संत बहिणाबाई पाठक ( Sant Bahinabai Pathak ) यांचा जन्म इ.स. 1628 मध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील देवगाव रंगाऱ्याचे येथे वेळगंगा नदीच्या काठी झाला होता. हे देवगाव गोदावरी नदीच्या उत्तरेस आणि घृणेश्वर मंदिराच्या पश्चिमेस वसलेले आहे. त्यांची आई जानकी आणि वडील आऊजी या मातापित्यांनी त्यांचे त्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षीच लग्न करून दिले. देवगाव रंगारी या गावापासून पाच कोस अंतरावर शिऊर गावात रत्नाकर उर्फ गंगाधर पाठक यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.
त्यांना दोन मुले असल्याचे सांगितले जाते. गंगाधर पाठकांच्या घरी पूर्वीपासूनच ज्योतिष विद्या होती. आणि आध्यात्मिक वळण असलेले हे कुटुंब होते. या घराण्याचा पूर्वीपासूनच वैद्यकीय व्यवसाय होता. लग्नाच्या वेळी बहिणाबाईंचे वय तीन वर्षे होते. बहिणाबाई आणि गंगाधर पाठक यांच्या वयामध्ये 27 वर्षांचे अंतर होते. त्या काळात लग्न लवकर केली जायची. त्यातही गंगाधर पाठकांचे हे दुसरे लग्न होते.पुढे लग्नानंतर बहिणाबाईंच्या वडिलांचे त्यांच्या भावकीशी असे भांडण झाले की शेवटी बहिणाबाईचे वडील यांना रात्रीच गावातून बाहेर पडावे लागले.
पुढे जायचे कुठे म्हणून ते शनिशिंगणापूर आणि त्यानंतर पंढरपूरकडे निघाले. सगळे पंढरपूरला आल्यानंतर बहिणाबाईंनी पंढरपूरलाच राहण्याची इच्छा व्यक्त केली . परंतु गंगाधर पाठक यांनी सांगितले की जिथे ब्राह्मण वस्ती जास्त आहे तिथे आपल्याला राहणे आवश्यक आहे. खरे तर बहिणाबाईंच्या सासरकडे वेदांचे पठण जर सोडले तर सर्व आध्यात्मिक गोष्टी वर्ज होत्या. गीता, शास्त्र,हरी नाम या गोष्टींना सुद्धा हे घराणे मानत नव्हते. गंगाधर पाठक पंढरपूरला राहायचे नको म्हटल्यानंतर हे सगळे रहिमतपूरला आले. रहिमतपूरला साधारणता दोन वर्षे या कुटुंबाचे वास्तव्य होते.
त्यावेळी बहिणाबाईंचे वय साधारणता दहा अकरा वर्षाचे होते. त्यानंतर पुढे कोल्हापूरला ते हिरामभट यांच्या घरी वास्तव्यास होते. या ठिकाणी त्यांचे बराच काळ वास्तव्य होते. तेथील जयराम स्वामी यांच्या कीर्तनाला त्या जायच्या. जयराम स्वामी कीर्तनासाठी नेहमीच संत तुकाराम महाराजांचे अभंग घ्यायचे. त्या काळात तुकाराम महाराजांच्या हयातीतच त्यांच्याच अभंगावर अनेक ठिकाणी कीर्तने व्हायची. त्याचवेळी बहिणाबाई पाठक यांना तुकाराम महाराजांबद्दलची ओढ निर्माण झाली.
तुकाराम महाराजांची पदे ऐकून त्या फार आकर्षित झाल्या.आणि त्यांना वयाच्या 12 व्या वर्षी तुकाराम महाराजांचा ध्यास लागला. परंतु बहिणाबाईंच्या कुटुंबाला ही न आवडणारी गोष्ट होती. परंतु बहिणाबाईंना तुकारामांच्या भक्तीची एवढी ओढ लागली की काही काळानंतर त्यांना लोक भेटण्यास येऊ लागली.आपल्या पत्नीला एवढ्या कमी वयात लोक भेटायला यायला लागली हे पाठकांना सहन होत नव्हते. त्यांचं असं म्हणणं होतं की लोक येतील आणि बायकोला नमस्कार केल्यानंतर आम्हाला काहीही किंमत राहणार नाही. त्यामुळे त्यांचा पुरुषत्व अहंकार जागृत झाला होता. बायकोच्या नावाने विचारत विचारत लोक आमच्या घराकडे येतात.
जरी तिच्या लौकिक नावाने ते विचारत असतील तरी हे आम्हाला जमणार नाही असे ते म्हणायचे. परंतु बहिणाबाई नवऱ्याने समजून सांगून सुद्धा ऐकत नव्हत्या. अद्वैतांचे तत्वज्ञान घेण्याची बहिणाबाईंना उत्सुकता लागली होती. आपल्याला हे तत्त्वज्ञान नको आहे. आपल्या घरात हरीचे कथन नको हे समजून सांगून सुद्धा बहिणाबाई ऐकत नाहीत म्हणून गंगाधर पाठकांनी बहिणाबाईंना त्रास देण्यास सुरुवात केली होती. शेवटी शेवटी गंगाधर पाठकांनी ही बाई मेलेली बरी अशी विधाने करण्यास कमी केली नाही.
भेटायला आलेल्या लोकांमध्ये आणि बहिणाबाई मध्ये द्वेष निर्माण करण्याचे कामही त्यांनी केले. एवढं होऊन सुद्धा बहिणाबाई तुकाराम महाराजांच्या भक्ती पासून दूर जात नव्हत्या. शेवटी त्यांनी नवऱ्याला सांगितले की तुकाराम महाराज माझ्या स्वप्नात येऊन त्यांनी मला शिष्यत्व दिलेले आहे. आणि मी त्यांना गुरु केले आहे व मी त्यांची शिष्या झाली आहे. शेवटी गंगाधर पाठकांनी त्यांना परत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की अग, वेडे तू असे काय करतेस आपण वेदांचे पठण करणारे ब्राह्मण आहोत. आपल्यामध्ये हे चालत नाही. तुला शूद्र लोक भेटण्यास येत आहेत. आपण ब्राह्मण आहोत आपल्या घराण्यामध्ये वेदांचे पठन सोडून काहीही नको.
परंतु बहिणाबाई आपला मार्ग सोडण्यास तयार नव्हत्या आणि आता तर त्यांनी तुकाराम महाराजांचा अनुग्रह घेतलेला होता. यामध्ये गंगाधर पाठकांना पूर्ण दोषी समजण्यात येत नाही कारण त्याकाळी समाजामध्ये ती परिस्थितीच होती. ही परिस्थिती समजून घेऊन बहिणाबाई हा सर्व अत्याचार सहन करत होत्या. कधी कधी गंगाधर पाठक त्यांना मार देत होते. हे सगळे बघून त्यांचे घरमालक हिरमभट यांना खूप त्रास होत होता. बहिणाबाई आपल्या ध्येयापासून दूर जात नाहीत आणि गंगाधर पाठक तर त्यांना समजून सांगून थकले होते. शेवटी गंगाधर पाठकांनी पत्नीला सोडून देण्याचा विचार केला.
अशा परिस्थितीतच गंगाधर पाठक फार आजारी पडले.जवळजवळ एक महिना ते आजारीच होते.परंतु या एक महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी नवऱ्याने आपल्याला किती त्रास दिला याच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. त्यांनी एक महिनाभर नवऱ्याची अशी सेवा केली की, माझ्यासाठी माझा नवरा देव आहे असे समजून त्यांनी नवऱ्याची खूप सेवा केली.आणि गंगाधर पाठक बरे झाले. आणि त्यांच्या लक्षात आले की माझ्या या दुःखाच्या काळात मला मदत करणारी फक्त माझी बायको बहिणाबाई होती. आणि अशा पत्नीला मी सोडून देण्याचा विचार करत होतो आणि त्यानंतर त्यांनी स्वतःमध्ये परिवर्तन करण्याचा निश्चय केला.
अशा या 12-13 वर्षांच्या बहिणाबाईने नवऱ्यामध्ये परिवर्तन करून नवऱ्याला सांगितले की आता आपल्याला देहूला जायचे आहे. आणि तुकाराम महाराजांना त्या विनंती करू लागल्या कि, तुकोबा तुझी माझी भेट का होऊ शकत नाही. आता तर माझा जीव जाण्याची वेळ आलेली आहे. तरी तू मला का भेटत नाही. वेदांचे पठण करू म्हणणारे आता तुमची सतत भक्ती करू असे म्हणत आहेत. आणि मग दोघा नवरा बायकोने तुकाराम महाराजांच्या गावांमध्ये जाऊन राहायचे असा दृढ निश्चय केला आणि हे कुटुंब देहू गावात वास्तव्यासाठी गेले.देहूच्या नदीकाठी स्नान करून मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दोघेही गेले. आणि तेथेच त्या दोघांनाही संत तुकाराम महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन झाले.त्यावर बहिणाबाईंनी एक सुंदर अभंग ही रचला आहे.
त्यावेळी बहिणाबाई अगदी प्रसन्न मनाने सांगतात की यासाठीच मी हा सगळा अट्टाहास केला होता. मग गावातील कोंडाजींकडे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. आणि आनंद ओवरी मध्ये त्यांना राहण्यास जागा देण्यात आली. आता हे कुटुंब देहू मध्ये राहायला लागले. वयाच्या तिसऱ्या वर्षी तीस वर्षाच्या पतीबरोबर झालेले लग्न आणि त्यानंतर सासर कडून त्यांना झालेला त्रास आणि त्यानंतर आलेले हे सुखाचे दिवस बहिणाबाईंसाठी फार आनंदाचे होते. रोज तेथे तुकाराम महाराजांचे कीर्तन व्हायची. कोल्हापूर मध्ये जयराम स्वामी वडगावकर यांच्या कीर्तनातून तुकाराम महाराजांच्या अभंगातून ध्येय वेड्या झालेल्या बहिणाबाई आता तर प्रत्यक्षात तुकाराम महाराजांचे कीर्तने ऐकत होत्या. प्रत्यक्ष तुकाराम महाराजांच्या तोंडून निरूपण ऐकत होत्या.
त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या सर्व गोष्टी त्यांच्या अभंगामधून मांडलेल्या आहेत. तुका केवळ पांडुरंग आहे. असे त्या त्यांच्या अभंगातून सांगतात. प्रत्यक्ष तुकाराम महाराजांच्या सहवासात राहून बहिणाबाई तुकाराम महाराजांचे रूप म्हणजे केवळ पांडुरंग आहे असे सांगतात. यावरून तुकाराम महाराजांची पांडुरंग भक्ती लक्षात येते. काही ठिकाणी तर देहूच्या मंदिराची फडकती ध्वजा म्हणजे बहिणाबाई असे बहिणाबाईंचे वर्णन केलेले आढळते. संत तुकाराम महाराजांच्या चरित्राचा बराचसा भाग बहिणाबाईंच्या अभंगांमधून उमजतो. वेदांचे पठण आणि यज्ञ फक्त ब्राह्मणांनी करायचे आमच्यासारख्यांनी का नाही करायचे अशाप्रकारे जर वेद आमच्यापासून जर रुसून गेला असेल तर त्या वेदांचाही बाप विठ्ठल आहे.
आणि या विठ्ठलाला आम्ही आमच्या कंठाशी धरले आहे. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल या नामघोषामध्ये आम्ही राहात आहोत आणि हे सर्व तत्त्वज्ञान लोकांपर्यंत आम्ही पोहोचवले आहे. असे तुकाराम महाराज सांगायचे.पुढे गंगाधर पाठकांचे कुटुंब देहू मध्ये राहत असतानाच एकीकडे बहिणाबाईंचा सासरचा त्रास संपून देहू मध्ये बहिणाबाई नवऱ्यासोबत अतिशय आनंदात राहत होत्या आणि देहू मध्ये नंतर मंम्बाजी भटांचा त्रास सुरू झाला. हा मंबा देहू गावामध्ये अतिशय कर्मठ ब्राह्मण होता.
सगळे लोक तुकाराम महाराजांना विठ्ठल म्हणत असताना हा मंबा त्यांची हिनवणी करायचा. एक दिवस हा मंबा बहिणाबाई आणि गंगाधर पाठकांकडे जाऊन मला गुरु करून घ्या असे म्हणू लागला. परंतु बहिणाबाईंनी सांगितले की असे होणार नाही मी कोल्हापूर मध्ये असताना स्वप्नामध्येच संत तुकाराम महाराजांना गुरु करून घेतले आहे. आणि मी महाराजांचा अनुग्रह घेतलेला आहे आणि म्हणूनच मी या देहू गावामध्ये आलेली आहे. अतिशय विषारी, कपटी आणि क्रोधी असलेल्या या मंबाने तू एका शूद्र शेतकरी,अज्ञानी, बलिभद्र माणसाला गुरु करून घेतले आहे अशा प्रकारे बरच काही भरून देण्याचा प्रयत्न केला.
हे सर्व बहिणाबाईंनी त्यांच्या अभंगामधून जर सांगितले नसते तर तुकाराम महाराजांचा बराचसा इतिहास आपल्यापासून दूरच राहिला असता. पुढे एवढे सांगून सुद्धा बहिणाबाई ऐकत नाहीत हे पाहून एक दिवस मंबाजी भटाने बहिणाबाईंची आवडती गाय त्याच्या मठात नेली. त्या गाईला ते मारत असायचे जेणेकरून बहिणाबाईंना त्रास होईल. तरी बहिणाबाई ऐकत नव्हत्या. शेवटी तुम्हाला आम्ही ब्राह्मणांमधून काढून टाकू अशी धमकी मंबा त्यांना देऊ लागला. शेवटी मम्बाजीने न्यायालयामध्ये पुण्याच्या अप्पाजी गोसावी यांच्याकडे तुकाराम महाराज आणि बहिणाबाईंची तक्रार दाखल केली.
एक शूद्र वेदाचे तत्त्वज्ञान सांगतोय आणि एक ब्राह्मण त्यांच्याकडून गुरु दीक्षा घेत आहेत असे मंबाजीने त्यांच्या तक्रारीत लिहिले होते. शेवटचे दोन ते तीन वर्ष तुकाराम महाराजांचा सहवास बहिणाबाईंना देहू मध्ये लाभला. पुढे याच ठिकाणी देहूमध्ये बहिणाबाईंना एक सुंदर मुलगी झाली होती. त्या मुलीचे नाव त्यांनी काशी असे ठेवले होते.
त्यानंतर त्या परत शिऊर या त्यांच्या सासरगावी आल्या. वयाच्या साधारणता 20 -21 व्या वर्षी त्या देहू वरून येथे आल्या. त्यांच्या वयाच्या 19 व्या वर्षी त्यांना काशी नावाची मुलगी झाली होती. पुढे शिऊरला त्या 50 ते 55 वर्ष राहिल्या आणि पुढे वयाच्या 72 व्या वर्षी इस 1700 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. देहुत असतानापासून क्षणोक्षणी तुकारामांचे भजन गाणाऱ्या बहिणाबाई आता तुकारामामय झाल्या होत्या. एवढेच नव्हे तर तुकारामांचे वर्णन करताना एका अभंगामध्ये बहिणाबाई म्हणतात तुकाराम आणि पांडुरंगा मध्ये काही फरक नाही तसेच तुकाराम महाराज हे गौतम बुद्धांचे एक पूर्ण रूप आहे.
गौतम बुद्ध हे विठ्ठलाच्या रूपाने जर कोणाला पाहिजे असतील तर ते संत तुकाराम महाराज यांच्यामध्ये आहेत.पुढे ते म्हणतात “तुकोबांचे हात लिहितात जे जे l ते ते सहज पांडुरंगे ll
गाथेतील प्रत्येक अक्षर हे पांडुरंग आहे असे त्या म्हणतात. एवढी तुकाराम महाराजांविषयीची कृतज्ञता त्यांच्यामध्ये होती बहिणाबाईंचे एकूण ७३२ अभंग प्रकाशीत आले आहेत. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस!, या प्रसिद्ध अभंगाची रचना साध्वी बहिणाबाई यांचीच आहे. तो संपूर्ण अभंग असा –
संत कृपा झाली इमारत फळा आली |
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया |
नामा तयाचा किंकर तेणे विस्तरिले आवार |
जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला ll
तुका झालासे कळस भजन करा सावकाश |
बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा ll
अशा त्यांच्या अनेक प्रसिद्ध, प्रख्यात अभंगरचना भक्तांसाठी उपलब्ध आहेत.
Chhan