तोपर्यंत मी कीर्तनाला जातो.

त्या व्यापाऱ्यांना त्याचा राग असल्यामुळे सर्वांनी त्याचा माल सांभाळण्यास नकार दिला. भानूदासचा सर्व भाव पांडुरंगाच्या चरणी असल्यामुळे भानुदासाने मालाची कुठलीही पर्वा न करता तो किर्तनाला निघून गेला आणि तो दिवस एकादशीचा होता. परंतु इकडे त्या दृष्ट व्यापाऱ्यांनी त्याचा माल वाहणारा घोडा सोडून दिला आणि त्याचे कापडाचे गाठोडे लपवून ठेवले. त्यांना त्याचे कापडाचे गाठोडे आपापसात वाटून घ्यायचे होते. परंतु पांडुरंगाने एका साध्या ब्राम्हणाचे रूप धारण करून तो घोडा पकडला
तसेच तो ब्राह्मण गुप्तरूप धारण करून भानुदासाच्या गाठोड्याजवळ बसला.

व्यापाऱ्यांच्या कपट वृत्तीमुळे त्या रात्री खरोखरच तेथे दरोडा पडला आणि सर्वांचा माल चोरांनी पळून नेहला. सर्व व्यापारी टाहो फोडत होते तेवढ्यात भानुदास कीर्तन अटपून तेथे आला. भानुदासाचा घोडा पकडून ठेवलेल्या ब्राह्मणाकडे भानुदास जाताच तो ब्राह्मण अदृश्य झाला तसेच भानुदास आपल्या कपड्यांच्या गाठोड्याकडे येताच त्याला त्याचे गाठोडे मिळाले. सर्वांची चोरी झाली आणि त्याची नाही तसेच घोड्याजवळील ब्राह्मण अचानक अदृश्य झालेला पाहून भानुदासाला साक्षात पांडुरंगाने हे घडवल्याचे कळले. तेव्हापासून भानुदास कायमस्वरूपी कीर्तन करू लागला.

संत भानुदास यांची आणखी एक कथा प्रचलित आहे. त्याकाळी विजयनगर साम्राज्याचे राजे कृष्णदेवराय महाराज यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील विठ्ठल मूर्ती आपल्या राज्यात घेऊन जाऊन तिची प्रतिष्ठापना केली होती. पुढे आषाढ वारी जवळ आल्यानंतर वारकरी संप्रदायातील भक्त, वारकरी आणि संत विठ्ठल दर्शनासाठी कासावीस झाले होते. परंतु विठ्ठलमूर्ती राजाकडे कशी मागायची किंवा मागायला कोण जाणार म्हणून सगळेजण चिंतीत होते . अशात संत भानुदास यांनी त्यांना आश्वासन दिले की मी विठ्ठल मूर्ती परत आणेल. त्याच रात्री संत भानुदास राजाने स्थापित केलेल्या विठ्ठल मूर्ती समोर जाऊन “चल देवा माझ्या बरोबर, सगळे भक्त तुझी वाट पाहत आहेत असे म्हणाले.”

विठ्ठलाने आपल्या गळ्यातील हिरे जडीत माळ भानुदासाच्या गळ्यात टाकली आणि तू जा मी येतो असे म्हणाले. दुसऱ्या दिवशी राजाला विठ्ठल मूर्तीच्या गळ्यात रत्नजडित हार न दिसल्यामुळे त्यांनी सैन्याला आदेश दिले की चोर शोधून काढा. शोधात भानुदासाच्या गळ्यात विठ्ठलाचा हार दिसल्यामुळे त्यांना राजाच्या सैन्याने बंदी बनवले. शिक्षा म्हणून भानुदासाला सुळावर चढवण्यासाठी ज्या लाकडी खांबाला बांधले होते त्या वाळलेल्या लाकडाला दुसऱ्या दिवशी पालवी फुटली.ही बातमी राजाला पोहोचल्यानंतर राजा चकित होऊन त्याला पश्चाताप झाला.

पांडुरंग फक्त भक्तीनेच आपल्याकडे येऊ शकतो हे राजाला कळाले म्हणून राजाने विठ्ठल मूर्ती भानुदासाकडे सुपूर्त केली. अशा प्रकारे विठ्ठल मूर्ती परत पंढरपूरला विठ्ठल मंदिरात आणण्यासाठी संत भानुदास यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांनी विठ्ठल मूर्ती परत विठ्ठल मंदिरात आणून ठेवली. असे म्हटले जाते की पांडुरंगाने संत श्री भानुदास यांच्या भक्तीतून प्रसन्न होऊन त्यांच्या कुळात संत एकनाथ महाराज रूपात जन्म घेतला होता.

श्री अशोक देशपांडे यांनी “देव आले पंढरीला “ ( Dev ale Pandharila ) अशी कादंबरी लिहिली आहे. न.ची. केळकर यांचे “संत भानुदास” असे नाटक आहे. संत भानुदास यांचे काही अभंग आणि अख्यायिका आजही जतन केलेल्या आहेत.

Leave a Comment