समाज सुधारक साधू वासवानी | Sadhu Vaswani

आपल्या देशात अनेक समाजसुधारक होऊन गेले. ज्यांचे कार्य फार मोठे होते. असेच एक भारतीय संस्कृती आणि सहिष्णुतेचे उपासक आणि समाज सुधारक म्हणजे साधू वासवानी ( Sadhu Vaswani ) होते. त्यांचे संपूर्ण नाव साधू थांवरदास लीलाराम वासवानी असे होते. साधू वासवानी यांचा जन्म सध्या पाकिस्तान मध्ये असलेल्या सिंध प्रांतातील हैदराबाद येथे 25 नोव्हेंबर 1879 रोजी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव लीलाराम आणि आईचे नाव वरणदेवी असे होते.

ब्रिटिशांची सत्ता येण्यापूर्वी कल्लोरा आणि तारपुर सरकारमध्ये उच्चशिक्षित हिंदू धर्मीय लोक महत्त्वाच्या जागेवर होते. साधू वासवानी यांचे कुटुंब सुद्धा असेच पांढरपेशा समाजातील होते. ते लहान असताना हैदराबाद येथे एका अकॅडमी मध्ये शिकले  होते. लहानपणी त्यांनी सर्वप्रथम ब्रह्म बांधव उपाध्याय नावाच्या बंगालमधील एका ब्राह्मणाकडून उपनिषदे शिकून घेतली होती. साधू वासवानी यांनी हिंदू धर्म सोबतच इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचा सुद्धा अभ्यास केला होता. पुढे त्यांना उपनिषदांचे  एक कुशल समर्थक आणि कुराण आणि बायबल चे एक उत्तम ट्रान्सलेटर म्हणून ओळखले जाऊ लागले.

मॅट्रिकची परीक्षा पास केल्यानंतर बी ए चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते 1899 मध्ये मुंबईमध्ये आले आणि मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी ए ची पदवी घेतली. दरम्यान त्यांना एन एस शिष्यवृत्ती सुद्धा मिळाली होती.ही शिष्यवृत्ती त्यांना कराची येथील सिंध महाविद्यालयात पदवीधर शिक्षण घेत असताना मिळाली होती आणि 1902 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी ए ची पदवी प्राप्त केले होती. त्यानंतर साधू वासवानी यांनी आपले संपूर्ण आयुष्य देवाची भक्ती आणि इतरांची सेवा करण्यासाठी आपल्या आईची परवानगी मागितली. परंतु त्यांच्या आईची इच्छा मात्र वेगळी होती. कोणत्याही आईला वाटेल त्याचप्रमाणे त्यांनाही आपल्या मुलाने मोठे व्हावे, पुढे जावे,काम करावे, पैसे मिळवावे असेच वाटत होते. म्हणून त्यांच्या आईने त्यांना असे करण्यास परवानगी नाकारली होती.

पुढे आईच्या समाधानासाठी साधू वासवानी यांनी शिक्षकाची नोकरी करण्यास सुरुवात केली. मग त्यांच्या आईने त्यांचे लग्न करण्याची इच्छा दाखवली. तेव्हा मात्र साधू वासवानी यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची म्हणजे कधीही लग्न न करण्याची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी कलकत्ता येथील मेट्रो पोलीटन  कॉलेज मध्ये इतिहास आणि तत्पज्ञान या विषयांचे प्राध्यापक म्हणून पद स्वीकारले. आणि तेथे कलकत्त्यातच त्यांना त्यांचे गुरु श्री प्रमोदलाल सेन भेटले. जेव्हा साधू वासवानी यांनी एम ए ची पदवी प्राप्त केली होती त्यानंतर त्यांच्या वयाच्या साधारणता 22 व्या वर्षी वासवानी यांनी युनिव्हर्स अकॅडमीत नोकरी केली.

काही महिन्यानंतर म्हणजेच 1903 मध्ये त्यांनी सिटी कॉलेज कलकत्ता येथे त्यांनी इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. तसेच लाहोर येथे दयाल सिंह कॉलेज मध्ये त्यांनी प्राध्यापकाची नोकरी केली. तसेच त्यांनी बिहारच्या पटीयाला मध्ये महेंद्र कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही काही काळ काम पाहिले .तसेच 1908 मध्ये म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यापूर्वी ते कराची ला टीजी सायन्स कॉलेजमध्ये इंग्रजी आणि तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक होते. जून 1910 मध्ये साधू वासवानी तीस वर्षांचे असताना ते आणि त्यांचे गुरु प्रमोद लाल सेन हे मुंबईवरून बर्लिन ला एका भाषणासाठी गेले होते.

ऑगस्ट मध्ये त्यांनी बर्लिन मधल्या वेस्ट काँग्रेस च्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ रिलीजन या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्यावेळी तेथे त्यांनी धर्माचा प्रसार करत शांततेचा संदेश दिला होता. ते एक उत्तम वक्ता आणि धार्मिक एकतेचे प्रसारक होते. तसेच ते महात्मा गांधींच्या अहिंसा चळवळीचे समर्थक होते.पुढे त्यांच्या वयाच्या 40 व्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले.त्यांनी त्यांच्या आईला काम करण्याचं आणि कमाई करून आणण्याचे जे वचन दिले होते ते त्यांनी आईच्या हयातीत पूर्ण केले होते. परंतु आईच्या अंत्यसंस्कारानंतर साधू वासवानी यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता.

 1948 मध्ये साधू वासवानी यांनी सिंध मधून भारतात स्थलांतर केले होते. ते पाकिस्तान ने नव्याने स्थापित केलेल्या राज्यात होते. त्यावेळी अनेक सिंधी बांधव भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले होते. तसेच साधू वासवानी भारतात आल्यानंतर पुण्यात स्थायिक झाले होते. साधू वासवानी महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीचे सुरुवातीचे निष्ठावान समर्थक होते. भारतात भूमिहीनांना भूमी देण्यासाठी त्यांनी आवाज उठवला होता.आणि सहकारी शेतीचे त्यांनी समर्थन केले होते. त्यांच्या प्रस्तावावर आणि त्यांच्या प्रभावाखालीच काँग्रेसच्या सिंध राजकीय परिषदेने असहकार चळवळीच्या कार्यक्रमाबद्दल ठराव मंजूर केला होता.

त्यादरम्यान त्यांनी अनेक पुस्तके सुद्धा लिहिली. त्यापैकी इंडिया प्रेझेंट, यंग इंडिया, इंडियाज ॲडव्हेंचर , इंडिया इन चेंज, द सिक्रेट ऑफ एशिया, माय मदर लँड, बिल्डर्स ऑफ टुमारो, अँड अ पोस्ट ऑफ फ्रीडम अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यातील त्यांची काही पुस्तके फार महत्त्वाची ठरली. साधू वासवानी हे आधुनिक भारताचे खरे संत होते. आणि ते काळाच्याही पुढे चालणारे होते. त्यांनी महिला सशक्तिकरण आणि महिलांच्या उच्च शिक्षणासाठी मोठे काम केले होते. त्याकाळी ते स्वातंत्र्यासाठी झगडत होते. त्यावेळी महिला स्वयंपाक घरापुरत्याच मर्यादित होत्या. अशा काळात ते महिलांच्या समान  हक्कांसाठी लढत होते.

1929 मध्ये साधू वासवानी यांनी सखी सत्संगाची सुरुवात केली होती. हा सत्संग महिलांना मोठ्या प्रमाणात एकत्र आणण्यासाठी महत्त्वाचा ठरला होता. स्त्रियांमध्ये फार मोठी क्षमता आहे स्त्री म्हणजे एक मोठी शक्ती आहे स्त्रियांचा समाज आणि राष्ट्राच्या भल्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. ही त्यांची कल्पना त्यांनी बोलून दाखवली होती. साधू वासवानी असे सांगत होते की मुलींना शिक्षण देणे हे तिच्यासाठी तिचे सामाजिक बंधन तोडणे आणि तिची क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक आहे. आणि या विचारातूनच पुढे 1933 मध्ये साधू वासवानी यांनी “मीरा कॉलेज ऑफ गर्ल्स” या वास्तूची स्थापना केली होती.

या शाळेने शिक्षणाच्या मीरा चळवळीची कोनशिला घातली. संत मीरा शैक्षणिक चळवळ सुरू करून प्रथम मुलींसाठी शाळा आणि नंतर त्यांच्यासाठी महाविद्यालय काढण्यात आली. त्यांच्या मीरा शैक्षणिक चळवळीचे कार्यालय पुणे येथेच आहे. पुण्याचे मीरा कॉलेज ऑफ गर्ल त्यासाठी प्रसिद्ध आहे. शिवाय साधू वासवानी यांनी 1931 मध्ये पुण्यात साधू वासवानी मिशनची स्थापना केली होती. साधू वासवानी मिशन हे पृथ्वीवरचे जीवसृष्टी म्हणजे त्यात माणसे,प्राणी, पक्षी,आणि सर्व सजीव आपण सर्व एकच आहोत अशी शिकवण देते आणि आपल्या जीवनात अध्यात्माचे महत्त्व पटवून देते. किर्तन, प्रार्थना,ध्यान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतरांबद्दल प्रेम या गोष्टींसाठी प्रोत्साहन देते. हे मिशन आपल्याला आपण इतरांपासून वेगळे नाहीत आणि आपण सर्व एकच आहोत याची शिकवण देते.

साधू वासवानी यांनी आपल्या कार्याची मशाल पुढे 1965 मध्ये दादा वासवानी यांच्या हाती सोपवली होती. दादा वासवानी हे साधू वासवानी यांच्या भावाचे पुत्र होते. पुढे 16 जानेवारी 1966 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी साधू वासवानी यांनी देह त्याग केला. त्यांच्या निधनाने जगभरात शोककळा पसरली होती. पुण्यात साधू वासवानी यांच्या नावाने चौक सुद्धा आहे. आजही पुण्यातील साधू वासवानी मिशन कॅम्पसमध्ये असंख्य भाविक त्यांच्या पवित्र समाधीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत असतात.

Leave a Comment